घोरपड्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार – गुत्ती!

by Pranjal Wagh
84 views
गुत्तीचा परिसर!

घोरपडयांनी गाजवलेल्या अलौकिक पराक्रमाचा मूर्तिमंत साक्षीदार – गुत्ती किल्ला!

हा लेख साप्ताहिक सकाळ मध्ये ६ मे २०१९ रोजी प्रकाशित झाला होता

रात्रीचा गडद काळोख कापीत, धुळीचे लोट उडवत आणि असंख्य गचके, धक्के खात आमची APSRTC ची एसटी बस सुसाट धावत होती. एसटीच्या दिव्यांच्या उजेडात समोरील खड्डेवजा रस्ता अस्पष्ट दिसत होता आणि या सफरीत पुढे किती धक्के आपल्याला सोसायचे आणि पचवायचे आहेत याची कल्पना येत होती.
भागानगारच्या (आजचे हैदराबाद) नैऋत्येस असलेल्या आदोनीच्या विस्तीर्ण किल्ल्यास भेट देऊन, तेथील असंख्य मंदिर, बुरुज आणि दरवाजे यांचे अवशेष आम्ही डोळ्यांत साठवले. अस्ताव्यस्त पसरलेला हा किल्ला अनेक मंदिरांनी नटला आहे. तेथील एका सभामंडपाचे खांब स्वरनिर्मिती करणारे आहेत. बोटांनी त्यावर हलकेच वादन केले तरी स्वर निर्माण होतात! हम्पीच्या जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिरातसुद्धा असेच खांब आढळतात! भारतीय स्थापत्यशास्त्राच्या प्रगत असण्याचा हा आणखी एक पुरावा! उन्हे उतरायला लागताच आम्ही किल्ला उतरून अदोनीच्या बस आगाराकडे कूच केली. थोडी क्षुधाशांती करून गर्दीने ओसंडून वाहणारी गुत्तीची बस आम्ही पकडली. एव्हाना अंधार पडायला लागलं होता! बसमधील एकूण माणसांची आणि सामानाची स्थिती पाहून मला पुलंच्या “म्हैस” मधल्या “मुला माणसांचे आणि सामानाचे पुरण भरलेल्या गतिमान करंजीची” आठवण झाली! फक्त त्या अंधारात आमच्या बस समोर कुठल्या म्हशीला यायची दुर्बुद्धी येऊ नये अशी मनोमन प्रार्थना करीत मी आंध्रचा पठारी वारा खात बसलो! आपल्या सौम्य प्रकाशानं आसमंत उजळून टाकणारं फाल्गुनी पौर्णिमेचं पिठूर चांदणं पाहत पाहत माझ्या विचारांना बसच्या गतीची लय कधी गवसली कळलंच नाही!
तसं २०१९ हे आमचं कर्नाटक भटकंतीचे चौथे वर्ष! २०१६ मध्ये सुरु झालेला ही वेडी हौस आज एक परंपरा बनली आहे! बघता बघता कानडी मुलुखातले ७ जिल्हे आम्ही पालथे घातले. तेथील असंख्य किल्ले, मंदिर, स्मारकं पहिली तरीही काहीतरी राहून गेले असे वाटत राहते! २०१९च्या भटकंतीमध्ये आंध्रप्रदेशातील आदोनी आणि गुत्तीचा पण समावेश आम्ही केला! मागील तीन वर्षासारखच या वर्षी देखील या कन्नड देशाने मायेने जवळ घेऊन आपल्याकडील अनमोल रत्नांचा खजिना समोर रिता केला! भाषा, धर्म, चालीरीती या सार्यांच्या सीमा ओलांडून हा देश मला दरवर्षी आपलंसं करतो, शतकानुशतकांच अतूट नातं सांगतो! प्रत्येक ठिकाणी अद्भुत अनुभव येतात! गावा-गावात एकतरी मनुष्यरत्न गवसते! काही ठिकाणी अपूर्व स्थापत्य कलेचे आविष्कार पाहायला मिळतात, काही ठिकाणी भाषेची अडचण असूनही संवाद कधीच थांबत नाहीत, काही ठिकाणी दुर्गम भागात मराठी बोलणारी एखादी असामी भेटून जाते! अशा ठिकाणी व्यतीत केलेल्या क्षणात जी प्रचिती या पामरास मिळते, तिला शब्दांच्या बंधनात अडकवण्या इतकी प्रतिभा माझ्याजवळ तरी नाही! दैवी प्रचीती म्हणा हवे तर!

पण या अद्भुत कानडी सफारीचा सिलसिला सुरु कुठून झाला? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या आमच्यासारख्या भटक्यांना सगळं सोडून दूर कर्नाटकाच्या graniteच्या दगड धोंड्यांना पाहण्याची हुक्की आली कुठून? या सगळ्याच्या मागे हा गुत्तीचा प्रचंड आणि प्रबळ दुर्ग आहे! दादरला एकदा पुस्तकाच्या दुकानात सहज पुस्तकं पाहताना एक सुरेख पुस्तक नजरेस पडले – “एक झुंज शर्थीची” – घोरपडे घराण्याच्या वंशजांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद! ही गोष्ट आहे पराक्रमाची, शौर्याची आणि शर्थीने एकाकी झुंजणाऱ्या मुरारीराव घोरपड्यांची – सेनापती संताजी घोरपड्यांच्या वंशजांची! पुस्तकातील छायाचित्रे पाहताक्षणी मी गुत्तीच्या किल्ल्याच्या प्रेमात पडलो आणि त्याचक्षणी हा किल्ला पहायचा ही गाठ मनाशी बांधली! पण planning, logistics याची अडचण लक्षात घेता गुत्ती किल्ला पाहण्याचा योग यायला ४ वर्ष लागली!
धुळीचे लोट उडवीत आमची बस गुत्ती मध्ये शिरली आणि माझी विचारांची तंद्री भंगली! बस मधून उतरल्या उतरल्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गुत्तीच्या किल्ल्याची अंधुक आकृती आकाशात चढलेली दिसली! अंधाराने वेढलेला किल्ला साद घालीत होता! तूर्तास आम्हाला निवारा शोधणे गरजेचे होते. गुत्ती मध्ये असलेल्या २ लॉज पैकी “बऱ्या” लॉजमध्ये उरलेल्या शेवटच्या २ खोल्यांमध्ये आम्ही आमचा तळ ठोकला, खास आंध्र पद्धतीचे “मील्स” पोटभर जेवलो आणि बसच्या प्रवासाने मोडकळीस आलेली पाठ बिछान्यावर टेकली! ऐन गर्मीत घरघर करीत गरम वारा देणाऱ्या पंख्याची हवा खात, समोर खिडकीतून दिसणाऱ्या गुत्तीच्या बुरुजावर नजर लावली आणि डोळे कधी मिटले माझे मलाच कळले नाही!
भल्या पहाटे उठून, सगळे आवरून आम्ही गुत्तीचा तो अवाढव्य दुर्ग पाहण्यास निघालो. गुत्ती गावाच्या गल्लीबोळातून चालत चालत आम्ही गडाच्या पहिल्या दरवाज्यात पोहोचलो! या पडक्या दारातून एक गाडी रस्ता आत जातो आणि बाहेर एक सुंदर सुबक नरसिंह मंदिर आहे! दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर काही अंतर चालल्यावर पुरातत्व खात्याची चौकी लागते. तिथे नोंद करून फरसबंदीच्या वाटेने गड चढायला सुरवात केली! एकोणिसाव्या शतकात जेव्हा गुत्तीचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होतं तेव्हा त्यांनी पायथ्याला स्मशानभूमी बांधली. तिथल्या संगमरवरी tombstone वरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे! इंग्रज या जागेला गूटी (Gooty) असे संबोधायचे. गडाचा खरा चढ इथून सुरु होतो. थोडे वर चढून आल्यावर सहज म्हणून मागे नजर टाकली. तेव्हा या प्रचंड किल्ल्याचे सामरिक महत्व लक्षात आले! चार टेकड्यांवर पसरलेला हा अजस्त्र दुर्ग म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. यातील सगळ्यात उंच टेकडी म्हणजे एक दगडी सुळकाच जणू! हा गुत्तीचा अभेद्य बालेकिल्ला! उंच बेलाग कातळकड्यांवर भक्कम तट-बुरुजांची खणखणीत झालरच चढली आहे! सभोवतालच्या ३ टेकड्यांवर अशी नागमोडी तटबंदी बंद्धून किल्ल्याला अजिंक्य रूप दिले गेले आहे! या चारही डोंगरांच्या मधोमध वसलंय जुन गुत्ती शहर – बाहेरील आक्रमणांपासून पूर्णपणे सुरक्षित! इंग्रज अधिकारी विल्क्स ने म्हटल्याप्रमाणे, “फक्त दुष्काळ पडला अथवा फंदफितुरी झाली तरच हा किल्ला सर करता येईल!” समुद्रसपाटीपासून २१५० फूट आकाशात चढलेल्या या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अनेक खोल विहिरी! यातील मुख्य गावात असलेली विहीर अशी आहे की त्यातल झरा उन्हाळ्यात सुद्धा आटत नाही!

गुत्तीचा बुरुज!

गुत्तीचा बुरुज!

पायथ्यापासून गडमाथा गाठेपर्यंत आपल्याला १३ भक्कम दरवाजे पार करून जावे लागतात. प्रत्येक मोक्याच्या जागेवर योग्य ठिकाणी शत्रूवर मारा करण्यासाठी जागा आहेत. बालेकिल्ल्यात पोहोचे पर्यंत गोळीने टिपले नही गेला तरी शत्रू अर्धमेला होऊन जाईल इतका उत्तुंग किल्ला! गडाचा तिसरा दरवाजा चढून आत गेल्यावर समोर थोडे मोकळे मैदान लागते आणि लगेच गोलाकार वळण घेऊन चौथ्या दरवाज्याच्या आत आले की उजवीकडे कड्यात महिषासुरमर्दिनी आणि गणपती कोरलेले आहेत. देवीला स्थानिक सत्यम्मा म्हणतात. पूर्वी इथे एक घुमटी होती आणि जेमतेम एक माणूस आत जाईल इतकीच जागा असे. आज ती घुमटी नष्ट झाली आहे आणि देव उघड्यावर पडले आहेत हे पाहून मन उद्विग्न होते! असे सांगतात की याच सत्यम्मा देवीसमोर बसून मुरारीराव घोरपडे शक्तीची उपासना करायचे! किल्ल्यात अनेक ठिकाणी दुर्मिळ अशी गजांतलक्ष्मी नजरेस पडते! अनेक ठिकाणी कानडी शिलालेख कोरून ठेवले आहेत! दुर्दैवाने कानडी वाचता येत नसल्यामुळे ते आम्हाला समजले नाहीत! त्याचे वाचन झाले असल्यास माहिती शोधून काढण्याची मनोमन नोंद करून आम्ही पुढे सरकत राहिलो!

१४ दरवाजांपैकी एक!

१४ दरवाजांपैकी एक!

गजलक्ष्मी असलेला गुत्तीचा दरवाजा

गजलक्ष्मी असलेला गुत्तीचा दरवाजा

सुबक बांधणीचा दरवाजा!

सुबक बांधणीचा दरवाजा!

पागेतून दिसणारा बालेकिल्ला!

पागेतून दिसणारा बालेकिल्ला!


बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर आतमध्ये भग्न इमारतींची गर्दी आपल्याला आढळते! बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी एक बुरुज आहे ज्यावर पूर्वी फिरती तोफ असणार जिथून सभोवतालच्या प्रदेशावर अचूक मारा करता येत असेल. दुर्दैवाने, आज तिथे तोफ नाही आणि खजिना अथवा गुप्तधन शोधणाऱ्या लोकांनी अक्षरशः बुरुज खोदून काढला आहे! गुत्तीच्या किल्ल्यात अनेक ठिकाणी अशी खणती लावलेली आपल्याला दिसते! आपल्याच इतिहासाबद्दल आपली ही उदासीनता पाहून मन खिन्न झाल्यावाचून राहत नही!
बालेकिल्ल्यात इस्ततः विखुरलेले अवशेष पाहता एकेकाळी येथे घोरपड्यांच्या राजवटीत नांदलेल ऐश्वर्य आणि समृद्धीची कल्पना येते! सहज डोळे बंद केले तर डोळ्यासमोर इथलं मुरारीरावांचा दरबार, महाल आणि अनेक इमारती क्षणार्धात उभ्या राहतात, मन इतिहासाच्या कल्पनाविलासात रममाण होतं! पण समोर अस भग्न आणि दारूण वास्तव असताना फार काल हे स्वप्न टिकत नाही आणि आपण झटकन वास्तवात परत येतो! सहज दूरवर नजर जाते आणि एका बुरुजाच्या टोकावर बांधलेली एक छोटीशी चुन्यात बांधलेली छत्री अथवा घुमटी नजरेत भरते! त्याला “मुरारीरावांचे आसन” असे म्हणतात!

या छत्रीत बसून मुरारीराव बुद्धिबळ खेळायचे आणि झोपाळ्यावर झोके घ्यायचे असे म्हणतात. या मोक्याच्या ठिकाणहून मुरारीरावांनी अनेकदा पसरलेल्या आपल्या मुलुखावर नजर फिरवली असेल. इथून नजर थेट क्षितिजाला भिडते! येणारे जाणारे सारेच नजरेस पडतात! गडावरील ही सगळ्यात खास जागा आहे! इतक्या गर्मीत सुद्धा इथे थंड वाऱ्याची झुळूक खेळती होती! मनात सहज विचार आला, ई.स. १७७५ मध्ये जेव्हा हैदर अलीने बल्लरीचा किल्ला घेतल्यावर गुत्तीकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा मुरारीरावांना एक खलिता धाडला. त्यात हैदर अलीचे मांडलिकत्व पत्करल्याचे प्रतिक म्हणून एक लाख रुपये खंडणी आणि हैदर अलीची सेवा करण्यासाठी आपल्या सैन्याची एक तुकडी पाठवून द्यावी असं आदेश होता! हा खलिता त्यांनी याच छत्रीत उभे राहून वाचलं असेल का? हा धमकीवजा आदेश वाचून हा ढाण्या वाघ खवळला असणार! रागाने त्यांच्या मुठी वळल्या असतील आणि याच जागी उभे राहून त्यांनी हैदरला प्रयुत्तर पाठवले असणार! ते प्रत्युत्तर असे होते, “ मी तुला हाताखाली केवळ पाच माणसे असलेला साधा नायक म्हणून बघितले आहे. या उलट मी मुरारीराव हिंदुराव, मराठा साम्राज्याचा सेनापती आहे. तू तेव्हापासून आतापर्यंत बराच मोठा झाला असशील, परंतु मी कधीही तुझ्याशी चार हात करू शकतो. आता तू मागितलेल्या खंडणीबाबत बोलायचे, तर मला खंडणी वसूल करण्याची सवय आहे, देण्याची नाही!”

मुरारीराव घोरपडे यांचे आसन!

मुरारीराव घोरपडे यांचे आसन!

गुत्तीचा परिसर!

गुत्तीचा परिसर!

या स्पष्ट व बाणेदार उत्तरामुळे हैदर आपल्यावर चाल करून येणार हे मुरारीरवास पक्के ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी निकराच्या लढाईची तयारी सुरु केली. १७७५ पर्यंत हैदरचे सामर्थ्य बरेच वाढले होते. मुरारीराव ऐन साठीच्या वयात होते. माधवराव पेशव्यांचा अकाली मृत्यू, नारायणराव पेशव्यांचा खून अशा धक्क्यातून मराठे शाही सावरत होती. त्यामुळे मदतीची अपेक्षा न बाळगता अत्यंत शांतपणे, स्थितप्रद्न्य होऊन शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा निर्धार करून हा लढवय्या गुत्तीमध्ये हैदरची वाट पाहत बसला!
पंचवीस हजारांचे सैन्य घेऊन हैदर जेव्हा गुत्तीवर कोसळला तेव्हा त्यास वाटले की सहज किल्ला आपल्या हातात येईल पण गुत्ती नगरावर ४-५ हल्ले करून सुद्धा गुत्ती नगर कब्जात आले नाही. उलट किल्ल्यातून इतका कडवा प्रतिकार झाला की हैदरचे बरेच नुकसान झाले! पण कालौघात, गुत्ती नगर पडले आणि हैदरच्या ताब्यात किल्ल्यातील मुख्य पाण्याचा साठा गेला! इथून फासे आवळण्याची खरी सुरुवात झाली! बल्लरीच्याकिल्ल्यावरून फ्रेंच तोफा मागवून हैदेरने गुत्तीवर त्यांचा भडीमार सुरु केला! आतूनही त्यास त्याच तोडीचे प्रत्युत्तर मिळत होते. गुत्तीच्या राखण्दारांनी मुरारीरावांच्या नेतृत्वाखाली अतुलनीय शौर्य गाजवल! उन्हाळा लांबला आणि हळू हळू किल्ल्यातले पाणी संपत चालले याची हैदरला जाणीव होती आणि म्हणूनच त्याने फद्फितुरीचे काही प्रयत्न करू

न पहिले पण कौतुकास्पद बाब ही की मुरारीरावांचा एक ही सैनिक फितूर झाला नही आणि शेवटपर्यंत लढत राहिला! लढाईच्या एका वर्णनात असे म्हंटले आहे, “ किल्ल्यातून मारलेल्या प्रत्येक गोळ्याचा नेम इतका अचूक आहे की दरवेळी शत्रूची तीन चार मनसे गारद होतात!एकही बार वाया जात नाही!” किल्ल्यातले पाणी संपत आलं तसं शेवटी मुरारीवांनी तहाची बोलणी सुरु केली पण हैदरला या दुष्काळी परिस्थितीचा सुगावा लागताच त्याने बोलणी हाणून पाडली. हैदर अलीने शेवटी फौजफाटा दुपटीने वाढवून मुख्य किल्ल्यावर तोफांचा अविरत मारा करण्याचे आदेश दिले. हा मारा सतत २ दिवस चालू होता! शेवटी थकून तोपची पडायला लागले तेव्हा हा हल्ला थांबवून हैदरची सेना निकराने गुत्तीला भिडली! आतून मराठ्यांनी कडवा प्रतिकार करत हैदरच्या माणसांना पिटाळून लावले आणि त्यांचे १२०० सैनिक यमसदनी धाडून 2500 सैनिक जायबंदी करून टाकले. आणि हे सगळे करताना त्यांच्या जवळ खायला कच्चे तांदूळ आणि तहान भागवायला चिखलातील ओलावा फक्त होता! पण या साऱ्याची तमा न बाळगता मुरारीरावांचा सानिक धन्यासाठी अविरत लढत होता! शेवटी १५ मार्च १७७६ ला किल्ल्यातील पाण्याचा शेवटचा थेंब संपला आणि दुर्दैवाने शरणागती पत्करावी लागली. आपल्या लाडक्या किल्ल्याचा निरोप घेऊन, सत्यम्मा देवीच्या शेवटचे पाया पडून मुरारीराव किल्ला उतरले तेव्हा घोर्पद्यांचे काळे पांढरे निशाण अभिमानाने पराक्रमाची साक्ष देत बुरुजावर फडकत होते! ते किल्ल्याबाहेर येताच हैदरने त्यांना अटक केली, हैदरचा मुलगा टिपू याने रिकाम्या किल्ल्यात घुसून तो काबीज केला. दोन आठवड्यात हैदरने मुरारीरावांना श्रीरंगपट्टण येथे हलवले आणि नंतर कब्बलदुर्ग नावाच्या डोंगरी किल्ल्यात तुरुंगात डांबून ठेवले. तिथे त्यांचे अनन्वित छळ आणि अत्याचार अवलंबिले. अनेक प्रयत्न करून सुद्धा हैदरने मुरारीरावांना सोडण्यास नकार दिला. अखेर या पराक्रमी योद्ध्याचादुर्दैवी अंत कब्बल्दुर्गावर झाला. नेमकी तारीख कुणालाच ठाऊक नाही! साधारण १७७७च्या अखेरीस मुरारीराव “हिंदुराव” घोरपडे हे वादळ शांत झालं! अठराव्या शतकात मराठ्यांचा दरारा दक्षिणेत वाढवणारं हे असं पराक्रमी व्यक्तिमत्व. कब्बल्दुर्गावर तो तुरुंग अजूनही त्यांची आठवण सांगतो.आणि गुत्तीच्या प्रत्येक दगडाने तर त्यांना डोळेभरून पहिले आहे! एक प्रजावत्सल राज्यकर्ता, एक विवेकी आणि धैर्यशील योद्धा, अनुभवी राजकारणी अशी त्यांची अनेकविध रूपे या किल्ल्याने पहिली आहेत! नव्हे अजूनही प्रत्येक फत्तरांत जतन करून ठेवली आहेत!
किल्ला उतरताना हा सगळं जिवंत इतिहास डोळ्यासमरून सरकत होता. इथल्या प्रत्येक दगडात मुरारीरावांच अस्तित्व जाणवत होतं. इतिहासाचा अभ्यास करताना भावनाशून्य होऊन करावा म्हणतात पण काही वेळेला भावना आड येतातच! या विचारांच्या तंद्रीत पायथ्याला केव्हा पोहोचलो कळलेच नाही! एव्हाना सूर्य आग ओकीत ऐन माथ्यावर आला होता! सहज वळून किल्ल्याकडे नजर फिरवली तेव्हा सूर्य किरणे डोळ्यात गेली, तत्क्षणी मुरारीवांच्या आसनात धिप्पाड व्यक्ती आपल्याकडे पाहत आहे असं भास झाला! हाताने उन्हाची तिरीप अडवून पाहतो तर असं रिकामे होते. फक्त वाऱ्यावर घोरपडयांचा काळा पांढरा ध्वज एकटाच फडकत होता!

-प्रांजल वाघ
०६ मे २०१९

Creative Commons License
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

2 comments

दिलीप वाटवे March 30, 2020 - 8:21 PM

व्वा सुंदर. खूपच मस्त लिहिलंयस. अशी थिम बेस्ड भटकंती आवर्जून करायला हवी. असे मराठ्यांच्या पराक्रमाचे लेख वाचल्यावर प्रत्यक्ष तिथे जावंसं वाटतं. वरचेवर असंच लिहायचं थोडं मनावर घे.

Reply
Pranjal Wagh April 15, 2020 - 11:25 PM

धन्यवाद सर!! काही काही गोष्टी अशाच घडून येतात!तुम्ही म्हणताय तसं मनावर घेऊन नक्की वरचेवर लिहीन!

Reply

Leave a Comment

You may also like