मार्चचा महिना सुरू झाला आणि वेध लागले ते “मार्च मॅडनेस”चे. एकतर भयंकर उन्हाळा सुरू झाला. त्यात आर्थिक वर्षाच्या समाप्तीची चाहुल लागली. मग काय? दिवस रात्र ऑफिसच्या कामात बुडून गेलो. गुंतवणूकदारांना भेटणं आणि इतर काम करण्यात हा महिना कसा सरला हे कळलंच नाही! ३१ मार्चच्या संध्याकाळी संभाजीने व्हॉटसॅपवर एक युट्युबचा व्लॉग टाकला आणि या साऱ्या कामाच्या धामधुमीतून बदल घडावा म्हणून हा ट्रेक करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. कोणता होता हा किल्ला?
भिवंडीच्या वायव्य दिशेला एका छोट्या डोंगरावर कातळाची टोपी घातलेला हा छोटेखानी किल्ला होता गुमतारा! बऱ्याच वर्षांपासून हा किल्ला मला साद घालत होता. या किल्ल्याबद्दल अनेक गोष्टी आधीच कानी आल्या होत्या. कोण म्हणे इथे चकवा लागतो, इथली वाटच सापडत नाही, काही लोकं म्हणत इथला चढ खूप अवघड आहे! नक्की कुणाचे खरे मानावे कळत नसे. त्यातच इथे एका अनुभवी आणि ज्येष्ठ ट्रेकरचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे एक गूढ-रम्य वलय या किल्ल्याला बहाल करून बसलो. नाव पण तसेच – गुमतारा! हिंदी भाषेत “गुम होना” म्हणजे “बेपत्ता/लुप्त होणे”. बहुदा या किल्ल्याची वाट त्याचे नाव सार्थ करते म्हणून तर त्याला गुमतारा म्हणत नसावेत? जंगलाच्या गराड्यात हरवून गेलेला हा किल्ला म्हणूनच साद लायचा!
मग १ एप्रिलला, म्हणजे शनिवारी संध्याकाळी संभाजीला फोन लावला.
“संभा, गुमतारा करूया का?”
“कोण कोण आहेत? माझं अनिश्चित आहे रे!” , संभाजीच समोरून उत्तर आलं
“मी महेशला विचारतो! तो पर्यंत तुझं अनिश्चितचं ‘सुनिश्चित’ कर! जाऊयाच उद्या! बरेच महिने ट्रेक नाही केलाय!”
तसाच महेशला फोन केला, “ महेश, उद्या ट्रेक करायचा का? संभा पण येईल.” मी संभाजीच्या उत्तराची वाट न पाहताच सांगून टाकले.
“अरे मी नाईट सायकल राईडला जाणार आहे साउथ मुंबईला!”
झालं! म्हणजे आता महेश सायकल राईडवर आणि संभाजी अनिश्चित! म्हणजे आता ट्रेक रद्द झाल्यातच जमा होता! एकट्याने जाऊन यावे का ट्रेकला इथ पर्यंत माझे विचार पोहोचले होते पण तितक्यात महेश बोलला, “सकाळी निघणार असू ६ नंतर तर मी सायकल राईड आटपून सोबत येतो!”
वा s s !! ट्रेकर मित्र असावेत तर असे! रात्री गावभर सायकल हाणीत फिरणारा आमचा हा मित्र ट्रेकचं नाव काढताच तयार झाला! (इतकं समर्पण मी अभ्यासात दाखवलं असत तर आयआयटी मध्ये नक्कीच गेलो असतो. पण जाऊ दे नको त्या दु:खद आठवणी! ?)
लगेच संभाजीला फोन करून त्याला ट्रेकसाठी पटवलं आणि मग ठरलं! डोंबिवलीहून जरा उशिरानेच निघायचे! कल्याणला महेशला गाडीत घालून भिवंडीच्या रोखाने निघायचे. भिवंडी-वाडा महामार्गाला लागायचे आणि तिथून मोहिली गावाकडे जाणारा रस्ता धरायचा. महेश पूर्वी सायकलने मोहिली गावापर्यंत जाऊन आल्याने त्याला तिथल्या रस्त्यांची परिस्थिती ठाऊक होती.
ठरल्याप्रमाणे डोंबिवलीला मला सकाळी ०७:३० वाजता संभाजीला भेटायचे होते. म्हणून रात्री सामान-सुमान बांधून झोपी गेलो. सहज खबरदारी म्हणू महेश आणि संभाजी यांना एक मेसेज करून ठेवला, “सकाळी उठलात की मला एक फोन करा रे! चुकून जर गजर बंद करून झोपलो तर पंचाईत नको व्हायला!” आणि झाले ही तसेच! झोपेतचकिल्ल्याची स्वप्न पाहता पाहता पहाटे ०५:३० चा गजर कधी वाजून बंद झाले मला कळलंच नाही! माझं नशीब जोरावर होतं म्हणून महेश ने ६ वाजता फोन केला! नाहीतर डोंबिवलीला वेळेत पोहोचलोच नसतो! डोंबिवलीला ०७:४५ वाजता पोहोचताच संभाजीला भेटून निघे पर्यंत ८ वाजले. महेशला कल्याणला भेटलो तर हा पठ्ठ्या जेमतेम १५ मिनिटं झोप काढून आला होता! आदल्या दिवशी सकाळी ५ ला उठलेला हा महापुरुष २८ तासात फक्त १५ मिनिटं झोपून पुढे ट्रेकला येत होता! त्याने गाडीत बसल्या-बसल्या मागच्या सीटवर ताणून दिले आणि गाढ झोपी गेला! महामार्गाला लागेस्तोवर उन्हे वर आलेली होती. धग जाणवू लागली होती! या उन्हात चढ चढताना कसा दम निघेल, चढण्या अगोदर खालीच पाणी पिऊन घ्यावं म्हणजे डीहायड्रेशन लगेच होणार नाही वगैरे गोष्टींचे हिशेब मांडत बसलेलो तोवर उजवं वळण घेऊन गाडी भिवंडी- वाडा रस्त्यावर आली आणि दूर कुठेतरी, धुरकट ‘धुक्यामधून’ एक कातळटोपी घातलेला डोंगर क्षितिजावर दिसू लागला!
मी काही बोलायला तोंड उघडले तोच संभाजी तिथून उद्गारला, “ ए s s! तो बघ गोतारा!!”
जवळ जवळ २ दशकं ट्रेक करतोय पण दर वेळी, न चुकता किल्ल्याचा डोंगर दिसला की उत्साह, आश्चर्य आणि आतुरता ही पहिल्या वेळी इतकीच कायम असते! हीच तर जादू आहे सह्याद्रीची!
बरं, संभाजी गोतारा म्हणाला म्हणून चमकलात? खुळ्या ब्लॉगरने निब्बा लेव्हलची चूक केली असं वाटतंय? तर तसं बिलकुल नाही! या किल्ल्याचं मूळ नाव हे “गोतारा” असावं! ईशान्येकडे घोटगाव असल्याने त्याला घोटवाडा किल्ला म्हणतात आणि तसेच पूर्वेकडे असलेल्या दुगड गावामुळे त्याला दुगडचा किल्ला पण म्हंटले जाते! शिलाहार कालीन बांधकामाने सजलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणला – बहुदा अफझलखान मारल्यावर उघडलेल्या कल्याण-भिवंडी आघाडीवरील मोहिमेत! तो नंतर १८१८ पर्यंत स्वराज्यातच राहिला. भिवंडी, वज्रेश्वरी, आणि तानसा नदीवरील व्यापारी वाहतुकीचे संरक्षण आणि जवळच फिरांगणात म्हणजे वसईत असलेल्या पोर्तुगीजांवर वचक ठेवायला बहुदा या किल्ल्याचा वापर होत असावा. १७३९ मध्ये वसई मोहीम उघडल्यावर काही दिवस चिमाजी अप्पा आपल्या फौजेसह या किल्ल्याच्या पायथ्यास तळ ठोकून होते असं सांगतात. या वरून किल्ल्याचे सामरिक महत्व लक्षात येते! पेशवाईत बहुदा या किल्ल्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन “गुमतारा” झाला असावा! तेव्हा पासून आजतागायत या किल्ल्याला गुमतारा असे संबोधले जाते!
पुढील १५-२० मिनिटात आम्ही मुख्य रस्ता सोडून मोहिलीच्या दिशेने वळलो. पुढचा रस्ता अचानक चिंचोळा झाला आणि आम्ही अनेक वाड्या-वस्त्या मागे टाकून एका गावात आलो! तिथे उभ्या असलेल्या दोन माणसांजवळ गाडी थांबवली अन विचारलं, “ दादा, मोहिली गावाचा हाच रस्ता का?”
“ ओ, ह्येच मोहिली गाव!”, असं जमिनीकडे ठसक्यात हातवारे करत तो युवक बोलला!
या वाक्यातील “ह्येच” तो अशा काही आवेशात म्हणाला की एक क्षण ‘आ’ वासून त्याच्याकडे पाहत राहिलो. पण दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन पुढचा प्रश्न विचारला, “किल्ल्याकडे हाच रस्ता जातो का? गाडी कुठपर्यंत जाईल?”
“जाईल की! जिथ पर्यंत जाईल तिथपर्यंत न्या!”
त्यांचे आभार मानून तिथून काढता पाय घेतला. पुढील कच्च्या रस्त्यावरून धूळ उडवीत आमची गाडी गचके खात मंदगतीने पुढे निघाली. काही वेळाने ‘गाडी इथून पुढे घेऊन गेलो तर गाडीच्या जीविताला धोका निर्माण होईल!’ असं आमचं एकमत झालं आणि तिथल्याच एका डेरेदार वृक्षाच्या सावलीत गाडी लावली. इथून गुमताऱ्याकडे पाहिलं तर तो युद्धासाठी उभा राहिलेल्या एखाद्या मावळ्यासारखा दिसत होता. किल्ल्याच्या पूर्वेकडील छोटं टेकाड म्हणजे त्याची ढाल आणि दक्षिणेला असलेली धार म्हणजे खड्ग पेललेला त्याचा उजवा हातच जणू!
सामान आवरून तयार झालो. सावधगिरी म्हणून ७५० मिली पाण्याची एक बाटली रिकामी करून मी पुढे निघालो. तिथेच गुमतारा किल्ल्याची माहिती देणारा एक फलक लावला होता. या फलका मागूनच किल्ल्याची वाट जाते. जवळच असलेल्या काही गावकऱ्यांना रस्ता विचारून खात्री करून घेतली आणि आम्ही चालायला सुरुवात केली. सकाळचे १० वाजले असूनही दुपार असल्यासारखे जळजळीत कटाक्ष सूर्य आमच्यावर टाकत होता! प्रत्यक्षात दुपार झाल्यावर आपला भाजून कोळसा होणार हे ठाऊक होतं पण “जे होईल ते बघता येईल ” या वैश्विक तत्वाचा आधार घेऊन आम्ही चालायला सुरुवात केली.
एप्रिलचा महिना असूनही किल्ल्याच्या पायथ्याशी बऱ्यापैकी दाट जंगल शिल्लक होतं. त्यातून व्यवस्थित मळलेली पायवाट तुडवत आम्ही झपझप निघालो. उन्हं वाढण्या आधी बहुतांश चढ चढून आम्हाला जायचं होतं. काही वेळाने हलका चढ सुरु झाला. आता आम्ही गुमताऱ्याच्या दक्षिण धारेच्या पायथ्याला येऊन ठेपलो होतो. पूर्वेची टेकडी आणि गुमतारा यांच्या मध्ये आम्ही आलो होतो. झाडांमधून डोकावणाऱ्या किल्ल्याकडे नजर टाकली आणि चढायला सुरुवात केली. उभा चढ नसल्याने आमची प्रगती झटपट होऊ लागली. वाटेवर आता बाण मारले असल्याने रस्ता सापडणं सोपं झालंय. त्यात गावकऱ्यांनी झाडांना पिशव्यांच्या चिंध्या बांधल्याने रस्ता सापडायला खूपच मदत झाली.
सुमारे अर्ध्या तासात आम्ही दक्षिणेचे टेकाड चढून दक्षिणेकडील खिंडीत दाखल झालो. इथून वाट सरळ चढत वर चालली होती. निमुळत्या धारेवरील वाट असल्यामुळे काही ठिकाणी मातीमध्ये खोदून पावट्या तयार केल्या आहेत. पावसाळ्यात हीच मातीची निमुळती वाट निसरडी झाल्यावर या पावट्या ट्रेकर लोकांच्या खूप उपयोगी पडतात! काही वेळाने थोडी सपाटी आली.तिथे झाडांच्या मधोमध एक बैठकीची नैसर्गिक जागा तयार झाली होती. गार रानवारा सुटला होता आणि सकाळपासून पोटात अन्नाचा एकही कण नसल्यामुळे पोटात कावळ्यांची शाळा भरली होती. मग तिथेच बसून थोडं पाणी प्यायलो, खजूर, गूळ खाल्ले, पाच मिनिटं गप्पा मारल्या आणि पुढे निघालो.
धार चढता चढता आमच्यातील गावैय्याला – संभाजीला अचानक कंठ फुटला. या माणसाची एक खासियत आहे. कुठल्याही किल्ल्यावर गेला की चढताना हा खड्या आवाजात बिंदास गाणी म्हणत चढतो. आणि ही गाणी त्या त्या ठिकाणानुसार customized असतात बर का!. मागे २०१० साली अंकाई-टंकाई किल्ल्यावर आम्ही गेलो असताना “विठाई विठाई माझे कृष्णाई” या लता मंगेशकरांच्या गाण्याच्या चालीवर “अंकाई-अंकाई माझे टंकाई” असे गाणे गात वर चढत होता. उगीच नाही तिथल्या माकडांनी आमच्यावर हल्ला केला! तसच इथे “ये तारा वो हर तारा” या स्वदेस चित्रपटातील गाण्याच्या धर्तीवर “गुमतारा गुमतारा गुमतारा, वज्रेश्वरीकी आखो का तारा” गाणं सुरु केलं! नशीब आसपास माकड नव्हती! पण या उकाड्यातील घाम काढणाऱ्या चढाईत अशाच गोष्टींमुळे थोडा दिलासा मिळतो! आम्हाला नेहमीच संभाजी खळखळून हसवतो आणि हे असले उकाड्याचे दम काढणारे चढ सुसह्य करतो!
इथून थोडे पुढे गेल्यावर एक अत्यंत बारीक आणि निमुळती मातीची धार लागते. ही धार अत्यंत अरुंद असून चालताना लक्ष जरासं जरी विचलित झालं तर दोन्ही बाजूला असलेल्या जंगल युक्त दरीत कपाळमोक्ष निश्चित! कदाचित म्हणूनच त्यावर कुणी भल्या माणसांनी पावट्या खोदून ठेवल्या आहेत! पावसाळ्यात हा भाग अत्यंत निसरडा होत असणार, त्यावेळी या पावट्या म्हणजे वरदान ठरत असणार!
आता जरी गुमताऱ्याचा निम्म्याहून अधिक टप्पा आम्ही पार केला होता तरीही डोक्यावर चढलेलं उन आम्हाला भलतंच भाजून काढत होतं आणि त्यामुळे आमचा वेग कमालीचा मंदावला! घामाच्या धारा पुसत संभाजीने एक सवाल टाकला, “द्राक्ष काढू का रे?”
“द्राक्ष!”, ऐकताच समोर रसाळ द्राक्षाचे घोसच्या घोस डोळ्यासमोर तरंगू लागले. त्यातील एखादं टपोरं द्राक्ष दाताखाली चावल्यावर तोंडाच्या आत होणारी रसाची उधळण आठवली! घशाला पडलेल्या कोरडीला क्षणात पळवून लावून नसा नसत नवीन जोश भरला असता या द्राक्षांनी! मोह आवरणे कठीण जात होते. इथेच सावलीत गार वाऱ्याच्या झुळकेसोबत द्राक्षांचा फडशा पडावा असं वाटत होतं पण कसबसं स्वतःला आवरलं. खजुराने द्राक्षाची भूक भागवत संभाजीला म्हटले, “ नको रे! आपण वर जाऊन खाऊ! किल्ला सर केल्याचे बक्षीस!!” त्याला सुद्धा हे पटलं असाव कारण काही न बोलताच तो पुढे चालू लागला. मनातल्या मनात तो मला काय बोलत होता हे मला कसं कळणार?
इतक्यात वर लक्ष गेले आणि गुमताऱ्याची तटबंदी नजरेत भरली! या छोटेखानी किल्ल्याच्या दगडी टोपीला या तटबंदीची काळीभोर झालर लावली होती जणू! थोडी डावीकडे नजर वळताच दिसली ती एक उंच वर चढत जाणारी घळ आणि त्या घळीच्या सर्वोच्च ठिकाणी दिसला तो बुरुजाची ढाल करून लपलेला किल्ल्याचा महादरवाजा! डोंगर चढताना किल्ल्याचे अवशेष दिसू लागताच का कुणास ठाऊक अंगात एक नवीनच उर्जा उत्पन्न होते! गुमताऱ्याची दगड एकमेकात अडकवून बांधलेली रेखीव तटबंदी पाहून अंगात नवा उत्साह संचारला! हवेत भयंकर उष्णता होती तरीही एका नव्या जोमाने, तटबंदी न्याहाळत आम्ही वाट चढू लागलो!
पाहता पाहता मुख्य दरवाज्याच्या घळीत आम्ही येऊन पोहोचलो. गडाच्या बांधकामाच्या दगडांनी अनेक शतकं ऊन, पाऊस आणि वारा यांचा सामना करत अखेर धीर सोडला होता. तेच घरंगळत त्या घळीत खालपर्यंत आले होते. जागोजागी घडीव दगड आम्हाला दिसत होते. शत्रूचे वार सहज परतवून लावणाऱ्या त्या पाषाणांनी मानवी अनास्था आणि निसर्ग यांच्यापुढे मात्र हार पत्करलेली पाहून मन थोडे विषण्ण झाले. थोडे पुढे चढून गेल्यावर एक बुरुज पुढे आलेला होता आणि त्या मागे लपलेल्या मुख्य द्वारापुढे संरक्षक ढाल बनून उभा होता. या दरवाजाच्या बांधकाम पद्धतीला आजकाल ‘गोमुखी’ शैली म्हणतात पण या नावाचे ऐतिहासिक संदर्भ दुर्गशास्त्रात शोधावे लागतील. गुमतारा किल्ल्यावर सध्या “सह्याद्री प्रतिष्ठान’ उत्तम कामगिरी करत आहे. इथला मातीत गाडला गेलेला मुख्य दरवाजा त्यांनीच उत्खनन करून वर काढला आहे. त्याचे पूर्वीचे व आत्ताचे फोटो असणारे फलक त्यांनी लावल्यामुळे त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येतो! तसेच गड देवतेचे मंदिर व्यवस्थित करणे , पाण्याची टाकी साफसूफ करणे हे त्यांचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे! गड संवर्धनाचे कार्य सोपे नाही आणि ज्या संस्था हे काम व्यवस्थितपणे (सिमेंट-विटा न वापरता) करतात त्यांचे कौतुक झालेच पाहिजे! हे सारे कार्य पाहताच मघाशी आलेली विषण्णता काही अंशी नक्कीच कमी झाली!
इथले सारे दगड हे घडीव आहेत आणि एकमेकात अडकवलेले आहेत. दरवाजे, बुरुज यांच्या दगडांना जोडायला कुठेही चुन्याचा किंवा bonding एजंटचा वापर केलेला नसून हा किल्ला शिलाहारकालीन (किवा अधिक पूर्वीचा) असण्याची शक्यता आहे! याच कमानीत एके ठिकाणी एक भोक असलेला दगड उभा करून ठेवला आहे. गडाचा दरवाजा अडकवण्याचं हे ‘बिजागर’ आहे! दरवाज्याच्या आत आल्यावर समोरच एक टाकी समूह आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून वाट थेट वर चढते ती गडदेवेतेच्या मंदिराकडे येऊन थांबते. इथे मंदिरात भैरवाची मूर्ती आहे. देवाला नमस्कार केला आणि जवळच सावलीत बसून, गार वाऱ्याची सुखद झुळूक अंगावर घेत दुपारचा नाश्ता केला! आणि नाश्ता संपल्यावर शेवटी खाल्ली ती किल्ला सर केल्याचे बक्षीस म्हणून थंडगार, टपोरी, पाणीदार आणि गोड द्राक्ष! पहिलं द्राक्ष दाढेखाली चावताच मुखात झालेल्या रसनिष्पत्ती पुढे समुद्रमंथनातून आलेले अमृत देखील फिके पडले असते!
थोडा वेळ इथे विश्रांती घेतली आणि मग आम्ही चालू लागलो बालेकिल्ल्याकडे! छोटासा चढ पार करून किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी येऊन दाखल झालो. भगवा मोठ्या डौलाने फडकत होता आणि आजूबाजूचा परिसर नजरेत भरत होता! पूर्वेला दूर दिमाखात माहुली किल्ला उभा होता तर पश्चिमेस तुंगारेश्वरच्या अभयारण्याची हिरवीगार शाल धर्तीवर पांघरलेली होती. तुंगारेश्वरच्या थोडं खाली, गुमताऱ्याच्या नैऋत्येस कामणदुर्ग आपल्या नजरेस पडतो! गुमतारा किल्ल्याच्या वायव्य दिशेस नजर फेकली तर पहिल्यांदा दिसते ते उसगांवचे धरण आणि जलाशय, त्याच्यापुढे दिसते ते वज्रेश्वरी आणि त्याच रेषेत पुढे गेले की आभाळ साफ असल्यास टकमकचा किल्ला दिसतो! किल्ल्याच्या उत्तरेस लांबवर कोहोजचा किल्ला लागतो पण तो दृष्टीस पडत नाही! तसेच दक्षिणेस पसरलं आहे भिवंडी शहर. हा सगळा नजारा पाहून या किल्ल्याचे सामरिक महत्व अधिकच अधोरेखित होते!
किल्ला पाहून झाला होता. (खरंतर तो कधीच पाहून होत नाही) आता परतीचे वारे वाहू लागले होते. संभाजीने गाडीत ठेवलेला गार पाण्याचा थर्मास आम्हाला आता साद घालत होता. मजल दर मजल करत मग आम्ही किल्ल्याची घळ आणि धार उतरलो. कडक ऊन आम्हाला जाळून काढीत होते पण त्याचवेळी वाहणारा थंडगार रानवारा हलकीच फुंकर घालून उतार सुकर करत होता, चालत राहायला प्रोत्साहित करत होता! सुमारे दीड तास चालून आम्ही संभाजीच्या गाडीसमोर आलो आणि थेट झाडाच्या शीतल सावलीत बसकण मारली. संभाजीने दिलेले थंडगार पाणी अधाशासारखं प्यायलो तेव्हा कुठे जीवात जीव आला! पण इतकं करून आमचं समाधान झालं नाही. भट्टीसारख्या तापलेल्या गाडीत बसून पुढे गेलो न गेलो तो मोहिली गावात रंगीबेरंगी सरबतांच्या बाटल्यांनी नटलेली बर्फाच्या गोळ्यांची गाडी नजरेस पडली. लगेच गाडी बाजूला लावली आणि सरबत, गोळे, मलई गोळे यांचा रतीब लावून, गोळेवाल्याची रविवारी मोठ्ठी बोहनी केली आणि तेव्हा कुठे आमचा जीव शांत झाला!
या साऱ्या गोष्टी निरखीत मागे गुमतारा शांत उभा होता. इतिहासाच्या प्रवाहात सामरिक महत्व असलेला पण काळाच्या प्रवाहात आडवाटेला पडलेला, विस्मरणात गेलेला असा हा देखणा किल्ला! छोटेखानीच पण दम काढणारा, माणसाच्या इच्छाशक्तीची कसोटी पाहणारा आणि आपल्या सुंदर, सुबक बांधकामाने भटक्यांना भुरळ घालणारा हा गुमतारा नकळतपणे आम्हाला सहनशक्तीचे धडे देऊन गेला होता! हातातले सरबताचे ग्लास आपसूकच उंचावले आणि किल्ल्याला एक सलामी देत आम्ही किल्लायचा निरोप घेतला – पुन्हा भेट होई पर्यंत!
– प्रांजल अपूर्व वाघ
१८ एप्रिल २०२३