सुडी – विस्मृतीत गेलेलं मंदिरांचं गाव

by Pranjal Wagh
493 views

एखादं भीमथडीचं वारू दख्खनी वारा पिऊन बेभान सुटावं तशी आमची KSRTCची लाडकी “सरिगे” बस, गदगच्या तापलेल्या डांबरी सडकेवरून सुसाट निघालेली. मार्चच्या जळणाऱ्या गर्मीत बाहेर सूर्य सारा आसमंत जाळून-भाजून काढत होता. थर्मामीटरचा पारा ४५°C च्या सीमा ओलांडू पाहत होता. पण इतक्या मरणाच्या गर्मीत आम्ही कुठे निघालो होतो नेमके?

२०१९ सालच्या मार्च महिन्यात, नेहमीप्रमाणे कर्नाटकच्या किल्ल्यांनी आणि मंदिरांनी साद घातली तशी आम्ही तिथे धाव घेतली. थेट छत्रपती शिवरायांशी नाळ जोडली गेलेला, स्वराज्यनिष्ठ शूरवीर घोरपड्यांचा भव्य-दिव्य असा गजेंद्रगड आणि त्याखाली दिमाखात उभा असलेला “भुजंग छाया” हा घोरपड्यांचा वाडा ही आमच्यासाठी गदग तालुक्यातील खास आकर्षणं होती. तो पाहून आम्ही पुढे शिवरायांनी बांधलेला श्रीमंतगड, गदग शहरातील मंदिरं आणि जवळच असलेली लककुंडीची मंदिरं पाहणार होतो. पण म्हणतात ना, जे विधिलिखित आहे ते त्याची वेळ आली की होतंच. तसंच अगदी अपघाताने, इंटरनेटवर काही वाचत असताना आमच्या हाती एक खजिनाच लागला! मग योजनेत थोडाबदल करून, उंटाच्या चालीने वाट वाकडी करत आम्ही तो खजिना बघायला निघालोच!गजेंद्रगडवरून रोण या गावी जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या १२ किमीवर सापडलं एक अगदी छोटंसं गाव. दिसायला छोटंच , मोजक्याच लोकवस्तीचं, आधुनिकतेच्या, विकासाच्या स्वप्नांनी झपाटलेल्या आणि खुद्द काळाशी व्यर्थ स्पर्धा करणाऱ्या माणसाने व्यवहारात शून्य उपयोग म्हणून नाकारलेलं पण तरीही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाने समृद्ध आणि आमच्यासारख्या भूतकाळात भटकणाऱ्या भुतांना भुरळ घालणारं अस हे गाव! मंदिरांनी, मूर्तींनी आणि बारवांनी नटलेल्या या गावाचं नाव होतं – सुडी!

सुडी गावात जाणारे रस्ते

काही वेळातच खचाखच भरलेल्या आमच्या KSRTC बसने महामार्ग सोडला आणि उजवीकडे वळण घेत, खडबडीत रस्त्यावर गचके खात सुडीमध्ये प्रवेश झाल्याची जाणीव आम्हाला करून दिली. गावातील असलेल्या छोट्या बस थांब्याकडे जाताना आमची नजर शाळेच्या प्रशस्त पटांगणाकडे गेली. तिथे गावातली पोरं भारताचा अघोषित राष्ट्रीय खेळ – क्रिकेट खेळण्यात व्यस्त होती. पण त्या मुलांच्या खेळापलीकडे आमची नजर गेली आणि क्षणार्धात थकवा, क्षीण कुठल्या कुठे विरून गेला! त्या पटांगणाच्या सीमेवर उभी होती एक भव्य-दिव्य वास्तू. मावळतीकडे झुकू लागलेल्या सोनेरी किरणात न्हाऊन केशरी झालेली, एका उंच दगडी पीठावर उभारली गेलेली आणि तिची दोन उंच शिखरं जणू आकाशाकडे झेपावत होती! पाहताच क्षणी ओळख पटली -प्रवेश करताच सुडी गावच्या मुकुटमण्याचं आम्हाला दर्शन झालं होत. हेच ते “जोडू कलसा गुडी” अर्थात ” जुळ्या शिखरांचं मंदिर”! अधाशासारखे आम्ही ते मंदिर पाहणार इतक्यात काही झाडं मध्ये आली आणि मंदिर नजरे आड झालं. पण आता आमची जिज्ञासा चाळवली गेली होती. बस थांबताच पटापट बॅगा घेऊन खाली उद्या टाकल्या आणि जवळच असलेल्या एका बंदिस्त आवाराकडे धूम ठोकली!

फाटकातून आत जाताच काही वास्तू नजरेस पडल्या. त्यांची स्थापत्यशैली त्यांची प्राचीनता दर्शवत होती. समोरच चार खांब असलेले दोन दगडी मंडप होते आणि त्यांच्या बाजूला एक दगडी चौथरा. एका मंडपात ६ फुटी बसवण्णा मूर्ती विराजमान होती. कर्नाटकात प्रेमाने नंदीला बसवण्णा म्हणतात. म्हणजे हा शिवमंदिराच्या नंदीमंडप होता. या बसवण्णाचे मुख कुणीतरी भग्न केले होते.  त्याच्या बाजूलाच असलेल्या मंडपात एक जवळजवळ ३ फूट उंच असे शिवलिंग होते! समोरच असलेल्या दगडी चौथऱ्यावर सुद्धा एक भलेमोठे शिवलिंग होते. हा चौथराच ३ फूट उंच असल्याने यावर असलेल्या शिवलिंगासोबत त्याची उंची जवळजवळ ६ फूट भरत होती! चकचकीत आणि गुळगुळीत असे हे शिवलिंग – दुपारच्या सूर्यकिरणांनी चमकून उठत होते!

सूर्यकिरणांनी चमकून उठलेले शिवलिंग!
एकाच शिळेतून कोरलेला भव्य गणपती
एकाच शिळेतून कोरलेला भव्य गणपती

तिथून चार पावलं पुढे गेलो तर एक छोटेखानी मंदिर आढळलं आणि त्याबाहेर होत्या दोन अर्धवट भग्न मूर्ती. ते गणेश मंदिर होते पण अगदी साधे आणि त्यावर कोरीव कामाचा अभाव पाहून या मूर्तींबद्दल कुतूहल निर्माण झाले. आम्ही आपापसात तर्क-कुतर्क करू लागलो. मंदिरांचं थोडंफार ज्ञान असल्याने तिथे पडलेल्या त्या मूर्ती या द्वारपालांच्या होत्या हे एव्हाना कळले होते. संपूर्ण दगडी असलेल्या मंदिरात प्रवेश करताच बाहेरची उन्हाची आग एकदम गायब झाली. आतील मनमोहक थंडाव्याने क्षणात अराम दिला. मंदिराच्या आत एकाच दगडापासून घडवलेली ६ फुटी, एकसंध आणि पोटावर नाग बांधलेली लंबोदर मूर्ती होती! संपूर्ण मंदिरच या मूर्तीने भरून गेले होते!

चालुक्य कालीन बावी – नागकुंड

गणपती मंदिरावरूनच काही अंतरावर लागते ती कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असलेली एक “बावी” (बारव). तिचे नाव नागकुंड! छोटीशी, सुबक आणि चालुक्य शैलीतील एखाद्या मंदिरासारखी कोरलेली, भिंतींवर द्राविडी विमानांचे साज लेवुनी दिमाखात उभी असलेली ही बारव. पण इतक्या सुदंर वास्तूला गालबोट लागले होते ते म्हणजे मार्च महिन्यात ही बाव ठणठणीत कोरडी पडली होती! माझं असं वैयक्तिक मत आहे की या बारवा आज आपण पुनरुज्जीवित करू शकलो तर अनेक ठिकाणी असलेली पाण्याची समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते!

या प्रवासानंतर आम्ही जेव्हा सुडीवर अधिक वाचन केले तेव्हा भन्नाट माहिती मिळाली! सुडीमधील मंदिरांचे निर्माते कल्याणी चालुक्य होते! साधारण इ.स. ७५४ मध्ये लयास गेलेल्या बदामी चालुक्यांच्या राजवटीचे इ.स १०व्य शतकाच्या शेवटी पुनरुज्जीवन झाले. राष्ट्रकुटांच्या पराभव करून २०० वर्ष सुप्तावस्थेत असलेले चालुक्य पुन्हा उसळी मारून राज्यकर्ते झाले. तीच राजवट म्हणजे कल्याणी चालुक्य! आजच्या बसवकल्याण येथे राजधानी असलेलं हे साम्राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बहुतांश महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवून होते! इ.स. ९५७ ते इ.स. ११८९ हा साधारण त्यांचा राज्यकाळ  मानला जातो. आणि सुडी? सुडी गावाला तर त्या काली अनन्यसाधारण महत्व होते! विस्मरणाच्या गर्तेत हरवलेलं आजचे सुडी गाव त्या काळी किसुकाडू-७०/कुसकुडी-७० या प्रांताची राजधानी होती! त्याचे नाव “सुंडी” असे असून अक्कादेवी ही तिथली शासनकर्ती होती. विक्रमादित्य पाचवा, या तृतीय चालुक्य राजाची अक्कादेवी ही बहीण असून ती अत्यंत कुशल आणि लोकप्रिय राज्यकर्ती म्हणून ख्याती पावलेली होती! तोरगरे-६० आणि मसवडी-१४० हे प्रांत देखील तिच्याच देखरेखीखाली होते. इ.स १०६९ मध्ये सुंडीला कुसकुडी प्रांताची राजधानी होण्याचा बहुमान मिळाला व तो किमान इ.स. १०८४, सहाव्या विक्रमादित्याच्या कारकिर्दी पर्यंत अबाधित होता. या प्रांतांच्या नावापुढे असलेली संख्या त्या प्रांताच्या देखरेखीत असलेल्या गावांची आहे उदा कुसकुडी-७० या प्रांताच्या अंतर्गत ७० गावं होती आणि या प्रांताचे मुख्य शहर म्हणून  सुडी/सुंडी गावाला “राजधानी सुंडी” संबोधले जायचे.

कल्याणी चालुक्यांचं साम्राज्य (इ.स. ११२१)

कल्याणी चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य हा सगळ्यात यशस्वी चालुक्य राजा मानला जातो. उत्तरेस नर्मदा, दक्षिणेस कावेरी, पश्चिमेस महाराष्ट्र-कर्नाटक सागर किनारा आणि पूर्वेस पुद्दुचेरी जवळील वेंगींपर्यंत इतका मोठा विस्तार याच राजाच्या कारकिर्दीत झाला. याच कारणासाठी सहाव्या विक्रमादित्याच्या कारकीर्द “चालुक्य विक्रम पर्व” म्हणून गौरविली जाते! याच चालुक्य विक्रम पर्वात सुडी हे राजधानीचं गाव एल टाकसाळ म्हणून जवळच असलेल्या लककुंडीसोबत नावलौकिकाला आले. इथल्या सोनारांना नाणी पडण्याचा परवाना मिळाला होता. “उत्तवोज” हा तिथल्या राजटाकसाळीचा अधिपती होता. इथे पाडण्यात आलेल्या सर्वात जड नाण्यांचे वजन साधारण ६.२२ ग्रॅम इतके होते याचे उल्लेख धारवाड गॅझेटियरमध्ये मिळतात.   

इ.स. ११८९ मध्ये कल्याणी चालुक्यांचा पाडाव झाल्यावर, सुडीचा ताबा कालचुरींकडे गेला. पुढे होयसळ, विजयनगर असे सत्तांतर देखील झालं. पण काही निवडक कालचुरी शिलालेख सोडले तर होयसळ अथवा विजयनगरच्या एकाही  शिलालेखात सुडीचा साधा उल्लेख देखील नाही. इतकी समृद्ध नागरी अचानक विस्मृतीच्या गर्तेत कशी गेली? याचे उत्तर सध्यातरी काळंच सांगू शकेल!

जोडू कलसा गुडी (जुळ्या शिखरांचं मंदिर)

नागकुंड पाहून झाल्यावर आमची नजर वळली ती “जोडू कलसा गुडी” कडे. शाळेच्या पटांगणात साधारण ४ फुटी जगतीवर हे मंदिर उभे आहे. वेसर पद्धतीने या मंदिराचे बांधकाम झाले असून याची दोन्ही शिखरं आणि कळस शाबूत आहेत. नावाप्रमाणेच हे मंदिर “द्विगर्भिय” आहे म्हणजे याला दोन गर्भगृह अथवा गाभारे आहेत – एक पूर्वाभिमुख तर दुसरा पश्चिमाभिमुख! मंदिराच्या आत पूर्वेकडे तोंड करून एक भलामोठा नंदी बसलेला आढळतो. याचाच अर्थ पूर्वेकडील गाभारा हा मंदिराचा मुख्य गाभारा असणार. या गाभाऱ्यात मोठे दगडी शिवलिंग आढळते ज्याच्यावर एक मकर तोरण कोरलेले आहे. मकर तोरण हेच दर्शवते की मंदिराचे काम  कल्याणी चालुक्यांनी केले होते. मंदिरात जुन्या कन्नड लिपीत दोन शिलालेख आहेत ज्यांचे वाचन झाले असून ते असे सांगतात की सोमेश्वर नामक चालुक्य सम्राटाच्या राजवटीत (इ.स. १०४२-१०६८) हे मंदिर महासामंताधिपती नागदेव नावाच्या त्याच्या मंत्र्याने बांधले. प्राध्यापक ऍडम हार्डी यांचे तर असे मत आहे की नागदेवाने बांधले म्हणून या मंदिराचे नाव “नागेश्वर” असे आहे!  

जोडू कलसा गुडीचा प्लॅन
जुन्या कन्नड भाषेतील शिलालेख
मुख्य गर्भगृहातील मकरतोरण

जोडू कलसा गुडी हे मंदिर पाहून झाल्यावर आमचा मोर्चा वळला गावाच्या मुख्य चौकात उभ्या असलेल्या “मल्लिकार्जुन त्रिंगर्भिय मंदिराकडे”. या “त्रिकुट” मंदिरात दक्षिणेकडील गाभाऱ्यात अनंतशयनी विष्णूची अप्रतिम मूर्ती आहे. शेहसनगावर झोपलेल्या विष्णूचे अष्ट-दिक्पाल, प्रभावळीत विष्णूचे दशावतार हे सारे अत्यंत कुशलतेने अनामिक कारागिरांनी कोरून काढले आहे. या समोरील गाभाऱ्यात उमा-महेशाची उभी मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगासमोर एक छोटा नंदी आहे. या मुख्य गर्भगृहाच्या समोरील खांबांवर ब्रह्म-विष्णू-महेश यांची मूर्ती असलेलं एक मकर तोरण कोरलेले आहे. तसेच इ.स. १०५४ मध्ये हे मंदिर सोमेश्वर राजाच्या कारकिर्दीत बांधले गेल्याचे एका शिलालेखावर स्पष्टपणे नोंदले गेले आहे. इथे जमलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी अक्केश्वर देवाला जमीन अर्पण केली. त्या अधिकाऱ्यांची नवे आणि पदे या शिलालेखात लिहून ठेवली आहेत. अक्केश्वर हे मल्लिकार्जुन मंदिरातील शिवलिंगाचे नाव असावे.

काळाच्या ओघात या शिलालेखाचे थोडी हानी झाली आहे पण सुदैवाने कर्नाटकातील सर्व शिलालेखांचे वाचन आणि कागदोपत्री नोंद झालेली आहे!

उमा महेश मूर्ती
अनंतशयनी विष्णू
मल्लिकार्जुन मंदिरातील मुख्य गर्भगृहावरील मकरतोरण

सुडीमधील मुख्य मंदिरं पाहून होईपर्यंत सूर्य मावळतीकडे निघाला होता. नाईलाजाने निघावे लागणार होते. गदगच्या गाडीची चौकशी करून, आमची पावले बस थांब्याकडे वळली. दुपारी आग ओकणारा सूर्य आता उबदार झाला होता, वाऱ्याची एखादी मांडशी झुळूक धूळ उडवून जात होती. अनामिक हातांनी, हजारो वर्षांपूर्वी अमूर्त दगडातून मूर्ती घडवून त्यांना सौंदर्य आणि दैवी रूप असे काही प्रदान केले की आजही निसर्गाच्या तत्वांचा मारा सहन त्या वस्तूंची जादू कायम आहे! इतक्यात गुरगुरत, धूळ उडवीत बस थांब्यात प्रवेश करती झाली. लगबगीने आम्ही त्यात चढून स्थानापन्न झालो. “राजधानी सुडी”ची ही शेवटची भेट नाही, इथे परत येणे होणार असं आपोआप वाटून गेलं. बसने वळण घेत महामार्ग पकडला तशी नजर मागे वळली. शाळेचे पटांगण आता रिकामे होते, पोरे केव्हाच पांगली होती, मावळतीच्या किरणात जोडू कलसा गुडीचं मंदिर सोनेरी रंगाने झळाळून घेणे होते! सम्राट आणि साम्राज्ये उदयास आणि अन लयास गेली, विध्वंसक परधर्मीय आक्रमणे आली आणि गेली पण आजही सुडीमधील स्थापत्य टिकून आहे! जणू काळाप्रमाणेच या वास्तूदेखील शाश्वत आणि चिरंतन आहेत!

– Pranjal Wagh ©

15 March 2021

www.rational-mind.com

Instagram: @sonofsahyadris

References:

 1. Inscription Readings Taken from South Indian Inscriptions Vol XI/Epigraphica Indica Vol XV by Thomas F W, Archaeological Survey of India (1921)
  1. Inscription No 55 – Stone Slab inside Jodu Kalasa Gudi
  1. Inscription No 95 – Stone Slab inside Jodu Kalasa Gudi
  1. Inscription No 91 – On a pillar in front of Mallikarjuna Temple
  1. Inscription No 93 – On a pillar in front of Mallikarjuna Temple
 2. Sharma Shilpa, Deshpande Shirish, The Evolution of the Temple Plan in Karnataka with respect to Contemporaneous Religious and Political Factors, IOSR Journal of Humanities and Social Sciences (IOSR-JHSS) Volume 22, Issue 7, Ver. 1 (July. 2017) p.47 Fig.7 Plan View of Jodu Kalasa Gudi
 3. Vardia Shweta, Building Science of Indian Temple Architecture, Thesis 2018, Universidade do Minho p.85 Plan View of Mallikarjuna Temple
 4. Saxena Saurabh, Sudi -Twin Temples of Karnataka (Source: https://puratattva.in/)

10 comments

Ajay Phatak November 17, 2021 - 6:24 PM

Vnice information given by u, thanks

Reply
Pranjal Wagh November 18, 2021 - 9:59 PM

Thank you so much!! Do keep coming back for more!!

Reply
Vinod Patil November 18, 2021 - 8:26 PM

Impressed with detailed information in this blog / write-up.

Reply
Pranjal Wagh November 18, 2021 - 9:58 PM

Thank you so much for the appreciation!!

Reply
Sagar November 23, 2021 - 2:51 PM

Wonderful!!👍

Reply
Pranjal Wagh November 23, 2021 - 2:53 PM

Thank you so much!!

Reply
s.d..Sane December 27, 2021 - 4:46 PM

Very iinformative study. Such places are not known. Govt.should take efforts to protect these monuments.

Reply
Pranjal Wagh January 12, 2022 - 10:45 AM

Thank you so much Sane Sir for this comment! Fortunately, at least all the “Shilalekhs” or Stone inscriptions in Karnataka are documented giving us a history of these places. Moreover, the Archaelogocial Dept of Karnataka is active in protecting and restoring such places although the pace is very slow!

Reply
Sumit Jagtap September 25, 2023 - 9:20 PM

Information and Photos 👌🏻❤️

Reply
Pranjal Wagh October 8, 2023 - 12:43 PM

Thank you so much!!

Reply

Leave a Comment

You may also like