“सर, टायगर दिसतोय! फेअरीचा बछडा रस्त्यावर दिसतोय!”, असं म्हणत आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने गाडी पिटाळली! मातीचा धुरळा हवेत उडवत, उमरेड-काऱ्हान्डला व्याघ्र प्रकल्पातील रस्ते कापीत आम्ही साधारण १५-२० मिनिटात वाघोबा जिथे होता तिथे पोहोचलो.
उमरेडच्या जंगलातील फेअरी वाघिणीला ३ पिल्लं होती. साधारण दीड वर्षाच्या वाघाचे बछडे म्हणजे मनुष्याच्या १५-१६ मुलांसारखे असतात. अंगा-पिंडाने बऱ्यापैकी मजबूत असले तरी या बछड्यांना स्वतःहून शिकार करता येत नाही. त्यामुळे ही पोरं आईवरच निर्भर असतात. या वयात आई यांना शिकार करायला शिकवत असते. आम्ही साधारण ५-५३० वाजता डेरेदार वृक्षाच्या सावलीत गाडी लावून वाघ दिसण्याची वाट बघत असताना आमच्या गाईडला वाघ दिसल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो.
पाहतो तर काय, फेअरीचा “मुलगा” एका रानडुकराच्या पिल्लासोबत “खेळत” होता! रक्तबंबाळ झालेलं ते बिचारं पिल्लू वाघाच्या तावडीतून सुटण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. पण वाघ कसला ऐकतोय? जरा कुठे पळण्याचा प्रयत्न सुरु झाला की त्याच्या पंज्याचा एक फटका त्या पिल्लाला पडायचा आणि ते काही क्षण सुन्न व्हायचे, निपचित पडून राहायचे! वाघाच्या पंजाचा फटका जबरदस्त शक्तिशाली असतो! एका पंजाच्या फटक्यात एक वाघ एखाद्या पैलवानाचे मुंडके उडवून लावील तिथे या पिल्लाची काय गत? धारदार नखांनी त्याला बरेच जखमी केले होते आणि मध्ये मध्ये वाघ त्याचे चावे घेत होता. हे सगळं करताना, आजूबाजूला जमा झालेल्या गाड्यांवर त्याचा एक डोळा होताच!
त्या पिल्लाची हालत पाहून आम्हाला खूप वाईट वाटत होते. पण एरवी सुंदर भासणारा निसर्ग असाच निष्ठुर आणि क्रूर असतो! एरवी गोंडस दिसणाऱ्या वाघाच्या बछड्याचे क्रौर्य पाहून काहींनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली खरी पण तो त्याला निसर्गाने घालून दिलेल्या “धर्माचे” पालन करीत होता! वास्तविक त्या छोट्या वाघोबाला शिकार करणे ठाऊक नव्हते! तो नुसता आपली नखं, जबडा आणि पंजे वापरण्याचा सराव करत होता. वाघ, बिबटे आणि आपल्या घरगुती मांजरी मारण्यापूर्वी अनेकदा आपल्या सावजासोबत असेच खेळतात!
एव्हाना त्या वाघाचे नाक आणि ओठ रक्ताने लाल झाले होते आणि पंज्याखाली धरलेलं ते पिल्लू निपचित पडले होते. इतक्यात आमच्यामागून एक गाडी आली आणि त्याचे लक्ष विचलित झाले, सावजावरची पकड ढिली झाली आणि ही संधी साधून रानडुक्कर चपळतेने उठले आणि तिथून ठेचकाळत, धडपडत, जीव वाचवत पळू लागले. डुक्कर पळताच वाघाचे लक्ष त्याच्याकडे गेले पण तो शांतपणे पाहत राहिला. काही क्षण पिल्लाला “स्वातंत्र्य’ उपभोगू दिले आणि मग परत धावत जाऊन त्याला एक ठोसा लगावला! त्या फटक्याने भेलकांडत ते पिल्लू बाजूच्या गवतात जाऊन पडले! आम्हाला वाटलं सगळा खेळ संपला! पण काय आश्चर्य! ते पिल्लू परत उठून चालू लागले! सैरभैर झाल्यामुळे इतका मार खाऊन ते पुन्हा वाघाकडे चालत आले आणि त्याच्या पायांमधून पळ काढायला बघताच या वाघाने काय करावे?
अजूनही लहान असलेल्या या वाघाच्या बछड्याला “किलिंग स्ट्रोक” मारणे ठाऊक नव्हते. काय करावे हे त्याला सुचेना आणि म्हणून तो सरळ-सरळ त्या डुकराच्या पिल्लावर बसला! इतकं वजनदार धूड अंगावर बसल्यावर त्या चिमुकल्या डुकराची शुद्धच हरपली! आम्ही सगळे थक्क होऊन हे पाहत असताना आमचा गाईड म्हणाला, “ सर आपली वेळ संपत आली आहे! निघायला हवं!” आणखी थोडा वेळ थांबण्याच्या विनाव्या करून देखील अभयारण्याचे नियम आम्ही मोडू शकत नव्हतो! नाईलाजाने निघावे लागले! निघता निघता मागे वळून पाहिले तेव्हा फेअरीचा हा मुलगा डुकराच्या पिल्लाला घेऊन झाडीत घुसला होता. त्या संध्याकाळी रानडुकराचा अंत लिहिलेला होता. प्रश्न होता शेवटचं घाव कधी पडेल हा!
आम्हाला त्या पिल्लाचे हाल बघून खूप वाईट वाटले. पण त्याच वेळी एखाद्या वाघाच्या बछड्याला शिकार कशी करायची याचा ‘स्वाध्याय’ करताना पहिल्यांदाच आम्ही पहिले होते! हे दृश्य मनात साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो!
खरंच, निसर्ग जितका सुंदर तितकाच तो निर्दयी असतो!
– प्रांजल वाघ
१५ मे २०२४
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
(सामना या दैनिकाच्या “उत्सव” या रविवार पुरवणीत “फिरस्ती” या स्तंभात हा लेख १९ मे २०२४ तारखेला प्रकाशित झालेला आहे )
2 comments
Khup Chan Pranjal
Thank you so much!! 😀