लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग ३)

आरोहण!!

by Pranjal Wagh
236 views
मी हातात धरलेला भगवा ध्वज त्या भगव्या आसमंतात उंचावला! 

(भाग २ इथे वाचा)

आरोहण!!

“बिले टाईट!”

लिंगाण्याच्या पहिल्या प्रस्तरला मी भिडलो. माझा आवाज ऐकताच सम्याने दोर खेचून घट्ट केला. हार्नेसवर ओळखीचा ताण जाणवू लागला आणि पहिले प्रस्तरारोहण करण्यास मी पाऊल टाकले.

चढाई सुरु करण्यापूर्वी पाठीवर पिट्टू (छोटी बॅग) भरून घेतली होती. त्यात आवश्यक वस्तू  – पाणी, खजूर, हेड-टॅार्च, क्लाईम्बींगचे बूट व माझी आवडती लीची जेली – भरल्या होत्या. चढाई करताना पाणी सहसा सापडत नाही व भूक तर हमखास लागते – त्यासाठी हा उपद्व्याप! क्लाईम्बींग बूट सोबत घेतले पण ते वापरण्याची सवय झाली नसल्यामुळे पहिला टप्पा अनवाणीच करणार होतो.

lingana 26 jan 2010 (444)आमच्या चढाईचा मार्ग

लिंगाण्याच्या चढाईचे पहिले ३० फूट “स्क्री” आहे. पावसाळ्यात वाहून आलेले व उतारावर स्थिरावलेले सुटे दगड, खडे आणि भुसभुशीत माती! ही स्क्री चढून गेल्यावर लागतो तो लिंगाण्याचा पहिला पॅच – इन मीन १५ फूटी! पण त्याच्या दिसण्यावर जाऊ नका! भल्या-भल्यांचा दम काढण्यात हा प्रस्तर पटाईत आहे! संपूर्ण लिंगाणा चढताना ह्या पॅचहून अनेकपटीने उंच पॅचेस चढून जावे लागतात  पण त्यामधील  हा सर्वात फसवा आणि किचकट म्हणावा लागेल! कारण असं की ह्याच्यावर चढाई सुरु केलीत की हा अंगावर येतो. सरळ भिडतोच  छाताडाला! साधारण १००° बाहेर आलेला कातळ आणि मागे सरळ ३० फुटाची स्क्री! बरं उजव्या न डाव्या बाजूला, दोन्हीकडे कातळ तुम्हाला वेढून  उभा असतो! हात देखील नीट  हलवता येत नाहीत! हा चिमनी (Chimney) क्लाईम्बींगचाच एक प्रकार म्हणायचा! चिमनी क्लाईम्बींगमध्ये कमीत कमी मागे पाठ टेकायला कातळ असतो  – इथे तर काहीच नाही!

त्या ठिकाणी थोडं अडखळलो. थोडा थांबलो. पहिलीच पायरी चढताना अडकलो कि काय?

शंका आली तसा लगेच मागून सम्याचा आवाज आला,

” जमत नसेल तर उतर रे खाली! मी करतो क्लाईम्ब!”
त्याला दुजोरा देत रोहनचा आवाज,
” वाघा, ये खाली. समीरला करु दे !”

आता माझी सटकली!
कुछ भी करनेका था , लेकीन अपुनका इगो हर्ट नहीं करनेका था!!

मी ठरवलंच, काही झालं तरी हटायचं नाही. हा कातळ मीच चढून जाणार! दात ओठ आवळत अस्फुटसे उद्गार बाहेर पडले, “थांब!” आणि प्रयत्न चालू केले! एक वेगळी मूव्ह केली. उजव्या पायाचा अंगठा  एका नखाएवढ्या बारीक होल्डवर ठेवला अन थोडासा डावीकडे वळलो. डावीकडच्या कातळाला पाठ टेकवली, त्याचा आधार घेतला आणि स्वतःला वर खेचून घेतले! आलो की वर!  झाला पहिला कातळटप्पा पार! दोर वर खेचून घेतला, बोल्टला क्विक-ड्रॉ (QD) लावला आणि दोर त्याच्यातून पुढे घेतला. चला पहिला टप्पा सुरक्षित केला!

समीरला बिले देऊन वर घेतला. त्याने देखील टप्पा पार केला. त्यानंतर, दुसरा दोर मी अडकवून घेतला माझ्या हार्नेसच्या मागे  अन निघालो पुढच्या टप्प्यावर! पुढे तर स्क्री होती. हा टप्पा तसा सोपा आणि ओळखीचा होता. सुमारे ४०-५० फूट वर चालत जाउन मी दोर Anchor करून घेतला, स्वतःला Anchor केले व त्या तिघांची वाट पाहत बसलो. 

सहज समोर नजर गेली. रांगडा सह्याद्री उभा ठाकला होता! महाकाय रायलिंगचं पठार, त्याच्या कातळी अंगरख्याला सोनेरी किनार देत खाली उतरत होती बोराट्याच्या नाळेची वाट. मधेच ३- ४ नागमोडी वळणं घेत खिंडीत उतरत होती. सोबतीला गार वारं हळुवार वाहत होतं, दुपारच्या त्या काहिलीत थोडं सुख देऊन जात होतं! अचानक आभाळात एक चित्कार घुमला. नजर वर गेली तर एक गरुड आकाशात घिरट्या घालीत होता. आपले विशाल पंख पसरून आकाशात आपल्याच तोऱ्यात संथपणे उडत मुलुखाची पाहणी करीत होता. एखाद्या राजासारखा!

543802_10152485862280145_457942768_n सहज समोर नजर गेली. रांगडा सह्याद्री उभा ठाकला होता!

सह्याद्रीची ती बोलकी शांतता, वाऱ्याचं  हळूच कानात बरंच काही सांगू पाहणे आणि हवा कापीत उडणारा तो गरुड – ह्यांनी  टाकलेल्या मोहिनीला मी वश होऊन, तिथेच मंत्रमुग्ध होऊन पाहत बसलो! खरं तर तिथे बसून  राहणे मला खूप आवडलं असतं परंतु दृष्टीआड लपलेला लिंगाण्याचा माथा खुणावत होता. इतक्यात समीर पाठोपाठ रोहन आणि ख्रिस आले. ह्या पुढील पॅच सोपा होता पण उभा होता आणि विशेष म्हणजे इथे एकंच  बोल्ट  होता – तो देखील चुकीच्या ठिकाणी!

आम्ही चढाईची तयारी करत असताना समीरने पुढाकार घेतला, “हा पॅच मी करू का लीड?”

वास्तविक मला ही जोखीम स्वतःला पार पाडायची होती. त्यामुळे समीरला लीड करायला देणे माझ्या मनात नव्हते. परंतु आम्ही प्रस्तरारोहण करत होतो काही शिकण्यासाठी. ही काही स्पर्धा नव्हती. प्रत्येकास संधी मिळाली तरच आमची प्रगती होणार होती. म्हणून मग (थोड्याश्या नाईलाजाने का होई ना) त्याला मी होकार दिला. आणि मग मी त्याला बिले देऊ लागल्यावर समीर त्या कातळाला भिडला! मोठ्या कौशल्याने त्याने तो टप्पा पार केला आणि वर जाऊन आम्हास टॉप-बिले देऊन वर घेतले. सगळ्यात शेवटी मी वर चढून आलो आणि मग आमचा चमू निघाला लिंगाण्याच्या गुहेच्या रोखाने! मी घड्याळाकडे पाहिले तर अवघ्या दीड तासात आम्ही गुहा गाठली होती. आमचा वेग बऱ्यापैकी चांगला होता!

काही वेळ स्क्री पार करत चढून गेल्यावर लगेच लिंगाण्याची गुहा लागते. ही जागा म्हणजे लिंगाण्यावर चढाई करताना पाणी मिळण्याचे एकमेव स्थान! इथून पुढे माथा गाठून खाली परत येईपर्यंत मध्ये कुठेही पाणी किंवा निवारा नाही. त्यामुळे इथे पाणी पिऊन घेणे आणि बाटल्या भरून घेणे अत्यंत गरजेचे होते. इथवर येताना केलेल्या श्रमामुळे तहान तर लागलीच होती म्हणून ती शमवायला डावीकडे वळसा मारून टाक्याच्या रोखाने आम्ही निघणार तोच रोहनला परत Dehydrationचा त्रास  सुरु झाला. तो पार थकून गेला होता. त्याला पाणी प्यायला लावले, खजूर खायला दिले व तिथे जरा वेळ विश्रांती घ्यायला सांगून आम्ही पाणी भरण्यास डावीकडच्या अरुंद वाटेने पुढे निघालो. उजवीकडे लिंगाण्याचा कातळ कडा, डावीकडे डोळे फिरवणारी दरी  आणि मधोमध अरुंद वाटेवरून जपून चालणारे आम्ही! दोन पावलं  पुढे जाताच उजवीकडील भिंतीला बोल्ट्स  दिसू लागले – हाच लिंगाण्यावरील सर्वात मोठा सलग प्रस्तर! द वर्ल्ड फ़ेमस “केवच्या मागचा” पॅच! ह्या पॅचचं  सौंदर्य न्याहाळत, मधेच डावीकडे लक्ष देत मी, ख्रिस आणि सम्या पाण्याच्या टाक्यापर्यंत पोहोचलो. हे पाण्याचं टाकं  म्हणजे साक्षात अमृतकुंड! इथले पाणी अगदी गोड आणि थंडगार! पोटभर पाणी पिउन घेतलं, रिकाम्या बाटल्या भरल्या आणि निघालो परत चढाई करायला!

चढाई करण्याआधी आम्हाला लिंगाण्याची गुहा पहायची होती. 

408502_10152488660020118_117419727_n
गुहेकडे जाणारी वाट अगदीच अरुंद आहे. एखादे चुकीचे पाऊल भलतेच महागात पडेल!

रायलिंगच्या पठारावरून कातळात कोरलेली ही गुहा अगदी ठळक दिसते. इथे जाणारी वाट अगदीच अरुंद आहे. इथे एखादे चुकीचे पाऊल भलतेच महागात पडेल. आपल्या महामार्गावरील बोर्ड इथे लावले पाहिजेत – “चुका ध्यान गई जान!” थेट वरचे तिकीट! ही वाट चालत चालत आम्ही लिंगाण्याच्या काळ्या छातीत कोरलेल्या छोट्याशा गुहेत दाखल झालो आणि आश्चर्यचकीत झालो! आजपर्यंत  इतकी स्वच्छ गुहा, झोपायला, बसायला इतकी अनुकूल सपाट जमीन मी पहिली नव्हती! ह्यात भर म्हणून काय गुहेच्या कोपर्यात रचून सरपण देखील ठेवलेली होती – एखाद्या हॉटेल रूमसारखी! And what a view this room offered! पोलादी छाती फुगवून रायलिंगचा डोंगर मोठ्या दिमाखात समोर उभा होता! फक्त रूम सर्व्हिस तेवढी बाकी होती! ह्या गुहेत एकदा नक्की मुक्काम करायचा असे ठरवून आम्ही परत फिरून चढाई करण्यास निघालो!

75051_10152488662495118_106917162_n
 ख्रिस आणि समीर गुहेमध्ये. कोपऱ्यात  सरपण दिसत आहे!
533664_10152488660830118_1652354945_n
The Room with a View!

पुढील चढाई आम्हाला अनोळखी होती. त्यामुळे इथे चढताना अधिक सावध, अधिक सतर्क राहावे लागणार होते आणि वेळ निश्चित जास्त लागणार होता.ही गोष्ट ध्यानात ठेवून आम्ही कामाचा वेग वाढवला. आता विश्रांती घेऊन रोहनही चढाईसाठी सज्ज झाला होता. इथे परत समीरने लीड करण्याची जबाबदारी पेलली. वास्तविक पॅच दिसायला मोठा असला तरी तो सोपा होता. एखाद्या कुशल प्रस्तरारोहकाप्रमाणे आमचा भीमरूपी सम्या झर-झर पॅच चढून गेला. ख्रिस आणि रोहन हे दोघे वर गेल्यावर मग मी चढाईला सुरुवात केली. मी ह्या पॅचवर क्लाईम्बींग शूज वापरत असल्यामुळे ही चढाई करताना खूपच मजा आली, एक वेगळाच अनुभव मिळाला!

205813_10152488675200118_1522268581_nगुहेमागील प्रस्तरावर चढाई करताना ख्रिस!

आता जवळ जवळ ४ वाजले होते. ही धोक्याची घंटा होती. प्रस्तरारोहणात माथा गाठणे हा अंतिम उद्देश नसतो! परत उतरून सुखरूप खाली येणे हे मुख्य लक्ष्य असते! त्यामुळे जर माथा गाठून आज  रात्रीच खाली खिंडीत पोहोचायचं असेल तर आम्हाला हालचाली झटपट करणे भाग होतं. ह्या हेतूने  इथून पुढे समीरने अन मी आलटून-पालटून लीड करत बरंच  अंतर कापलं.

549917_10152488680235118_707513945_n
डोळे फिरवणारा नजारा!

चढाई करताना आपल्याला कोणी तरी  पाहतय असं  वाटलं म्हणून सहज मागे वळून पाहिलं. वास्तविक इथे आम्हला कोण पाहायला येणार? आणि लिंगाणा चढणारे आम्ही काही पहिले  नव्हतो. पण मागे वळून पाहताच एक सुखद धक्का बसला – रायलिंगच्या पठारावर १०-१५ माणसं जमली होती! तिथे बसून आमची चढाई पहात होते! इतका वेळ चढाई करून भूक, तहान लागली होती व थोडा थकवाही जाणवू लागला होता पण हे दृश्य पाहताच थकवा पार नाहीसा झाला आणि पुन्हा जोमाने चढायला आम्ही सुरुवात केली!

लिंगाण्याच्या माथ्यपासून आम्ही आता अवघ्या ५०-६० फुटापर्यंत येउन पोहोचलो होतो. त्या पॅचवर रोहन शेवटी चढत होता. ख्रिस त्याला बिले देत होता. मी आणि सम्या पुढच्या चढाईची तयारी करत होतो. आम्हाला इथून माथा  दिसत नव्हता पण तो जवळच असल्याची जाणीव होऊ लागली होती. मला अजूनही ती वेळ आठवते – संध्याकाळचे बरोब्बर ०५:१५ झाले होते. सूर्य आपली ड्युटी संपवून अस्तास जायला निघाला होता. वाऱ्याचा जोर वाढला होता आणि तो अधिक बोचरा झाला होता. माथा आम्हाला खुणावत होता! हाकेला “ओ” देणे अपरिहार्य होते! मागच्या वर्षीचं  हुकलेलं  लक्ष्य हाकेच्या अंतरावर होतं! एक स्वप्न साकार होण्याच्या वाटेवर होतं!

पण बेअर ग्रील्स आजोबांनी टी.व्ही वर सांगून ठेवलंय, ” In the Wild, things happen when you are least expecting them!” आणि झालं  ही तसंच!

रोहन पॅच चढून वर आला आणि त्याने आमच्यावर बॉम्ब टाकला, ” वाघा, सॅम मला वाटतं आपण परत फिरुया. अंधार पडतोय – उतरायला चालू करूया! I’m done!”

एक दोन क्षण मी सुन्न होऊन ऐकत होतो. मागे लिंगाण्याचा माथा, आणि समोर परतीची वाट. मनात विचारांचा कल्लोळ माजला! मागच्या वर्षीची रात्र आठवली, अंधारातले ते उतरणे आठवले, अपयशाची कडवट चव जिभेवर रेंगाळून गेली आणि आता जर मागे फिरलो तर माथा सर करण्यासाठी ते दिव्य परत पार पाडावे लागणार होते! ते करण्यासाठी मी अजिबात तयार नव्हतो!

वास्तविक रोहनचं  बरोबर होतं. कुठलाही सुळका जेव्हा तुम्ही सर करता तेव्हा ती कामगिरी फक्त ५०% झालेली असते. सुखरूप खाली येणे हे सुळका सर करण्यापेक्षा अधिक महत्वाचे – अन तो तेच करत होता. पण मी आता ऐकायला तयार नव्हतो! मी आता ठरवलंच – इथवर आलोय तर लिंगाणा सर केल्याशिवाय मी काय परत जाणार नाही! Come what may!!

” शिंदे, मी परत नाही येणार. ५० फुटांवर समिट आहे. मी आज तो सर करणारच! मग मला इथे कुडकुडत रात्र काढावी लागली तरी मला चालेल!”

“हे बघ रोहन, आता तसाही अंधार होतोच आहे. आपण खाली उतरताना अंधारातच उतरावं लागणार आपल्याला. मग आपण माथा गाठून  अंधारात उतरू! पण इथून माघार नको!” , समीरने दुजोरा दिला.

पण रोहन काही यायला तयार होई ना.

“ख्रिस, Are you coming?” , मी ख्रिसला विचारले पण त्याने आपण रोहनला साथ द्यायला इथेच थांबतो तुम्ही पटकन जाउन या असे सांगितले.

ठरले तर मग! मी आणि सम्या  निघालो! भगवा आणि तिरंगा घेऊन! ६ वाजायच्या आत आम्हाला माथा गाठून तिकडे तिरंगा फडकवायचा होता! घड्याळाचे काटे आणि आम्ही – अशी शर्यत लागली!

इथून पुढे कठीण पॅच नसले तरी लिंगाण्याची सोंड अधिक अरुंद होत जाते. दोन्ही बाजूला खोलच खोल दरी आणि त्याच्या सोबतीला भन्नाट वारा! हे सगळे झेलत, तोल सांभाळत लक्ष्याच्या रोखाने चालत राहायचं!! बस!! आयुष्यात तरी आपण ह्याहून वेगळं असं काय करतो? 

480690_10152488684565118_1951576699_n
“समिट दिसतोय का रे?”

इथला बराच मार्ग “स्क्रीमय” होता. प्रस्तर कमी. पण काही वेळाने एक उभा कातळ वाट अडवून उभा ठाकला. बहुदा लिंगाण्याने  आमच्यापुढे ठेवलेले शेवटचे आव्हान! हे आव्हान आम्ही स्विकारलं आणि मी भिडलो त्या कातळाला. चढण्यास सोपा होता, भरपूर होल्डस होत्या. पण म्हणतात ना – जोर का झटका धीरे से लागे – तेच झालं! सोपा पॅच म्हणून झर झर चढत वर गेलो आणि आश्चर्यचकित झालो! चक्क दगडी पायऱ्यांचे अवशेष! “समीर!! पायऱ्या आहेत इथे !!”, मी मागे वळून समीरला सांगितले आणि पुढे त्याच पायऱ्यांवरून पावलं  टाकत निघालो. आणि मग झटका बसला! त्या पायऱ्या  अचानक डावीकडे वळल्या आणि समोर सरळ सरळ अडीच हजार फुटाची , डोळे फिरवणारी, इथून थेट स्वर्गाचा शॉर्टकट असलेली , खोलंच -खोल अशी दरी! दोन सेकंद हडबडलो-थांबलो! सावरलं  स्वतःला आणि डावीकडे वळून पुढची चढाई करायला लाग्लो. कातळटप्पा सर झाला, समीर पण वर आला, पण माथा काही दिसत नव्हता – पुढे परत स्क्री असलेली चढण! हा लिंगाणा माझ्या सहनशक्तीचा अंत पहात होता!

वैतागून त्या स्क्रीवरून चालत चालत निघालो, थोडा पुढे गेलो आणि थबकलो! बऱ्याचवेळा  पुस्तकात वाचलेली, सिनेमात ऐकलेली एक ओळ आठवली –

There is no higher ground!!

आम्ही लिंगाणा सर केला होता!!

आम्हाला गतवर्षीची “माघार” आठवली.  क्षणभर भूतकाळात मन गेलं.  ती पराजयाची लाजिरवाणी कडवट चव आठवली. पाने गावातून लिंगाण्याकडे पाहताना अनुभवलेली मनातली ती अस्वस्थ चलबिचल आठवली. आणि परत येउन लिंगाणा सर करण्याची ती दुर्दम्य इच्छा देखील. त्याच इच्छेच्या जोरावर आम्ही परतलो होतो  आणि आज लिंगाण्याच्या माथ्यावर पाउलं रोवून आम्ही होतो! जणू माथा सर करताच त्या साऱ्या अपयशाची नामोनिशाणी पुसली गेली होती! अपयशाचे कृष्णमेघ बाजूला झाले होते आणि यशाच्या तळपत्या सूर्याने आमचे मन प्रज्वलित अन प्रसन्न केलं होतं!

लिंगाणा सर केल्यावर आपण कसे उड्या  मारून आनंद साजरा करू, गर्जना, घोषणा देऊ वगैरे बरीच दृश्य मनात रंगवली होती. पण आता, लिंगाणा खरोखर सर झाला होता आणि आम्ही तिथे फक्त शांत उभे होतो. लिंगाणा सर करून तो आम्ही आज जिंकला होता. पण खरोखर आम्ही लिंगाण्यावर विजय मिळवला होता का? कि हा विजय आम्ही स्वतःवर मिळवला होता? इच्छाशक्ती अधिक प्रबळ करून, त्या शक्तीच्या जोरावर माथा सर करून स्वतःच्या मनावर मिळवलेला हा विजय तर नव्हे? आम्ही निघालो होतो लिंगाणा काबीज करायला पण माथा सर केल्यावर आम्ही स्वखुशीने लिंगाण्याला  शरण गेलो होतो – लिंगाण्याने आम्हास केव्हाच जिंकून घेतले होते! आम्हा मर्त्य जीवांना आपल्या अंगा-खांद्यावर खेळू देत, विजयाची खोटी समजूत पटवून देत, महाराजांच्या ह्या अमर्त्य पर्वतपुरुषाने आमच्यावर गनिमी काव्याने विजय  प्राप्त केला होता! आणि आम्ही नकळत बिनशर्त शरणागती पत्करत, आनंदाने नतमस्तक झालो होतो!

आम्ही दोघेही बोलण्याच्या स्थ्तितीत नव्हतो. कारण समोरच्या दृश्याने आमची तोंडं  बंद केली होती. मागे रायलिंगचं पठार, त्याच्या  मागे दूर आकाशात चढलेले, अभेद्य असे स्वराज्याचे दोन शिलेदार – तोरणा आणि राजगड! आणि समोर? समोर मावळतीच्या किरणांनी उजळून निघालेला,  शिवराज्याभिषेकाने पावन झालेला, दुर्गदुर्गेश्वर रायगड!! हे दृश्य केवळ अप्रतीम नव्हे तर पूजनीय होते!!

मंत्रमुग्ध होऊन आम्ही पाहत राहिलो. पण लगेचच भानावर आलो. तिरंगा आणि भगवा फडकवायचा आहे! सूर्य मावळतीला आलाय! एकच गडबड उडाली. भगव्यासाठी छोटी काठी सापडली पण तिरंगा लावता येईल अशी एकही काठी लिंगाण्यावर नव्हती. १५ माणसं जेमतेम उभी राहतील इतका मोठा माथा – तिथे कुठे काठी मिळणार? मग शेवटी तिरंगा झेंडा आम्ही हातानेच वर धरला आणि सूर्यास्त व्हायच्या आत – २६ जानेवरीला झेंडा फडकवला! ह्या पाठोपाठ आम्ही भगवा ध्वज आकाशात उंचावला आणि मग समीरने एक जबरदस्त, दमदार आणि अवघ्या आसमंतात घुमणारी शिवगर्जना केली –

महारा s s ज..
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर
गोब्राह्मणप्रतिपालक भोसले कुल दीपक मुघल दल संहारक
हिंदवी स्वराज्य संवर्धक सद्धर्म संस्थापक संस्कृती रक्षक
श्रीमंत श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज राजराजेश्वर
सेनाधुरंधर विमल चरित श्रीमंत नृपति भूपति
छत्रपति श्री शिवाजी महाराज कि ….

जय!!!

– अचानक १५ लोकांच्या कंठातले स्वर एकत्र घुमले आणि अवघा परिसर “जय” च्या गर्जनेने दुमदुमला!! इतक्या लोकांचे आवाज ऐकताच आम्ही चमकून पहिले तर समोर रायलिंगच्या पठारावरील प्रेक्षकांनी समीरच्या गर्जनेला तितकाच जोरदार प्रतिसाद दिलेला होता!! इतका वेळ श्वास रोखून आमची चढाई पाहणारे हेच ते लोक!

आता हळूहळू सूर्य मावळत चालला होता. रायगडावरील जगदीश्वर मंदिर, महाराजांची समाधी ह्यांच्या बरोबर मागे सुर्यनारायण उभा ठाकला होता. जणू काही हा पृथ्वीचा जीवनदाता सूर्य त्या युगपुरुषाला नमस्कार करीत होता! आजूबाजूचा सर्व परिसर, आसमंत, धरती सूर्याच्या किरणांत न्हाऊन भगवी झाली होती. ज्या श्रीमंत योग्याने इथल्या मातीत  स्वातंत्र्याचे बीज पेरले, इथल्या मनगटांत गगनभेदी भरारी घेण्याचे बळ भरले, स्वाभिमानाचे धडे गिरवले त्या महात्म्याच्या समाधीसमोर सारा आसमंतच  नतमस्तक झाला होता! क्षणार्धात डोळ्याच्या कडा ओलावल्या आणि मला राहवले नाही – मी हातात धरलेला भगवा ध्वज त्या भगव्या आसमंतात उंचावला!  त्या युगपुरुषाला सलाम केला!

419615_10152488684075118_547326915_n मी हातात धरलेला भगवा ध्वज त्या भगव्या आसमंतात उंचावला! 

तिथून खरंतर पाय निघत नव्हता पण निघणे अपरिहार्य होते. सूर्यास्त झाला होता आणि अंधार पडू लागला होता. अजून अख्खा लिंगाणा उतरायचा होता आणि तो ही अंधारात!पण इतक्या मोठ्या उतराईचं काही वाटत नव्हतं कारण आज आम्ही लिंगाणा सर केला होता – एक अपूर्ण स्वप्न पूर्णत्वास नेलं होतं! आज मी जगातला सर्वात समाधानी मनुष्य होतो! आता तर उघड्यावर उपाशी पोटी रात्र काढायला देखील माझी हरकत नव्हती!!      

पण खाली रोहन आणि ख्रिस आमची वाट पाहत होते. त्यांना सुखरूप खाली घेऊन जाणे हे आमचं  कर्तव्य होते. आणि वास्तविक अजून ५०% मोहीम बाकी होती! म्हणून मग निघालो! निघायच्या आधी एकदा मागे वळून पाहिलं – महाराजांच्या रायगडाचं शेवटचं  दर्शन घ्यावं म्हणून. सूर्य आता संपूर्ण बुडला होता, रायगड आता अंधारात लुप्त होण्याच्या मार्गावर होता , जगदीश्वर मंदिराचे शिखर त्या अंधुक प्रकाशात धुसर दिसत होते. ते दृश्य पाहत असताना अचानक मला एक रहस्य उलगडलं!

बरीच लोकं आम्हा ट्रेकर्सना सारखे विचारत असतात, ” काय रे, तुम्ही एवढे डोंगर का चढता? काय मिळतं तुम्हाला चढून? का जाता तिथे?”
आजपर्यंत ह्या प्रश्नाचं थेट उत्तर मी दिलं नव्हतं. कधी हसून प्रश्न उडवून लावला, कधी “तुला नाही कळायचं रे ते!”, असं उत्तर दिलं तर कधी विषयच बदलला. का कुणास ठाऊक, सह्याद्रीवर इतकं प्रेम करून मी इथे कुठल्या ओढीने येतो हेच मला नेमके सांगता यायचे नाही! पण आज, लिंगाण्याच्या त्या माथ्यावर उभा राहून, मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाची भगवी चादर ओढलेल्या रायगडावरील त्या महापुरुषाला ध्वज उंचावून मानवंदना देताच हे कोडं सुटलं होतं, रहस्यभेद झाला होता!!

त्याक्षणी जर मला कोणी प्रश्न विचारला असता, ” तू डोंगर का चढतोस?” तर माझं  झटक्यात उत्तर आलं  असतं,

“कारण तिथे मला माझा राजा  भेटतो!!”

(समाप्त)

– प्रांजल वाघ  

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

छायाचित्रे साभार : प्रांजल वाघ, रोहन शिंदे, समीर पटेल आणि ओंकार ओक

( लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! ही संपूर्ण शृंखला इथे वाचा

पूर्वार्ध …आणि मग ठिणगी पडलीच !
भाग १ – आरंभ!!
भाग २ – जाणुनियां अवसान नसे हे !
भाग ३ – आरोहण!! )

Creative Commons License

 

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).

This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

48 comments

Prasad February 3, 2014 - 1:19 AM

Apratim..as usual…. Ass vatal mich Lingana sar kartoy… Keep it up…. 🙂

Reply
Pranjal Wagh February 3, 2014 - 1:29 AM

प्रसाद
धन्यवाद मित्रा!
असच वचत रहा!

Reply
Rajesh February 3, 2014 - 9:36 AM

Apratim. Apratim.. Apratim.. Masatch.. third part is masterpiece. I am still searching words.. felt like watched thriller movie/ nail biting cricket match and yes even felt as I am climbing with you. intazzar ka fal mita hota hai. wagha sargha ladlas.
Jai Maharashtra

Reply
Pranjal Wagh February 3, 2014 - 9:44 AM

मित्रा राजेश!!
तुझ्या कमेंट ने तोडलस!! धन्यवाद ! 🙂
मला आभार मानायला शब्दच उरले नाहीत!
असेच वाचत रहा!कौतुक तर केलेसच पण टीका करण्यास मागे पुढे पाहू नकोस! 🙂
धन्यवाद!!

Reply
ravi thombade February 3, 2014 - 11:04 AM

khupch sundar lihlay sir…. tumche kautuk krave titke kamich aahe..
sir ekda nkki bhet dya amcyahi nisargala mazya akoletalukyala
mahitisathi pha http://www.akolemaza.com
thank u..

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:13 AM

धन्यवाद रवी जी!

सर्वप्रथम तुम्ही केलेल्या कौतुकाचा मी आभारी आहे!
सर बोलण्याइतका मी मोठा नाही!
जरूर अकोल्याला भेट देऊ! आणि तुम्हालाच भेटेन तेव्हा!!

धन्यवाद!

Reply
shridhar Joshi February 3, 2014 - 4:31 PM

Sphurti denara blog ahe g8

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:13 AM

श्रीधरजी

आभारी आहे! असेच आपले कौतुक (अन वेळ पडल्यास टीका सुद्धा) येऊ द्या!

Reply
Madhura Shetye February 3, 2014 - 5:51 PM

masst….kewhan pasun waat pahat hote mi ya shewatchya adhyaychi….linganyache warnan tar itk apratim kelays…shabd ch nahiyet…shewati tarr dolyat paani aanlas mitra….
“kharach….aaplyala tithe aapla raja bhet to…kitti tari roopat…khunavat rahato aaplyala…aani aapan tyala bhetnyachya odhine punha punha sahyadrichya kushit shirto..aani to hi aaplyala titkyach maayene jawal gheto…aaplya rajyachya mahttateche darshan ghadavto”
Punha ekda tumha chaughanche Abhinandan…

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:20 AM

मधुराजी

धन्यवाद! तुम्ही इतकी सुंदर प्रतिक्रिया दिलीत आता मी आणखी काय बोलणार?
बस, नेहमीच ब्लॉग वाचत चला !
आभारी आहे!

Reply
Snehal Patil February 3, 2014 - 7:11 PM

मला वाटते तुम्हाला परत परत करायची गरज कारण आपले राजा तिथे भेटतात Great guys….. go on

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:15 AM

धन्यवाद स्नेहल जी!
परत परत गेलो तरी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अनुभव हा फक्त सह्याद्रीच देऊ शकतो!

Reply
vaibhavi gandhi February 3, 2014 - 9:10 PM

“तू डोंगर का चढतोस ?”……”कारण तिथे मला माझा राजा भेटतो ” ….ह्या पुढे काही शब्दच उरले नाहीत .हेवा वाटतो रे तुमचा 🙂

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:16 AM

वैभवी!
सर्वप्रथम इतका ताटकळत ठेवल्याबद्दल माफी असावी 🙂

धन्यवाद तू भरभरून केलेल्या कौतुकासाठी!
आणि हेवा काय ग वाटायचा? तू पण जातेसच कि सह्याद्रीत!

Reply
Umesh Chaudhary February 4, 2014 - 10:22 AM

अप्रतिम लिहिलंय वाघा … डोळ्यात पाणी आलं …
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो…

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:17 AM

उमेशजी!

आभारी आहे ! जे अनुभवला ते मी लिहिल! ह्या उपर मी काय लिहिणार!

Reply
bhushan shinde February 4, 2014 - 11:23 AM

Bhawa…jikalas bhagg …bhari ..even i have missed lingana, and now i want to do it again …paan partecha parawas naki lihe..ajoon maja yeel

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 2:18 AM

भूषणजी

तुम्ही नक्की लिंगाणा सर कराल…लवकरच!

Reply
sarang kulkarni February 5, 2014 - 12:52 PM

atishay sundar. sarvat shevatchi line avadli. ” karan tithe mala raja bhetato”
:). Chhand mhanun karat asla tar nakki chhand jopasa pan swatahala sambhalun. sahyadri premal ahe, sundar aahe tasach to rakat aahe. aplichuk tyachya lakshat yete. pan aplya lakshat yeiparyant apan kadachit……
khup khup shubhechha tumhala. agdi manapasun.

sarang kulkarni

Reply
Pranjal Wagh February 5, 2014 - 11:35 PM

सारंगजी
सर्वप्रथम मी अत्यंत आभारी आहे! आपण केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद!
आणि हो, आम्ही काळजी तर घेतोच पण चार शब्द आपुलकीने सांगितलेत त्याचा आदर ठेऊन आणखी खबरदारी ने गिर्यारोहण करू!

धन्यवाद!

Reply
swati February 6, 2014 - 3:41 AM

Khoop chan tumcha abhnandan .karach vachtana vatta apnch gad jadat ahot . ani atta japoon asa manat vatta. gad ka chadta hey ootar dekhel apratim ahe . Maja moola ne poode kadhe asa dhadas kela tar mala kete kalghe vatel asa vatat rahata sarkha . pan dhadas yelach mantat . Poonha ABHINANDAN

Reply
Pranjal Wagh February 8, 2014 - 12:59 AM

स्वातीजी

धन्यवाद इतकं कौतुक केल्याबद्दल!
आभारी आहे मी!
तुम्ही असाच ब्लॉग वाचत राहावा हीच इच्छा!

Reply
vinayak date February 7, 2014 - 10:58 AM

had just read part of it earlier. read fully today.overwhelmed.i love people with passion.your love for sahygiri borders more on ‘zapatlepan’ than mere love to trek,go for hike or climbing rocks.you have a very cameralike style of writing as if writing a screenplay which gives us readers a feeling of being there.my congrats and blessings to you and your team for this win.keep writing.

Reply
Pranjal Wagh February 8, 2014 - 1:01 AM

Dear Date Sir,

Thanks a lot for this wonderful comment!
You are right! It is sometimes more than love..It is “zapatlepan”
There is a centuries old connection 🙂
Thank you once again!
Do keep reading and also guiding me!

Reply
लिंगाणा - एक स्वप्नपूर्ती! (भाग २) | A Rational Mind February 8, 2014 - 1:10 AM

[…] (भाग ३ इथे वाचा) […]

Reply
saurabh badave February 8, 2014 - 1:01 PM

अप्रतिम लेख !!
सह्याद्रीबद्दलचे हे प्रेम तुम्हा-अम्हासारख्याना कायम हाक मारून बोलावत असते.
काळजी घ्या आणि कायम जिंकत राहा !!

Reply
Pranjal Wagh February 8, 2014 - 11:10 PM

सौरभजी,

धन्यवाद!
डोंगरांकडे पाहिलं की एक अनामिक ओढ, एक युगानुयुगे चालत आलेलं नातं त्यांच्या जवळ आकर्षित करतं!

Reply
उत्कर्ष एरंडकर February 8, 2014 - 2:04 PM

प्रस्तरारोहणाचे वर्णन एवढे उत्कृष्ठ होऊ शकते ह्यावर विश्वास बसत नाहीय. प्रस्तरारोहणाची आवड निर्माण करण्यासाठी उत्तम लेख आहे.

आपण डोंगर का चढतो ह्याचं तुला उमगलेलं उत्तर खरंच हृदयस्पर्शी आहे. मला वाटतं प्रत्येक गिर्यारोहक हेच उत्तर शोधत आहे मात्र त्याला ते उमगलेलं नसतं. हे उत्तर शोधणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या वतीने तुझे आभार.. आणि पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा..

Reply
Pranjal Wagh February 8, 2014 - 11:04 PM

उत्कर्षजी,

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि भरभरून कौतुक केल्याबद्दल मी आभारी आहे!
आपण डोंगर का चढतो ह्याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळ असतं असं माझ मत आहे! 🙂
माझे आभार मानण्यासाठी मी अजून खूप लहान आहे – कर्तृत्वाने आणि वयाने!

धन्यवाद! असेच आशीर्वाद असू द्या!

Reply
Nishigandha Keluskar February 8, 2014 - 11:46 PM

Atishay Sunder… lekh ani pictures … sahaj anubhavala asa watala…. 🙂 🙂 keep it up… All the best 🙂

Reply
Pranjal Wagh February 9, 2014 - 12:05 AM

निशिगंधाजी,

धन्यवाद!
आभारी आहे!

Reply
कुलकर्णी शेखर February 9, 2014 - 12:41 PM

अप्रतिम मित्रा मी फेब्रुवारी 2013 आणि 5 जानेवारी2014 हा अनुभव घेतला आहे पण तुझे लेखन वाचून पुंन्हा हा ट्रेक केलेची प्रचिती आली

Reply
Pranjal Wagh February 9, 2014 - 10:13 PM

शेखरजी,

धन्यवाद!
आपण खरोखर भगयवान आहात आपण दोन वेळा लिंगाणा सर केलात!!
मी आपला आभारी आहे!

Reply
Sanjay Kakade February 11, 2014 - 2:02 PM

Pranjal,
Laaaaaaai bhari!!

Reply
Pranjal Wagh February 11, 2014 - 2:17 PM

दादा,
धन्यवाद !! 🙂 _/\_

Reply
Ravi Abhyankar February 14, 2014 - 11:46 PM

Excellent article. Write more and more. I am eager to read more from you.
All the best!

Reply
Pranjal Wagh February 15, 2014 - 1:01 AM

Ravindra Ji,

I am very thankful and grateful to you that you have actually read the blog and appreciated it! As suggested, I will write more and more! Just hope I meet your expectations!

Thanks a lot!!

Reply
Mangesh March 1, 2014 - 2:58 PM

Waghya … kiti vat baghayla laavlis re ya part chi .. i mn tu yaa aadhiche 2 part chhanch lihiles … pan haa one of the best article asava peshava sarkar nantar 🙂
thanks for sharing 🙂

Reply
Pranjal Wagh March 3, 2014 - 3:22 AM

मंग्या थैंक्स अ लॉट!!
पोस्ट करायला उशीर केल्याबद्दल सॉरी!! 🙂

Reply
Ketan MoreKetanketan More June 4, 2015 - 3:04 PM

karan mala tithe raja bhetato……

sgal sampal ya pekshya moth kahich nahi

Reply
Pranjal Wagh June 22, 2023 - 1:22 AM

मनःपूर्वक आभार!!

Reply
suhas mane October 30, 2015 - 12:06 PM

Mast re bhavano dolyat pani anale khrech ki kay magchya janmi kay tri puny kele astil mnhun me mazya rajyachya swarajyat janm ghetla

Keep it up guys nice…..yar

Reply
ISHWAR GAIKWAD November 6, 2021 - 9:01 PM

व्वा, खूप खूप छान, प्रांजल! जबरदस्त वर्णन.. सलग तिन्ही भाग वाचताना जाम मजा आली. वाचताना अगदी स्वतः लिंगाण्यावर असल्यासारखंच वाटत होतं. माझ्या लिंगाणा चढाईचा सन २०१२ चा तो दिवस आज मी जसाच्या तसा अनुभवला. छान, प्रांजल, खूप छान वर्णन! तुझी लेखनशैली छानच आहे.
☺️

Reply
Pranjal Wagh November 16, 2021 - 11:29 PM

अनेकानेक आभार!!

Reply
Ishwar Gaikwad June 17, 2023 - 5:04 PM

आज पुन्हा वाचला. पुन्हा खूप छान वाटलं. तुझी लेखनशैली खरेच खूप छान आहे. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे, ‘ इवल्याचं एवढं करण्यात खरंच तु नावाप्रमाणेच ‘वाघ’ आहेस. ‘ पण हो, ‘पुन्हा क्रमशः लिहिण्याच्या फंदात पडशील तर गाठ माझ्याशी आहे, याद राख.’ ? काळजी घे, लिहित रहा..

Reply
Pranjal Wagh June 18, 2023 - 1:08 AM

हाहाहा! गाठ पडायची असेल तर मग लिहिलंच पाहिजे! 😉

Reply
Pramod sunanda sawant June 21, 2023 - 12:44 PM

यशस्वी आरोहणाबद्दल तुझ्या टीमचे अभिनंदन.??
शेवटचं वाक्य अप्रतिम.??
भाग ३ रा.जबरदस्त??

Reply
Pranjal Wagh June 22, 2023 - 1:16 AM

खूप खूप धन्यवाद!! _/\_

Reply

Leave a Comment

You may also like