भाग १
——
अकरा वर्ष!!
अकरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गोष्ट आहे कोयना- चांदोलीतील एका अजब आणि अद्भुत सफरीची, सह्याद्रीच्या घनदाट जंगलातल्या पायवाटांवर घडलेल्या घटनांची आणि आयुष्यभर पुरून उरतील अशा अनुभवांची! या ट्रेकच्या किश्शांनी अनेक मित्र-मैफली आम्ही गाजवल्या. तेव्हा सगळे म्हणायचे, “ वाघ्या, यावर एक ब्लॉग येऊ दे!” इच्छा खूप होती लिहिण्याची पण नेहमीच्या षड्-रिपुंशी झुंजता झुंजता वर्षे सरत गेली! मग मित्रांच्या आग्रहाचे शिव्यात रुपांतर झाले! तरीसुध्दा, हातीचे कलम कागदावर टेकवून ही गोष्ट खरडायला मी तब्बल अकरा वर्ष काढली. आणि त्याला कारणं ही तशीच होती! पण हे मात्र खरे, कितीही कारणं दिली तरी उशीर मात्र झाला!
असो! तर हा लेखन प्रपंच आपल्यासमोर मांडत आहे. आवडेल अशी आशा! आवडला तर बिनधास्त बोला! नाही आवडला तर हक्काने कान पकडा!
बहुत काय लिहिणे? आपण सुज्ञ आहात!
—–
साल २०१२. एप्रिलच्या उन्हाळी महिन्यातली एक दुपार. जीवाच्या आकांताने माझा मोबाईल खणखणला. अनुपचा फोन होता! मी पुणेकर असतो तर वैतागून, “सामान्य माणसांची ही झोपायची वेळ असते!” असे खडे बोल सुनावले असते पण आम्ही पडलो मुंबईकर! आणि मुंबईकर हे विनम्रतेचे पुतळे असतात हे आपण जाणताच! त्यामुळे मी शिस्तीत फोन उचलला, चेहऱ्यावर स्मितहास्य आणले आणि विनम्रतापूर्वक बोललो, “बोला सर!”
“वाघ्या, चल ट्रेकला!”, आपलं नेहमीचं वाक्य अनुपने टाकलं.
“कुठे?”
“कोयना-चांदोलीमध्ये! भैरवगड-प्रचितगड-कंधार डोह पाहूया!”
नुकतीच विश्वास पाटील यांची “संभाजी” ही ऐतिहासिक कादंबरी वाचली होती त्यामुळे प्रचितगड, कोयना हा मुलुख चांगलाच ओळखीचा होता आणि प्रचितगड पहायची खूप इच्छा होती. मग बोक्याने (अनुप बोकील) ट्रेकसाठी विचारल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्न होताच कुठे? आम्हा दोघांसोबत आणखी एक सदस्य असणार होते. डोंबिवलीचे गणिताचे प्राध्यापक विश्वेश्वर भिडे!
आमच्या त्रयीची मग तयारी सुरु झाली. सामानाची खरेदी करणे, बसच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रेकची आखणी करणे, जंगलात घेण्याची खबरदारी या सगळ्या गोष्टी आम्ही करू लागलो. बरं, आम्ही ज्या भागात जाणार होतो तो भाग राखीव जंगल होते. कोयना-चांदोली हा परिसर “सह्याद्री व्याघ्र प्रकल्प” होता. त्यात कोयनेचं खोर आणि जंगल हे “बफर झोन” होतं. कोयनेच्या जंगलात भैरवगडापर्यंत फिरण्याला तशी बंदी नव्हती पण चांदोलीचं जंगल तर चक्क “कोअर झोन” असल्यामुळे तिथे तर प्रवेश निषिद्धच होता! पण त्या परिसराबद्दल केलेला अभ्यास आणि फोटोसहीत जमा केलेली माहिती या साऱ्यांनी आमच्या मनावर इतकी मोहिनी घातली होती की आम्हाला काही करून तिथे जायचे होते! मग अनुपने वन विभागातील त्याच्या ओळखींना गळ घालून परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला.
२९ एप्रिल २०१२!
बघता बघता निघण्याचा दिवस येऊन ठेपला. सामानाची पाठ-पिशवी तयार झाली. त्या काळी सह्याद्रीत भटकंती करताना आजच्या सारखं “सुसज्ज” व्हावं लागत नसे. २००२ साली माटुंग्याच्या “अवी इंडस्ट्रीज” कडून घेतलेली एक भक्कम, टिकाऊ हॅवरसॅक हीच माझी ट्रेकिंगची “मालमत्ता”. स्लीपिंग बॅग घेणे, ट्रेकिंगसाठी असलेल्या पाण्याच्या बाटल्या घेणे , मल्टी-फ्यूल स्टोव्हवर जेवण बनवणे असले ब्रँडेड चोचले पूर्वी नव्हतेच! आणि असले तरी ते शौक पूर्ण करण्यासाठी लागणारे वजन खिशात नक्कीच नसायचं! त्यामुळे पूर्वी कधीतरी प्यायलेल्या शीत पेयाच्या २ लिटरच्या २ बाटल्या भरून पाणी, झोपायला सतरंजी आणि चादर यांची वळकटी, थेपले, आंबट-गोड-तिखट छुंदा, चिक्की असे जिन्नस, रात्रीच्या जेवणासाठी तेव्हा मार्केटमध्ये नुकतेच आलेली “Instant Food” ची पाकीटं आणि अर्थात ट्रेकर समुदायाचे लाडके “मॅगी” असे साधारण सामान बागेत भरून माझी स्वारी दादर स्थानकातून ट्रेन पकडून विठ्ठलवाडी स्थानकासाठी निघाली!
विठ्ठलवाडी स्टेशनबाहेर अनुप वाट पाहत होताच. तिथल्या एसटी डेपोमधून आम्हाला कराडची गाडी पकडायची होती. डेपोला पोहोचताच अनुपने विश्वेश्वर भिडेंना फोन केला. ते डोंबिवलीहून निघाले होते आणि ५-१० मिनिटात पोहोचणारच होते. माझी त्यांची पहिलीच भेट. मी आणि अनुप सामानाची तपासणी करत असतानाच त्यांची स्वारी विठ्ठलवाडी मध्ये दाखल झाली. चाळीशीत असणारे हे हसमुख व्यक्तिमत्व! त्यात ट्रेकिंगची भारी आवड. हसतच आम्ही त्यांचे स्वागत केले आणि ओळखी झाल्या. पण त्यांच्या पाठीवरची छोटी पाठपिशवी पाहताच मनात शंकेची पाल चुकचुकलेली , त्यात त्यांनी बॉम्ब फोडला!
“अरे मला ट्रेकला येता येणार नाही!”
“काय? का पण?”, आम्ही उडालोच!
“वडिलांची तब्येत जरा बरी नाहीये! त्यामुळे मला थांबावे लागणार! पण मी सगळं सामान आणलंय तुम्हाला घेऊन जायला!”, असं म्हणत त्यांनी त्यांच्या पाठीवरची पिशवी उतरवली
त्यांच्या घरी अशी परिस्थिती उद्भवल्याने आग्रह किंवा वाद घालण्यात अर्थ नव्हता आणि त्यांच्या हिरमुसल्या चेहऱ्यावरून त्यांच्या भावना साफ दिसत होत्या. आता तिघांचे सामान आम्हा दोघांना वागवायला लागणार होते. पण चांगली गोष्ट ही की हा सज्जन परस्पर डोंबिवलीमध्ये बसून ही बातमी आम्हाला देऊ शकला असता. पण आमची गैरसोय होऊ नए म्हणून चक्क सामान घेऊन आम्हाला भेटायला विठ्ठलवाडीला आला!
इतक्यात अंधाराचे आवरण दुउर करीत ९ वाजताची कराडची रातराणी गाडी फलाटावर दाखल झाल्यामुळे आम्ही तिथे धावलो. रिजर्वेशन असल्यामुळे जागा पटकन मिळाली. काही क्षणात काळ्या धुराचा ढग हवेत सोडत गाडीने निघण्याची तयारी दर्शवली. हात उंचावत भिडेंचा निरोप घेतला आणि गाडी कराडच्या रस्त्याला लागली.
असे म्हणतात की “No Plan survives first contact with the enemy!” अगदी तसेच आमच्यासोबत झालेले. आणि ही तर नुसती सुरुवात होती!
गाडीने जसा वेग घेतला तसा आमच्या गप्पांना पण लय सापडली. आजूबाजूला अंधारात दिसणारे सह्याद्रीचे डोंगर मग ट्रेकिंगच्या आठवणी जागे करू लागले. स्मृतींच्या अडगळीत पडलेल्या किश्श्यांची काजवे गाडीमधील अंधारात चमकू लागली. बसने पुणे पार करता करता डोळ्यांवर झोप अवतरायला लागली आणि काही क्षणात सह्याद्रीच्या थंड वाऱ्याची अंगाई ऐकत ऐकत झोपेच्या आम्ही कधी स्वाधीन झालो कळलंच नाही!
कराडला पोहोचून आम्हाला सकाळी ६ वाजताची नवजा कॉलनीची बस घ्यायची होती. त्यामुळे आमची गाडी वेळेत कराडला पोहोचेल अशी आशा करीत आम्ही गाढ झोपी गेलो.
पहाटे केव्हातरी गाडी थांबल्यामुळे जाग आली. घड्याळात पावणे सहा वाजले होते. बाहेर तांबडं फुटू लागलेलं होतं आणि हवेत छान गुलाबी थंडी रेंगाळत होती. डोळे किलकिले करून पाहताच “कराड बसस्थानक” अशी पाटी दिसली. सहज म्हणून आळोखे पिळोखे देताना एसटी मास्तरांना विचारलं, “मास्तर! नवजाची बस कुठे येईल?”
“नवजा कॉलनी? अहो ती काय समोर उभी आहे! सुटेल आता! पकडा तिला!”
हे ऐकताच जांभई देण्यासाठी उघडलेल तोंड तसंच उघडं राहिलं! एक सेकंदभर वादळापूर्वीची शांतता पसरली आणि जणू सारं जग स्तब्ध झालं. आणि मग पूर्ण परिस्थिती लक्षात येताच आम्ही ताडकन उठून, आमचं सामान उतरवून नवजाच्या बसकडे धूम ठोकली! आता झोप कुठच्या कुठे पळाली होती! नवजाची बस सुटता-सुटता पकडली आणि सुटकेचा निश्वास टाकीत आम्ही क्षणार्धात पुन्हा झोपेच्या स्वाधीन झालो!
नवजा कॉलनीच्या थांब्यावर बस आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. झोपही उडाली होती. सामान घेऊन आम्ही खाली उतरलो. सभोवताली नजर टाकली. दूरवर असलेल्या घरांतून चुलीचा धूर आकाशाकडे रेंगाळत सरकत होता. चुलीत पेटलेल्या लाकडांचा वास हवेत दरवळत होता. तो दरवळ जाणवताच मनातल्या कुठल्यातरी कप्प्यात निद्रिस्त असलेल्या स्मृती जाग्या झाल्या. त्या सुगंधाच्या लहरींवर स्वार होऊन माझे मन अनेक वर्ष मागे गेले. गावाकडील स्वयंपाकघरात चुलीसमोर बसून ओरपलेली गरमागरम पेज आणि त्यावर प्यायलेला उकळता-वाफाळता गोड चहा यांची चव जिभेवर क्षणभर रेंगाळली आणि त्या थंडीत अचानक पोटातील कावळ्यांना जाग आली! पण करणार काय? आमच्या आस-पासच्या परिसरात एक साधे चहाचे दुकानसुद्धा नव्हते! कोयनेच्या जंगलाच्या निर्मनुष्य सहवासाची ती नांदी होती! पायाखालील डांबरी सडकेने आम्ही तसेच निघालो. वाट वळेल तसे वळत काही वेळ चालत राहिलो अन इतक्यात एक फोरेस्टवाल्यांचे चौकीवजा फाटक लागले. तिथे तर कोणीही नव्हते! ते तसेच पार करून आम्ही चालू लागलो.
त्या रस्त्यावर दूर कुठेतरी एक घोंगडं पांघरलेला आजोबा आपल्या नातवासोबत गप्पा मारत निघाला होता. बहुदा जंगलात सरपण गोळा करायला असेल.अंतर फारच असल्याने त्या दोघांच्या गप्पा ऐकू येत नसल्या तरीही मनुष्यजातीचा भूतकाळ आपल्या भविष्यासोबत संवाद साधत असेल अशी एक कवीकल्पना मनाला चाटून गेली. अचानक मागच्याच वर्षी गेलेल्या माझ्या आजोबांची आठवण झाली. मन थोडे हळवे झाले! (आज अकरा वर्षांनी लिहिताना ही होतेय!) बालपणी कित्येक वेळी आम्ही असेच फिरलो असू! किती त्या गप्पा मारल्या असतील! आयुष्याची २५ वर्षे मला आजोबा लाभले हे माझं भाग्यच! खरंच, आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो असं म्हणतात हे त्रिवार सत्य आहे!
चालता चालता रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पाऊलवाट जंगलात दिसेनाशी झाली. ती पाहताच बोक्या थांबला आणि माझ्या मनातील विचारांची शृंखला तुटली!
“वाघ्या, चल इथे आत! इथून “रामबाण” नावाचे स्थान लागते. गोड पाण्याचा झरा आहे!”, बोक्या म्हणाला.
गर्द झाडीतून अगदी २ पाऊले आत जाताच पाण्याचा एक खळाळता झरा नजरेस पडला! रामबाण म्हणजे दाट हिरव्या झाडीने वेढलेले थंड हवेचे ठिकाण! इथे आम्ही थांबून ते अमृततुल्य जल पोटभर पिऊन घेतले! इथल्या तिथल्या फुला-पानांची , कीटकांची यथेच्छ फोटोग्राफी केली. तिथून पाय निघता निघत नव्हता पण पुढे पूर्ण ३ दिवसांचा ट्रेक उभा ठाकलेला! मग करतो काय? पाय ओढीत तिथून आम्ही बाहेर पडून रस्त्याला लागलो!
आता आमचं लक्ष्य होतं या ट्रेकचा पहिला किल्ला – कुंभार्ली घाटाचा पहारेकरी – जंगली जयगड!
या डांबरी सडकेने काही वेळ पुढे चालत गेल्यावर लागतो तो एक बोगदा. या बोगद्याचे नाव “तांबडेवाडी पंचधारा बोगदा” , घाटातून पलीकडे कोकणात उतरणारा. “सांगाती सह्याद्री” या पुस्तकात जंगली जयगडावर जाणारा मार्ग याच बोगद्याच्या उजवीकडून वर चढल्यावर सुरु होतो. तसे आम्ही इथून चढाईला सुरुवात केली. कोयनेच्या जंगलात इथून आमचा खऱ्या अर्थाने प्रवेश सुरु झाला!
काही काळ उभा चढ चढल्यावर मागे वळून पाहिले तर झाडीतल्या फटीतून विस्तृत कोयना जलाशय डोकावत होता. नवजा कॉलनी खूप लांब राहिली होती. आमच्या सोबतीला आता होत्या फक्त सह्याद्रीतल्या खुणावणाऱ्या ढोरवाटा आणि अनोळखी पाहुणे पाहिल्यामुळे सुरु झालेली जंगलातील पाखरांची कुजबुज! दिशादर्शक म्हणून सोबतीला होते ते बऱ्याच अंतरावर असलेले वनखात्याने उभे केलेले दगडी मनोरे. उंच उंच, गर्द झाडीतून सूर्याची किरणे काही प्रमाणात आत येत होती. उन्हाळ्याचा महिना असला तरी बाहेर असलेली उन्हाची झळ आम्हाला लागत नव्हती.
पायाखालची वाट तुडवत जाता जाता सहज डोक्यात विचार चमकून गेला. “इतकं घनदाट जंगल, बिबट्या दिसेल का? असला तर त्याने आपल्याला एव्हाना नक्कीच पाहिले असणार! कुठे असेल? झाडावर बसून गम्मत पाहत असेल का? आपण सावध राहिलं पाहिजे! डोळे “उघडे” ठेऊन जंगल निरखुया म्हणजे नक्की नजरेस पडेल!”, अस स्वतःशीच बोलत वर झाडांच्या फांद्या न्याहाळत मी पुढे निघालो. मागे भगवा टी-शर्ट परिधान केलेला उंचपुरा अनुप होता. साधारण मिनिट-दोन मिनिट मी असा वर बघून चालत होतो आणि इतक्यात पायाकडे काहीतरी हालचाल जाणवली. खाली लक्ष जाताच मी अक्षरशः उडालोच! माझ्या पायांच्या अगदी जवळून एक साप सर्रकन सरपटत पुढे गेला!! त्या क्षणी तो साप विषारी होता की बिनविषारी हे कळले नाही पण एक मात्र लक्षात आलं – जंगलात अखंड सावध राहावे लागेल! हा कोणता साधा-सुद्धा ट्रेक नव्हे तर अजूनही बऱ्याच अंशी मानवी स्पर्शापासून दूर राहिलेल्या जंगलातली ही डोळस भटकंती व्हायला हवी! निसर्गापासून शिकण्यासारखे बरेच काही असतेच पण त्या आधी निसर्गातील जीवांचा आदर करणे आणि आपण त्यांच्या प्रदेशात पाहुणे म्हणून आलो आहोत याचे भान ठेवणे जास्त महत्वाचे!
साप पायाजवळून गेला हे बोक्याला मी सांगायला वळलो तर त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे संभ्रमित भाव! “काय झालं?”, मी विचारले
“’सांगाती मध्ये लिहिलंय की बोगद्याच्या उजवीकडून वाट वर चढते आणि १५ मिनिटात जंगली जयगडाचा पहिला बुरुज लागतो. आपण तर तासभर चालतोय!”
“पण वाट तर हीच असणार! इतका ठळक आणि मळलेला रस्ता आहे! एकतर “सांगाती” मधले ट्रेकर मंडळी सुपरमॅन असतील किंवा आपण खूपच वाईट ट्रेकर आहोत!”, मी व्यक्त झालो!
वाट जरी बरोबर असली तरी जयगडचे बुरुज काही नजरेस नव्हते पडत. मग आम्ही डोंगराच्या “रिज लाईन” कडे जाण्याचे ठरवले! उंचावर जाऊन सभोवतालचा परिसर न्याहाळून पाहूया काही सापडते का! त्यात वेळेचे बंधन पाळणे अनिवार्य होते कारण इथून पुढच्या मुक्कामाला – म्हणजे हेळवाक जवळील रामघळीत – पोहोचणे गरजेचे होते! बाजूच्या जंगलातील वृक्षांच्या सावलीतून आम्ही चढायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! पुढील दहा मिनिटात बुरुजासारखी गोलाकार आकृती दिसली! किल्ला अथवा डोंगरमाथा नजरेस पडला की एखाद्या ट्रेकरचा सारा थकवा क्षणात विरून जातो. एक नवीन उर्जा अंगी संचारते! तीच उर्जा घेऊन आम्ही झपाझप पावले टाकीत अंतर कापले आणि खरोखर जंगली जयगडाच्या पहिल्या बुरुजाने आमचे स्वागत केले!
घाटमाथ्यावरील मुख्य डोंगर रांगेतून एक निमुळती धार कोकणात घुसली होती आणि त्या धारेच्या शेवटी अखंड पहारा देत उभा होता कुंभार्ली घाटाचा रक्षणकर्ता – जंगली जयगड! किल्ला तसा छोटेखानीच पण सामरिक महत्व असामान्य!कोयना परिसरातून कोकण-देश होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवून परिसर राखणे हे याचे काम! सद्यस्थितीत किल्ल्याच्या पायथ्याला वेटोळे मारीत एक रस्ता दिसतो. तांबडेवाडी पंचधारा बोगद्यातून पुढे कोकणात उतरणा हा कोळकेवाडी घाट! इथे काही वीजनिर्मितीची केंद्र पण नजरेस पडतात. आणि दूर दिसतो तो कराड-पाटण-चिपळूण जोडणारा सर्पाकृती कुंभार्ली घाट! इथे गाडी चालवण्याची मजा काही औरच!
जंगली जयगड किल्ल्यावर जायला आमची पावले धारेवर जशी पडू लागली तसे आमच्या एक गोष्ट लक्षात आली. इतका वेळ आमच्या डोक्यावर असलेली जंगलाची छत्रछाया आता नाही राहिली. ते पाहताच सुर्यनारायण पुढे सरसावले आणि आम्हाला अक्षरशः भाजून काढायला सुरुवात केली! एव्हाना दुपार झाली होती त्यामुळे अगदी आमच्या डोक्यावरच सगळी आगपाखड होत होती. त्याच स्थितीत आम्ही वाटेने पुढे निघालो. वाटेत काहीच अवशेष न लागल्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली. जंगली जयगड हाच असेल ना? की चुकीच्या डोंगरावर आलो? पण जवळपास कोणताही “किल्ला” म्हणता येईल असा डोंगर नव्हता. तितक्यात काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला लागली ती जयगडाची तटबंदी! निसर्गातील पंच तत्वांशी सामना करून तग धरून उभे असलेले किल्ल्यावरील कदाचित एकमेव बांधकाम! या व्यतिरिक्त आम्हाला तिथे दुसरी तटबंदी आढळली नाही. जवळच एक मंदिर आणि दीपमाळ होती. बस्स! इतकेच अवशेष तिथे आम्हाला सापडले! पण इतकं मात्र नक्की, इथल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक अवशेष दडले असणार! उत्खनन झाले तर अनेक अवशेष उजेडात येऊ शकतील! किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी एक भगवा ध्वज फडफडत होता. तिथून साऱ्या कोकण परिसराचे नयनरम्य दर्शन घेऊन आम्ही आल्या पावली परत फिरलो.
आता डोक्यावरील होणारा सूर्याचा तांडव शिगेला पोहोचला होता. त्या सोबत पोटात भूक मी म्हणत होती. मग झपझप पावलं टाकीत आम्ही घाटमाथ्यावर पोहोचलो. तिथेच आडोसा शोधला आणि शिदोरी उघडली. ठेपले, छुंदा आणि बिस्किटं असा मोजकाच बेत. उन्हामुळे ठेपले जरा गरम झालेले पण घशाला कोरड पडल्यामुळे कसे बसे एक-दोन ठेपले घशाखाली ढकलले, थोडी बिस्कीटं खाल्ली आणि एक बाटली राखीव ठेऊन बाकी सारं पाणी पिऊन टाकलं. इतकं करून ही तहान काही भागेना! मग आलो त्या मार्गाने तांबडेवाडी बोगद्याजवळ पोहोचलो आणि पाय भाजून काढणाऱ्या डांबरी सडकेवरून मुकाट्याने एस.टी थांब्यावर आलो!
नवजा कॉलनी – कोयनानगर -हेळवाक गाडीची चौकशी केली. गाडी यायला अवकाश होता. मग पुढील रस्ता पुन्हा एकदा पाहून घेतला. आमचा पुढचा मुक्काम होता रामघळ! समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही दाट जंगलात, धबधब्यामागे आणि कड्यातील कपारीत लपलेली गुहा. वरंध घाटाजवळ असेलेली शिवथरघळ बऱ्याच लोकांना ठाऊक असते पण हेळवाकची रामघळ तशी आडवाटेला आणि अपरिचित! कागदावर आमचं सर्व नियोजन तयार होतं फक्त प्रत्यक्षात उतरवणे बाकी होते. तितक्यात हॉर्न वाजवत हेळवाकहून जाणारी लाल परी अवतरली. पटापट सामान घेऊन आम्ही गाडीत चढलो आणि रिकाम्या जागा शोधून, दुपारच्या उन्हाने तापलेल्या त्या आसनांवर बुड टेकवून शेकत बसलो! इंजिनचा दमदार गुरगुरण्याचा आवाज झाला, काळ्याभोर धुराचा आणि धुळीचा धुरळा उडवीत गाडी निघाली! खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने आधीच थकलेल्या आम्हाला जोजवायला सुरुवात केली आणि रामघळीची स्वप्ने रंगवत आम्ही केव्हाच झोपेच्या अधीन झालो!
(क्रमश:)
– प्रांजल वाघ
भाग २ इथे वाचा : रामघळीचा थरार!
भाग ३ इथे वाचा : भैरोबाच्या मुलुखात!
भाग ४ इथे वाचा : मु.पो. पाथरपुंज
भाग ५ इथे वाचा : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
छायाचित्र साभार : अनुप बोकील, प्रांजल वाघ
14 comments
झक्कास सुरुवात ! पुढचा भाग लवकर येऊदे … त्यासाठी पुढली ११ वर्षे घालवू नकोस म्हणजे झालं ?
धन्यवाद साहेब!! पुढील भाग आला आहे!! तिसरा भाग एक दोन दिवसात येऊन जाईल! 😀
किल्ल्यावर घेऊन गेलास मित्रा, खूप छान वर्णन आणि चॅन शब्दात लिहलय, असा ट्रेक करायची इच्छा निर्माण केली मनात
खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार!! लवकरच आपण असा ट्रेक करावा अशी प्रार्थना करतो!
कोयनेच्या परिसराबद्दल पहिल्या पासूनच विलक्षण आकर्षण, त्यात वनदुर्गाच्या निमित्ताने पदभ्रमण म्हणजे सोने पे सुहागा.
पाहुले चालती.… त्याप्रमाणे लेखन सुरेख लिहती.??
मनःपूर्वक आभार!!
प्रांजल,
ओघवात्या भाषेतल फारच सुंदर वर्णन. आपण स्वतः ट्रेकमधे आहोत असेच वाटले आणि माझ्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
मनपूर्वक आभार!! पुढील भागांचे काम जोरात सुरु आहे! ऑफिसच्या कामातून वेळ काढून लिहितोय!! 😀
मी फारशी सहयद्रीत नाही फिरली….शिक्षण, कुटुंब यात स्वतःसअठी कधीच वेळ काढला नाही……..मी मूळची जुन्नर भागातली पण
..नेहमीच आकर्षण असायचं या डोंगरावर व पलीकडे काय असेल …
…….but now at age of ४० , I started trek . मला मराठी टायपिंग जमत नाही त्याबद्दल दिलगिरी…..तुमचं लिखाण आणि अनुभव अप्रतिम आहे . तुमच्यासोबत अनवट वाटाबरोबर ओळख करायला आवडेल
ट्रेकिंगला किवा कोणतीही गोष्ट सुरु करायला वयाची मर्यादा नसते! फक्त शरीराने साथ दिली पाहिजे! नक्की जाऊ कधीतरी! ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला! तुमचं प्रेम असेच राहो! _/\_
मी फारशी सहयद्रीत नाही फिरली….शिक्षण, कुटुंब यात स्वतःसअठी कधीच वेळ काढला नाही……..मी मूळची जुन्नर भागातली पण
..नेहमीच आकर्षण असायचं या डोंगरावर व पलीकडे काय असेल …
…….but now at age of ४० , I started trek . मला मराठी टायपिंग जमत नाही त्याबद्दल दिलगिरी…..तुमचं लिखाण आणि अनुभव अप्रतिम आहे . तुमच्यासोबत अनवट वाटाबरोबर ओळख करायला आवडेल
ट्रेकिंगला किवा कोणतीही गोष्ट सुरु करायला वयाची मर्यादा नसते! फक्त शरीराने साथ दिली पाहिजे! नक्की जाऊ कधीतरी! ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला! तुमचं प्रेम असेच राहो! _/\_
Excellent ?
Thank you so much!! 😀