वागीनगेरा – औरंगजेबाची शेवटची लढाई!

बेडर नायक आणि मुघलांच्या रोमांचक संघर्षाची कहाणी!

by Pranjal Wagh
136 views
वागीनगेरा किल्ल्यातील मंडप

२०१७ सालच्या मार्च महिन्यात कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसमधून आम्ही एका छोट्याशा खेड्यात उतरलो. घड्याळाचे काटे तीनच्या पुढे सरकू लागताच दुपारची उन्हं थोडी नरम पडू लागली. गावाबाहेरील चहाच्या टपरीजवळील चावडीवर पाठ्पिश्व्या उतरवल्या आणि गावामागे असलेल्या तटबंदीयुक्त डोंगराकडे गेली – वागीनगेरा! सुरपूर संस्थानाची एकेकाळची राजधानी! मराठ्यांच्या इतिहासात या गावाचा वाकीनखेडा असाही उल्लेख आला आहे!

खरंतर आम्ही जेव्हा त्या गावात पोहोचलो, तेव्हा आमचे लक्ष्य होते फक्त इथला किल्ला पाहणे! पण हिंदुस्थानच्या इतिहासात हे गाव एका फार मोठ्या घटनेचे साक्षीदार आहे याची आम्हाला सुतराम कल्पना नव्हती! सन १७०५ मध्ये बेडर नायक संस्थानाचा राजा पितांबर बहारी पिड नायक आणि मुघल यांच्यामध्ये इथे तुंबळ युद्ध झाले! आणि या युद्धात मुघलांच्या बाजूने रणांगणात प्रत्यक्ष उतरला होता मुघलांचा आलमगीर – औरंगजेब! इतकंच नव्हे तर ही लढाई औरंगजेबाची शेवटची लढाई ठरली!

पण ही सगळी माहिती आम्हाला फार नंतर कळली. त्या दिवशी मात्र आम्ही गावात शिरताच किल्ल्याच्या वाटेवर चालू लागलो! पायऱ्या चढता चढता असे लक्षात आले की उजवीकडे एक सरोवर आहे आणि त्या सरोवरापलीकडे एका छोट्या टेकडीवर आणखी एक किल्ला उभा आहे! या छोट्या किल्ल्याचे नाव आहे “होसकिल्ला” म्हणजे “नवा किल्ला” आणि वागीनगेऱ्याच्या मुख्य किल्ल्याचे नाव “पदुकोट”. पदुकोट किल्ल्याच्या पायऱ्या काटकोनात वळल्या आणि आम्ही महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश केला.

विजयनगर साम्राज्यातर्फे लढणारे बेडर नायक, हे पुढे आदिलशाहीचे मांडलिक झाले. भीमा-कृष्णा नद्यांच्या दोआबातील प्रदेश जहागीर म्हणून आदिलशहाने त्यांना दिली. पहिल्या पिड नायक राजाने करशीहळ्ळी येथील डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याला नाव दिले वागीनगेरा – म्हणजे ब्रह्माचा डोंगर! इथून पुढे १७०५ पर्यंत वागीनगेरा किल्ला सुरपूर संस्थानाची राजधानी राहिला!

वागीनगेरा येथील पदुकोट किल्ल्याचा नकाशा
वागीनगेरा येथील पदुकोट किल्ल्याचा नकाशा

किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक सुंदर सभामंडप आमच्या नजरेस पडला. तिथून थोडं पुढे गेल्यावर एक नैसर्गिक दगडी “बुरुज” समोर उभा ठाकतो! या बुरुजावर तटबंदीचे अवशेष आहेत आणि पायथ्याला छोट्या भुयारात वेणुगोपाल मंदिर! थोडं आणखी पुढे चालत आलो आणि नजरेस पडलं ते एक अर्धवट बांधलेलं मंदिर! सुरुवातीला आम्हाला वाटलं की या मंदिराचं बांधकाम अपुरं राहिलं असावं पण श्री. एस. के. आरुणी यांच्या सुरपूर संस्थानावरील शोधनिबंधात हे मंदिर वागीनगेरा जिंकून घेतल्यावर औरंगजेबाच्या सैन्याने उद्ध्वस्त केले असा उल्लेख आहे.

किल्ल्याच्या आतील विधी मंडप (?) आणि मागच्या भिंतीवर असलेल्या जाळीदार चर्या!
किल्ल्याच्या आतील विधी मंडप (?) आणि मागच्या भिंतीवर असलेल्या जाळीदार चर्या!

किल्ल्याच्या सलग ग्रानाईटच्या भिंती शत्रूच्या आक्रमक सैन्यापुढे छातीचा कोट करून आजही उभ्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजवीकडे पायऱ्या असलेली एक मोठी बारव आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात ही बारव आणि गावाकडच्या खालच्या किल्ल्यात दुसरी एक मोठी विहिर आहे. किल्ल्यातील हे दोन मोठे पाण्याचे स्रोत! इथून तटबंदी वरुन आम्ही पुढे चालत गेलो आणि वरच्या किल्ल्याला खालच्या किल्ल्याशी जोडणारा आणखी एक मोठा दरवाजा लागतो! या दरवाज्यावर एक फारसी शिलालेख आहे. १७०५ मध्ये किल्ला जिंकून घेतल्यावर औरंगजेबाने हा शिलालेख इथे कोरून ठेवलाय!

औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं वेणुगोपालस्वामी मंदिर आणि मागे होसकिल्ला
औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं वेणुगोपालस्वामी मंदिर आणि मागे होसकिल्ला

१६८६ मध्ये आदिलशाही खालसा केल्यावर, सुरपूर संस्थानाचे राजे असलेल्या नायकांवर वाईट दिवस आले. त्यांचं छोटेखानी संस्थान मुघल सरकारात जमा करावे लागले आणि एक साधा पंचहजारी मनसबदार म्हणून रहावे लागले. या असंतोषाचा स्फोट १६८८ मध्ये पम नायकाच्या मृत्युनंतर झाला. त्याचा पुतण्या पिड नायक पेटून उठला, पारतंत्र्याच्या शृंखला झुगारून देऊन त्याने आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. हातातून गेलेले किल्ले मुघलांकडून हिसकावून घेतले आणि वागीनगेरा किल्ल्यावर नायकांची राजधानी पुन्हा वसवली. हे सगळं झाल्यावर, १७०५ साली खुद्द औरंगजेब सुरपूर संस्थानावर कोसळला. जवळच असलेला तलवारगेरा गावातील मातीचा कोट नायकांचा तिखट प्रतिकार मोडून काढत जिंकला. या हल्ल्यात झुल्फिकारखान आघाडीवर होता. रायगड फितुरी करून जिंकून घेणारा हाच तो! पाळेगार नायकांनी इतका कडवा प्रतिहल्ला चढवला की त्यात झुल्फिकारखान कसाबसा वाचला. पण तलवारगेरा गाव पडले!

भवानीदास यांनी काढलेले वागीनगेऱ्याच्या लढाईत उतरलेल्या औरंगजेबाचे चित्र
भवानीदास यांनी काढलेले वागीनगेऱ्याच्या लढाईत उतरलेल्या औरंगजेबाचे चित्र

आता औरंगजेबाची वक्रदृष्टी वागीनगेऱ्यावर पडली! ९००० नायकांच्या सैन्यावर ४०००० मुघल सैन्याने हल्ले सुरु केले आणि किल्ल्याला वेढा दिला. छोटेखानी होसकिल्ला जिंकून घेतला आणि मग अंतिम संघर्षाची सुरुवात झाली. ८७ वर्षांचा खासा आलमगीर आपल्या घोड्यावर बसून तोफखान्याजवळ रणांगणावर उभा राहिला. मुघली तोफा किल्ल्यावर आग ओकू लागल्या!एक दंतकथा सांगितली जाते की मुघलांच्या एका हल्ल्यास नायकांनी इतक्या जोरदार विरोध केला की किल्ल्याची भिंत आणि तिथली जमीन मुघलांच्या रक्ताने लाल झाली आणि त्या भागास “लालगढ” म्हटले जाऊ लागले! पण औरंगजेबाने पदुकोटाचा खालचा भाग जिंकून घेतल्यावर चक्रे उलटी फिरू लागली. जवळच असलेल्या मराठ्यांचे सरसेनापती धनाजी जाधव यांनी पिड नायकाला संदेश पाठवला – “मुघलांना किल्ला देऊन टाका आणि आमच्या सैन्यास येऊन मिळा! किल्ला परत घेता येईल!”

पिड नायकाने मराठ्यांचा सल्ला मानला. रातोरात किल्ला रिकामा करून नायक निसटले! सकाळी शरण गेल्यावर मुघलांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर त्यांना किल्ला रिकामा दिसला! फक्त जखमी सैनिक तिथे होते! पण किल्ला हाती आल्याने म्हातारा पातशहा खूष झाला! रिवाजाप्रमाणे किल्ल्याचे नामांतर करून “रहमान बक्ष खेरा” असं नाव ठेवलं! आज ही नायकांचे वंशज सुरपूरमध्ये राहतात. त्यांच्या वाड्यात औरंगजेबाच्या हाताचा ठसा असलेलं पत्र आहे! या लढाईत गाजवलेल्या शौर्यामुळे, ‘असफ जाह १’ नावाच्या एका सरदाराला “चीन किलीच खान” हा खिताब दिला आणि पंचहजारी मनसबदार बनवला. हा “चीन किलीच खान” पुढे जाऊन मराठ्यांच्या बगलेतील काटा झाला – याला आपण “निजाम” म्हणून ओळखतो!

वागीनगेरा किल्ल्यातील दरवाजा ज्यावर औरंगजेबाचा शिलालेख कोरलेला आहे
वागीनगेरा किल्ल्यातील दरवाजा ज्यावर औरंगजेबाचा शिलालेख कोरलेला आहे
वागीनगेरा किल्ल्यातील निसर्गाशी संलग्न बांधकाम
वागीनगेरा किल्ल्यातील निसर्गाशी संलग्न बांधकाम
वागीनगेरा किल्ल्याचा आतील दरवाजा
वागीनगेरा किल्ल्याचा आतील दरवाजा

१७०५ मध्ये हा किल्ला जिंकल्यावर औरंगजेब कृष्णेकाठी देवगाव इथे मुक्कामास गेला. पुढे १७०७ मार्च मध्ये भिंगर येथे त्याचा मृत्यू झाला! औरंगजेब मरण पावल्यावर पिड नायकाने मराठ्यांची रणनीती अवलंबून गपचूप पुन्हा वागीनगेरा किल्ला जिंकून घेतला आणि आलमगीराचा शेवटचा विजय फोल ठरवला! पुढे त्याने सुरपूरला नवीन राजधानी वसवून १८५८ पर्यंत नायकांचे राज्य तिथे राहिले!

वागीनगेरा, सुरपूर आणि तिथे असलेल्या अनेक वास्तूंचे ऐतिहासिक महत्व अनन्यसाधारण आहे! एकदा वेळ काढून नक्की भेट द्या!  

– प्रांजल वाघ
२५ जून २०२४

Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris

(वरील लेख सामना या दैनिकाच्या रविवार पुरवणीत ३० जून २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे)

(संदर्भ : S.K.ARUNI HISTORY AND CULTURE OF SURAPURA SAMSTHANA, NORTH KARNATAKA, A.D. 1650-1858 )  

Leave a Comment

You may also like