रणझुंजार रामशेज

by Pranjal Wagh
108 views
दुर्ग रामशेज!

तुम्ही नाशिक जवळील रामशेज किल्ला पाहिला आहे का?

समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंच असलेला, नाशिकच्या वायव्येस सुमारे २५ किमी असलेला हा छोटेखानी दुर्ग चढायला अगदीच सोपा आहे. पायथ्याच्या गावातून चढाई करायला १ तास खूप झाला! पण हाच छोटेखानी किल्ला मराठ्यांनी बलाढ्य औरंगजेबाविरुद्ध साडेसहा वर्ष झुंजत ठेवला होता! इतकेच नव्हे तर त्याच्या अनेक मातब्बर सरदारांच्या तोंडचे पाणी इथल्या ४००-५०० मराठ्यांनी पळवले होते!

१६८२ मध्ये मोगलांचा आलमगीर औरंगजेब आपल्या सर्व शक्तिनिशी दख्खनेत उतरला. ५ लाखाचे बलाढ्य सैन्य घेऊन हा पातशाह दख्खनेवर आपला चांद-तारा फडकवायला बाहेर पडला होता. कदाचित इतक्या संख्याबळाने आक्रमण करणारा नेपोलियन नंतर औरंगजेब हाच सुलतान असावा! त्याचं लक्ष्य होतं २०० वर्षांहून अधिक काळ टिकलेली आदिलशाही, कुतुबशाही आणि केवळ ३०-३५ वर्षाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल हिंदवी स्वराज्य!

महाराष्ट्रात उतरताच औरंगजेबाने या छोट्याशा दुर्गाचा बंदोबस्त करायला, निजाम-उल-मुल्काचा बाप शहाबुद्दीन खान, याला मोठं सैन्य आणि विपुल दारुगोळा देऊन पाठवलं. किल्ल्यावर ४००-५०० मराठे होते पण त्यांचा किल्लेदार हा अनुभवी, बेडर आणि मुरलेला लढवय्या होता. दुर्दैवाने त्याचं नाव आपल्याला ज्ञात नाही!

शहाबुद्दीन खानाने पराक्रमाची शर्थ केली. उंच लाकडी दमदमे  बांधून किल्ल्यावर तोफांचा मारा केला. पण काही उपयोग झाला नाही. एका काळ्या रात्री किल्ल्यावरील मराठे भुतासारखे आले न लाकडी दमदमे पेटवून निघून गेले. पण शहाबुद्दीन खान हटला नाही. त्याने तोफांचा तुफान मारा केला आणि किल्ल्याच्या दरवाजाजवळील तटबंदी ढासळली. मोगलांनी मोठी मुसंडी मारली पण किल्ल्यातल्या मराठ्यांनी दात-ओठ खात प्रतिकार केला. मोगलांच बरंच नुकसान होताच त्यांनी माघार घेतली.

पुढे बहादूर खानास रामशेजवर पाठवले. त्याचा एक मोतद्दार आपल्याला जादूटोणा येत असून तुम्ही मला १०० तोळे वजनाचा सोन्याचा नाग बनवून द्या असे म्हणाला. मी पुढे चालत जातो तुम्ही सैन्य घेऊन माझ्या मागे या. किल्ला लगेच आपल्या हातात येईल. हा मोतद्दार चालत येताना आतील मराठे पाहत होते. दरवाज्याजवळ तो पोहोचताच आतून गोफणीचा एक गोळा आला आणि त्या मोताद्दराच्या डोक्यात बसला! मोतद्दार आणि नाग दोन्ही तिथेच पाडले आणि सैन्य मागच्या मागे पळून गेले!

इतकी तोकडी शिबंदी घेऊन रामशेज लढत असताना त्याला आसपासच्या किल्ल्यातून रसद व्यवस्थित पुरवली जात होती. संभाजी महाराजांनी त्यांना कसलीच कमी पडू दिली नाही. किल्ल्यात दारुगोळा आणि तोफा नव्हत्या. मग मराठ्यांनी लाकडी तोफा बनवून कातड्याचे गोळे उडवले. मोगलांचा इतिहासकार खाफीखान रामशेजच्या वेढ्यात प्रत्यक्ष हजार होता. तो म्हणतो,

ही लाकडी तोफ दहा तोफांचे काम करते!”

पुढील अनेक वर्ष ही झुंज अशीच सुरु राहिली. खानजहान बहाद्दूर, कासिमखान किरमाणी या सरदारांनी सुद्धा प्रयत्न केले पण रामशेजच्या मराठ्यांनी त्यांना भीक घातली नाही! १६८७च्या सुमारे छत्रपती संभाजी महाराजांनी किल्लेदाराला खिल्तीची वस्त्रे, रत्नजडीत कडे आणि नगद रक्कम देऊन त्याचा सन्मान करून त्याची प्रमुख किल्ल्यावर नेमणूक केली. दुर्दैवाने नवीन किल्लेदार फितूर झाला आणि सुमारे ६ वर्षांच्या कडव्या झुंजीनंतर रामशेज मोगलांच्या ताब्यात अलगद गेला!   

टाक्यांची शृंखला!
टाक्यांची शृंखला!

आज किल्ल्यावर फार वास्तू दिसत नाहीत. वाड्यांचे अवशेष, पाण्याच्या टाक्या इतकेच दिसते. पण इथलं मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्णपणे कातळात खोदून काढलेला महादरवाजा आणि सहज लक्षात न येणारा भुयारी चोर-दरवाजा!

रामशेजचा भुयारी दरवाजा!
रामशेजचा भुयारी दरवाजा!

आज ३४० वर्षांनंतर गडाच्या तटावर उभे राहिले की समोर दिसते मोगलांची सागरासारखी पसरलेली छावणी, शहाबुद्दीन खानाचा डेरा, त्याने बांधलेले लकडी दमदमे आणि आग ओकणाऱ्या त्याच्या तोफा! पण मागे वळून किल्ल्यात पाहताच दिसतात ते शिवछत्रपतींच्या स्वराज्याचं स्वप्न उरात घेऊन लढणारे त्यांचे मावळे आणि “आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य” म्हणत मावळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले पोलादी छत्रपती संभाजी महाराज!

नीट कान देऊन ऐकलंत तर रामशेजचा प्रत्येक दगड मराठ्यांची शौर्यगाथा आपल्याला सांगतो!

  • प्रांजल वाघ
  • pranjalwagh@gmail.com  
    (संदर्भ : ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ सदाशिव शिवदे)

2 comments

Samir Gulekar July 17, 2025 - 9:20 PM

खूप छान माहिती

Reply
Pranjal Wagh July 30, 2025 - 11:19 PM

मन:पूर्वक आभार!! 😀

Reply

Leave a Reply to Samir Gulekar

You may also like