आरंभ!!
“सम्या , भगवा घेतलास का?” विसरू नकोस!”
जवळ जवळ दिवसांतून ५-६ वेळा मी हे समीर पटेलला विचारलं होतं. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. २६ जानेवारीला २०१३ ला आम्ही लिंगाण्यावर पुन्हा चढाई करणार होतो! मागच्या वर्षीच्या सपशेल माघारीच्या जखमांचे व्रण आता नाहीसे झाले होते पण लिंगाण्याने शिकवलेले धडे अजूनही मनात ताजे होते – किंबहुना आम्ही ते विसरूच नयेत असे सह्याद्री गुरुजींनी शिकवले होते!! “मी लिंगाणा परत करणार रे, नक्की!” असं सगळ्यांना सांगता सांगता आम्ही अगदी कंटाळलो होतो. वेळ आली होती शब्दांना कृतींमधून प्रकट करण्याची. मग एकदाचं आम्ही ठरवलं – येत्या प्रजासत्ताक दिनी लिंगाण्यावर यशस्वी चढाई झालीच पाहिजे!
पण मग त्यासाठी काही खबरदाऱ्या घेणे जरुरी होते. काही चुका जाणीवपूर्वक टाळायच्या होत्या. नियोजन मुख्यतः असं करायचं होत जेणेकरून मोहिमेत अडचणी येऊ नयेत, मोहीम सुरळीत पार पडावी! म्हणूनच पहिला निर्णय असा घेतला की फक्त प्रस्तरारोहणाचं शिक्षण असलेले सहकारी ह्या मोहिमेस घेऊन जाणे आणि दुसरा असा की ५ लोकांहून अधिक जणांनी जायचं नाही! गतवर्षी आम्ही ९ लोकं घेऊन लिंगाणा सर करायचा प्रयत्न केला होता. बऱ्याच फोना-फोनी व मेला-मेली नंतर एकदाची चार जणांची यादी तयार झाली ती अशी – रोहन शिंदे (लीड), प्रांजल वाघ (2nd Man/Last Man), Christian Spanner (ख्रिस) आणि समीर पटेल((2nd Man/Last Man).
आता थोडं ख्रिस बद्दल सांगतो! ख्रिस हा मुळचा जर्मन – एक मुरलेला प्रस्तरारोहक, एकदम फिट! चाळीशीचं वय सांगायचा पण आमच्याहून तब्येतीने तगडा! आय टी कंपनी मध्ये कामाला असणारा, प्रोजेक्टच्या निमित्ताने त्याचा पुण्यात ६ महिने मुक्काम होता. अन त्यात रोहनचा मित्र! मग काय डोंगरांची ओढ त्याला देखील स्वस्थ बसू देई ना! म्हणून त्याला सुद्धा बरोबर घेतला – अस्सल देशी रांगड्या सह्याद्रीचा वारा त्याला ही पिऊ द्या! इथले भयानक रौद्र सौंदर्य पाहून जगाला सांगू द्या!
मग उर्वरीत साहित्य “Travel Light, Travel Fast” हे ब्रीदवाक्य ध्यानी ठेऊन गोळा केले. जेवणखाण करण्यात जास्त वेळ दवडायचा नव्हताच म्हणून “Ready To Eat” वर जास्त भर दिला गेला. पण ह्या सगळ्यात प्रस्तरारोहण साहित्यात कोणतीच तडजोड होऊ नये ह्याची आम्ही खबरदारी घेतली. Equipment Check झाल्याशिवाय ती आम्ही बरोबर घेतली नाहीच व एरवी पण कोणी तसं करू नये!
बरं नेहमीप्रमाणे भगवा हा तर आम्ही फडकवणारच होतो. पण प्रजासत्ताक दिन असल्यामुळे, लिंगाणा सर केल्यावर तिथून भगव्या आधी तिरंगा फडकलाच पाहिजे असं आम्ही ध्येय निश्चित केलं होतं.
मग समीर आणि मी मुंबईहून पुण्यास निघालो! २५ जानेवारीला दुपारच्या कडक उन्हात आमचा रणगाडा (माझी इंडिका) एक्स्प्रेसवेच्या तापलेल्या रस्त्यावरून धावत होती! सोबत Climbing Equipment, ए. आर. रेहमानचे संगीत आणि भोवतालच्या सह्याद्रीच्या गोष्टी करत आम्ही दोन मुसाफिर गाडीतून निघालो पुण्याला! पुण्याला रोहन शिंदे व त्याचा जर्मन मित्र Christian Spanner (ख्रिस) आम्हाला भेटणार होते!
मागील वेळी आम्ही कोकणातून महाड ओलांडून लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेल्या पाने गावातून चढून लिंगाणा खिंड गाठली होती आणि मग लिंगाण्यावर चढाई केली होती. म्हणजे थेट कोकणातून घाटमाथा! उभा चढ, त्यात भाजून काढणारं ऊन आणि पाण्याची कमतरता! ह्या मार्गाने लिंगाणा गाठायचा व नंतर पुढची ६०० -६५० फूट चढाई करायची म्हणजे माणसाची पार दमछाक होते!
म्हणून ह्या वेळी थेट पुणे-वेल्हे मार्गे हरपुड गाठायचे होते. हरपुडला गाडी ठेवायची अन पायी मोहरी गावात पोहोचायचं अन तिथून पायपीट करून, बोराटा नाळ उतरून थेट लिंगाण्याच्या पायथ्याशी थडकायचे असा आमचा ठरलेला प्लान होता. ह्यामुळे आमचा stamina वाचणार होता अन वेळ देखील!
पण एखादा ट्रेक ठरवल्याप्रमाणे झाला तर मग त्याला ट्रेक थोडीच म्हणायचं?
गोष्ट झाली अशी की मला अन समीरला पुण्यात पोहोचायला थोडा उशीर झाला. मग पटापट रोहन आणि ख्रिस ह्यांना “उचलले” अन निघालो सुसाट वेल्ह्याकडे. वेल्हा हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेला गाव. पाबे घाटाची खिंड ओलांडली अन इथेच सारी गम्मत सुरु झाली. संध्येच्या किरणांत न्हाऊन निघालेले स्वराज्याचे दोन अभेद्य किल्ले समोर उभे ठाकले! स्वराज्याची पहिली राजधानी राजगड अन प्रचंडगड तोरणा! महामानवाच्या सहवासाचे परम भाग्य लाभलेले, पावन झालेले असे ते दोन किल्ले पाहिले अन गाडी थांबवलीच. दिवस उतरणीला लागला होता आणि सर्वत्र एक सुंदर शांतता पसरली होती. बस! इथेच थांबावे अन त्या दोघांशी संवाद साधावा! त्यांच्या मनीच्या गुजगोष्टी जाणून घ्याव्या! कोण जाणे त्यांच्या भेटीतून महाराजांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडेल एखादवेळेस!

पण तसे करणे दुर्दैवाने शक्य नव्हते. कारण हरपुड गाव अंधाराच्या आत गाठायचं होतं आणि अजून बराच पल्ला बाकी होता!
मग दामटवली गाडी. पण हा सह्याद्री तुम्हाला त्याच्या सौंदर्याने कुठे, कधी अन कशी भूल पाडेल काहीच सांगता येत नाही! अस्तास निघालेल्या सूर्याची किरणे स्पर्श करतील त्याला सोनं करीत होती आणि अशाच एका सुंदर वळणावर स्वच्छंद विहार करताना आम्हाला दिसला एक राजबिंडा Crested Hawk Eagle! मंत्रमुग्ध होऊनच आम्ही गाडी थांबवली. त्या सोनेरी क्षणी शांततेची खरी व्याख्या समजली. त्या जादुई वातावरणात माझा अन त्या गरुडाचा एक निःशब्द पण अविस्मरणीय संवाद घडला!
अंधाराची चाहूल लागली. आता निघणे अपरिहार्य होते. चावी फिरवली, गुरगुरत गाडी सुरु झाली अन निघालो भरधाव वेल्ह्याच्या रोखाने! वेल्हे गावात पोहोचताच एका म्हाताऱ्या आजींना विचारलं,
“का हो मावशी, हरपुडला कसं जायचं ?”
आजी हसल्या. बहुदा मावशी म्हटल्यामुळे खूष झाल्या असाव्यात.
म्हणाल्या,”ह्यो असा रस्ता धरायचा अन भट्टी गावाकडून फुडं जायाचं. तिथून मग वरोती लागल.त्योच रस्ता धारायचा आन तसंच हरपुडला पोचता बघा तुमी!”
“किती वेळ लागेल हो?”
गाढवा पुढे गीता वाचली म्हणून तो थोडीच शहाणा होणार? तीच गत आमची! इतकी वर्ष ट्रेक करून एकदम बेसिक मिस्टेक! ह्याला काय म्हणावं आता? “गावकरी Standard Time” (जी. एस. टी ) हा शहरी लोकांना लागू होत नाही हे ठाऊक असूनही असले प्रश्न?
आजी म्हणाल्या, ” हितच हाय की! २० मिनिटात पोचाल!”
नंदीबैलासारख्या माना हलवून आम्ही पुढे निघालो अन मग डोक्यात घंटी वाजली! आजी २० मिनिटे म्हणाल्या म्हणजे आम्हाला नक्की त्याच्या दुप्पट वेळ लागणारच होता! अहो, तो Standard Conversion Formula आहे! 🙂 आणि झाले ही तसेच! तब्बल एका तासानंतर आम्ही वरोती गावात पोहोचलो. पण तत्पूर्वी, भट्टी गावातून तोरण्याचे जे काही रौद्र रूप दिसले आम्हाला त्याला काहीच तोड नव्हती! आज वर असे उभे कडे कधी पाहीले नव्हते! सायंकाळच्या अंधुक प्रकाशात तो भीमरूपी तोरणा एखाद्या अजस्त्र पैलवानासारखा उभा होता! आपले बाहू पसरून आवाहन करीत होता! हिम्मत असेल तर याच!!
वरोतीपर्यंत जाणारा रस्ता कच्चा होता त्यामुळे वेग तर कमी झालाच पण पोहोचेपर्यंत अंधार पडू लागला. मग तिथे जमलेल्या काही तरुण पोरांना विचारलं, ” मित्रा , हरपुडला हाच रस्ता जातो का?”
“व्हय! पर पोचेपर्यंत अंधार हुईल!”
“गाडी जाईल ना?”
“जाईल की! पन रस्ता लई खराब हाये! तुमी येक काम करा. आज रातच्याला हितच थांबा. उद्या सकाळी जावा हरपुडला!”
जानी! बंदे के बात में दम हैं! पोरगं एकदम ब्येस बोललं! आम्ही गाडीमध्येच एक छोटी चर्चा केली अन सगळ्यांचच मत पडलं – आजची रात्र वरोतीमध्येच मुक्काम करायचा, पहाटे लवकर उठून हरपुडला पोहोचायचं अन तिथून मोहरी गाठायचं!
मग गावकऱ्यांनी पडायला ओसरी दिली,वापरायला भांडी दिली आणि सरपण हवं का हे देखील विचारलं! आम्ही आमच्याकडचा Multi Fuel स्टोव्ह दाखवल्यावर “असं बी असतंय व्हय!”, असे आश्चर्याचे बोल आणि वर “काही लागलं तर मागून घ्या!” असं आवर्जून सांगितलं! असे अनोळखी माणसास इतक्या आपुलकीने कोण शहरात वागवेल का?
ओसरीवर आम्ही विसावलो. ख्रिसने त्याचा स्टोव्ह पेटवला.आता पटापट जेवण उरकायचं, सामग्रीचं वितरण करायचं आणि मग लवकर झोपी जायचं! पहाटे लवकर उठून मोहरी गावी पोहोचायचं होतं ना! जेवण तयार होतंय तोवर मी जरा बाहेर पडलो, आसपास जरा हिंडू लागलो.
बाहेर पिठूर चांदणं पडलं होतं. गाव हळू हळू झोपी जात होतं. विझलेल्या चुलींचा एक गावरान सुगंध हवेत भिनला होता. वाऱ्याची थंड अशी मंद झुळूक हळूच गुदगुल्या करून जायची. कुठल्याश्या जुन्या हरवलेल्या स्पर्शांची आठवण करून द्यायची. खरं तर त्या चांदण्यात फिरत रहावसं वाटत होतं. एखादी कविता सुचतेय की काय असं वाटत होतं…
पण ह्या शांततेला सुरुंग लावीत, तिथून रोहन शिंदेंचा तोफखाना वाजू लागला, “वाघ्या, #@$# तिथे काय करतोयस? इथं कामाला ये!” मग जाणं भागच पडलं. काय आहे, रोहनच्या सुगरण पत्नीने, सोनालीने, आमच्यासाठी स्पेशल बटाट्याची भाजी पाठवली होती! मग काय? चांगल्या जेवणासाठी काय पण!!
जेवणाचा सपशेल फडशा पाडल्यावर भांडी जास्त धुवावी लागली नाहीत कारण ती तशी चाटून पुसून साफ झालेली होती! जेवणाचा खमंग वास आल्यामुळे गावातील कुत्री आशेने आली होती. आशाळभूतपणे आमच्याकडे पहात बसली होती – कधी बोके जेवण आटोपतायत आणि कधी उरलं सुरलं आपण फस्त करतोय असं त्यांना झालं होतं. त्यांची साफ निराशा झाली!
पेट पूजा होऊन, ढेकर देऊन तृप्त झाल्यावर आम्ही बसलो सामग्री वाटून घेण्यासाठी. दोर कुणी घ्यायचा, कॅराबीनर्स, क्विक Draws, हार्नेस कुणाकडे राहतील ह्याबाबत चर्चा/वाद होऊन त्याची वाटणी करून घेतली. आणि मग झोपण्याच्या तयारीला लागलो.थंडी वाढत होती, अंगातले कपडे तिला तोंड द्यायला असमर्थ ठरत होते. म्हणून मग कानटोपी, जाकीट घालून आम्ही स्लीपिंग bags अंथरल्या आणि त्यात पटापट घुसलो. स्लीपिंग bag ला अंगाभोवती गुरफटून एखाद्या मांजरीसारखं गुडूप होऊन झोपी गेलो. निरव शांतता, शीतल वातावरण, खास गावरान सुगंध आणि दिवसभर गाडी चालवून चालवून दमलेलं शरीर हे झोप येण्यासाठी एक रामबाण समीकरण आहे! काही क्षणातच शांत झोप लागली!
दुसऱ्याच क्षणी हेलिकॉप्टरच्या आवाजाने खाडकन डोळे उघडले! आजू-बाजूला थोडी नजर टाकली आणि हेलिकॉप्टरच्या आवाजाचा स्त्रोत लक्षात आला!
माझ्या बाजूला पडलेले ते तीन “मुडदे” घोरत होते! आपण किती “सुरात” घोरतोय ह्याची यत्किंचित पर्वा न करता हे तिघेही गाढ झोपले होते!
खड खड खड खड!!
घुर्र फुस्स!!
झोपेचं खोबरं झालं अगदी!
“आलिया भोगासि” म्हणून गपगुमान डोळे मिटले व झोपायचा प्रयत्न करू लागलो! झोप काही लागेना आणि मग ज्याची भीती होती तेच झालं! मनात विचारांनी थैमान घातले! हे विचार निर्लज्ज पाहुण्यांसारखे असतात! नको असताना येतात, हवे असताना जात नाहीत आणि हवा तितका वेळ मनाचा ताबा घेतात!आणि अतिथी देवो भव म्हणत ह्यांना सहन करावच लागतं! पण काही वेळा हे विचार म्हणजे आपले गुरु होतात, नकळत काहीतरी शिकवून जातात!
त्या दिवशी आम्ही जसे शहराकडून गावात आलो तसा एक सांस्कृतिक बदल झटकन लक्षात येऊ लागला. इथे आम्ही कोण कुठले हे न विचारता दोन क्षणात आम्हाला झोपायला ओसरी दिली, घरातली भांडी-कुंडी दिली! हे शहरात होईल का? इतका विश्वास आपण शहरातली लोकं ठेऊन कुणाला आसरा देऊ का? गाव जसं जसं मोठं होतं जातं तसं तिथल्या लोकांची मनं लहान का होत जातात? कोण कुठलं “मागासलेलं” वरोती गाव, माणुसकीच्या बाबतीत इतकं पुढारलेलं कसं असू शकतं?
मराठेशाहीत दसऱ्याला सरदारांच्या सेना सुटायच्या. गनीमाच्या प्रदेशात घुसून मुलुखमारी करायच्या! स्वराज्याच्या सीमा ओलांडून ते खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायचे! पण आम्ही देखील आज एका वेगळ्या प्रकारे “सांस्कृतिक” सीमोल्लंघन केल्याची जाणीव होऊ लागली!!
विचारांच्या ओघात मन भरकटत गेलं. डोळा कधी लागला कळलंच नाही आणि अचानक डोळ्यांसमोर आला तो लिंगाण्याचा बुलंद सुळका! मनात त्याचा चढ स्पष्ट दिसू लागला. तेथील प्रत्येक कातळ टप्पा नजरेत येऊ लागला. त्या प्रस्तराचा स्पर्श बोटांना होऊ लागला. किती आश्चर्याची गोष्ट आहे पहा ना! थकलेलं शरीर इथे घोरत वरोतीच्या ओसरीत विसावलं होतं पण मन भरारी घेऊन शरीराच्या सीमा केव्हाच ओलांडून, थेट लिंगाण्याच्या शिखरावर जाऊन पोहोचलं होतं!!
(क्रमशः)
– प्रांजल वाघ ©
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
छायाचित्रे: प्रांजल वाघ,रोहन शिंदे
This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.
21 comments
Wah re Wagh sahib,
Khupach chan likhan keley. Pudhaychya bhagachi utsutkata lagun rahiliy….Liha asech chan chan lihit raha ….manaje aamchyahi dnyanat ajun bhar padel.
Devi aai bhawani pratyekashyat saraswati rupane aapalyakadun lihun ghete aahe…
Bahut kay lihine..??
Agatya asawe..
Aapalach Namra,
Kiran Shelar.
Kiran Dada,
🙂 _/\_
majhyakade shabd nahit aple abhar manayla!
🙂
Chan lihitos re ……mag ata bhag dusara kadhi ?
Chan ..ahe …..pudhacha bhag kadhi milnar vachayla ?
[…] लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग २) Posted on November 4, 2013 by Pranjal Wagh (भाग १ इथे वाचा) […]
Khup chaan lihalay………….
Thanks a lot Vidya!
[…] (भाग १ इथे वाचा) […]
खूप छान प्रवास वर्णन केलं आहेस प्रांजल वाघ 🙂
मज्जा आली वाचताना.
धन्यवाद समीर पटेल!!
आपण सारे असेच वाचत रहा म्हणजे लिहिण्याची स्फूर्ती मिळत राहते!! 🙂
Mastach re Pranjal.. Apratim.. shevatche don teen paragraph tar khupach chhan.. keep it up..
Cheers
राजेश,
कौतुक केल्याबद्दल आभारी आहे!
तुम्हा सर्वांना आवडेल असं आणखी लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन!
भाग २ सुद्धा वाच!
भाग ३ येतोय लवकरच!
पुन्हा एकदा, धन्यवाद!
[…] पूर्वार्ध – …आणि मग ठिणगी पडलीच ! भाग १ – आरंभ!! भाग २ – जाणुनियां अवसान नसे […]
खूप सुंदर
रामदासजी,
तुम्हाला लेख आवडला यातच सारं काही आलं! आभारी!
खूप छान, प्रांजल. मस्त लिहिलंयस!
????
आभारी आहे!!
खूप छान, प्रांजल. मस्त वर्णन केलंयस! मजा आली.
????
आभारी आहे!!
पशु,पक्षीतज्ञ,खगोलशास्त्र,प्रस्तराआरोहक,
छायाचित्रकार,लेखक/लेखन घडवण्याचे एकमेक साधन म्हणजे डोंगर भटकंतीतील
‘सह्याद्रीची संगत’
प्रांजल…. तुझे लिखाण खुप छान आहे.????????
वरील कोणतीही पदवी मला लागू नसली तरीही तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे! 😀 खूप आनंद होतो असं कौतुक वाचून! मनःपूर्वक आभार!!