महाराज शहाजी भोसले समाधीस्थळ – होडीगेरे

by Pranjal Wagh
670 views
महाराजा शहाजी समाधी स्थळ

सांतेबेन्नूरच्या जगावेगळ्या पुष्कर्णीचे सौंदर्य डोळ्यात भरभरून सामावून घेतलं आणि चन्नगिरीच्या किल्ल्याच्या रोखाने गाडी सोडणार इतक्यात संभाजीच्या तोंडून उद्गार निघाले, “महाराज शहाजी भोसले समाधी, होडीगेरे 18 किमी!”

“काय?!”, आश्चर्यचकित होऊन केदार आणि मी त्याच्याकडे पाहिले तोच त्याने एका बोर्डाकडे बोट दाखवले.

आणि पाहतो तो खरोखर कर्नाटक पर्यटन विभागाच्या माणसांनी तिथे एक दिशादर्शक फलक लावलेला. त्यावर ठळक अक्षरात आमच्यापासून समाधीचं अंतर लिहिले होते. आम्ही उभे होतो तिथून केवळ 18 किमीवर होडीगेरे गाव होतं.

होडीगेरे!

छत्रपती शिवरायांचे तीर्थरूप महाराज शहाजी भोसले यांना जिथे शिकारीवर असताना अपघाती मृत्यू आला ते गाव म्हणजे होडीगेरे! पूर्वी याला “होडीकेरी” देखील म्हणत! प्लॅनची आखणी करताना किल्ले आणि मंदिरं यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे हे लक्षातच आलं नाही की होडीगेरे  इतकं जवळ आहे! तिघांचं क्षणात एकमत झालं की काहीही झालं तरी समाधी पाहायचीच!

गाडी सुरु करून आधी चन्नगिरीचा छोटेखानी किल्ला पाहिला! तिथले श्री रंगनाथ स्वामी मंदिर संकुल, देखणे बुरुज आणि दगडात कोरलेली बारव पाहून मन तृप्त झाले! पण आतुरता लागून राहिली होती ती महाराजसाहेबांच्या भेटीची! झपाझप चन्नगिरी उतरून गाडी गाठली अन सुसाट निघालो होडीगेरेच्या रोखाने!

चन्नगिरीचा छोटेखानी किल्ला

कर्नाटकातले रस्ते भलतेच गुळगुळीत आणि त्यात चन्नगिरी आणि परिसर हा “सुपारीभूमी” म्हणजेच “The Land Of Areca Nut” असल्यामुळे सगळीकडे खड्या कवायती फौजेसारख्या सुपारीच्या बागा सावधानमध्ये उभ्या ठाकल्या होत्या! वळणावर वळणं घेत आमची गाडी होडीगेरेजवळ येत गेली तसे कर्नाटक पर्यटन विभागाने लावलेले दिशादर्शक फलक दिसू लागले! इतक्या दुर्गम असलेल्या भागात, एखाद्या छोट्या खेड्यातसुद्धा हे फलक सरकारने लावावे याचे खरंच कौतुक वाटले!

होडीगेरे गावातून आमची गाडी बाहेर येताच रस्त्याच्या कडेला काही  विशाल वटवृक्ष दिसले. त्यांच्याच बाजूला, एक व्यवस्थित कुंपण आणि फाटक असलेले आवार नजरेस पडले आणि चटकन लक्षात आले – हीच महाराज शहाजींची समाधी! गाडी रस्त्याच्या कडेला लावून, कॅमेरे सरसावून आम्ही पटापट फाटकापाशी पोहोचलो आणि पाहतो तो काय? फाटकाला भलंमोठं टाळं ठोकून तिथला इसम बहुदा दुपारचं गरमागरम जेवायला घरी पसार झाला होता!

व्यवस्थित कुंपण आणि फाटक असलेले आवार नजरेस पडले आणि चटकन लक्षात आले - हीच महाराज शहाजींची समाधी!
व्यवस्थित कुंपण आणि फाटक असलेले आवार नजरेस पडले आणि चटकन लक्षात आले – हीच महाराज शहाजींची समाधी!

काही क्षण आम्ही तसेच स्तब्ध उभे राहिलो. अवतीभोवती नजर टाकली तर तिथे कोणीच नव्हतं. बहुदा दुपार असल्यामुळे माणसं जेवायला अथवा घरी झोप काढायला गेली असावीत. पण तिथल्या वडाखाली आपली दुचाकी लावून एक इसम फोन वर बोलत उभा होता. काहीच दिसेना म्हणून शेवटी त्याच्या रोखाने मी चालायला सुरुवात केली. जवळ जाताच नमस्कार करून हिंदीत बोललो,

“इथे समाधीच्या फाटकाला कुलूप आहे. कोणाकडे मिळेल चावी?”

सर्वप्रथम त्याचे उत्तर हिंदीत आले म्हणून हायसे वाटले पण तितक्यात तो बोलून गेला, ” मी पण इथला नाही! मी चन्नगिरीहुन इथे आलोय!”

आज काय आपल्याला मदत मिळत नाही असं वाटून आम्ही थोडे हिरमुसलो. पण तितक्यात त्याने हात करून आणखी एका दुचाकीस्वाराला थांबवून चावीबद्दल विचारले. तेव्हा समजले की इथला माणूस जेवायला घरी गेला होता. आम्ही पटकन म्हंटल, ” आम्ही येतो चावी घ्यायला, तुम्ही न्याल का?”

त्याची मंजुरी मिळताच केदार पटकन दुचाकीवर स्वार झाला. किक मारताच ते दोघेही गावाच्या रोखाने निघाले.

तितक्यात आमच्या मदतीस आलेल्या इसमाने न राहवून विचारले, ” हे कसलं स्थळ आहे?”

“ही महाराज शहाजी भोसले यांची समाधी आहे!”, आपोआप अभिमानाने मी उद्गारलो.

“कौन?”, त्याचा सवाल!

“महाराज शाहजी भोसले! छत्रपती शिवाजी महाराज के पिताजी! उनकी समाधी है यह!”

“अच्छा! अच्छा!”,  असं तो म्हणाला. पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून मी समजून गेलो की याला काही समजले नाही पण उगीच माझं समाधान व्हावं म्हणून तो होकारार्थी मन हलवतोय! आम्ही शाळा-कॉलेजातील वर्गात तरी दुसरं काय केलं होतं?

इतक्यात तिथून केदार चावी घेऊन आला. आम्ही पटापट कुलूप उघडलं, फाटक  उघडलं आणि आत प्रवेश् केला. समाधीस्थळाच्या फाटकातून आत जायला जशा पायऱ्या होत्या तसाच दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पसुद्धा होता! इथे आडवाटेला दिवसात बोटावर मोजण्याइतके लोकं येत असावीत पण तरीही इथे दिव्यांगांना प्रवेश मिळावा म्हणून तशी व्यवस्था केलेली होती! तसंच सर्व समाधी परिसर फुलझाडं लावून सुशोभित केलेला होता. उजव्या बाजूच्या भिंती जवळ पाण्याचा कूलरदेखील होता! या साऱ्या व्यवस्थेसाठी कर्नाटक पर्यटन विभागाचे आभार मानलेच पाहिजेत!

सर्वांना समाधी स्थळ पाहता यावे  म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी बनवलेला रँप
सर्वांना समाधी स्थळ पाहता यावे म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी बनवलेला रँप

मागे निनादराव बेडेकरांच्या एका व्याख्यानात जयराम पिंडेकृत “राधामाधवविलासचम्पू” या ग्रंथात महाराज शहाजींचे वर्णन आपल्या शब्दांनी अगदी योग्य कसे उभे केले आहे हे ऐकले होते. या ग्रंथात शहाजीराजांची दिनचर्या, ते कसे एका राजासारखे वावरत, जनतेचं त्यांच्यावर असलेलं प्रेम हे सारं पिंडेंनी स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. शहाजी राजांची महती संगार्या त्याच ग्रंथातल्या काही ओळी अशा आहेत,

“जगदीश विरंचकू पुछत है कहो शिष्टी रची कौन कहा

कर जेरी कही जयराम विरंच्ये तीरीलोक जहा के तहा

ससी वो रवी पूरब पश्चिम लो तुम सोय रहो सिरसिंधू महा

अरु उत्तर दछन रछन को इत साह्जु है उत साहिजहा”

भावार्थ : जगदीश्वर ब्रम्हदेवाला विचारतात की तू ही सृष्टी रचलीस पण तिच्या रक्षणार्थ कोणाला नेमलेस ते मला सांग. ब्रह्मदेव म्हणतात  पूर्वेस सूर्याला नेमले, पश्चिमेस चंद्राला. उत्तरेचा रक्षक म्हणून शहाजहानास नेमला आहे तसाच दक्षिणेकडे शहाजीराजांना!

या एका काव्याने आपल्याला महाराज शहाजींचे दक्षिणेतल्या राजकारणातील वजन – आधी निजामशाही आणि मग आदिलशाही – लक्षात येते. एकंदर विजापूर दरबारी असलेला हा एक अत्यंत मातब्बर सरदार! प्रजेचे वडीलांप्रमाणे पालन करणारा आणि उरी स्वराज्याचे स्वप्न नुसतेच बाळगून नव्हे तर ते सत्यात उतरवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेला असा हा महायोद्धा! जिजाऊ मासाहेबांसोबत लहानग्या शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज रुजवण्याचे श्रेय शहाजीराजांना देखील दिले पाहिजे!

अशा या योद्ध्याच्या समाधीस्थळाला भेट देताना आपसूकच आमची पावले थबकली. फाटकापाशी पायातील वहाणा काढून ठेवल्या. आस्तिक असो व नास्तिक या ठिकाणी चपला-बूट काढूनच दर्शनाला जायचे!

आपण आपोआप महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होतो!
आपण आपोआप महाराजांच्या समाधी समोर नतमस्तक होतो!

या महान योद्ध्याच्या समाधीचे स्वरूप कसे असावे? अवघ्या ४०,००० फौजेनिशी, शहाजानाच्या १ लक्ष सैन्याला नाचवणारा हा वीर! एखाद्या योद्ध्याला दक्खनच्या भूगोलाची पुरेपूर जाण असेल तर तो कमी सैन्यबळ असून देखील बलाढ्य शत्रूला चकवा देऊ शकतो हे शहाजीराजांनी दाखवून दिले! निजामशाही वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, आपल्या देशावर आपले राज्य आणण्यासाठी केलेला खटाटोप आणि आपल्या धाकल्या मुलाच्या मनात रुजवलेल स्वातंत्र्याचं बीज आणि ते देखील आदिलशाहीच्या दरबारी राहून! केवढा मोठा धोका आणि केवढी मोठी जोखीम उचलली असेल शहाजीराजांनी? मग अशा महायोद्ध्याची समाधीसुद्धा तशीच भव्य-दिव्य हवी! हो ना? पण नाही! महाराजांची समाधी अगदी साधी आहे! एक चौकोनी दगडी चौथरा, त्यावर समाधी आणि मागे दिवा लावण्यासाठी असलेला ३-४ फुटी दगडी खांब! बस! जमिनीपासून फार फार तर १-२ फुट उंचीचं असलेलं हे बांधकाम! इतक्या मोठ्या राजाची इतकी लहान समाधी? आकाशाशी स्पर्धा करणारे कळस असणारी उत्तुंग इमारत तरी असावी, मोठाले कारंजे, बागबगीचे असावेत! तर समाधी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेशी असती! एरवी मला वाईट वाटले असते. पण त्या जागेत एक वेगळीच ऊर्जा आणि स्पंदनं जाणवली! पटकन जाऊन समाधीवर डोके टेकवले, नतमस्तक झालो! ज्या व्यक्तीमुळे आपण आज “आपण” म्हणून जगत आहोत त्याचा जनक इथे विसावलाय! हिंदवी स्वराज्य शून्यातून निर्माण करणाऱ्या शककर्ते शिवरायांच्या मागे सदैव हिमालायासारखा उभा राहणारा पर्वतासमान, अखंड प्रेरणादायी स्रोत, या स्थळी आजही जागृत आहे! ज्या माणसाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अवघ्या हिंदुस्तानात आपल्या पराक्रमाचा डंका वाजवला, त्याची कीर्ती आणि महती केव्हाच एका अप्राप्य उंचीवर जाऊन विराजमान झाली होती. ३५० वर्षानंतरदेखील जर महाराज शहाजी भोसले आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर मग समाधी छोटी का असेनात?

आमच्या महापुरुषांच्या समाधी या अशा आहेत! आमच्या माणसाचं कर्तृत्व मोठं जरी असलं तरी सहसा त्याची समाधी लहान असते. कारण त्यांची महती सांगायला त्यांचं कर्तृत्व, गडकोटांच्या रूपाने सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर त्यांची स्मारकं बनून उभं आहे!

प्रांजल वाघ

१९.०७.२०२२

(‘सह्याद्री मित्र संमेलन २०२३’ यांच्या स्मरणिकेत हा लेख संक्षिप्त स्वरुपात प्रसिद्ध झालेला आहे)

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

सांतेबेन्नूरची अप्रतीम बारव!
सांतेबेन्नूरची अप्रतीम बारव!

Leave a Comment

You may also like