ट्रेकर्स आणि डोंगरातील श्वानमंडळी यांच्यातील नातं काही वेगळंच असतं , मग तो सह्याद्री असो वा हिमालय! गेल्या १८ वर्षात मला अनेक अनुभव आले. अनेक वेळा तर या डोंगरातील कुत्र्यांनी आम्हाला घनदाट जंगलात योग्य वाटेला लावून दिलं आहे. पण या वर्षी २० अक्टोबर रोजी आम्ही जेव्हा पालीजवळील डेऱ्या घाट – गाढवलोट घाटाने चढाई-उतराई करत होतो तेव्हा एक वेगळाच अनुभव आम्हाला आला.

आम्ही भर उन्हात, ऑक्टोबरच्या उष्म्यात हा घाट चढत होतो. या मोहिमेचा पहिला टप्पा पार करेपर्यंत आम्ही अक्षरश: घामाने चिंब भिजलो होतो. शरीराचे प्रचंड निर्जलीकरणे झाले होते पण भयंकर चिकाटीने स्वतःला पुढे रेटत आम्ही पठारावर १०-१२ घरट्यांच्या एका वाडीत पोहोचलो. या वाडीचं नाव होतं “आसनवाडी”.
गावात प्रवेश करताच ही कोण अनोळखी माणसं गावात आली हे पाहायला एक मावशी घराबाहेर आल्या. नाव-गाव यांची विचारपूस झाल्यावर आम्ही मावशींकडे पाणी मागितलं. त्यांनी लगेच तांब्याभरून थंडगार पाणी दिलं. पाण्याचे घोट घशाखाली उतरताच तरतरी आली, झालेली दमछाक जवळजवळ नाहीशी झाली!
“मावशी, हे पाणी तुम्ही कुठून भरता?” , आमच्यातल्या समीरने मावशींना विचारलं.
“हितंच पुढे एक विहीर आहे तिथून भरतो आम्ही पाणी!”, मावशी उत्तरल्या.
मग आम्ही लगेच ठरवलं. विहिरीजवळ विश्रांती घेऊन दुपारचं जेवण करायचं आणि मग तिथून पुढे उजवीकडे वळून मारठाण्याच्या आणि जांभळ्या डोंगराच्या करड्या पहाऱ्यातून सह्याद्रीच्या पठारावरील पायवाट तुडवायची आणि हिर्डे गावातून “गाढवलोट” घाट उतरून पुन्हा पाली गाठायचं!
मावशींचे आभार मानून आम्ही चालायला सुरुवात केली न केली तोच आमच्या मागे एक काटक, पण तल्लख डोळ्यांची एक कुत्री, शेपूट हलवत आली! हिचे नाव राणी! जवळ आल्यावर हळूच तिच्या डोक्यावर खाजवलं आणि मग ती आम्हालाच चिकटली!
दूरवर घनगडावर ढग गडगडायला लागले होते. थंड वारं वाहायला लागताच आम्ही वेग वाढवला आणि विहीर गाठली खरी पण तिथं पोहोचताच असं लक्षात आलं की विहिरीतून पाणी काढणं अशक्य होतं! पण आजूबाजूला काही झरे आणि स्वच्छ डबकी होती. तिथून पाणी भरून घेऊया म्हणून पाठपिशव्या खाली ठेवल्या आणि पाणी भरायला डबक्याकडे जायला बाटली काढली तितक्यात ही राणी त्याच डबक्यात जाऊन बसली! आमच्या चौकडीने तिला सडकून शिव्यांची लाखोली वाहिली पण त्याचं तिला काहीच नव्हतं! तिने आमच्याकडे तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांनी असा काही कटाक्ष टाकला की आम्ही लगेच विरघळून गेलो!

पोटभर जेवल्यावर, दुसरीकडून पाणी भरून घेतलं आणि आम्ही पठारावरून वेगवान चाल करून निघालो हिर्डी गावाकडे! या संपूर्ण प्रवासात राणी आमच्या पावलांवर पंजे टाकत चालली होती. हे तर अगदीच “नॉर्मल” होतं. घनदाट जंगलातील पायवाट तुडवत, सह्याद्रीतील फुललेल्या रानफुलांचा आस्वाद घेत, घाटमाथ्यावरून सह्याद्रीच आणि कोकणाच सौंदर्य न्याहाळीत आम्ही हिर्डी गावात पोहोचलो.

गावात पोहोचल्यावर आम्ही गाढवलोट घाटाने उतरण्यासाठी वाटाड्या शोधू लागलो. हिर्डी गाव तसं अंधारबनच्या जवळचं असल्यामुळे आम्हाला वाटाड्या लगेच मिळाला आणि त्यांनी लगेच त्यांची कुत्री बरोबर घेतली. तिने राणीला पाहताच गुरुगुरायला सुरवात केली! साहजिकच तिच्या हद्दीत ही दुसऱ्या गावची कुत्री आलेली तिला चालणार नव्हती! पण तिच्या मालकाने तिला ओरडून गप्प केले आणि म्हणाला, “ही राणीचीच मुलगी आहे!”

आसनवाडी ते हिर्डे हा टप्पा साधारण ७-८ किमीचा असावा. ही राणी आमच्यासोबत तितका पल्ला चालत आली. आता वेळ होती गाढवलोट घाटाने उतरून पुन्हा खाली कोंडजाई गाठायचे! साहजिकच आम्हाला वाटले की राणी आता इथून परत आपल्या गावी जाईल. पण काय आश्चर्य! ही बया आमची साथ काही सोडायला तयार होईना. प्रेमाने समजावले, दरडावले पण ती काही हटेना! घड्याळाचे काटे मावळतीकडे सरकताच आमचा नाईलाज झाला आणि आम्ही राणीसकट उतरंडीवर पाऊल ठेवले!
सह्याद्रीच उभा चढ उतरताना आम्हाला काही गावकरी मंडळी भेटली. ती आसनवाडीची निघाली! त्यांनी राणीला ओळखले! समीरने त्यांना विनंती केली, “ हिला परत घेऊन जा गावी! आम्ही खालून मुंबईला निघणार मग हे अख्खं जंगल ही एकटी पार करून कशी येणार?”
मग त्या जमलेल्या काकूंनी तिला “यू राणी! राणी यू!”, असं म्हणत बोलवायचा प्रयत्न केला पण ही बया काही ऐकेना! एखाद्या जळू प्रमाणे आम्हालाच चिकटून बसली! इतका खोळंबा का होतोय हे पुढे गेलेल्या परागला कळेना! अंधारा अगोदर खाली पोहोचणे आणि आमच्या वाटाड्याला परत हिर्डी गावात येणे महत्वाचे असल्यामुळे. पराग तिथून बोंबलायला लागला!
मग आम्ही पुन्हा काढता पाय घेत अख्खा गाढवलोट घाट न थांबता उतरलो! सपाटी लागताच वाटाड्या मामांना त्यांची बिदागी दिली. ते निघाले तरी राणी आमची सांगत सोडेना! प्राणीप्रेमी समीर हवालदिल झाला! आपली काळजी बोलवून दाखवत तो म्हणाला, “अरे ही एकटी कशी जाईल आता गावी?”
कुत्रे मला सुद्धा प्रचंड आवडतात पण घरी जाणे तितकेच महत्वाचे असल्याने मी थोडा पाषाणहृदयी झालो आणि म्हणालो, “ अरे कुत्र्यांना कळतं सगळं! जाईल ती! काळजी नको करूस!” मी हे म्हंटल खरं पण मला देखील चिंता लागून राहिलेली.
कोंडजाई मध्ये लावलेल्या आमच्या गाडीकडे येईस्तोवर अंधार होऊ लागला होता. आम्ही पटापट कपडे बदलले, सामान गाडीत भरलं. एक साधा अंदाज बांधला तर ही आसनवाडीची राणी आमच्या सोबती कमीत कमीत १२-१५ किमी चालत आली होती! आम्ही थक्क झालो!
मग आमच्या जवळ असलेलं दूध तिला आम्ही प्रेमाने दिलं. माझ्याजवळ असलेलं उकडलेलं अंड तिला खाऊ घातलं आणि तिचे शेवटचे लाड करून गाडीत बसलो!

गाडीच्या मागील खिडकीतून आम्ही नजर टाकली तर राणी आमच्याकडे नजर लावून, शेपूट हलवीत आशेने पाहत होती. पण निघणे अनिवार्य होते! दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा मानवनिर्मित, भावनारहित शहरी जीवनाचा भाग व्हायचे होते! कुणालने गाडी सुरु केली तसा समीर म्हणाला, “अरे ती बघ आपल्या मागे पळत येतेय!” ते दृश्य पहायचं धाडस माझ्यात नव्हतं! ती आसनवाडीला परत जाईल का? कोंडजाई ते आसनवाडीमध्ये असलेल्या घनदाट जंगलात फिरणारी हिंस्र श्वापदांच्या नजरा चुकवून ती तो पल्ला पार करेल का? अशा अनेक विचारांनी मनात गर्दी केली!
इतक्यात गाडीने वळण घेतले आणि धावणारी राणी वळणा आड नाहीशी झाली! हा एक वेगळाच हृदय हेलावून टाकणारा अनुभव या वेळी सह्याद्रीने आमच्या पदरी टाकला होता!
- प्रांजल वाघ


1 comment
माहिती आणि भावना यांचा सुंदर संगम