भारतीय मंदिरातील शिखर शैलींचा विकास

by Pranjal Wagh
226 views
Kadasiddeswara Temple, Saundatti Fort

अश्वलायनसूत्र (इ.स.पू ५-६व शतक) म्हणते,

“…the ritual of Sulagava Sacrifice, is to be performed in two huts dedicated to Pasupati and Ambika and to their son Jayanta in the third hut in between the two huts.”

सांची येथे यज्ञातील अग्नीला अर्पण करणाऱ्या व्यक्तीच शिल्प सापडले आहे. यातील अग्नी ही एका कुटीमध्ये तेवत ठेवलेली आहे. वैदिक काळात होणारी अग्नीची उपासना पुढे हळू हळू चिन्हांच्या उपासनेकडे वळली. साधारण इ.स.पू. पहिल्या शतकाच्या सुमारास चिन्हांची पूजा सुरु झाली असं घोसुंडी, राजस्थान येथील एका  बंदिस्त प्रकारामध्ये असलेल्या “नारायण” या वैदिक देवतेला पुजण्यासाठी बनवलेल्या स्लॅबवरून आपल्याला अनुमान बांधता येतो.[1] विदिशा येथील हेलिओडोरसचा गरुड स्तंभत तर जगविख्यात आहे. साधारण, इ.स. पहिल्या शतकात हेलिओडोरस याने विदिशेत गरुडस्तंभ, तेथील विष्णुमंदिरासमोर उभा केला. त्या मंदिराचे अवशेष आज सापडले आहेत.

इ.स.पूर्व पहिल्या शतकात सुरु झालेला हा प्रवास, इ.स. १२ व्या शतकपर्यंत मंदिरांचं स्थापत्य विकसित करणारा ठरला. एका छोट्या “देवगृहात” होणारी अग्नीची उपासना एका “देवालयात” अथवा “प्रसादात” होणारी एखाद्या देवतेच्या मूर्तीची उपासना हा प्रवास अचंबित करणारा आहे. वराहमिहिराची बृहतसंहिता मंदिर बांधणीसाठी लागणारे  साहित्य आणि मंदिरांचे वेगळेवेगळे प्रकार, यांची माहिती देतं. 

प्राचीन भारतीय मंदिर स्थपतींनी, मंदिराची उभ्या मनुष्याच्या शरीराशी तुलना केली आहे. आणि या मंदिरात पुजले जाणारे  दैवत हे त्या शरीराचा आत्मा. याचा उल्लेख आगमात आलेला आहे. खाली दिलेल्या “देव-देवालय-प्रोक्त” चित्रात तीच तुलना अधोरेखित होते. यात देवळाच्या कळसातील भाग खालीलप्रमाणे आहेत. किंबहुना त्यांची नावच त्यांचं मानवी शरीराशी असलेला नातं सांगतात

स्कंध – खांदाकपाल – कपाळआमलक – मुख
ग्रीवा – मानशीर्ष – मस्तककळस – केस
मंदिराची उभ्या मनुष्याच्या शरीराशी केलेली तुलना [2]

वराहमिहिराची बृहतसंहिता आणि इतर पुराण, मंदिराचा “प्रासाद” असा उल्लेख करतात. प्रासाद म्हणजे राजाचा राजवाडा. किमान तीन माजले आणि शिखर असलेला असा राजवाडा राजाच्या राहण्यासाठी बनलेला असतो. राजाला आपण “विष्णूचा अवतार” अथवा “देवाचा प्रतिनिधी” मानतो. मग देवाचा प्रतनिधी जर महालात वास्तव्य करतो तर खुद्द देवाने कुटीत कसे राहावे? म्हणून त्याच्यासाठी प्रासादरूपी मंदिरे बांधली गेली. कृष्णदेव म्हणतात, ” … एखाद्या राजासारखंच, देवाला सिंहासन, छत्र आणि वर देण्यासाठी पंखा असणं हे तर नैसर्गिक आहे. देवाची पूजा होताना राजाला शोभेल असा देखावा, नृत्य-संगीत आणि दीप-प्रज्वलन ही केले पाहिजे” [3]

सातवाहन कालीन मंदिरांचे अवशेष आज जरी अस्तित्वात नसले तरीही गाथा सप्तशती या ग्रंथात विटांच बांधकाम असलेली “गौरी मंदिरं” यांचा उल्लेख आहेत.  मंदिरांना अज्जाघर, देऊळ असं संबोधलं जायचं आणि त्यांची विविध वैशिष्ट्ये देखील या गाथांमध्ये नमूद आहेत. या छोटेखानी मंदिरांना असलेले “शंकू शिखर” किंवा आकाशाकडे निमुळते होत जाणारे मनोरे होते असा उल्लेख गाथा सप्तशती करते. [4]

भारतीय मंदिरांतील शिखर शैलींचा विकास अभ्यासाचा असेल तर आपल्याला प्रत्येक मंदिर शैलीनुसार शिखरांची उत्क्रांती पाहावी लागेल. भारतीय मंदिरांत दोन शैली प्रामुख्याने आढळतात:

१. नागर शैली

२. द्राविड शैली

३. वेसर शैली (नागर आणि द्राविड शैलींचं मिश्रण)

नागर ही शैली उत्तर भारतात आणि द्राविड शैली दक्षिण भारतात आढळते. पण हे फारच ढोबळ मानाने झालं कारण अनेक ठिकाणी नागर आणि द्राविड मंदिरे एकत्र देखील आढळतात उदा बदामी येथील चालुक्यकालीन महाकूट मंदिर समूहात नागर आणि द्राविड मंदिरे एकेमेकांच्या बाजूला आढळतात. या पुढे नागर शैलीच्या दोन उपशाखा म्हणता येतील अशा पण तरी देखील स्वतःमध्ये परिपूर्ण असलेल्या – भूमिज आणि फाम्सना मंदिर शैलींचा उल्लेख आवर्जून करायला हवा. त्यामुळे शिखरांचा अभ्यास करताना या चारही शैलींचा अभ्यास केला पाहिजे.

नागर मंदिरं आणि शिखर शैली :

नागर या शब्दाचा अर्थ होतो “of the city”. उत्तर भारत, दक्खन आणि तुंगभद्रेच्या खोऱ्यात देखील नागर मंदिरं आढळतात. इतक्या मोठ्या प्रदेशावर असलेल्या प्रभावामुळे, स्थानिक पातळीवर या नागर शैलीची अधिक उत्क्रांती होऊन, स्थानिक शैलींचा उगम झाला. भूमिज आणि फाम्सना मंदिरांचा उदय यातूनच झाला असावा. कृष्णदेव म्हणतात इ.स सातव्या शतकात या स्थानिक शैलींचा उदय झाला आणि इ.स. ९-१० व्या  शतकांपर्यंत या शैलींची  एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

डॉ देगलुरकरांच्या मते, “… it is a curvilinear spire (sikhara) constituting the most striking cognizance of the Nagara Temple. It initially appeared at the beginning of the 7th century. Then it was an embrio-Sikhara as seen of the Durga Temple in Aihole in Bagalkot district of Karnataka State. All projections of the sikhara are covered with a mesh of Chaitya window design. The sikhara terminates in a griva (a neck like construction) surmounted by a large amalaka or amalasaraka (ribbed circular member) crowned by a kalasa (a pitcher – like finial)”[5]

इ.स. सहाव्या शतकाच्या सुरुवातीला  बांधलेले देवगडचे दशावतार मंदिर हे भारतातील पहिले ज्ञात पंचायतन विष्णू मंदिर आहे. नागर शैलीतले प्रारंभिक शिखर येथे आढळते. कलशाकडे निमुळते होत जाणारे, अनेक थरांनी बनलेलं असं शंकू शिखर या देवळाला लाभले होते. सध्या अर्धभग्नावस्थेत हे शिखर आपल्याला दिसते. तसेच इ.स. पाचव्या शतकाच्या शेवटी बांधलेले भितरगावचे विटांचे बांधकाम असलेले गुप्तकालीन मंदिर देखील दशावतार मंदिरासारखेच नागर शैलीतील निमुळते शंकू शिखराचे बांधकाम दर्शवते. मात्र येथील शिखर संपूर्ण विटांनी बांधून काढलेला आहे. १८५० मध्ये वीज पडल्याने शिखर अर्ध उद्ध्वस्त झाले होते, जे पुढे बांधून काढण्यात आले.

देवगढचे दशावतार मंदिर
भितरगावचं विटांच मंदिर

कर्नाटकातील ऐहोळेचं दुर्गामंदिर हे आकाराने जरी चापाकार असले तरीही यावरील कळस हा नागर शैलीचा आहे. या मंदिराचा काळ इ.स. ७-८ व्या शिखराचा सांगितलं जातो.  महाराष्ट्रातही नागर शैलीची अनेक मंदिरं आढळतात. कल्याणजवळील लोनाडचे त्रिगर्भिय महादेव मंदिर याचं एक उत्तम उदाहरण. दुर्दैवाने या मंदिराचे शिखर आज अस्तित्वात नाही पण काही अवशेषांच्या आधारे येथे नागर शैलीचे शिखर होते असे सांगता येईल. डॉ जामखेडकरांच्या मते येथील शिखर “पंचांडक नागर”शैलीचा असावा.[6]

नागर लतीन शिखर शैली:

पूर्वभारतात ओरिसामध्ये आपल्याला जी मंदिर शैली सापडते ती नागर शैली जरी असली तरी तिथले बांधकाम वेगळ्या धाटणीचे आहे. या शैलीत “मंडपाला” “जगमोहन” म्हंटले जाते आणि जगमोहनावरील शिखराला “पिधा देऊळ” म्हणतात. तसेच गर्भगृहावरील शिखराला “रेखा देऊळ” म्हंटले जाते. ओरिसा शैलीतील नागर मंदिरांच्या शिखर शैलीला “नागर लतीन” म्हणतात.

नागर लतीन शिखर शैली

ओरिसामधील इ.स. ११ व्या शतकातील लिंगराज मंदिर हे लतीन शिखर पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण. या शिखराला १० भूमी अथवा मजले आहेत. भूमी/मजला म्हणजे मोठ्या शिखराच्या छोट्या प्रतिकृती असतात आणि छोटं आमलक एक मजला दर्शवितो. खालील चित्रात शिखराचे १० मजले सहज लक्षात येतील. या शिखराची  अथवा “रेखा देवळाची” उंची ६० मीटर इतकी आहे. भूमींवर सिंह आणि इतर मूर्ती कोरल्या आहेत व त्यावर आमलक आणि संपूर्ण कलश आहे.

तसेच ओरिसामधील पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचेही रेखा देऊळ, नागर लतीन शैलीचे आहे. ओरिसा शैलीतील मंदिरात सर्वात उंच शिखर (६५ मीटर) या मंदिराला लाभले आहे. येथील आमलकाला “नील चक्र” संबोधले जाते. अष्टधातूंनी बनलेलं हे आगळंवेगळं आमलक, ३.५  मीटर उंच आहे. खालील चित्रामध्ये जगन्नाथ पुरीच्या मंदिराची भव्यता लक्षात येते.

लिंगराज मंदिर
कोणार्क सूर्य मंदिराचा काल्पनिक आराखडा 
पुरीचे जगन्नाथ मंदिर

जगन्नाथ पुरीजवळच असलेले इ.स. १३व्या शतकात बांधलेले कोणार्कचे भव्य सूर्यमंदिरही नागर लतीन पद्धतीचे. तब्बल २४ चाकं असलेला सूर्याचा भव्य रथ असे या मंदिराचे रूप आहे. सध्या या मंदिराच्या नटमंडपांचा बराचसा भाग पडून गेलेला आहे आणि गर्भगृह अस्तित्वात नाही.  मात्र जगमोहन०अस्तित्त्वात असून त्याच पिढा देऊळ फान्सणा शैलीत आहे व त्याचीच उंची ६५ मीटर आहे. यावरून गर्भगृहाचे रेखा देऊळ किती भव्य आणि उंच असेल याची आपण एक कल्पना नक्कीच करू शकतो.

कोणार्कच्या सूर्यमंदिराचे पिधा देऊळ

नागर शिखर शेखरी शैली:

नागर शैलीत अनेक छोट्या शिखरांनी संयुक्त अशी एक शिखर शैली देखील अस्तित्वात आहे. त्याला “शिखर शेखरी” असे संबोधले जाते.

खजुराहोचे कांदरीया महादेव मंदिर हे या शैलीचे उत्तम उदाहरहन ठरते. चंदेल राजा विद्याधर याने हे मंदिर इ.स. १०२५ मध्ये हे बांधून पूर्ण केले म्हणून याला चंदेल नागरी शैली असे ही म्हंटले जाते. एका उंच जगतीवर हे उभे आहे आणि सुस्थितीत आहे. इथल्या गर्भगृहावरील शिखरावर ८४ छोटी शिखरं आहेत. या छोट्या शिखरांना “उरुशृंग” म्हणतात.

शिखर शेखरी शैलीचे शिखर असलेले, उंच जगतीवर बांधलेले, खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिर

नागर भूमिज शैली:

हेन्री कझिन, ऍडम हार्डी आणि कृष्ण देव हे तिघेही भूमिज शैलीला “नागर शैलीची “Deccan Variety” असे संबोधतात. भुवनदेव लिखित अपराजितपृच्छ ग्रंथात भूमिज शैलीचा उल्लेख करतो. साधारण १९४६ च्या सुमारास Stella Kramrisch यांनी आपल्या जगविख्यात “द हिंदू टेम्पल” या आपल्या ग्रंथात भूमिज म्हणजे “Born of  the  Earth” असे म्हंटले आहे. त्यांनी भूमिज शैली माळव्यापुरती मर्यादित आहे असे म्हंटले आहे पण “लक्षणसमुच्चय” आणि ” अपराजिता” हे दोन्ही माळव्याबाहेर रचलेले ग्रंथ भूमिज शैलीचा उल्लेख करतात. तसेच कृष्णदेव यांच्या नुसार “भूमि” या शब्दाचा अर्थ “मजला” असा आहे. आणि स्थापत्यशास्त्रीय दृष्टिकोनातून हाच अर्थ योग्य वाटतो कारण भूमिज शिखरावरील कूटस्तंभांची रचना एखाद्या इमारतीच्या मजल्यांसारखी असते. डॉ देगलूरकर आपल्या “टेम्पल आर्किटेक्चर अँड स्कल्प्चर ऑफ महाराष्ट्र” या ग्रंथात भूमिज शिखर शैलीचे विस्तृत वर्णन करतात. त्याचे थोडक्यात वर्णन खाली

  १. या शिखरांना चार लता अथवा “कणा” असतात – चार मुख्य दिशांना चार लता

  २. या चार लतांमध्ये शृंगांची रचना असते. जसे आपण खालून वर जातो तसे शृंगांची उंची/आकार कमी होत जातो. यांची संख्या horizontally ३-५ असते आणि vertically ५-९ अशी असते. याना कुटस्तंभ असे म्हणतात

  ३. प्रत्येक लतेच्या  पायथ्याला चैत्यासारख दिसणारं कोरीव काम असते आणि त्यात “sculpted medallion” असते. त्याला शुरसेनक म्हणतात. या चैत्यरूपी कोरीव कामात एखाद्या दात्याच शिल्प असतं.

  ४. या शिखरातील जी मुख्य लता असते  – जी मंदिराच्या दिशेला तोंड करून असते ती – त्यावर यावर कोरीव कामाने सुशोभित असे शुकनासक असते आणि त्यावरील  शुरसेनकात मंदिरातील मुख्य दैवताची मूर्ती असते.[7]

महाराष्ट्रातील अंबरनाथ जवळील १०व्या शतकातील शिवमंदिर हे भूमिज शैलीचे उत्तम उदाहरण आहे. वरील वर्णनातील सगळ्या गोष्टी तिथे आढळतात. त्याचे शिखर जरी पडलेल असले तरी भूमिज शैलीचं शिखर स्पष्टपणे ओळखता येते. इ.स. १२व्या शतकात बांधलेले महाराष्ट्रातील झोडगे येथील माणकेश्वर मंदिर येथे संपूर्ण भूमिज शिखर पाहावयास मिळते.

अंबरनाथचे शिवमंदिर – भूमिज शैलीचे शिखर

नागर फान्सणा शैली:

या शैलीतील मंदिर काश्मिरात आढळतात. तसेच महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर गावी असलेल्या  नागेश्वर मंदिराचे बांधकाम या फान्सणा शैलीतले आहे.

फान्सणा शैलीचे नागेश्वर मंदिर – खिरेश्वर

डॉ देगलूरकर म्हणतात, “It is a square shrine with a porch or otherwise with a pyramidal shikhara consisting of plain, broad, flat square slabs place of one above the other forming diminishing tiers. These slabs can be plain or multiple eave variety”[8]

ऍडम हार्डी म्हणतात की इ.स. ९व्या शतकापासून या शैलीचे बांधकाम अस्तित्वात आहे पण जो पर्यंत या शिखरांवर आमलक नसते तो पर्यंत यांना नागर शैली म्हणतात येत नाही

नागर  शिखर शैलीतील शिखरं मग ते लतीन/शिखर शेखरी/ वल्लभी/ भूमिज/फांसणा/कूट असो त्या शिखरांवर आमलक असणे अत्यंत आवश्यक मानले जाते.[9]

बहुदल मंदिर:

महाराष्ट्रातील सिन्नर येथे असलेले गोंदेश्वर पंचायतन  मंदिर हा मंदिर समूह साधारण इ.स. ११-१२ शतकात बांधला गेला. येथील ४ छोट्या मंदिरांचे शिखर नागर शैलीचे आहेत. गुढमंडपाचे शिखर फासणा शैलीचे आहे आणि गर्भगृहाचे मुख्य शिखर भूमिज शैलीचे आहे. इथे नागर  शैलीतील तीनही प्रकारचे शिखर आपल्याला पाहायला मिळतात. अशा मंदिरांना बहुदल मंदिरं म्हणून संबोधले जाते[10]

सिन्नर येथे असलेले गोंदेश्वर पंचायतन  मंदिर

द्राविड शैली:

मुख्यत्वे दक्षिण भारतात द्राविड शैलीची मंदिरे सापडतात. गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि मुखमंडप असा साधारण आराखडा या मंदिरांचा असतो. वास्तविक आगमनाच्या आणि शिल्पशास्त्रानुसार अधिष्ठानापासून शिखराच्या स्तूपीपर्यंत असलेल्या वास्तूला विमान म्हणतात. पण साधारणतः द्राविड शैलीतील शिखरांना देखील विमान म्हणून संबोधले जाते. नागर शैलीची शिखरे आणि द्राविड शैलीतील शिखरांत काही ठळक फरक असतात. जसे नागर शिखरांमध्ये लता आणि भूमी (मजले) असतात तसे द्राविड शिखरांमध्ये स्पष्ट मजले असतात. नागर शिखरावरील मजले मोजण्यासाठी जसे आपण छोटी आमलक/ उरुशृंग मोजतो तसे द्राविड शिखरांवरील मजले मोजण्यासाठी कूट (चौकोनी) अथवा शाला (आयताकार) शिल्प मोजतात. सर्वात महत्वाचा फरक म्हणजे नागर शिखरांचा सगळ्यात ठळक घटक हे आमलक असते तसेच द्राविड शिखरांवर स्तूपी असते.[11]

पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिर

इ.स. ७ व्या शतकापासून अस्तित्वात असलेले पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिर हे द्राविड स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. या मंदिराच्या स्थापत्याची भरभराट विजयनगर साम्राज्यात झाली. या मंदिराचे गोपुर इथले खास आकर्षण आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे गोपुर हे नऊ मजली असून ते द्राविड शैलीचे आहे. स्तूपी सुद्धा उत्तम स्थितीत आहे.

बृहदेश्वर मंदिर

तंजावर येथील जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर तर द्राविड शैलीचा अजोड नमुना आहे. येथील शिखर १३ मजली असून त्याची उंची ६४ मीटर इतकी भरते. शिखरावरील स्तूपी साधारण ८० टन वजनाची आहे. राजराजा चोळ याने इ.स. १०व्या शतकात पल्लवांचा पराभव केल्यावर हे मंदिर बांधले. 

वेसर शिखर शैली:

वेसर म्हणजे शब्दशः खेचर. Stella Kramrisch यांच्यानुसार “an issue of heterogeneous parents”. या मंदिरांचे विधान हा द्राविड मंदिरांप्रमाणे असतो पण स्थापत्य नागर शैलीचे असते. ऍडम हार्डी या शैलीला वेसर शैली न म्हणता चालुक्य मंदिर शैली म्हणतात कारण प्रामुख्याने ही मंदिरं चालुक्यांचा ज्या क्षेत्रात प्रभाव होता तिथे आढळतात. कर्नाटकातील बदामी आणि आजूबाजूच्या परिसरात असलेली ही मंदिरं आजही बऱ्यापैकी सुस्थिती आहेत. कर्नाटकातील गदग जिल्ह्यात, गजेंद्रगड तालुक्यात सुदी गावातील जोडू कलसा गुडी – दोन शिखरांच मंदिर हे वेसर शैलीचे आहे. दोन्ही शिखरं द्राविड शैलीची असली तरीही स्थापत्यात नागर शैलीचा प्रभाव जाणवतो. तसेच लक्कुंडी येथील काशीविश्वेश्वर देऊळ देखील वेसर शैलीतील आहे. पुढे राष्ट्रकूटांनी या शैलीचा विकास केला आणि महाराष्ट्रातील वेरूळच कैलास मंदिर हे वेसर शैलीत बनले.

गजेंद्रगड तालुक्यात सुदी गावातील जोडू कलसा गुडी
लक्कुंडी येथील काशीविश्वेश्वर देऊळ

भारतीय मंदिर शैलीतील मंदिरं आणि त्यांच्या शिखरांची उत्क्रांती जवळ जवळ १२ शतकं सुरु होती. या मधून नागर शैली, द्राविड शैली आणि वेसर शैली या शिखर शैलींचा उगम झाला. या उत्क्रांतीमुळे शिखर हा मंदिराचा अविभाज्य भाग तर बनलाच पण त्या त्या मंदिर पद्धतीची ओळख देखील बनला. 

– प्रांजल वाघ

(वरील लेख/असाइनमेंट साठये कॉलेज आणि होरायझन सेंटर फॉर कल्चरल स्टडीज यांच्या “मंदिर स्थापत्य” या कोर्सदरम्यान लिहिला गेला आहे. “इतिहासाच्या पाऊलखुणा यांच्या दिवाळी २०२१च्या दिवाळी अंकात हा प्रसिद्ध झालेला आहे)

(

विशेष आभार :


[1] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculpture of Maharashtra, P.17

[2] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.18, Illustrated by Abha Bhagwat

[3] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.19 quotes Krishna Deva (1997), Temples of North India,P.1

[4] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.20 quotes Joglekar, S.A., Gatha No 172 from The Gatha Saptshati

[5] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.24

[6] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.140

[7] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.25 quotes Aparajita Pruccha,112-2-3.

[8] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.25

[9] Hardy Adam, Temple Architecture of India, P.107

[10] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.272

[11] Deglurkar G.B., Temple Architecture and Sculptures of Maharashtra, P.26

Leave a Comment

You may also like