मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा सौंदत्ती दुर्ग! 

मलप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या शहराचा संरक्षक!

by Pranjal Wagh
17 views
श्री काडसिद्धेश्वर मंदिराचे शिखर आणि मागे येलम्माच्या डोंगरावर असलेला, शिवाजी महराजांनी स्वराज्यात आणलेला परसगड!

बेळगाव शहराच्या आग्नेयास, मलप्रभा नदीवर “नाविलुतीर्थ” नावाचे धरण १९७२ मध्ये बांधले गेले आणि रेणुका सागर नावाचा जलाशय जन्मास आला! याच ठिकाणी सरोवराला बिलगून वसले आहे एक छोटेखानी शहर! पण हे शहर फार प्राचीन आहे! साधारण इ.स. ९व्या शतकात, राष्ट्रकुटांचे मंडलिक असलेले “रट्ट” राजे यांनी याचं ठिकाणी “सुगंधावर्ती” नावाचं शहर वसवलं. “सौगंधीपुरा” असेही त्याचे दुसरे नाव. याच सुगंधावर्तीचा अपभ्रंश झाला आणि आजचं “सौंदत्ती” अथवा “सवदत्ती” जन्माला आलं! इथे जवळच असलेल्या येल्लम्मा देवीच्या मंदिराच्या डोंगरावर परसगड नावाचा दुर्ग त्यांनी बांधला!

दुर्गच्या आतील भाग!
दुर्गच्या आतील भाग!

९व्या ते १९ व्या शतकापर्यंत सौंदत्ती शहराला अनेक राज्यकर्त्यांचा अंमल अनुभवता आला. रट्ट, देवगिरीचे यादव, विजयनगर, आदिलशाह इतके विविध राज्यांच्या अमलाखाली हा प्रदेश १७व्य शतकापर्यंत होता. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान हा प्रदेश स्वराज्याला जोडला. जवळच असलेला परसगड डागडुजी करून भक्कम केला आणि या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता बसली. साधारण १७३४ साली नवलगुंड-शिरसंगी येथील दुसऱ्या जयाप्पा देसाई या नायकाने सौंदत्ती शहरात एक कोट उभारला! हाच सौंदत्ती किल्ला!

दुर्गाचे महाद्वार!
दुर्गाचे महाद्वार!

तिहेरी तटबंदी असलेला हा भुईकोट एका छोट्या उंचवट्यावर बांधून काढलेला आहे. किल्ल्याबाहेर पूर्वी खंदक होता आणि खंदकालगत असलेली तटबंदी आज भग्नावस्थेत आहे. पण उरलेला किल्ला उत्तम स्थितीत आहे – जणू आजही तिथं एखाद्या राजाचं राज्य सुरु आहे! दुर्ग कसा वाचवायचा आणि हा अनमोल ऐतिहासिक वारसा कसा जतन करायचा याचं सौंदती दुर्ग हे एक उत्तम उदाहरण!

महाद्वाराचे रक्षक बुरुज !!
महाद्वाराचे रक्षक बुरुज !!

अष्टकोनी आकाराचा असलेल्या या दुर्गाला ८ उत्तुंग बुरुज आहेत. दुर्गाला एक मुख्य द्वार असून त्या समोर तटबंदी बांधून ते सुरक्षित करून घेतले आहे. किल्ल्याच्या आत एक पाण्याची टाकी आहे. हाच किल्ल्याचा मुख्य पाणीसाठा! आतील परिसर अत्यंत स्वच्छ ठेवलेला असतो आणि इथे अनेक ठिकाणी लहानमुलांसाठी खेळण्यायोग्य उद्यानं बनवलेली आहेत. अनेक ठिकाणी पडून गेलेल्या महालांची, घरट्यांची जोती आज ही टिकून आहेत.

दुर्गाचे दुसरे द्वार
दुर्गाचे दुसरे द्वार

दुर्गाच्या मध्यभागी दोन बुरुजांनी संरक्षित असा एक चौकोनी परकोट बांधला आहे. या परकोटाच्या आत आहे जयाप्पा देसाई यांनी बांधलेले “श्री काडसिद्धेश्वर महादेव मंदिर”! मंदिराच्या सभोवताली असलेल्या देवड्यांच्या छज्ज्यावर २०० हून अधिक वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कलाकुसर आहे! बालेकिल्ल्याच्या तटावर चढून सभोवतालच्या संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते! दूर पूर्वेकडे, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणलेला परसगड येलम्माच्या डोंगरावर दिमाखात उभा असलेला दिसतो!

काडसिद्धेश्वर मंदिराच्या परकोटाचा परिसर
काडसिद्धेश्वर मंदिराच्या परकोटाचा परिसर

छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर सौंदत्ती मुघलांकडे आली पण मराठ्यांनी पुन्हा आपले वर्चस्व इथे प्रस्थापित केले. पुढे १७७० च्या आसपास हैदर अलीने आपली क्रूर सत्ता इथे लादली पण १७९२ मध्ये मराठ्यांनी त्याचा श्रीरंगपट्टणला दणकून पराभव केल्यावर तहात हा प्रदेश आणि सौंदत्तीचा दुर्ग मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला! रामदुर्गचे पटवर्धन यांनी आपला अंमल इथे बसवला!

१७व्या आणि १८व्या शतकात छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांनी अखंड हिंदुस्थान आपल्या पराक्रमाने गाजवून सोडला! त्याच पराक्रमाची प्रचिती घ्यायची असले तर सौंदत्तीला नक्की भेट द्या!

प्रांजल वाघ

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

Youtube : Son Of Sahyadris

काडसिद्धेश्वर मंदिराचा परकोट आणि बालेकिल्ला
श्री काडसिद्धेश्वर मंदिराचा परकोट आणि बालेकिल्ला
Home » मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा सौंदत्ती दुर्ग! 

Leave a Comment

You may also like