गोवा म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते अथांग समुद्राच्या फेसाळत्या लाटांनी बहरलेले सागरी किनारे, त्या किनाऱ्यावर असणारे शॅक्स आणि तिथे मांस, मासळी आणि मद्याचा आस्वाद घेत असलेली पर्यटक जनता! रात्र झाली की पार्टी डेस्टिनेशन बनणारं आणि कसिनोमध्ये डाव लावून कधी जय कधी पराजय आपल्या पदरी पडून घेणारे पट्टीचे “खेळाडू”! पण माझ्यासाठी गोव्याच्या आठवणी अगदी लहानपणापासून वेगळ्या आहेत!
माझ्या आजीचं (आईच्या आईचं) ते माहेर असल्यामुळे, मे महिना आला की आम्ही गोव्याला पळायचो! आणि मामाच्या गावी आम्ही नुसता दंगा करायचो!सकाळी उठल्यावर भाताची गरमा गरम पेज किंवा भाकरी-भाजी पोटात भरली की मग आम्ही सुटायचो! मामाच्या टेम्पोमध्ये शेणखत भरून ते शेतावर नेऊन टाकायचे, घराच्या आजूबाजूला असलेल्या आणि गावठी आंब्यांनी लगडलेल्या वृक्षांवर धाड मारून पोतीच्या पोती आंबे घरी आणायचे, काजूच्या बागेत राखण करायला जाऊन दुपारी झाडाखाली मस्त झोप काढायची, आणलेले काजू अंगणातील कडक उन्हात व्यवस्थित पसरून वळत घालायचे, काजूच्या फाक्टरीमध्ये राबायचे आणि संध्याकाळ झाली की चरायला गेलेली गुरं गोठ्यात परत घेऊन यायची! मग काय? घरातील विहिरीवर कळशा भरभरून अंघोळ करायची आणि पोटभर जेवून, गप्पा मारीत झोपी जायचे!
इतकं जरी असलं तरी गोमंतक भूमीचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं त्या अजाणत्या वयात ठाऊक नव्हतं! मराठ्यांचे तेरेखोल, फोंडा हे किल्ले ठाऊक होते. श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा तर आमची कुलदैवते, पण पोर्तुगीजांनी पाडल्यामुळे ती फोंड्यात पुन्हा बांधली गेली हे अगदी अलीकडे समजलं! केळशी (केलोसिम) येथील पाडलेले शांतादुर्गा मंदिर कावळ्याला एक झोपडीवजा मंदिरात स्थलांतरित झाले होते. कालांतराने छोटेखानी मंदिर बांधले गेले. पण शिवरायांचे नातू, शम्भूपुत्र छत्रपती शाहूंच्या पदरी नारोरम रेगे मंत्री होते. त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यास आजचे भव्य स्वरूप दिले असावे! या गोष्टी अगदी अलीकडच्या काळात समजल्या!
सुरुवात झाली ती इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांचे युट्युबवरील एक भाषण ऐकताना. त्यात छत्रपती शिवराय आणि त्यांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल ऐकले आणि मग ठरवले, या गोवा भेटीत हे मंदिर पाहायचेच! सप्टेंबर २०२३ साली गोव्यात दाखल झालो आणि निघालो मंदीर बघायला!
प्राचीन गोव्याचे तीन मुख्य प्रांत होते. बारदेश, तिसवाडी आणि साष्टी (salcette) आणि या तीन प्रांतांना विभागणाऱ्या तीन नद्या – मान्डोवी, झुआरी आणि साल! या पैकी तिसवाडीच्या उत्तरेस “दिवाड” नावाचे एक छोटेखानी बेत आहे. आपली गोष्ट इथे सुरु होते. ११-१२व्या शतकात गोव्यावर कदंब राजांची सत्ता होती. श्री साप्तकोटेश्वर म्हणजे महादेव शंकर हे कदंब राजांचं कुलदैवत! मग त्याचं भव्य-दिव्य मंदिर दिवाड बेटावर कदंबांनी बांधलं. या मंदिराची पुष्करणी, जिला “कोटी तीर्थ” म्हणत, ते गोव्यातील लालभडक चिरा खडक खोदून बनवले आहे! या कोटी तीर्थाच्या दगडी भिंतींवर असंख्य देवकोष्ट कोरलेले आहेत. असं म्हणतात की प्रत्येक देवकोष्टात एक एक देवाची मूर्ती होती! काय शान असेल या देवस्थानाची? आज आपण फक्त कल्पना करू शकतो!
कालांतराने बहामनी सुलतानांनी गोव्यातील कदंबांना परास्त केले आणि गोवा आपल्या अमलाखाली आणला. दिवाड बेटावरील हे मंदिर बहामन्यांनी उध्वस्त केले! सन १३९९ मध्ये विजयनगरचे ‘माधव मंत्री’ यांनी इथे सप्तकोटेश्वराचे मंदिर पुन्हा बांधून काढले!
गोव्यावर पोर्तुगीजांची काळी सावली पडली आणि इथलं सगळं वातावरण बदलून गेलं! व्यापार करायला आलेल्या या फिरंग्यांनी हळू हळू तिसवाडी बेट ताब्यात घेतले आणि तेथील हिंदू जनतेचा अनन्वित छळ सुरु केला! त्यांची मंदीरं पाडली आणि जुलूम जबरदस्तीने धर्मांतरण सुरु केले. या मंदिरात दिवाड बेटावरील सप्तकोटेश्वर मंदिराचादेखील समावेश होता. १५४० मध्ये हे मंदिर पाडून तेथे जवळच एक चॅपेल उभारले गेले आणि देवळाच्या गाभाऱ्यातील शिवलिंग एका विहिरीवर, पाणी काढण्यासाठी वजन म्हणून लावले गेले. आपल्या आराध्य दैवताचा हा अपमान जनता सहन नाही करू शकली पण पोर्तुगीज जुलुमाविरुद्ध आवाज कोण उठवणार? पुढे तब्बल १८ वर्षांनी, १५५८ मध्ये एका रात्री तिथल्या महाजनांनी (पुजाऱ्यांनी) ते शिवलिंग हलवले. मान्डोवी नदी ओलांडून बिचोलीजवळ असलेल्या नार्वे गावात ते आले. तिथे एका खोपटात ते शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा सुरु झाली!
सन १६६८ मध्ये पोर्तुगीजांचे छळ रोख्ण्यासाठी दस्तुरखुद्द शिवरायांनी बारदेशवर स्वारी केली. तेव्हा नार्वे गावात एका छोट्या खोपट्यात असलेल्या या सप्तकोटेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे भव्य मंदिर बांधावे असा हुकुम महाराजांनी काढला! आज आपल्याला जे मंदिर दिसते ते छत्रपतींनी बांधलेले आहे!
नार्वे बेटावरील हे भव्य मंदिर खास गोव्याच्या शैलीत बधले आहे. मंदिराला छोटं मुखमंडप आहे आणि तिथून आत गेल्यावरच सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर शिलालेख कोरलेला आहे.
ॐ नम: शिवाय
श्री सप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्री शिवराज्ञा देवालयस्य प्रारंभ:
खुद्द छत्रपती शिवरायांचे नाव कोरलेल्या मोजक्या जागांमधील हे एक मंदिर आहे!
मंदिराचा सभामंडप भव्य आहे! गोवा सरकारने उत्तम कामगिरी बजावत संपूर्ण मंदिरात ‘कावी’ कालाकीसार केली आहे! गर्भगृहात सप्तकोटेश्वराचे प्राचीन शिवलिंग विराजमान आहे आणि त्यासमोर निष्टावंत नंदी! मंदिरात विठ्ठल, श्रीकृष्ण, गणपती यांच्या प्राचीन दगडी मूर्ती देखील आहेत. मंदिराच्या मागे एक दगडी बांधलं आढळून येतं. त्याला “पाज” म्हंटले जाते. कदाचित जीर्णोद्धारा पूर्वी इथे देवपूजा होत असेल का? मंदिरासमोर नागबंधांनी सजलेला उंच दीपस्तंभ आहे आणि त्याच्या पुढेच मंदिराची पुष्करणी अथवा “तळी”!
गोव्यातील या दोन सप्तकोटेश्वर मंदिरांची कथा मनात वेगवेगळे भावतरंग निर्माण करून जाते. दिवाड बेटावरील दुर्लक्षित “कोटी तीर्थ” मनाला चटका लावून जातं. तिथल्या मंदिराची भव्यतेची कल्पना करता येईल असा कोणताच सुगावा तिथे नाही. पोर्तुगीजांनी मांडलेला अमानुष छळ आठवून तिथले पाणी अजूनही थरारत असेल! गोव्यातील जनतेचा आक्रोश तिथले दगड उर फुटेस्तोवर सांगतात! तर नार्वे गावातील मोठ्या दिमाखात उभे असलेले सप्तकोटेश्वर साक्ष देते म्लेंछक्षयदीक्षित शिवछत्रपतींच्या विजयाची आणि प्रेरणा देते कधीही हिम्मत न हारण्याची!
-प्रांजल वाघ
२८ एप्रिल २०२४
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
(सामना या दैनिकाच्या “उत्सव” या रविवार पुरवणीत “फिरस्ती” या स्तंभात हा लेख २८ एप्रिल २०२४ तारखेला प्रकाशित झालेला आहे )
2 comments
खूप अप्रतिम लेख ?
खूप खूप आभार!!