लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग २)

… जाणुनियां अवसान नसे हें!

by Pranjal Wagh
227 views
संमोहित होऊन लिंगाणा पहात आम्ही बसलो होतो

(भाग १ इथे वाचा)

 

… जाणुनिया अवसान नसे हे!

 

जरा वैतागूनच डोळे उघडले!

जानेवारीचा महिना अन त्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार झाडीने वेढलेला गाव हे समीकरण जुळून आलं की जी थंडी पडते त्याला कडाक्याची थंडी म्हणतात! हीच थंडी घुसखोरी करू पहात होती! माझ्या ऊबदार स्लीपींग बॅगमध्ये शिरून माझ्या साखर झोपेतील गोडवा चोरून न्यायला पहात होती! बरं, जिथे झोपलोय ती जागा पण नवी भासत होती आणि अंधारामुळे ओळखू येत नव्हती!आपण घरी नसून इथे दूर वरोती गावात आहोत हे ट्यूब पेटून लक्षात यायला ३-४ सेकंद लागले. मग त्रासिक चेहऱ्याने, जड डोळ्यांना अतीव कष्ट देऊन घड्याळ पाहिले.

पहाटेचे  ०५ :३० वाजले होते!

आता उठले पाहिजे की! सर्व आटोपून मोहरीसाठी ७ पर्यंत निघायचे होते. पण ती स्लीपींग बॅगची उबदार मिठी मला काही केल्या सोडायला तयार होईना! बॅग डोक्यावरून ओढून  घेतली अन उरली सुरली साखर झोप मिटक्या मारत चाखू लागलो. जेव्हा भल्या पहाटे जाग येते व समजते की आपल्या जवळ झोपण्यास आणखी थोडा वेळ शिल्लक आहे तेव्हा जो आनंद होतो ना तो केवळ स्वर्गीय!

पण पाचंच मिनिटात पहाटेची शांतता भंग करीत समीरचा अलार्म वाजला! सम्याने गदागदा हलवून उठवले. वास्तविक स्लीपींग बॅगचं उबदार कवच झुगारून थंडीला भिडण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती पण सकाळी सकाळी सर्वांची “संतवाणी” ऐकण्यापेक्षा आपणहून उठलेले बरे म्हणून उठलो. एव्हाना सारेच जागे होऊन आम्ही नाश्त्याच्या तयारीला लागलो. ख्रिसने त्याचा स्टोव्ह पेटवला. मॅगीचा बेत ठरला व उकळण्यासाठी पाण्याने भरलेलं  पातेलं स्टोव्ह वर ठेवलं. त्यात मॅगी टाकलं अन ते तयार होण्याची अधीरपणे वाट पहात स्टोव्ह भोवती रिंगण करून बसलो.

आता सकाळची कडाक्याची थंडी, पोटात सकाळीच ओरडू लागलेले कावळे आणि मॅगीचा येणारा सुगंध आमची बेचैनी वाढवत होता. ५-१० सेकंदांनी सारखे सारखे पातेल्यावरचे झाकण काढून “पाण्याला उकळी फुटली  का?” हे पाहत होतो. त्याचबरोबर वरोती ते हरपुड पर्यंत गाडी व तेथून हरपुड-मोहरी-लिंगाणा ह्या पायी प्रवासाला लागणाऱ्या वेळाचा हिशेब चालू होता. त्याच नादात बोलता बोलता सम्याने झाकण ओढले अन जरा जोराचा झटका बसलाच!जणू काही ते पातेलं झटक्याची वाटंच पहात होतं. झटका बसताच पातेल्याने स्टोव्हवरून खाली उडी घेतली आणि त्या ओसरीला साष्टांग नमस्कार घातला आणि स्वतःमधील सर्व सामग्री त्या ओसरीस अर्पण केली!!

गरमा गरम पाणी ओसरीत सांडल्या बरोब्बर आमची एकंच धावपळ उडाली. कुणी सामान आवरतोय, कुणी पातेलं परत स्टोव्ह वर ठेवतोय, कुणी वर्तमानपत्र वापरून कडकडीत पाण्याचा वाहता प्रवाह रोखायचे फोल प्रयत्न करतोय! तारांबळ उडणे हा वाक्प्रचार आम्ही अक्षरशः जगलो वरोतीच्या त्या ओसरीत!

“सम्या, तिथे पेपर लाव!”
“वाघा तुझी स्लीपिंग बॅग बाजूला घे!”
“शिंदे तुझा स्वेटर भिजतोय बघ!”
“सांडलेली मॅगी पातेल्यात काढून घे रे!”
“च्यायला ती कशाला हवी, खाणार आहेस का आता ती??!!”

जवळ जवळ ५-१० मिनिटे ही रणधुमाळी सुरूच राहिली. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहिम आम्ही वृत्तपत्राचे नाविन्यपूर्ण उपयोग करून यशस्वी केली. ओसरीवर शांतता पसरली. जणू आमच्या समोर सांडलेल्या त्या मॅगीला (आणि आमच्या न्याहारीला) वाहिलेली एक श्रद्धांजलीच!

आता प्रश्न असा होता कि नाश्त्याच काय करायचं? शेवटी ठरलं की दुसऱ्या दिवशीचा निम्मा instant उपमा आज संपवायचा आणि अधिक उशीर न करता हरपुडची वाट धरायची!

एव्हाना गावाला जाग आली होती. घरोघरी चुली पेटल्या होत्या, बाया भाकरी भाजत होत्या. बापडे शेताकडे निघाले होते. आमच्या यजमानांच्या घरात सुद्धा गडबड चालू होती. काही लोकं आम्हाला पाहून कुतूहलाने येत होती भेटायला. त्यांतच एक मावशी आल्या. विचारपूस करू लागल्या. मावशी हरपुड गावच्या निवासी, आमच्या यजमानांना भेटायला आल्या होत्या. आम्ही हरपुडहून मोहरीस जाणार हे समजल्यावर त्या सहज म्हणाल्या,

“पर मोहरीपर्यंत गाडी जाते की!”

” अक्का कुटं ? पुढं रस्ता न्हाई!”, आतून बाहेर येत आमचे यजमान म्हणाले.

” अरे हाये की! ह्यो इथून पुढं गेलं की हरपुड  लागल! त्यो रस्ता न्हाई घ्यायचा!” , मग आमच्याकडे रोख वळवला आणि म्हणाल्या, “तुमी परत फिरा हितून! मागं गेलात कि पासली लागतं. तिथनं रस्ता घ्या, डांबरी सडक हाये! केळद खिंडीच्या अलीकडं उजवीकडून येक मातीची सडक जातेय अन ते सरळ मोहरी गावात नेउन सोडेल बगा!”

” हो बाबा, हाये त्यो रस्ता! म्या गेलोय!” , यजमानांच्या पोराने दुजोरा दिला मावशींना.

आम्ही एकमेकांकडे पाहिलं. हे नवीनच होतं! ह्या माहितीमुळे सगळा प्लान बदलून जाणार होता! आणि मुख्य म्हणजे आमचा वेळ (जो आधीच वाया गेला होता) तो वाचणार होता! लगेच मंत्रिमंडळाने फेरविचार करून निर्णय बदलला. थेट मोहरीपर्यंत गाडी रेमटवायची! अन मग तिथून सुटायचं लिंगाण्याच्या रोखाने!

आमचा रस्ता आता काहीसा असा होता.
आमचा रस्ता आता काहीसा असा होता. 

भराभर सामान  आवरले. नवीन रस्ता सांगितल्याबद्दल मावशींचे आणि आसरा दिल्याबद्दल यजमानांचे आभार मानले. पैसे विचारल्यास त्यांनी सरळ नाकारले. मग त्यांना थोडी औषधं आणि मुलांसाठी  खाऊ देऊन आम्ही गाडीत बसून निघालो! वरोतीचा खडबडीत कच्चा रस्ता ओलांडून गाडी जेव्हा पासलीच्या डांबरी सडकेवर आली तेव्हा सकाळचे ८ वाजले होते!

गाडीचा वेग वाढवीत, रस्ता कापत आम्ही पासली गाव ओलांडलं. सूर्यनारायण एव्हाना बऱ्यापैकी वर आले होते. त्या थंडीत उन्हाची ती सोनेरी किरणे मनाला सुखावित होती. किरणांचा तो हलकासा ऊबदार स्पर्श हवाहवासा वाटत होता! काही वेळातच आम्ही केळद खिंडीत पोहोचलो आणि सम्या उद्गारला , “अरे तो बघ रस्ता! त्या मावशी म्हणाल्या तो लाल मातीचा रस्ता!” 

आम्ही पाहिलं तर उजवीकडून वळण घेऊन वरच्या अंगाला एक रस्ता गेला होता. गाडी लगेच वळवली आणि घेतली त्या रस्त्यावर! डोंगराच्या धारेवरून हा रस्ता तुम्हाला थेट मोहरी गावात नेऊन सोडतो! येष्टी जाइल इतका रुंद रस्ता, लाल मातीचा, सरळ आणि सपाट! गाडी जशी पुढे जाऊ लागली तसा मागे लाल मातीचा धुरळा उडत होता! Soil Erosion होत असल्यामुळे थोडं वाईट वाटत होतं पण आता त्याला इलाज नव्हता! डोंगराच्या धारेवरून धावत मागे लाल मातीचा लोळ उडवत आमची मोहरी एक्स्प्रेस निघाली! 

27270_10152488652200118_830420475_nकेळद-मोहरी मधील कच्चा रस्ता व आमची मोहरी एक्स्प्रेस !

पण आमची ही भरधाव “गाडी”दौड लवकरच संपुष्टात आली! सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत तशी  (सामानाने भरलेल्या) गाडीची धाव चढापर्यंत! झालं  असं  की हा कच्चा रस्ता नुकताच बनला होता, काही ठिकाणी तर काम अजूनही चालू होतं! त्यामुळे तिथली माती साहजिकच भुसभुशीत होती. पावसाळा नसल्यामुळे गाडीची चाकं रुतून आमचा कर्ण होण्याची शक्यता नव्हतीच मुळी! पण जसा गाडीला चढ लागला, तशी भुसभुशीत माती आपला डाव खेळू लागली. काही अंतर चढून गेल्यावर गाडीची चाकं  जागच्याजागी फिरू लागली! आणि चक्कं  जानेवारीच्या दिवसात, पावसाचा एक थेंब सोडाच पण आकाशात ढग सुद्धा नसताना आमची गाडी सुक्या मातीत रुतली!!

“वाघा काय झालं ?”, मागच्या सीटवरून रोहनचा सवाल आला.

“चायला चाकं जागच्या जागी फिरतायत!”

“फर्स्ट गियर मध्ये घालून बघ!”

“अरे फर्स्ट मध्येच आहे!”

पहिल्या गियर मध्ये असूनसुद्धा चाकं जागच्या जागी फिरत होती! माती उडवीत होती! आता काय करायचं? गाडीला बाहेर कसे काढायचे?

मग एक युक्ती केली. गाडी न्युट्रल मध्ये टाकली अन हँडब्रेक सोडला. गाडी आपोआप मागे आली पूर्वीच्या जागेवर. गाडी थांबवली. गाडीची काच खाली केली. आणि रोहनला सूचना द्यायला तोंड उघडलं, लाल मातीने तोंडभरून स्वागत केलं! खोकत, खाकरत जवळ आलेल्या रोहनला सांगितलं , “मी गाडी वर चढवतो, पण जर अडकली परत तर तुम्ही धक्का मारा मागून!”

“ओके! तयार झालो की सांगतो!”, असं म्हणून रोहन परत चढावर गेला. ख्रिस आणि समीरला सूचना दिल्या. त्यांनी आपापल्या जागा धरल्या आणि तयार राहिले. मला “थंब्स अप”चा इशारा करून आपण तयार असल्याचे कळवले. मी खिडकीची काच वर केली. चावी फिरवली, गाडी गुरगुरत चालू झाली. माझ्यावर थोडी रागावल्यासारखी वाटली!

“कुठे इथे झक मारायला घेऊन आलास मला? मी तुला SUV वाटले काय रे?”, गुरगुरत ती लटक्या रागाने म्हणाली!

मी स्टीअरिंग वरून लाडाने हात फिरवला. म्हटलं ,”अगं तुला लागतंय हे मला कळतंय! तुला जे दगड लागतायत ना त्याच्या वेदना मला होत आहेत गं! पण हा एक ट्रेक साथ दे आम्हाला!  बस्स! तुझी लगेच सर्व्हिसिंग करतो ट्रेकनंतर! शाम्पूने आंघोळ घालेन तुला! प्लीज!”  अन accelerator दाबला. वेग थोडा वाढवला आणि सरळ चढावर भिडवली गाडी! गेली, गेली, गेली! वर गेली गाडी! आता हा चढ पार करणार गाडी असं  वाटत असतानाच चाकं परत फिरू लागली जागच्या जागी! कचकन ब्रेक दाबला! आणि ठरल्याप्रमाणे आमचे शिलेदार पुढे झेपावले! गाडीच्या मागे धक्का द्यायला उभे राहिले! मी हळू हळू ब्रेक सोडला व Accelerator वर पाय दिला. चाकं  थोडी जागच्या जागी फिरू लागली तशी मागून मंडळींनी धक्का द्यायला सुरु केला! नेमाने धक्का देत चक्कं  ह्या त्रयीनी गाडी पुढे ढकलली! अचानक चाकं  मोकळी झाली आणि गाडी पुढे गेली! रुतलेली चाकं  निघाली आणि पटकन चढ चढून गाडी वर आली! 

थोड्या सपाट जागेवर  आणली गाडी आणि थांबवली. दार उघडून बाहेर उतरलो. मगाशी चाकं जागेवरच फिरल्यामुळ घर्षण होऊन झिजल्याची  शक्यता नाकारता येत नव्हती. गाडीच्या जखमा तपासल्या. चाकं कुठेच झिजल्यासारखी वाटत नव्हती. हुश्श! वाचलो! नाहीतर घरी पोहोचल्यावर कडेलोट झाला असता!

माय लाईफ फेल इन युटेन्सील!!

गाडीच्या टपावर लाडाने थोपटले अन मागे पहिले. तीन लाल रंगात न्हालेली माणसं  चालत येत होती! गाडी चढवायला मागून धक्का देत असताना चाकांतून उडणारी लाल माती आपल्या अंगावर घेतलेले तीन वीर माती झटकत झटकत येत होते! ख्रिसचं जर्किन लाल रंगाचे असल्यामुळे त्याच्यात जास्त फरक नव्हता जाणवत पण सगळे थोडक्यात शेंदूर फासलेले हनुमंतच दिसत होते! 😉 पाण्याची बाटली काढली आणि त्यांना दिली! चूळ भरून पाणी पिऊन फ्रेश झालो अन तितक्याच सम्या आश्चर्याने उद्गारला,

“तो बघ लिंगाणा!!”

66403_10152488651885118_202042350_n“तो बघ लिंगाणा!!”

सम्याने दाखवलेल्या दिशेकडे आम्ही पाहिले तर दिसला तो लिंगाण्याचा माथा! मागच्या वर्षी हुकलेला, सकाळच्या सूर्यकिरणात न्हाऊन निघालेला आणि आता आम्हाला आव्हान करणारा तोच तो माथा!! असे वाटले की हा चढ चढून येण्याचे कष्ट मुद्दाम त्याने आमच्या वाट्याला आणले. अन हे कष्ट, हि कसरत करून गाडी आम्ही वर चढवली म्हणून त्याने दर्शन देऊन आम्हास फळ दिले!लिंगाणा पाहताच आमच्यात एक नवीन स्फूर्ती संचारली. पटापट गाडीत बसलो अन निघालो! अधिक जोमाने, अधिक वेगाने, लिंगाण्याच्या ओढीने!

रस्त्यात आम्हाला वाकुल्या दाखवीत लिंगाणा माथा साथ करीत होता. कधी एखाद्या वळणावर नाहीसा होत, कधी अचानक दर्शन देत! पण इथून फारच बुटका दिसत होता! अगदी सहज काबीज करता येईल असा! पण खरंच  बुटका लहान होता का तो?  की हा खेळ खेळतोय आमच्याबरोबर? (ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं अपेक्षित नव्हतं पण ते लवकरच मिळालं खरं!)

असे अनेक विचार करता करता, लाल मातीने माखलेली आमची चौकडी अखेरची मोहरी गावात पोहोचली!

गावातील एका घरामागे गाडी लावली. सामानाची आवरा-आवर केली. पुण्यातल्या मंडळींच्या कृपेने आम्ही छोटं पातेलं सोबत घ्यायला विसरलो होतो. म्हणून  एक छोटं पातेलं एका दिवसापुरतं उसनं मागायला आम्ही त्या घराच्या मालकाकडे गेलो. त्यांच्याकडे आधीच काही ट्रेकिंग ग्रुपची मंडळी विसावली होती. गावात असेच काही २-३ ग्रुप दिसत होते. “देवा, हे लोकं  नकोत रे लिंगाण्यावर! खूप गर्दी होईल!”, अशी मी मनोमन प्रार्थना सुरु केली. इतक्यात घराचा मालक बाहेर आला. आम्ही त्यांना हाक  मारली व आमची अडचण सांगितली.

” कुटं  निघालात?”
” काका लिंगाणा चढणार आहोत! उद्या भांडे आणून परत देतो!”

काका काहीसे पुटपुटले आणि घरात गेले. आम्हाला नीटसं कळलं  नाही, म्हणून परत विचारलं तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या,
“न्हाई म्हणतायत त्ये ! तुमी ह्ये भांडं  घेऊन कोकनात गेलात तर आमाला  नवं आणायला पार वेल्ह्यापर्यंत २० मैल चालत जावं लागतंय! आमचा बाजार तीतच असतोय!”

“अहो मावशी! पातेलं  उद्या आणून देणार आम्ही!”

इतक्यात काका बाहेर आले, “पन तुमी गेलात जर कोकनात  तर एका भांड्यासाठी वेल्ह्यापर्यंत जावं  लागल ना!”

सारा प्रकार लक्षात येताच मी पटकन बोलून गेलो, “अहो काका! माझी गाडी तुमच्या घरामागे लावली आहे! मी परत इथेच येणार आहे! कोकणात नाही उतरणार! अन नाही आलो तर पातेल्याबदल्यात गाडी ठेवून घ्या!”

गाडी घरामागे लावलीये हे लक्षात येताच सारा नूर बदलला!

“असं हाय व्हय! मंग घ्या की भांडं!”, हसत हसत आत जाऊन एक छोटं भांडं आमच्या हवाली केलं. आभार मानीत आम्ही ते सॅक मध्ये ठेवलं.  गावातील मोठाल्या विहिरीतून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि निघालो आम्ही रायलिंग पठाराच्या दिशेने! समोर मार्गदर्शक म्हणून लिंगाण्याचा माथा खुणावीत होताच!

एव्हाना सूर्य बराच वर आला होता. उन्हाची झळ  जाणवायला लागली होती. चालता चालता घामाच्या धारा  वाहू लागल्या. त्याच बरोबर विचारधारा देखील! विचार येत होते मोहरी गावाचे! मोहरी गाव हा तसा आदिवासी पाडा आहे. उत्पन्नाचं एकमेव साधन – शेती! गावात वीज नाही, गाडी रस्ता नुकताच झालाय तो पण कच्चा! एस.टी.  इथपर्यंत येत नाही. बाजार वेल्ह्याला, दूर २० कि मी वर! नशीब चांगलं असल्यास एस.टी. मिळते अथवा तंगडतोड! हॉस्पिटल सोडाच, दवापाण्याला एखादा वैदू सुद्धा आसपास नाही. किती वेगळं आणि खडतर आहे ह्यांचं आयुष्य आपल्यापेक्षा! स्टेशनवरून भाजी घेऊन भर दुपारी १५ मिनिटे चालत आलो की आपण दमतो! पण वेल्ह्यातील बाजारातून महिन्याचं सामान २० कि.मी. ऊन-पाउस-वारा ह्यांची तमा न बाळगता वाहून आणायचं  हा इथल्या लोकांचा नित्यक्रम आहे!

आज स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षं झाली! महासत्ता होण्याची स्वप्ने रंगवतो आपण! पण आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मागे धावण्यात आपण इतके गर्क झालोत की  आपणच आपल्या काही बांधवांना मागे सोडून पुढे चाललोय! पैसा, सत्ता ह्या दोन गोष्टींसाठी देशातील शासनकर्त्यांनी निम्मा देश तर कधीच विकला! पण ह्या लोकांसाठी रस्ता बांधणे  इतका छोटा उपक्रम राबवायला इतकी वर्षं  लागावीत?

विचारांच्या ओघात आम्ही चालता चालता रायलिंग पाठरापाशी येउन पोहोचलो. जानेवारीचा महिना असल्याने पावसाळ्यात वाढलेले गवत सुकले होते. ते पिवळेजर्द गवत सूर्याच्या सुवर्ण  किरणांनी चिंब न्हाऊन स्वतःच सोनेरी झाले होते! जणू कुबेराच्या कोषागारात आम्ही प्रवेश केला होता! आणि ह्या सुवर्ण गालीच्यातून डोकं वर काढून उन्हात तळपत होता तो ह्या सर्व खजिन्याचा शिरोमणी – लिंगाणा!  

सुवर्ण गालीच्यातून डोकं वर काढणारे रत्न - लिंगाणा!
सुवर्ण गालीच्यातून डोकं वर काढणारे रत्न – लिंगाणा!

बोराट्याच्या नाळेकडे जाताना लिंगाण्याचे शिखर खुणावत असते, जवळ बोलवत असते आणि आपल्याला भुरळ पडते. लहान मुलाच्या उत्सुकतेने आपण पुढे झेपावतो अन रायलिंगाच्या पठारावर येताच एखाद्या नागाने फणा काढावा तसा हा लिंगाणा त्याचे रौद्ररूपी दर्शन देतो!  जवळ जवळ ६५० फुटी शिवलिंगच जणू! समुद्र सपाटी पासून २९६९ फूट असलेला, गगनास भिडलेला, बुलंद, बेलाग, दुर्गम असा हा गड! मित्रांना मित्र अन  शत्रूला शत्रू वाटणारा आणि प्रथमदर्शनी धडकी भरवणारा हा लिंगाणा!

1376758_562603597122524_2014352351_nरायलिंग पठारावर आल्या आल्या रौद्र रूप धारण करणारा लिंगाणा!

त्या सुळक्याच्या रौद्ररूपाने आमच्यावर मोहिनी केल्यासारखे आम्ही तिथेच रायलिंगच्या कातळावर बसून राहिलो! काजवे आपल्या सूर्याचे भयानक सौंदर्य पाहण्यात तल्लीन होऊन गेली होती!

483082_10152488653385118_1365111304_n संमोहित होऊन लिंगाणा पहात आम्ही बसलो होतो

पण आता आम्हाला उठणे भाग होते!अजून बोराट्याची नाळ उतरून आम्हाला लिंगाण्याचा पायथा गाठायचा होता. त्यात सुमारे दीड तास खर्ची पडणार होत.तिथून पुढे ६५० फुटाचे कातळारोहण करून माथा गाठायचा होता. आणि इकडेच आम्हाला ११ वाजले होते! आता  घाई केली पाहिजे! म्हणून आम्ही सुसाट निघालो नाळेच्या दिशेने!

बोराट्याची नाळ! शतकानुशतके पाणी वाहून, दरड कोसळून तयार झालेला हा मार्ग. घाटावरून कोकणात उतरण्यास एकदम सोयीस्कर! आम्हाला हा लिंगाण्याच्या पायथ्याला नेउन सोडणार होता! ही नाळ खूप कठीण आहे असे आजपर्यंत खूप ऐकून होतो. आज प्रत्यक्ष अनुभवणार होतो. निघालो!

19018_10152488650890118_369771688_n बोराट्याची  नाळ उतरताना

प्रत्यक्षात नाळ काही इतकी कठीण नव्हती. ती उतरायला सुमारे पाउण तास लागला. पण खेळाचा सगळा नूर पालटला तो शेवटच्या कातळ टप्प्यावर. समीर, ख्रिस आणि मी – आम्ही सहज उतरून गेलो. पण रोहन तिथे अडखळला. रोहन आमचा लीड क्लाईम्बर. तो इतक्या सोप्या टप्प्यावर अडकलाच कसा? हा प्रश्न मला सतावू लागला. त्याला मदतीचे हात देऊन आम्ही खाली उतरवून घेतला. खाली उतरल्यावर तो एका खडकावर बसला. दमलेला दिसत होता. घामाने भिजून गेला होता. थोडीशी धाप लागली होती.

“सम्या, मला सॉलिड dehydration झालंय. क्रॅम्प्स आल्या आहेत!”, समीरकडे पाहत तो म्हणाला.

” घे! पाणी पी! बरं वाटेल”, असं  म्हणत त्याला पाणी दिले. थोडा आराम केल्यावर त्याला जरा बरे वाटू लागले म्हणून आम्ही नाळेतून उजवीकडे ट्रॅव्हर्स मारायला निघालो. रायलिंगच्या डोंगराला वळसा घालून हि वाट लिंगाणा व रायलिंग डोंगरांच्या संगमी पोहोचते. (सेफ्टीसाठी बोराट्याच्या ट्रॅव्हर्सला  बोल्टिंग केलेले आहे)निम्मा वळसा मारून झाल्यावर रोहनला परत थकवा जाणवू लागला. त्याला एके ठिकाणी सावलीत बसवले. खूप दमलेला दिसत होता.

” वाघा, मला वाटंत नाही मी लीड करू शकेन!”

थोडा वेळ नि:स्तब्ध शांतता पसरली. हा प्रसंग अकल्पित होता. अनपेक्षित घडामोडींनी एकदम बावरून गेलो. रोहनच्या भरवशावर आम्ही इथवर आलो होतो. जर तोच चढू शकणार नव्हता तर आमची मोहीम कधी सफल होईल? ख्रिस पट्टीचा प्रस्तरारोहक पण जर्मनीमधील चढाई वेगळी. तिथली त्याला सवय होती. दर ६ फुटावर बोल्ट मारलेले. ठरलेले रूट. अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारे तिथे प्रस्तरारोहण केले जाते. त्याला सह्याद्रीची सवय नव्हती. त्यामुळे लिंगाणा सर करण्याची जबाबदारी माझ्यावर अन समीरवर येउन पडली. ह्या पूर्वी आमच्यापैकी  लीड क्लाइंब  कोणीच केलं  नव्हतं. जबाबदारी मोठी होती.

समस्या हा संधीचा पाया आहे. आपल्याला फक्त त्या संधीला ओळखून त्या समस्येवर मात करता आली पाहिजे. मी आणि सम्याने एकमेकांकडे पाहिले. एक मूक संवाद घडला. रोहनकडे  वळून मी म्हणालो, ” ओके! मी आणि समीर आलटून पालटून लीड करू!”

लिंगाणा सर करण्याची जबाबदारी आम्ही आता आमच्या खांद्यांवर पेलली होती. जबाबदारीची वजनदार थाप खांद्यावर पडली की सारा माहोल बदलून जातो! पावलं  पुढे पुढे टाकताना पोटात थोडी चलबिचल असतेच पण मोहीम तडीस नेऊ हा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्याला स्फूर्ती देत असतो!

सुमारे पंधरा मिनिटानंतर आम्ही लिंगाणा खिंडीत पाऊल ठेवले तेव्हा दुपारचे सव्वा बारा झाले होते. कडकडीत ऊन भाजून काढत होते. चढाई पूर्वी काही खाउन घेणे  आवश्यक होते. थोडी चिक्की व संत्री ह्यांचा यथेच्छ फडशा पाडण्यात आला. पाणी प्यायलो. आणि मग हार्नेस घातल्या. सामग्री हार्नेसला अडकवली. शरीराची तयारी केली पण त्याहून अधिक महत्वाची होती ती मानसिक तयारी. इतकी मोठी जबाबदारी प्रथमच पेलत होतो.

लिंगाण्याचा पहिलाच पॅच थोडा कठीण होता. समीर मला म्हणाला, ” वाघ्या (पहिलाच पॅच) तू करणार आहेस की मी करू?”

” मी करतो!”

मागे वळून लिंगाण्याकडे पाहिले. महाकाय, अजस्त्र असा तो दुर्गम पहाड माझ्या समोर होता. त्याच्या तुलनेत एखाद्या मुंगी एवढे आम्ही भासत होतो – न गण्यच! आमच्याहून वयाने, आकाराने सहस्त्रपटीने मोठा असणारा तो महाकाय पर्वत आम्हाला आव्हान देत होता, “हिम्मत असेल तर याच!”

432197_10150568667222308_1804192700_n
खिंडीतून दिसणारा अजस्त्र लिंगाणा!

माझ्यासाठी लिंगाणा आता एक पर्वत उरला नव्हता. तो एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी. सहस्त्र वर्षांपूर्वी ज्वालामुखीने त्याचे बळकट शरीर आगीतून साकारले होते. तेव्हापासून हा इथेच उभा आहे. आपल्या काळ्या छातीवर निसर्गाचे वार झेलीत – अढळ, अभेद्य! कैक साम्राज्यांचा  उदय ह्याने पाहिला आहे आणि काळाच्या ओघात त्यांचा अस्त देखील! शतके सरली तरी ह्याची तपस्या अविरत चालूच आहे! आपोआप माझे हात जोडले गेले, डोळे मिटले व त्यांस वंदन केले. अचानक माझ्या मनस्थितीचे अचूक वर्णन करणाऱ्या गाण्याच्या दोन ओळी आठवल्या,

” … जाणुनियां अवसान नसे हे
        महत्कृत्य भर शिरीं घेतों ॥ ”

डोळे उघडले. सम्याकडे पाहिले. फिरून लिंगाण्याकडे पाहिले.आत्मविश्वास दुणावला होता. जणू त्यानेच आशीर्वाद दिला होता चढाईसाठी!

नेहमीप्रमाणे चढाई चालू करण्याआधी समीरला कॉल दिला,

” क्लाइम्बिंग!”

मागून कणखर आवाजात निश्चयपूर्वक आणि आश्वासित करणारे त्याचे उत्तर आले,

“क्लाइम्ब ऑन!”

(क्रमशः)

– प्रांजल  वाघ

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

(भाग ३ इथे वाचा)

छायाचित्रे: रोहन शिंदे,समीर पटेल, Christian Spanner, पराग जाधव, ओंकार ओक

Creative Commons License

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).

This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

46 comments

Onkar OAk November 4, 2013 - 11:16 PM

Refreshing and Inspiring…Very well written…the incident about that utensil is too good to imagine. Waiting for next one !!

Reply
Pranjal Wagh November 4, 2013 - 11:21 PM

Thanks Onkar!! Keep reading!

Reply
vinayak date November 5, 2013 - 10:05 AM

hi pranjal, you made my day.it is such a wonderful, thrilling experience you had. hats off.your description is photographic.photos are great.i really feel proud that setting aside routine picnics you all have chosen something challenging, exhilarating.loved it. waiting for next part. bless you.

Reply
Pranjal Wagh November 5, 2013 - 2:11 PM

Dear Date Sir,
Thank you for such a great compliment! Do keep reading I will post the next part soon!

Reply
लिंगाणा - एक स्वप्नपूर्ती! (भाग १) | A Rational Mind November 5, 2013 - 3:47 PM

[…] (भाग २ इथे वाचा)This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License. […]

Reply
Ashish November 5, 2013 - 5:45 PM

एक नंबर लिहिलय मित्रा , आता पुढची लिंगाणा चढाई आमच्या बरोबर करायची … असेच लिहित राहा .

आणि जमले तर आदिवाशी पड्याच्या लोकांसाठी काही करू शकलो तर सांगा

It will be good for all. It will beginning to start to new co operation movement . Waiting for next

Reply
Pranjal Wagh November 5, 2013 - 5:49 PM

धन्यवाद आशिष !!

तिथल्या पाड्यांसाठी काहीतरी करायला नक्की आवडेल!
माझा ई मेल : pranjalbrinjal@gmail.com आहे
बिंदास मेल ठोका! नक्की करू काहीतरी!

असेच वाचत रहा ! पुढील भाग लवकरच येत आहे !

Reply
unmesh November 5, 2013 - 7:35 PM

excellent.

waiting for next part

Reply
Pranjal Wagh November 7, 2013 - 5:06 PM

उन्मेषजी,
धन्यवाद!
पुढचा भाग लवकरच येत आहे!
🙂

Reply
kumar khot November 6, 2013 - 10:00 AM

thanks mitra khup chhaan lihile ahes

Reply
Pranjal Wagh November 7, 2013 - 5:05 PM

कुमारजी, आभारी आहे मी आपला!
आपल्यास आवडला असेल लेख तर हा जरूर आपल्या आप्तांना आणि मित्रांना वाचावयास द्या!
धन्यवाद!

Reply
amol puranik November 10, 2013 - 5:13 PM

chhan lekh ahe

Reply
Pranjal Wagh November 10, 2013 - 8:09 PM

अमोलजी
धन्यवाद! आभारी आहे!!

Reply
RUPESH November 10, 2013 - 5:18 PM

हा ट्रेक जितका रोमांचकारी असेल तितकच आपल लेखनही अस्सल आहे, वाचताना प्रत्यक्ष मी तिथे आहे असेच वाटते आणि फोटोही छान पेरले आहेत लेखात एकदम चपखल… त्यामुळे वाचताना एक वेगळाच आनंद मिळतो .. धन्यवाद मित्रा ही अनुभूती दिल्याबद्दल… पुढच्या भागाची वाट पाहत आहे….

Reply
Pranjal Wagh November 10, 2013 - 8:10 PM

रुपेश्जी तुम्हाला लेख आवडला हे वाचून फार आनंद झाला!
एक विनंती के ह्या मालिकेतील पूर्वार्ध व भाग १ देखील वाचावे!

तिसरा भाग लवकरच येत आहे!!

Reply
Nilesh November 11, 2013 - 3:54 PM

मस्त जमलय !!! मी खूप फिरलोय ह्या भागात !!! बोरट्याची नाळ, मढे घाट, तीनही बाजूंनी तोरणा, प्रत्येक दरवजातून राजगड असं खूप खूप. वाचून पुन्हा एकदा अनुभूति जागृत झाली !!

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:20 PM

निलेशजी

वा!! तुमचे भ्रमंतीतर खूपच झालीये ह्या परिसराची!
तुम्हाला लेख आवडला ह्यातच सारं आलं !!
धन्यवाद!

Reply
ravi thombade November 12, 2013 - 4:07 PM

yaa ekda macya akole talukyala bhet dyaylaa alyavar aaplya soyisathi nkki call kra 8390607203 visit side plz www(dot)akolemaza(dot)com

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:22 PM

रवी जी

नक्की येऊ!

Reply
shirish sawant November 12, 2013 - 4:13 PM

रोमहर्षक ….

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:07 PM

शिरीषजी

धन्यवाद!

Reply
Chandrashekhar maske November 12, 2013 - 9:28 PM

Apratim varnan aahe, Vachat astana pratyaksha tumchya barobar aahe asech vatat hote. Tisrya bhagachi vat pahtoy.
Keep it up…

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:10 PM

चंद्रशेखरजी

आभारी आहे! तिसरा भाग वेळे अभावी अर्धा राहिला आहे! लवकरच पूर्ण करणार आहे!

Reply
Ravi Abhyankar November 12, 2013 - 11:20 PM

Great!! keep it up!!!
I had been there in 1975!
Best wishes

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:10 PM

रवींद्रजी

आभारी आहे!

Reply
Sushant Moholkar November 13, 2013 - 9:16 AM

Mitra, Kay bolu??? fakt vat baghtoy pudhchya bhagachi….. Kramashaha madhye adkavun thewlays tu..

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:11 PM

सुशांतजी

धान्यावद! क्रमशःमध्ये जास्ती वेळ अडकवून ठेवणार!

Reply
Snehal November 14, 2013 - 4:17 PM

Awaiting for Next Part…………..

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:12 PM

स्नेहलजी

तिसरा भाग लवकरच येत आहे!

Reply
Rupesh Kotere, Dpaoli, Dist-Ratnagiri November 15, 2013 - 3:08 PM

सह्याद्री राकट, रागिट असला तरी तो सांभाळतो आपल्याला स्वत:च्या बाळाप्रमाणे ..
प्रांजल… तुमच्या लेखाचा पूर्वार्ध आणि भाग १ वाचला .. तुमच लिखाणही सह्याद्रीच्या भन्नाट वा-यासारख आहे. ३ भागाची उत्सुकत आता आणखी ताणू नकोस मित्रा.

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:14 PM

रुपेश्जी

जास्त नाही ताणत आता! लवकरच ३ रा भाग प्रकाशित होईल !!

Reply
महेश निम्हण November 16, 2013 - 6:02 AM

अप्रतिम लिखाण…
शब्द एकदम सूत्रबद्ध…
अप्रतिम….

Reply
Pranjal Wagh December 1, 2013 - 11:18 PM

महेशजी

आपल्याला लेख आवडला हे वाचून फार बरे वाटले! असेच वाचत चला!

Reply
vikas January 19, 2014 - 10:40 PM

लेख आवडला,पुढिल भाग लवकर वाचायला मिळाला तर बरे होइल,

Reply
लिंगाणा – एक स्वप्नपूर्ती! (भाग ३) | A Rational Mind February 3, 2014 - 12:03 AM

[…] ( भाग २ इथे वाचा) […]

Reply
आरोहण!! | A Rational Mind February 3, 2014 - 12:11 AM

[…] ( भाग २ इथे वाचा) […]

Reply
अमोल साळे May 2, 2014 - 5:50 PM

मित्रा,
मोहरी गावाचे वर्णन वाचले आणि काहीतरी सांगावेसे वाटले. असेच काही मित्रांकडून मोहरी आणि लिंगाण्याचे वर्णन ऐकले आणि आम्ही आमच्याच एका प्रायोगाद्वारे मोहरी आणि सिंगापूर दोन्ही गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक सौर दिवा वाटला.
पुढच्या वेळी मोहरीत गेलात तर या दिवयांचा उजेड जरूर पहाल.
आमच्या प्रयोगाविषयी: https://amoalsale.wordpress.com/suryoday/
मोहरी मधील प्रयोगाविषयी: https://amoalsale.wordpress.com/2014/02/03/suryoday-jan-feb-2014-drive/
https://amoalsale.wordpress.com/2014/03/31/suryoday-mar-apr-2014-drive/

Reply
Pranjal Wagh May 19, 2014 - 9:23 AM

मित्रा अमोल,

सर्वप्रथम ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद!
तुमची कामगिरी खरोखर लक्षणीय आहे!
लिंगाण्यावरुन रात्री मोहरी गावातले हे दिवे पाहिले होते खरे पण आज ते दिवे पुरवणारे तुम्ही हे कळल्यावर आनंद झाला!! तुमच्या कार्यास सलाम!!

Reply
Rjtrks June 11, 2020 - 12:17 AM

I have written an article on indurikar maharaj

Reply
Pranjal Wagh June 11, 2020 - 1:14 PM

धन्यवाद!
पाठवून द्यावा लेख!

Reply
ISHWAR GAIKWAD November 6, 2021 - 8:16 PM

व्वा,छानच! सलग वाचतोय ब्लॉग, छान लिंक लागतेय नि उत्कंठावर्धकही आहे लिखाण.
????

Reply
Pranjal Wagh November 16, 2021 - 11:28 PM

वा! सलग वाचताय हे फारच मस्त! इतकं मोठं सहजासहजी कोणी इतका वेळ देत नाही 😀 वाचकांना इतका वेळ खिळवून ठेवू शकलो हेच मोठं आहे!

Reply
ISHWAR GAIKWAD November 6, 2021 - 8:19 PM

व्वा,छानच! प्रांजल, सलग वाचतो आहे ब्लॉग मी, छान लिंक लागतेय नि लिखाणही उत्कंठावर्धक झालंय.
????

Reply
Pranjal Wagh November 16, 2021 - 11:28 PM

धन्यवाद सर!

Reply
Pramod sunanda sawant June 19, 2023 - 10:02 AM

तुझी शब्द मांडणी उत्तम आहे.
खुप छान लिहतोस.????????

Reply
Pranjal Wagh June 19, 2023 - 8:26 PM

खूप खूप आभार!! 😀

Reply

Leave a Comment

You may also like