२०१६ साली होळीदरम्यान आम्ही जेव्हा बेळगावच्या दौऱ्यावर होतो, तेव्हा सौंदत्ती (सवदत्ती) जवळील परसगड किल्ल्याला देण्याचा योग आला. बेळगावच्या पूर्वेकडे, मलप्रभा नदीच्या तीरावर सौंदत्ती नावाच एक छोटेखानी शहर वसलेलं आहे. १९७२ साली याचं नदीवर “नाविलुतीर्थ” नावाचं धरण बांधले गेले आणि “रेणुका सागर” नावाचा मोठा सरोवर शहरालगत तयार झाला!
या सरोवराचे नाव “रेणुका”, सौंदत्ती शहरामागे असलेल्या विस्तीर्ण डोंगराचे नाव “येलम्मा गुडा” म्हणजेच येल्लमाचा डोंगर! ही येलम्मा म्हणजेच भगवान परशुरामांची आई – रेणुका! तिला स्थानिक लोकं येल्लमा म्हणतात! इथे येलम्मा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याच्या मागेच जमदग्नी ऋषींचे देखील एक मंदिर आहे! जमदग्नी म्हणजे भगवान परशुरामांचे वडील! असे मानले जाते की, हेच ते स्थान जिथे ऋषी जमदग्नी यांचा आश्रम होता. माता रेणुका देवी आणि भगवान परशुराम यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग याच डोंगररांगांमध्ये घडले.

मातृहत्येच पातक धुवून काढण्यासाठी परशुरामांनी याचं डोंगरावरच्या कड्यावर बसून तपश्चर्या केली असे मानलं जातं. आज त्या ठिकाणी एक विस्तीर्ण आणि सामरिक दृष्ट्या महत्वाचा दुर्ग उभा आहे. हा किल्ला “परशुरामाचा गड” म्हणजेच “परसगड”! याचं गडावर परशुरामांनी जिथे तपश्चर्या केली ती गुहा आज किल्ल्यावर आहे. रोज हजारो भाविक येलम्मा, जमदग्नी याचं दर्शन घेऊन त्यांच्या पुत्राचे दर्शन घ्यायला गडावर येतात! गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘रामतीर्थ’ या ठिकाणी परशुरामांनी आपली शस्त्रे धुतली होती अशी आख्यायिका आहे!

इ.स. १० व्या शतकात बेळगाव प्रांतावर आणि “सुगंधावर्ती” (सौंदत्ती) शहरावर “रट्ट” राजांची सत्ता होती. तेव्हाच या दुर्गाचा पाया रचण्यात आला. चालुक्यांचे मंडलिक असलेया या राजांनी मलप्रभा नदी आणि आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता हा दुर्ग बांधला असावा! पुढे राष्ट्रकुट, यादव, विजयनगर, आदिलशाही यांच्या अमलाखाली हा प्रदेश होता. १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयादरम्यान हा दुर्ग मराठ्यांच्या राज्यात सामील करून घेतला आणि त्याची डागडुजी करून तो अधिक भक्कम करून घेतला. मराठी स्थापत्य शैलीचा पगडा किल्ल्याच्या महाद्वाराच्या रचनेवरुन लक्षात येतो! संभाजी महाराज पकडले गेल्यावर मुघलांनी याचा ताबा मिळवला परंतु औरंगजेब मृत्यू पावल्यावर मराठ्यांनी मुसंडी मारली आणि पुनश्च परसगड स्वराज्यात दाखल झाला तो थेट पेशवाईचा अस्त होई पर्यंत!

गडाची स्थापत्यशैली पाहण्यासारखी आहे. गडावरील हनुमान मंदिर, जुन्या काळातील तोफांचे अवशेष, पाणी साठवण्याची खडकात खोदलेली टाकी आणि विस्तीर्ण तटबंदी आजही सुस्थितीत आहे. गडाच्या माथ्यावरून दिसणारे मलप्रभा नदीचे खोरे आणि सौंदत्ती परिसराचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट “जोगवा” याचे चित्रीकरण या किल्ल्यावर झाले आहे.
परसगड ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून तो आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी आहे आणि ऋषीमुनींच्या तपश्चर्येची जिवंत साक्ष आहे!
–प्रांजल वाघ
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
Youtube : Son Of Sahyadris



