एका मंदिराचा पुनर्जन्म!

भास्करपंत आणि मराठ्यांनी केलेला एक आगळावेगळा पराक्रम!

by Pranjal Wagh
3K views

सन १७४१ पासून सरदार रघुजी भोसल्यांच्या फौजा, दसऱ्यानंतर सीमोल्लंघन करून सुटल्या आणि छत्तीसगढ-ओडिशा-झारखंड-बिहार-बंगाल हा मुलुख काबीज करूनच थांबल्या! रघुजींचे  दिवाण भास्कर राम कोल्हटकर यांच्यावर या मोहिमांची मदार होती आणि या साऱ्या मुलुखावर त्यांनी इतका जरब बसवली की आज ही बंगालमधली चिल्ली-पिल्ली रात्री रडायला लागली की आई त्यांना “भास्कर पंडित”ची भीती घालून त्यांचं रडं थांबवते! त्यांच्या या “raids”च्या भीतीने त्यांना बंगालमध्ये “दोष्यू” संबोधले जाऊ लागले.  मराठ्यांची इतकी धास्ती या सगळ्यांनी खाल्ली की बिहारमध्ये पटण्याला तटबंदी घालण्यात आली, माळव्यात (उत्तर प्रदेशात) लोकांनी गढ्या उभारल्या, बंगालमध्ये तर व्यापाऱ्यांनी वर्गणी गोळा करून कंपनी सरकारकडून  जगप्रसिद्ध “मराठा डिच” नावाचा खंदक कल्कत्त्या भोवती खणून घेतला.

या साऱ्या धामधुमीची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. परंतु भारताच्या इतिहासावर मराठ्यांनी कैक वेळा एक वेगळीच छाप सोडली आहे. पण आपण मराठी असल्यामुळे त्याचा थांगपत्ताही आपल्याला नसतो! अगदी काही वर्षांपूर्वी मला सुद्धा नव्हता! मागे निनादराव बेडेकरांचे एक व्याख्यान ऐकताना त्यांनी हा किस्सा त्यात कथन केला होता तेव्हा जाऊन या बद्दल कळलं!

भास्कर राम कोल्हटकरांच्या नेतृत्वखाली जेव्हा मराठी फौजा ओडीशात घुसल्या तेव्हा एका ठिकाणी त्यांना मातीच्या ढिगाऱ्यातून काही मूर्ती डोकावताना दिसल्या. लागोलाग, याची वर्दी भास्कारपंतांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून २०० माणसं तिथे पाठवली गेली आणि ती सारी वाळू, झाडी साफसूफ केल्यावर त्यांना तिथे एक मंदिर सापडले. कोणते होते ते मंदिर?

इ स १२५० मध्ये पूर्व गंगा राजवंशातील राजा – नरसिंहदेव पहिला – याने या मंदिराची निर्मिती केली. त्याने मुसलमानी आक्रमकांवर मिळालेल्या विजयाच्या स्मृत्यर्थ हे मंदिर बांधले असे म्हणतात. त्यावरील अनेक मूर्ती लढाईचे प्रसंग दर्शवतात! ओडिशाच्या पूर्व किनाऱ्यावर हे मंदिर उभे होते आणि या मंदिराला दर्यावर्दी “Black Pagoda” म्हणत. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे या मंदिराचे दगड काळे पडत गेले आणि म्हणून त्याला “Black Pagoda” असं नाव! इ.स. १५०८ मध्ये काला-पहाड नावाच्या एका मुसलमानी सरदाराने राजा मुकुंददेवाचा पराभव करून ओडीशामधील  हिंदू मंदिरांच्या विध्वंसाचा नंगा-नाच सुरु केला. हा विध्वंस या मंदिराच्या वाट्याला सर्वात जास्त आला असावा असा अंदाज बांधता येतो. या विध्वंसाची तीव्रता किती होती? त्याचे एक उदाहरण म्हणजे या मंदिराच्या गर्भगृहाच्या दगडी भिंती २०-२५ फूट जाड असूनही कालापहाडने मंदिरावर इतके प्रहार केले की गर्भगृहावरील मुख्य शिखर जमीनदोस्त केले! पुढे १५६८ पर्यंत संपूर्ण ओडिशा मुघलांच्या अधिपत्याखाली आले आणि पुढील साधारण १७० वर्षे त्यांचेच वर्चस्व तिथे राहिले. मंदिरांचा विध्वंस सुरूच राहिला. पुरीचा जगन्नाथही त्यातून सुटला नाही! आणि १७४१ मध्ये या रंगमंचावर प्रवेश झाला तो मराठ्यांचा!

या विध्वंसानंतर इ.स. १७४१-४४ पर्यंत, मराठ्यांनी या मंदिराचे उत्खनन करे पर्यंत हे मंदिर विस्मृतीत गेले असावे असे वाटते. भास्कारपंतांनी आदेश केल्यावर मराठे कुदळी-फावडे-पहारी घेऊन सरसावले आणि एका मंदिराचा पुनर्जन्मच झाला!

त्यांना सापडला तो एक भव्य आकाराचा “जगमोहन” अथवा मंदिराचा मंडप! विविध देवदेवतांच्या मूर्तींनी नटलेल्या या मंडपावर विराजमान होते “फासणा” पद्धतीचे “पिधा देऊळ” अथवा शिखर! या मंडपाची एकूण उंची होती तब्बल ६५ मीटर! याच मंडपाच्या मागे होते ते मंदिराचे मुख्य देउळ – गर्भगृह! ओडिशा मंदिर शैलीत त्याला “रेखा-देउळ” म्हंटले जाते. याच रेखा-देऊळाचा शिखर कालापहाडने पाडला! अगोदर वर्णन केलेलं हेच ते “नागर लतीन” शैलीतले शिखर!

मग उत्खनन करता करता मराठ्यांना सापडली ती रथाची दगडी चाकं आणि त्या रथाला ओढणारे काही सुबक दगडी घोडे! ते पाहताच मराठ्यांच्या लक्षात आलं. आपण ज्या मंदिराचे उत्खनन करतोय ते एक भव्य-दिव्य असे सूर्य-मंदिर आहे! ज्या जागेवर हे उत्खनन झाले ती जागा म्हणजे भारताच्या पूर्व तटावरील पूर्वीचे एक गजबजलेले बंदर! त्याचे नाव “कोणार्क”!

होय! कोणार्कच्या सूर्यमंदिराचा पुनर्जन्म होण्यास आपण मराठे कारणीभूत आहोत!!

सद्यस्थितीत असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर

कोणार्कचे सूर्यमंदिर किती भव्य असेल? आपल्याला आज फक्त अंदाज बांधता येतो. पुरीचे जगन्नाथ मंदिर हे सध्या ओडिशामधले सर्वात उंच मंदिर मानले जाते. जगन्नाथ मंदिराचे शिखर हे सुस्थितीत असून त्याच्या शिखराची उंची जमिनीपासून ६५ मीटर इतकी भरते. त्याच्या तुलनेत कोणार्कच्या जगमोहनाची  आणि त्याच्या शिखरची एकूण उंचीच ६५ मीटर भरते! मग गर्भगृह आणि त्याच्या मुख्य शिखराची उंची किती असेल? खालील कल्पनाचित्र पाहता साधारण ७०-७५ मीटर उंची सहज असेल असा माझा आपला अंदाज!

कोणार्कच्या सूर्यमंदिराचे कल्पनाचित्र

आधी माझ्या नावाप्रमाणे आणि माझ्या स्वभावाप्रमाणे प्रांजळ कबुली देतो. मी कोणार्कच्या सूर्यमंदिरात गेलेलो नाही. पण मराठ्यांचा हा पराक्रम पाहता मला राहवले नाही आणि भारतीय मंदिर स्थापत्य शास्त्रावरील डॉ देगलूरकर यांच्या पुस्तकाचा, नागपूर गॅझेटीयर, काही लेख आणि जुनी छायाचित्रे यांचा आधार घेत मी या लिखाणास प्रारंभ केला! चूकभूल माफ कराल अशी आशा!

कोणार्कचे सूर्यमंदिर किती सुंदर असावे? सध्या उभ्या असलेल्या जगमोहनाचे हे रेखाचित्र मला इंटरनेटवर सापडले. त्यात मंदिरावर असलेले काम बघा! डोळे दिपून जातात! या मंडपाच्या दरवाजावरील सूर्याची प्रतिमा सध्या कलकत्त्याच्या वास्तुसंग्रहालयात असते.

कोणार्कचे सूर्यमंदिर हा सूर्याचा अखंड रथ आहे अशी कल्पना येथील स्थपतींनी हे मंदिर बांधताना केली असावी कारण या रथाची २४ चाकं असल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. तसेच सूर्य-रथाला ओढणारे त्याचे ७ घोडे इथे दगडी स्वरुपात होते हे देखील दिसते. खालील चित्र आपल्याला या रथाच्या भव्यतेची आणि सौंदर्याची एक छोटीशी झलक देते!

Pen and ink drawing of a sculpture that is part of the processional chariot pulled by horses from the Surya temple at Konarak in Orissa, from an album of 37 drawings (43 folios) of sculpture at Jajpur, Puri, Bezwada and Sitanagar made during a journey from Bengal through Orissa to the Coromandel Coast, dated 1815.
(Source   http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/other/019wdz000001066u00023000.html

जेम्स फर्ग्युसन नावाचा एक स्कॉटिश इतिहासकार. त्याचा विशेष आवडीचा विषय म्हणजे भारतीय मंदीरं आणि स्थापत्यशास्त्र. त्याने अनेक मंदिरांची १९व्या शतकातील चित्रे बनवून घेतली. ती आज आपल्याला बघायला मिळतात. साधारण या मंदिरांची सुंदरता, भव्यता आणि त्यांनी अंगावर वागवलेल्या जखमा यांची आपल्याला कल्पना करता येते! खालील चित्र कोणार्कच्या सूर्य-मंदिराचा जगमोहन पहा आणि त्या समोर उभी असलेली २ माणसं पहा! मागे “नागर लतिन” शैलीतले मुख्य शिखराची एक भग्न लता आपल्या नजरेस पडते. काय भव्यता असेल पूर्ण मंदिराची?

कोणार्कचे सूर्यमंदिर – जेम्स फर्ग्युसन (१८४७)
Source :http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00routesdata/1200_1299/konarak/konarak.html

ट्विटरवर एकाने मागे कोणार्कचे कल्पनाचित्र टाकले होते, ते खालीलप्रमाणे!  या मंदिराचे आज अस्तित्वात असलेले जगमोहन त्यात दिसते. त्या समोरील नात-मंदिर आज पडून गेले आहे आणि मागील गर्भगृह कला-पहाडने पाडले!

चित्राचे शीर्षक: दोन युरोपियन अधिकारी आणि एक कुत्रा
चित्रकार : विल्यम जॉर्ज स्मिथ (१७९२-१८२३)

ब्रिटीश लायब्ररीमधील “आशिया-पासिफिक-आफ्रिका” या संग्रहात एक चित्र आहे. बहुदा ते कोणार्कच्या जगमोहनाच्या आतले आहे. त्याच्या वर्णनात असे म्हंटले आहे, “ … Conceived as a gigantic chariot with twelve pairs of carved wheels, this temple is an architectural feat for the Orissan style. It originally consisted of a sanctum with a spire reaching more than 70 metres, an assembly hall and a dancing hall as well as a number of subsidiary shrines. The sanctum and the dancing hall have lost their roofs and it is only the assembly hall which has survived with its large pyramidal roof, the exterior of which is decorated with sculptures of musicians, dancers and maidens. This drawing depicts two figures and a dog inside the assembly hall”

केवळ ही जुनी चित्रे पाहूनच आपले डोळे दिपून जातात तर १३व्या शतकात बांधकाम पूर्ण झाल्यावर या मंदिराची अवस्था काय असेल? देवाचे घर हे एखाद्या राजाच्या प्रासादासारखे असावे या नियमाला धरून सूर्यदेवाचा प्रासाद हा निव्वळ स्वर्गीयचं असेल हे मात्र नक्की!

जाता जाता भास्कर राम कोल्हटकर यांच्याबद्दल आणखी थोडं सांगतो. १७४२ साली भास्करपंतांच्या फौजा थेट कल्कात्त्याजवळील कटवा या गावी पोहोचल्या. बंगालचा नवाब अलीवर्दी खान याला मार देऊन गंगेपार घातला आणि कटवा येथील दैनहाट आपली छावणी उभी केली. आज बांगलादेश सीमेलगत हे गाव आहे म्हणजे मराठ्यांची मुसंडी ही बंगालात कुठपर्यंत गेली होती याची आपल्याला कल्पना येते! तिथे एका स्थानिक दुर्गामंदिरात भास्करपंतांनी बंद पडलेल्या दुर्गापुजेला पुनरुज्जीवित करण्याचा घाट घातला. पण अष्टमीच्या रात्री दुर्गापूजेत व्यस्त असलेल्या मराठ्यांवर अलीवर्दी खानाने हल्ला केला आणि तिथून मराठ्यांना काढता पाय घ्यावा लागला त्यामुळे ही पूजा अर्धवट राहिली. आज ते मंदिर भग्नावस्थेत आहे पण कटवा येथील नागरिकांनी भास्करपंतांची ही अपुरी दुर्गापूजा १९८९ मध्ये २४७ वर्षांनी पुन्हा सुरु केली! एका अर्थी भास्करपंतांचे अधुरे कार्य बंगालच्या नागरिकांनी पूर्तीस नेले!!

दैनहाट येथील भग्नावस्थेतील दुर्गा मंदिर. भास्करपंतांनी १७४२ मध्ये मांडलेली अधुरी दुर्गापूजा स्थानिकांनी १९८९ पासून पुन्हा सुरु केली!

तलवारीच्या जोरावर मराठ्यांची भीमथंडीची घोडी चेनाब-सिंधू, गंगा-यमुना, कावेरीचे पाणी प्यायली. आज जो भारताचा नकाशा आपण पाहतो तो एकसंध राहण्यामागचे श्रेय निर्विवादपणे मराठ्यांचेच आहे! नुसतेच  मुलुख काबीज करून खंडण्या लावणे नाही तर शहरे सावरणे, नवीन शहरे वसवणे, तिथली मंदिर, हिंदू चालीरीती यांना पुनरुज्जीवित करणे हा देखील एक पराक्रम आहेच की! नुसतेच पुनरुज्जीवन नाही तर पूजा-उत्सव हे साजरे करण्यास जनतेस अभय लाभले! जगन्नाथ पुरी येथील पूजा पुन्हा सुरु करणे, देणग्या देणे हे सारे सारे आपल्याच पूर्वजांनी केले! समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे थोरल्या छत्रपतींच्या या पोरांनी खरोखर देव मस्तकी धरला , अवघा हल्लकल्लोळ केला आणि धर्मरक्षणकारणे रिपुचा मुलख बुडवून आपला अंमल वाढवला! ज्ञात – अज्ञात मराठा वीरांचा हा ही एक आगळा-वेगळा पराक्रम आपल्याला कळावा म्हणून हा लेखनप्रपंच!

बहुत काय लिहिणे? कुसुमाग्रजांच्या दोन ओळी लिहून थांबतो,

पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !

स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !

श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !

मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?

रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!

प्रांजल अपूर्व वाघ
१४ फेब्रुवारी २०२३

संदर्भ :

6 comments

Ashok k. Potdar kalyan west February 15, 2023 - 3:49 PM

खूप सुंदर वाघ साहेब मी 1990 ला सूर्य मंदिर पाहिलं आहे आपल्या मराठा योद्ध्याना सलाम

Reply
Pranjal Wagh February 15, 2023 - 5:17 PM

धन्यवाद पोतदार साहेब!! मी आपला शतशः आभारी आहे! माझं अजून पाहून नाही झालं! या वर्षी पाहायचे आहे!!

Reply
बाजी वझे,अकोला April 15, 2023 - 11:00 PM

श्री. प्रांजल जी,आपणाला खूप खूप धन्यवाद,कोणार्क मंदिर जसं मातीच्या खाली झाकलं गेलं होत तसाच त्याच्या जीर्णोद्धाराच्ा सत्य कहाणी झाकली गेली होतीएका भाषणातून क्लु मुळे तुम्ही शोध घेऊन मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्वान समोर आणला हे फार मोठे कार्य आपण केले. हे कार्य आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरावे. पुनश्च एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.बाजी वझे अकोला

Reply
Pranjal Wagh April 23, 2023 - 11:42 AM

नमस्कार!!
सर्वप्रथम आपली कमेंट स्पॅम फोल्डर मध्ये होती त्यामुळे उत्तर देण्यास विलंब झाला! त्याबद्दल क्षमस्व!
आपल्या कमेंटसाठी मनपूर्वक आभार! मी फार काही केले नाही ओ! थोडं फार शोधून फक्त लिहिलंय!आपल्या सारख्या लोकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हे घडत असत! त्यामुळे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!!

Reply
Jyoti Dasake June 23, 2023 - 11:08 PM

नमस्कार प्रांजल जी,

आपले काही ब्लॉग्ज वाचले आहेत. तुम्ही फार ओघवतं आणि सोप्या भाषेत लिहिता. हा लेख वाचून इतिहासाची माहिती मिळाली. त्यासाठी खूप खूप आभार. वाचताना दिसून येतं तुम्ही याबद्दल किती अभ्यास केला आहे ते. तुमचं लेखन असंच सुरू राहू देत.

Reply
Pranjal Wagh June 25, 2023 - 12:53 AM

मनःपूर्वक आभार ज्योती जी!!
तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाने आमचे ब्लॉग्ज वाचलेत हे माझे परमभाग्य समजतो मी! तुमच्याच ‘आशीर्वादाने’ आणि ‘मार्गदर्शनाने’ माझे ब्लॉग वाचनीय झाले आहेत हे आपण जाणताच! तुमची आमच्यावरील छत्रछाया अशीच राहू देत!!

Reply

Leave a Comment

You may also like