पद्मदुर्ग – जंजीऱ्याच्या उरावर निर्मिलेली शिवलंका!

सिद्दीला महाराजांनी दिलेला शह!

by Pranjal Wagh
81 views
पद्मदुर्गाचे ड्रोन वापरून घेतलेले छायाचित्र!

मुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिलं तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर तो अनन्वित अत्याचार करे. बळजबरी धर्मांतर, लोकांना पकडून गुलाम म्हणून विकणे, आया-बहिणींची अब्रू लुटणे, कत्तली यामुळे तिथली प्रजा कंटाळून गेली होती. त्यात जंजिरा किल्ल्यात बसून हा सिद्दी दर्यावर सत्ता गाजवायचा आणि तिथला व्यापार आपल्या ताब्यात ठेवायचा.

पश्चिम किनारपट्टी ताब्यात घेणे, व्यापार सुरळीत चालवणे आणि प्रजेला धर्मांध सिद्दीपासून मुक्त करणे या दृष्टीकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड जवळील कासवाच्या आकाराच्या बेटावर पद्मदुर्ग बांधायचा ठरवला. सिद्दीच्या ऐन दारात किल्ला उभा करणे म्हणजे सामान्य कार्य नव्हे! शिवाजी महाराजांनी इ.स. १६७५ मध्ये दर्यासारंग दौलतखान याला बेटाची सुरक्षा आणि सुभेदार जिवाजी विनायक यांस रसद पुरवठ्याची जबाबदारी देऊन तिथे पद्मदुर्ग निर्माण करायला सांगितला. अनेक हल्ले, लढाया यांना तोंड देऊन चार वर्षात हा किल्ला उभा राहिला! पद्मदुर्ग बांधून शिवाजी महाराजांनी राजपुरीच्या म्हणजे जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजपुरीच निर्माण केली!

पद्मदुर्ग आणि मागे दिसणारा मुरुडचा प्रदेश
पद्मदुर्ग आणि मागे दिसणारा मुरुडचा प्रदेश

मुरूडच्या समुद्र किनाऱ्यावरुन आता ३०० रु प्रत्येकी अशा बोटी सुटतात. हे तिकीट काढून आपल्याला किल्ल्यात जाता येते. आपली बोट जिथे लागते त्याच्या डाव्या बाजूस पद्म्दुर्गाचा परकोट आहे. कमळाच्या पाकळ्याच्या आकाराच्या चर्या असलेला खणखणीत बुरुज आपल्या नजरेस पडतो. किल्ल्याच्या तटबंदीचे दगड शतकानुशतके समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत करत झिजले आहेत पण त्या दगडांमध्ये वापरलेला चुना आज ही शाबूत आहे! शिवरायांची दुर्गबांधणी किती उच्च दर्जाची होती याचा इथे प्रत्यय येतो! परकोटाच्या आत “कोटेश्वरी आई”चे छोटेखानी मंदिर, पाण्याचा हौद, अनेक तोफा आणि काही इमारतींचे अवशेष आहेत. दुर्लक्षित असल्यामुळे इथल्या भिंती अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहेत!

मुख्य किल्ल्याला दोन महाद्वार आहेत. इथली सगळी तटबंदी अजूनही शाबूत आहे आणि ७ भक्कम बुरुज आज ही पहारा देत उभे आहेत! किल्ल्यात पाण्याची टाकी, पहारेकऱ्याच्या देवड्या, तटात  असलेले शौचालय असे अनेक अवशेष आपल्या नजरेस पडतात! छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, संभाजी महाराजांच्या काळात पण पद्मदुर्ग मराठ्यांकडे होता. साधारण १६९८-९९ च्या आसपास सिद्दीने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे पेशव्यांनी अनेक प्रयत्ने करून पण हा किल्ला स्वराज्यात आला नाही. हा किल्ला शेवटी मराठ्यांकडे आला की नाही हे फक्त सर्वभक्षी काळच सांगेल!

बोटीत बसून परत निघताना दूर दक्षिणेस सिद्दीचा जंजिरा दिसतो. जवळच डोंगरावर शिवरायांनी बांधलेला सामराजगड आपल्या नजरेस पडतो! अलिबाग किवा मुरुडला गेलात तर मुद्दाम पद्मदुर्गाला भेट द्या! शिवरायांच्या दुर्गशास्त्राचा एक अनोखा नमुना म्हणून त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे!

  • प्रांजल वाघ (pranjalwagh@gmail.com)

( माहिती साभार :
१. वेध जलदुर्गांचा – भगवान चिले
२. कथा सागरी दुर्गांच्या – महेश तेंडूलकर)


2 comments

अनिरुद्ध June 16, 2025 - 1:18 AM

फारच मस्त, फोटो डिटेलिंग पण खुप छान.

Reply
Pranjal Wagh June 16, 2025 - 10:30 PM

मना:पूर्वक आभार!!

Reply

Leave a Comment

You may also like