बहादूर बंडी –  एकच वर्ष स्वराज्यात असलेला दुर्ग!

मराठ्यांच्या हृदयातील भळभळती जखम!

by Pranjal Wagh
1 views
चिलखती तटबंदी लाभलेला तिसरं दरवाजा आणि बालेकिल्ला

बल्लरी-हुबळी महामार्ग सोडत, डावीकडे वळण घेत जेव्हा आमची बस स्थानकात शिरली तेव्हा सूर्य अस्तास जाऊन काही वेळ लोटला होता. आभाळ हळू हळू अंधारत चाललं होतं. जानेवारीचा महिना असल्यामुळे संध्याकाळच्या हवेत मंदसा, हलका गारवा जाणवू लागला होता. नगरपालिकेच्या दिव्यांच्या उजेडात, खाण्याच्या ठेल्यांवरच्या रॉकेलच्या पिवळ्याधमक दिव्यांच्या उबदार प्रकाशात हे गजबजलेलं ऐतिहासिक शहर आता कुठे जिवंत होऊ लागलं होतं. सहज बस स्थानकाच्या मागे नजर गेली. अंधारलेल्या आकाशात उंच गेलेला एक काळाकभिन्न, महाकाय पर्वत उभा होता. हा पर्वतपुरुष म्हणजे शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान स्वराज्यात दाखल झालेला कोप्पळ दुर्ग!

२०१८ च्या सुरुवातीस रायचूर-लिंगसूर-मुद्गल-कनकगिरी-कोप्पळ परिसरातील दुर्ग आणि मंदिर पाहण्याचा बेत आम्ही आखला होता. लिंगसूरचा जलदुर्ग – कर्नाटकातील एकमेव नदीपात्रातील दुर्ग – पाहून आम्ही मोर्चा वळवला एका ऐतिहासिक शहराकडे! दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान इथल्या जनतेने मियाना बंधूंच्या धार्मिक अत्याचाराला कंटाळून शिवरायांसमोर गाऱ्हाणं घातलं – मियाना बंधूंचं पारिपत्य करावे, आमची सुटका करावी! त्यानुसार मराठे मदतीस धावून गेले. लिंगसूर जवळ तुंबळ युद्ध झालं. कान्होजी जेध्यांच्या नातवाने – १९ वर्षीय नागोजी जेध्याने – अतुलनीय पराक्रम गाजवत मियाना बंधूंवर हल्ला चढवला पण दुर्दैवाने मस्तकास बाण लागून तो धारातीर्थी पडला. ही बातमी ऐकताच नागोजीची १० वर्षीय पत्नी गोदुबाई पुण्याजवळील कारीत सती गेली. छत्रपती शिवराय जातीने सांत्वन करायला कारीस जाऊन आले. मियाना बंधूंचा सपशेल पराभव झाल्यावर हा परिसर आणि इथले महत्वाचे किल्ले स्वराज्यात सामील झाले. त्यातील मुख्य किल्ला म्हणजे कोप्पळ!

लॉजवर पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे आसपासच्या किल्ल्यांची माहिती आम्ही घेऊ लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोप्पळच्या उत्तरेस असलेला इर्कालगडा दुर्ग पाहून मग कनकगिरीला भेट द्यायची होती. आणि इतक्यात केवळ योगायोगाने एक अपिरीचीत दुर्ग नजरेस पडला! आणि असा नजरेत भरला की नकळत त्याच्या प्रेमात पडलो! कोप्पळच्या दक्षिणेस केवळ ५ किमीवर एक खडकवजा टेकडी आहे त्यावर हा दुर्ग निर्मिलेला आहे. त्याचं नाव सुद्धा जगावेगळे – बहादूर बंडी! त्याचे बुरुज, निसर्गाशी संलग्न दरवाजांच्या रचनेचे रांगडं सौंदर्य फोटोत पाहून आमच्यासारख्या दुर्गप्रेमींची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली! ठरलं तर मग! कनकगिरीचा मुलुख पाहून झालं की संध्याकाळी या बहादूर बंडी नामक दुर्गास भेट द्यायची!

बहादूर बंडीचा नकाशा
बहादूर बंडीचा नकाशा

कोप्पळवरुन बहादूर बंडी गावासाठी थेट बस सेवा आहे. ती बस घेऊन आम्ही साधारण ४ वाजता गावात उतरलो. गावाच्या बाहेर पश्चिमेला बहादूर बंडीचा खडकाळ पर्वत आहे. कर्नाटकातील आणि दक्षिण भारतातील डोंगर ग्रॅनाईटच्या खडकाने बनलेले आहेत. सह्याद्रीपेक्षा खूप वेगळे! त्यामुळे इथले दुर्ग, त्यांचे दरवाजे शत्रू सैन्याच्या टप्प्यात सहजपणे येऊ शकतात. याचं कारणासाठी इथल्या दुर्गांवर तटा-बुरुजांचे अनेक पदर चढवून दुर्ग अभेद्य केलेला असतो. बहादूर बंडीचा दुर्ग असाच असेल अशी अपेक्षा होती.

किल्ल्याच्या पायथ्यास असलेला मारुती
किल्ल्याच्या पायथ्यास असलेला मारुती

गावात तोडक्या मोडक्या हिंदी-कानडीत चौकशी करून पश्चिमेकडील चढावर पाऊल टाकले. किल्ल्याच्या मागचे आकाश आता मावळतीस निघालेल्या सूर्याच्या सांजरंगांनी सोन्याहून पिवळ होऊ घातलं होतं. इतक्यात समोर ग्रॅनाईटचे आडवे खांब पडलेले दिसले, एकापुढे एक पडलेले! एका क्षणात लक्षात आलं – या तर किल्ल्याच्या पायऱ्या! नागमोडी वळणं घेत डोंगरावर चढत गेलेल्या! आम्ही पायऱ्यावर पाऊलं टाकत पुढे निघालो. अपेक्षा अशी की आजवर पाहिलेल्या कर्नाटकातील इतर किल्ल्यांसारखा दोन बलाढ्य बुरुजांच्या मधोमध उभा असलेला महाकाय दरवाजा समोर उभा ठाकेल! पण समोर जे काही पाहिलं त्याने आजवर पाहिलेल्या सर्व दुर्गाचं स्थापत्यशास्त्र विसरायला लावलं! 

अचानक वाट डावीकडे वळली, एका खडकापलीकडे लुप्त झाली. वाटेसोबत पावलं वळली खरी पण वळण घेताच तत्क्षणी ती जागच्या जागी थबकली. तोंडाचा “आ” वासून मी त्या खडकासमोर जागच्या जागी खिळून उभा राहिलो! असं काय पाहिलं होतं मी? दोन भले मोठे पाषाण एकमेकांना टेकून उभे होते. त्या पाषाणाच्या वर एक टेहळणी बुरुज माझ्यावर नजर ठेवून उभा होता आणि बरोबर त्या दोन खडकांमधून पायवाट आत जात एका दगडी चौकटीवजा दरवाजातून किल्ल्याच्या आत गेली होती! निसर्गाशी सुसंगत आणि संलग्न असं हे दरवाजा लपवणारं बांधकाम मी आजवर पाहिलं नव्हतं! आत जाताच लक्षात आलं की या दोन संरक्षक खडकांमध्ये, दरवाजाच्या वरच्या भागी काही नैसर्गिक खिडक्या आहेत. इथून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवता येतं आणि दरवाजावरील बुरुजाच्या माऱ्यातून वाचून कोणी गनीम इथवर आलाच तर इथूनच त्याला अचूक टिपता येतं! प्रवेश मार्ग इतका चिंचोळा असल्याने हत्ती सोडून, तोफा डागून या दरवाजाचे तुम्ही काहीच वाकडे करू शकत नाही. खेळण्यांच्या दुकानात सोडलेल्या लहान बालकाच्या उत्साहाने आणि विस्फारलेल्या नेत्रांनी आम्ही हे अजब, रांगडं सौंदर्य अक्षरश: पिऊन घेत होतो! आडवाटेला पडलेल्या, विस्मरणात गेलेल्या या दुर्गरत्नाने आपले एक एक पैलू उलगडायला आता कुठे सुरुवात केली होती!

नैसर्गिकरित्या खडकात बांधलेले पहिले प्रवेशद्वार२
नैसर्गिकरित्या खडकात बांधलेले पहिले प्रवेशद्वार
पहिले प्रवेशद्वार - आतील बाजूने
पहिले प्रवेशद्वार – आतील बाजूने

पहिल्या दरवाज्यातून आत आल्यावर दुसरा दरवाजा उजवीकडे जरा दूर होता. कातळात जरा उंचावर भुयारी मार्गासारखा लपलेला! पण व्यवस्था अशी केली होती की प्रत्येक जागेवरून किल्ल्यातले सैनिक शत्रूवर अचूक नेम धरू शकतील. इथल्या पायऱ्या चढून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करते झालो. दरवाजाची वाट लगेच डावीकडे वळते आणि आम्ही एका अरुंद बोळात प्रवेश केला. डावीकडे असलेली गावाकडील बाजू एक भक्कम भिंत बांधून अभेद्य केली होती. उजवीकडे अधिक उंचीवर बांधलेली किल्ल्याची संरक्षक भिंत आहे जिला जागोजागी बंदुका आणि बाण मारायला जंग्या केलेल्या आहेत. आणि समोर आहे तो बहादूर बंडीचा पूर्णपणे संरक्षित केलेला तिसरा दरवाजा. या द्वारावर एक रिकामी देवळी होती. कदाचित इथे कोण्या एके काळी श्री गणेशाची मूर्ती असावी! हे सारं अपूर्व दुर्गवैभव पाहत पाहत आम्ही गडाच्या तिसऱ्या भगत प्रवेश केला!

संरक्षित दुसरा दरवाजा
संरक्षित दुसरा दरवाजा
तिसरे प्रवेशद्वार
तिसरे प्रवेशद्वार

किल्ल्याच्या तटावर उभं राहून आजूबाजूचा प्रदेश न्याहाळताच उत्तरेकडे एक उंच, बेलग आणि बुलंद पर्वत नजरेत भरला! शिवरायांशी नातं सांगणारा कोप्पळचा दुर्ग आकाशात चढला होता! पण आम्हाला बहादूर बंडीबद्दल तेव्हा काहीच माहिती नव्हती. दुर्ग पाहताना मनात अनेक प्रश्न उठले होते. हा दुर्ग खुद्द शिवछत्रपतींनी बांधला असेल का? दक्षिण दिग्विजय मोहिमेत हा दुर्ग स्वराज्यात सामील झाला असेल का? भावनेच्या भरात शिवरायांच्या दुर्गस्थापत्याच्या खुणा मी या किल्ल्यावर शोधू लागलो. पण किल्ल्याच्या बांधकामात अनेक ठिकाणी भारतीय स्थापत्यासोबत युरोपीय शैली डोकावत होती. त्यामुळे माझ्यातल्या तार्किक दुर्ग अभ्यासकाला ती शक्यता धूसर वाटत होती. आणि तसंच झालं. पुढे अभ्यास केल्यावर कळलं की साधारण १७८२च्या सुमारास कोप्पळच्या दक्षिणेस असलेया “गुंटापुरा” नामक टेकडीवर शेख मुहम्मद या हैदर अलीच्या सरदाराने तो बांधून काढला. गडाच्या बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तसं सांगणारा एक फारसी शिलालेख आहे. जवळच आणखी एक फारसी शिलालेख हेच सांगतो!

हैदरच्या आधी बहादूर बंडीवर टाकी बांधल्याचा हाळे कन्नडा शिलालेख
हैदरच्या आधी बहादूर बंडीवर टाकी बांधल्याचा हाळे कन्नडा शिलालेख

पण हैदरने या “गुंटापुरा” टेकडीचा बहादूर बंडी दुर्ग बनवण्या आधी देखील या टेकडीला सामरिक आणि धार्मिक इतिहास असल्याची ग्वाही किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात असलेला हळेकन्नड मधील शिलालेख देतो,

“ज्यांच्या उत्तुंग मस्तकाला स्पर्श करणारी चंद्रकोर एखाद्या सुंदर चवरासारखी शोभून दिसते आणि जे तिन्ही लोकांच्या निर्मितीचे मूळ आधारस्तंभ आहेत, अशा भगवान शंभूंना (शिवाला) आमचे आदरपूर्वक प्रणाम असो.”

“शुभ असो! या समृद्ध [कोप्पळ/बहादूर बंडीच्या] क्षेत्रात, धार्मिक पुण्यासाठी आणि जनकल्याणासाठी ही पाण्याची टाकी बांधण्यात आली.”

या शिलालेखाच्या सुरुवातीस असलेला, शिवाचे स्मरण करणारा श्लोक साधारण विजयनगर साम्राज्याच्या काळात महत्वाच्या वास्तूंवरील शिलालेखात कोरला जायचा. त्याहूनही आधी मौर्य आणि चालुक्यांच्या काळात हे एक टेहळणीचे ठिकाण असू शकते कारण जवळच कोप्पळनजीक इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ दरम्यान कोरलेले सम्राट अशोकाचे शिलालेख सापडले आहेत. विजापूरची आदिलशाही, दक्षिण दिग्विजया नंतर मराठ्यांनी देखील हे ठिकाण टेहळणीसाठी वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही.  

टेहळणी बुरुजावरून बालेकिल्ल्याची भिंत
टेहळणी बुरुजावरून बालेकिल्ल्याची भिंत

अठराव्या शतकात म्हैसूरचं साम्राज्य कपटबळाने हस्तगत करण्याचा पराक्रम करणाऱ्या  “नवाब हैदर आली खान बहादूर” या आपल्या मालकाच्या स्मृतीप्रीत्यर्थ किल्ल्याला “बहादूर बंडी” हे नाव दिलं. एकेकाळी म्हैसूरच्या सैन्यात एक छोटा नायक असलेल्या हैदरने मारलेली मजल ही निश्चितच कौतुकास्पद आहे. दक्षिणेत निजाम-उल-मुल्कासोबत, हैदर-टिपू हे दोघे शत्रू मराठ्यांच्या बगलेतील बाभळीचे काटे ठरले होते. गुत्तीच्या प्रदेशावर अधिराज्य गाजवणाऱ्या, संताजी घोरपडेंचे पुतणे मुरारीराव हिंदुराव घोरपडे यांचा पराभव करून त्यांने कैदेत टाकणारा हा हैदर पुढे १७८२ मध्ये मरण पावला. दुर्ग बांधून होईपर्यंत तो जिवंत होतं की नाही याचे उत्तर अज्ञात आहे. पण उत्तर कर्नाटकात आपले बस्तान बसवू पाहणाऱ्या मराठ्यांच्या मार्गात हा एक मोठा अडथळा हैदरने निर्माण करून ठेवला! हैदरच्या मरणानंतर त्याचा पुत्र टिपू हा सुलतान झाला. हैदरपेक्षा शतपटीने क्रूर आणि धर्मांध अशा या टिपूने बहादूर बंडी अधिक बळकट करून घेतला. फ्रेंच आणि भारतीय दुर्गशास्त्राला पडलेलं एक आगळंवेगळं स्वप्न आहे बहादूर बंडी! त्याचे स्थापत्य वर्णायला शब्द तोकडे पडावेत इतकं! 

हा लढवय्या दुर्ग असल्याने इथे लष्करी इमारतींचे अवशेष आणि काही पाण्याची टाकी सोडता फारसे अवशेष शिल्लक नाहीत. या लढाऊ दुर्गाच्या दुसऱ्या टप्प्यावर विस्तीर्ण मैदान आहे आणि इथून उजवीकडे वळण घेताच एक भक्कम बुरुज नजरेस पडतो! पण त्याधी तिसऱ्या दरवाजाच्या बुरुजात एक छोटी खोली आहे त्यात हनुमानाची सुंदर मूर्ती स्थापन केलेली आहे! या बुरुजाच्या पायथ्याकडे पुन्हा एक पायऱ्यांची वाट लुप्त होत होती! एव्हाना या किल्ल्याचे रंग आमच्या लक्षात आले असल्याने इथे एक  दरवाजा असणार हे निश्चित आम्हाला ठाऊक होतं आणि तसचं झालं! भूयारासारख्या मार्गाने वर चढून आम्ही आत प्रवेश केला आणि दुर्गाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा लगेच डावीकडे अभिमानाने छातीचा कोट करून उभा असलेला दिसला! मुख्य-द्वाराच्या बाजूलाच एक छोटी दिंडी आहे. शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी ही बंद करत असावेत. इथेच तो फारसी शिलालेख हैदरच्या सरदाराने कोरून ठेवला आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर काही गोष्टी नजरेत भरतात. इथले फ्रेंच आणि भारतीय दुर्ग स्थापत्य मिश्रित बुरुज, खडकातील खळग्यात बांध घालून जागोजागी बांधलेली पाण्याची टाकी आणि निसरड्या ग्रॅनाईटवर बांधलेली सलग तटबंदी!

तिसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर खोलीत असलेला मारुती
तिसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर खोलीत असलेला मारुती
बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा
बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा

इथले बुरुज विस्तीर्ण आहेत. त्याच्या चर्या मोठ्या तोफांसाठी बांधल्या गेल्या असून बंदूकधरी सैनिक त्यावर झोपून शत्रू टिपू शकेल इतक्या रुंद आहेत. ग्रॅनाईटवर उभारलेली सलग तटबंदी सरकून खाली पडून नये म्हणून इथे आणखी एक क्लृप्ती केलेली आढळते. भिंतीच्या पायाशी दगडी खुंट्या ठोकून संपूर्ण भिंतीचा भार  वाहणाऱ्या पायथ्याच्या दगडांना आधार दिला आहे. ही अशीच व्यवस्था कोप्पळ (कर्नाटक) आणि मडकसिरा (आंध्र प्रदेश) येथे केलेली आम्ही पाहिली आहे. सह्याद्रीतील किल्ल्यांवर ही व्यवस्था आढळत नाही. भूगोल आणि निसर्गाप्रमाणे आपली दुर्ग बांधणी कशी बदलावी लागते याचं हे उत्तम उदाहरण.

भिंतीच्या पायाजवळ मारलेल्या दगडी खुंट्या
भिंतीच्या पायाजवळ मारलेल्या दगडी खुंट्या

बहादूर बंडीचा किल्ला दरवाजे, तट आणि बुरुज बांधून इतका अभेद्य करून ठेवला असला तरी त्याच्या अभेद्य संरक्षक कवचात एक कच्चा दुवा आहे आणि ते म्हणजे जलव्यवस्थापन! रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात म्हणतात त्याप्रमाणे पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेला दुर्ग सर्वोत्तम! पण बहादूर बंडीवर पाण्याचा नैसर्गिक स्रोत नाही! त्यामुळे दुर्गावरील खडकातील भेगा, सखोल भाग बघून जागोजागी बंध घालून पाण्याचा विपुल साठानिर्माण करून ठेवला आहे. इथला उन्हाळा भयानक असतो. जानेवारीच्या महिन्यातही किल्ल्यावर पाणी होतं पण ते रायगड-राजगड किवा अगदी कोप्पळ इतक्या विपुल प्रमाणात नव्हता!

पाषाणातील खळगी वापरून बनवलेली पाणी टाकी आणि समोर बांधाची भिंत
पाषाणातील खळगी वापरून बनवलेली पाणी टाकी आणि समोर बांधाची भिंत

सूर्य आता पश्चिमेच्या क्षितिजाशी सलगी करू लागला होता. चटका लावणाऱ्या उग्र सूर्याचा स्पर्श आता हळू हळू मृदू होऊ लागला होता. बालेकिल्ल्याच्या बुरुजावर उभं राहून कृष्णा-तुंगभद्रेच्या सुपीक दोआबाचे हे सौंदर्य न्याहाळताना सारखा एकंच प्रश्न मनाला भेडसावत होता. जणू एका दुर्गस्थपतीने आपलं सर्व कौशल्य पणाला लावून गुंटापुरा नामक टेकाडापासून आम्हा वेड्यांसाठी बहादूर बंडी नावाची एक उत्कृष्ट कलाकृतीच निर्माण केली होती! पण हा दुर्ग कधी मराठेशाहीत आला होता का? 

सरदार हरीपंत फडके
सरदार हरीपंत फडके

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात क्रूरकर्मा टिपू दक्षिणेतल्या राजवटींसाठी डोकेदुखी ठरू लागला होता. सामान्य हिंदू प्रजेचा छळ मांडत त्याने मराठ्यांच्या आणि निजामाच्या प्रदेशात आपली क्रूर सत्ता लादायला सुरुवात केली. १७८५ मध्ये टिपूने बेळगाव जिल्ह्यातील नार्गुंड आणि कित्तूर जिंकून घेत मराठ्यांच्या राज्याचे लचके तोडायला सुरुवात केली आणि इथे ठिणगी पडली! १७८६ मध्ये मग नाना फडणविसांनी निजामासोबत युती करून टिपू विरुद्ध सामुहिक आघाडी उघडली! पहिल्या मराठा – इंग्रज युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या सरनोबत हरीपंत फडके यांनी मोहिमेचा धुरा सांभाळत मराठ्यांच्या फौजा बेळगाव-गजेंद्रगड-सावनुर-बदामी हा परिसर जिंकत निघाल्या. निजामाने रायचूर-अदोनीचा प्रदेश जिंकला. कोप्पळच्या प्रदेशात घुसत मराठे-निजाम यांनी टिपूच्या सैन्याला शिंगावर घेतले. असंख्य चकमकी, छोटी युद्ध इथे झाली. शेवटी १७८६ मध्ये बहादूर बंडीच्या दुर्गाला मराठ्यांनी वेढा घातला. टिपूचे सैन्य युरोपीय कवयातीतले आणि मराठ्यांपेक्षा अधिक प्रगत शस्त्रे वापरात असल्यामुळे किल्ल्यातून अत्यंत कडवा प्रतिकार झाला. पण संकटासमोर मन तुकवेल तो मराठा कसला? हरीपंतांच्या फौजांनी शेवटी बहादूर बंडीवर मराठ्यांचा जरीपटका फडकवलाच! कृष्णा-तुंगभद्रेचा  सुपीक प्रदेश मराठी दौलतीत सामील झाला!

मराठे-निजाम विरुद्ध टिपू ही मोहीम १७८७ मध्ये सुद्धा सुरूच होती. आणि टिपू सारख्या कपटी, खुनशी आणि धर्मांध सुलतानाला काफ़िरांचं वर्चस्व सलत होतं. १७८७ मध्ये टिपूने अचानक या परिसरात धाडी टाकायला सुरुवात केली. वायुवेगाने हालचाली करत, युरोपियन धाटणीचं कवायती सैन्य, अग्निबाण आणि तोफखाना घेऊन तो बहादूर बंडीवर कोसळला. अग्निबाणांचा वर्षाव करून कोठारे उध्वस्त केली, रसद तोडली, कडे चढून रात्रीचे हल्ले केले. सरनौबत हरिपंत फडके दूर होते आणि आसपासचे रसदीचे मार्ग टिपूने रोखल्यामुळे आपल्या फौजेला मदत करू शकले नाहीत! पण किल्ल्यातले मराठे काही शांत बसले नव्हते! त्यांनी या सर्व हल्ल्यांना तोंड देत, कडवा प्रतिकार करून गड राखला. पण दुर्दैवाने  बहादूर बंडीवरील पाण्याचा साठा संपत आला! पाणी संपल्यावर मराठी सैन्याला पराभव दिसू लागला आणि त्यांनी नाईलाजाने शरणागती पत्करली.  दुर्ग ताब्यात आल्यावर टिपूचे हिरवे निशाण बहादूर बंडीवर फडकू लागले.

१७८७ मध्ये गजेंद्रगडचा तह मराठे-निजाम आणि टिपू यांच्यात झाला. बदामी पर्यंतचा प्रदेश आणि ४८ लाखांची खंडणी दर वर्षी टिपूने पेशव्यांना द्यायचे ठरले. आदोनी पर्यंतचा मुलुख निजामाला मिळाला. टिपूच्या हालचालींना चाप बसला. पण या सगळ्यात बहादूर बंडी मराठ्यांच्या हातून जो गेला तो गेलाच!

पुढे 1790 मध्ये ब्रिटिश-निजाम-मराठे यांनी टिपू विरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. तेव्हा निजामाच्या फौजांनी हा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांनी तेव्हा धारवाडचा मुलुख मुक्त केला. तेव्हापासून हा दुर्ग निजामाच्या हाती लागला आणि पूढे १८०० मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला!

सूर्य अस्तास जाऊ लागला तसे निळं, निरभ्र आकाश सोनेरी होऊ लागलं. नाईलाजानेच पावले दुर्ग उतरू लागली. किल्ल्याचे तिन्ही टप्पे उतरून येई पर्यंत आकाशात तांबड्या-जांभळ्या रंगांची अक्षरश: रंगपंचमी झाली होती. देखणा बहादूर बंडी शांतपणे त्या रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघत होता. आपल्या अखंड तीन पदरी तटबंदीत मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची सामावून एखाद्या स्थितप्रज्ञ योद्ध्यासारखा उभा होता! छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर तब्बल १०२ वर्षांनी अस्तित्वात आलेला हा अप्रतिम लढाऊ दुर्ग केवळ एक वर्ष मराठ्यांच्या साम्राज्यात सामील झाला! दैवचक्र असं फिरलं की पुढे हा दुर्ग टिपू, निजाम आणि इंग्रजांकडे गेला पण मराठ्यांकडे कधीच परत आला नाही!

डोंगर उतरून परतीची बस घेण्यासाठी आम्ही डांबरी रस्त्यावर आलो आणि येता क्षणी पावले जागच्या जागी थबकली! गावात समोर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं तैलचित्र असलेला फलक लावला होता! कन्नडा भाषेत लिहिलं होतं “श्री छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय मराठा समाज, बहादूर बंडी” आणि त्या खाली लहान अक्षरात “श्री तुळजा भवानी कृपे”!

छत्रपती शिवरायांन मानणारा बहादूर बंडीचा समाज!
छत्रपती शिवरायांन मानणारा बहादूर बंडीचा समाज!

दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान या परिसराला मियाना बंधूंच्या जाचातून मुक्त करणाऱ्या राजाला इथली प्रजा विसरली नव्हती! दूर दक्षिणेत आपल्या दैवतालाच देव मानणारे लोकं आहेत हे पाहून अंगावर रोमांच उभा राहिला! उर अभिमानाने भरून आला! किल्ल्याने जरी अनेक राज्यकर्ते अनुभवले असले तरी इथल्या प्रजेला आपला खरा राजा कोण आहे हे निश्चितच ठाऊक होते! 

– प्रांजल वाघ
pranjalwagh@gmail.com

Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris

Leave a Comment

You may also like