चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग १)

येता जावळी …..

by Pranjal Wagh
150 views
गोगावले वाडीतून दिसणारा मंगळगड उर्फ कांगोरी! 

येता जावळी …..

(भाग १)

नुकताच घेतलेला नवा कोरा गो-प्रो कॅमेरा वापरण्याची उत्सुकता, जावळीच्या घनदाट अरण्याने फार पूर्वीपासून घातलेली मोहिनी आणि पुण्यातले ते तिघे ट्रेकर – मला काही स्वस्थ बसू देईनात. बरं, विश्वासू सूत्रांनी आणखी एक खबर दिली होती. बदलापूरचा आमचा अनुप उर्फ “बोक्या” काही दिवसांपूर्वीच जावळीला जाऊन चंद्रगड-मंगळगड पाहून आला होता. हे म्हणजे जरा अतीच झाले! हा मुंबईचा वाघ इथे लोकलमध्ये धक्के खातोय अन तिथे तो बोका फिरतोय जावळीच्या जंगलात! अरे  ढाण्या   वाघाने (म्हणजे मी) बिनविरोध सत्ता गाजवावी असं ते जावळीचं रान – जिथे उन्हदेखील जमिनीवर उतरायला कचरतात- अशा ह्या रानात एक  य:कश्चित बोका फेर-फटका मारून येतो काय अन आम्ही नुसते हापिसात हेलपाटे मारत राहतो काय! छे छे!! सहनशक्ती पलीकडचे होते हे सगळे काही! आता शक्तीप्रदर्शन केलेच पाहिजे! 😉

म्हणून मग ठरले एकदाचे! या वेळी जावळी गाजवली पाहिजेच!

माणसांची जमवा-जमाव सुरु झाली. अखेरीस मी धरून तीन लोकं ठरली. खराडीचे पंकज झरेकर , मु.पो.वारजे येथील अमित कुलकर्णी – हे दोन नुकतेच झालेले “बाबा”लोग- आणि दस्तुरखुद्द आंबेगाव बुद्रुकचे अजय काकडे! १७ -१८ नोव्हेंबर २०१३ दरम्यान हि मोहीम पार पाडण्यात येणार होती. १६ तारखेला रात्री मुंबईचा मुक्काम पुण्याला हलवून सकाळी तांबडं फुटायच्या आत निघायचे होते.

१६ नोव्हेंबरच्या सायंकाळी एका सुंदर “हिरकणी”ची सोबत मला शिवाजीनगर पर्यंत लाभली. तिथे उतरल्यावर तिला “बाय” म्हटले तर ती माझ्या तोंडावर धुरळा उडवत भुर्रकन निघून गेली.आधीच ठरल्याप्रमाणे आमचा मित्र महेश उर्फ खंड्या मला काकडे-वाड्यावर घेऊन जाणार होता.तिथे माझ्या स्वागतासाठी मोठी मेजवानी युवराज काकडेंनी तयार ठेवली होती.

पण ह्या खंड्याने अशी काही खेळी खेळली की मी काही त्या दिवशी अजयच्या घरी पोहोचू शकलो नाही. रात्री उशीर झाल्यामुळे मुक्काम अमितकडे करावा लागला आणि बेत असा तडकाफडकी बदलल्यामुळे काकडेने वाहिलेल्या लाखोलीचे Dessert भरल्या पोटी खावे लागले! नशिबाने पचनशक्ती तगडी असल्यामुळे मला काही अपचन झाले नाही! 😉

सकाळी ४ वाजता कर्कश गजराने आमची झोपमोड केली. सगळे आवरून तयार झालो तशी दारावरची बेल वाजली आणि मिशीतल्या मिशीत हसत पंक्याचे आगमन झाले. आम्ही स्वतःला आणि आमच्या सामानाला गाडीत कोंबले अन नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत आमची गाडी निघाली आंबेगाव कडे!

Click by GoPro @ 0500 Hrs @ Amit Bloomfield Pune
उगीच आपली पहाटेची थोडीशी फोटोग्राफी !

काकडे-वाड्याच्या महाद्वारापाशी गाडी थांबवून २ मिनिटं होतात न होतात, तोच अजयचं  आगमन झालं! 😛 माणसं आणि सामान भरलेली आमची गाडी हायवेवर जेव्हा आली तेव्हा मागे पसरलेलं पुणे शहर गुलाबी थंडीत गरम दुलई घेऊन गाढ झोपलं होतं अन आम्ही ४ वेडे जीव थंडीत कुडकुडत एका अनाम ओढीने जावळीकडे झेपावत होतो!

बाहेर थंडी तर इतकी होती की गाडीत हवा खेळती ठेवायला मिलीमीटरभर काच खाली केली की दातावर दात वाजवीत मागून पंक्या ओरडायचा, “ए वाघ्या! काच वर कर!” अंगात आता थोडी उष्णता निर्माण करायला काही खाणे जरुरी होते म्हणून एका रस्त्यालगतच्या हॉटेला समोर गाडी थांबवली अन तिथे कालच्या इडल्या आणि थंड चटणी कशीबशी नरड्याखाली उतरवली! पण जसा वाफाळता गोड चहा पोटात गेला तशी थोडी हुशारी आली! आता थंडी आमच्यापासून थोडी लांबच राहू लागली! लगेच उबदार गाडीत आम्ही बसलो  अन निघालो सुसाट वरंधा घाटाच्या रोखाने!

The Sun Rises from behind Rohida Fort!जणू सोनं उधळत  सूर्यराज रथावर आरूढ होऊन रोहिड्याच्या मागून येत होते! 

जेव्हा आमची गाडी भोरच्या रस्त्याला लागली तेव्हा नुकतंच तांबडं फुटू लागलं होतं. क्षितिजावर रोहिडा किल्ला त्याच्या आकारामुळे सहज ओळखता येत होता. त्यामागून जणू सोनं उधळत  सूर्यराज रथावर आरूढ होऊन दिवसाची सुरुवात करीत येत होते.  वाटलं, गाडी थांबवावी अन ते दृश्य पाहत तिथेच बसावं! पण अम्या गाडी थांबवण्याच्या मनस्थितीत दिसला नाही म्हणून मग तो विचार सोडून दिला! एका पेक्षा एक अप्रतीम नजराणे आज सह्याद्री आमच्यासमोर पेश करीत होता. सूर्याच्या उगवत्या उन्हात न्हाऊन निघालेले सह्यपर्वत जणू तालमीतून बाहेर पडलेल्या, तेलाने चमकणाऱ्या रांगड्या मल्लासारखे दिसत होते! बलदंड!! मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या दृश्याने मी भारावून गेलो. शतकानुशतके उभ्या असलेल्या ह्या महाकाय पर्वतांपुढे माणूस किती लहान, किती नगण्य ह्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती!

20131116_072501
नीरा-देवघर जलाशय

20131116_072607 पहाटेच्या उन्हात न्हालेला नीरा-देवघर जलाशय!

हिरडस मावळ पार करून नीरा-देवघर जलाशय मागे टाकत आम्ही कावळ्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोटातील कावळ्यांना भाजी खायला घातली, चहा पाजला अन त्यांना गप्प केलं. समोर पसरलेल्या दरीत शिवथरघळ, चंद्रराव मोरेंचा वाडा ह्यांची ठिकाणं आमच्या ग्रुपचा  इतिहासकार अजय सांगत होते आणि मी नंदी-बैलासारखी मान डोलवत होतो! इतक्यात अम्याने मागून हाक मारून निघण्याची इशारत दिली अन आम्ही पुन्हा निघालो. वरंधाची नागमोडी वाट उतरून आम्ही कोकणात उतरलो आणि  ढालकाठीवरून उजवीकडे वळून मंगळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या वाडी पाशी येऊन पोहोचलो – गोगावले वाडी! २०-२५ घरांची पण स्वतःची शाळा असलेली ही छोटीशी वाडी मंगळगडाच्या सावलीत, मुख्य रस्त्यापासून बरीच आत वसलेली आहे.  वाडीच्या वेशीवर कांगोरीनाथाचे छोटेसे मंदिर आहे. मंगळगडाचे दुसरे नाव  कांगोरीगड – ही कांगोरीनाथाची देणगी!

Kangori (Mangalgad)गोगावले वाडीतून दिसणारा मंगळगड उर्फ कांगोरी! 

“दादा, गडावर जायला वाट कोणती?” , असा एक सवाल आम्ही एका गावकरीदादांना केला.

“गडावर? गाडी जाते की!”

गाडी! आम्ही तीनताड उडालो! जावळीतल्या किल्ल्यावर थेट गाडी? खात्री करून घ्यावी म्हणून परत विचारले, “वर पर्यंत जाते का गाडी?”

“ वर पर्यंत न्हाई, इथे मध्यावर जाते! कच्चा रस्ता हाये! मग तिथून पुढे चालत वर जायाचं!”, आणि मग थोडं थांबून विचारलं, “गाडी कुठली हाये?”

“सँट्रो”

ग्लासभर कडू लिंबाचा रस प्यायल्यासारखा त्याचा चेहरा पडला, “सँट्रो?”

त्याच्या ह्या प्रश्नावरूनच आम्ही ताडले की आमची गाडी काही वर जाणार नाही. तरीपण विचारलं, “हो. ती जाईल का वरती?”

“अ….न्हाई जाणार!  पावसात झुडपं खूप वाढलीत! तुम्ही असं करा गाडी हितच लावा सावलीत अन जाऊन या!”

अम्याने गाडी सावलीत लावली, आवश्यक ते खाद्यपदार्थ, भरपूर पाणी पिट्टूमध्ये भरून पाठीवर मारल्या अन मग आम्ही निघालो. गुडघाभर गवतातून वाट काढीत पाच मिनिटात कच्च्या “गाडी” रस्त्याला आम्ही लागलो तेव्हा उन्हं बरीच वर आली होती.

“मुख्य रस्ता चढून गेल्यावर उजवीकडे एका मोठ्या झाडापाशी शॉर्ट-कट लागतो तो घे. लवकर पोहोचशील”, असे पुण्यातील ओंकार ओक ने परत परत बजावून सांगितले होते. त्याचे बोल लक्षात ठेवले अन लगेचच ते मोठे झाड लागले. त्याच्या सावलीत पुण्यातील मंडळी पसरली. कोकणातील दमट हवेने चांगलच घामाने भिजवलं होतं  ह्यांना. मी मुंबईचा  असल्यामुळे रोज १-२ लिटर घाम सहज गाळतो! मला दमट-घामट वातावरणाची सवय असल्यामुळे फारसा फरक पडला नाही! 😉

ह्या रस्त्याने थोड्याच वेळात आम्ही माची वजा पठारावर पोहोचलो. इथून पुढील रस्ता जंगलातून आणि सावलीचा होता. त्यामुळे गडाच्या दरवाज्याचा उभा चढ गाठायला फारसा वेळ लागला नाही. थोडासा दमवणारा हा चढ चढून मी गडात प्रवेश करता झालो. गवत कंबरेपर्यंत वाढलेलं होतो. कैक महिन्यात गडाला भेट देणारे पहिले आम्हीच असू! मागून पंक्या येत होता. त्याला मी एक टोमणा मारला,

“अरे पंक्या काय हे? किती वेळ लागतोय! पुणेकर दामले वाटतं!”

तापलेल्या तेलावर टोमणा नामक पाणी मी शिंपडले होते. शांतपणे टोमणे ऐकून घेतील तर ते पुणेकर कसले? आता जाज्वल्य पुणेकरी अभिमान बोलू लागणार होता. धापा टाकणारा पंक्या त्याही अवस्थेत टोकदार ट्रेकिंग पोल उंचावत बोलला,

“वाघ्या सांभाळून, इथे ३-३ पुणेकर आहेत. मेजॉरिटी आमची आहे!”

मंगळगडाच्या दरवाज्यात एखाद्या फिल्मी विल्लन सारखा मी हा हा हा करून हसलो!

“बेटा, झुण्ड में तो सुवर आते हैं! शेर….अकेला आता हैं!”

असं रजनीकांतसारखं म्हणावसं मला खूप वाटत होता पण मी म्हटलं नाही. ह्याचं कारण त्याच्या हातातल्या ट्रेकिंग पोलचं अणकुचीदार टोक होते असे तुम्हाला वाटेल! पण तसे बिलकुल नव्हते! मुळातच मी शांतीप्रिय असल्यामुळे  मला उगीच भांडणं करायला आवडत नाहीत! त्यामुळे मी पुढे काही बोललो नाही!  😉

कांगोरीगडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डोळ्यात भरते ती गडाची माची अन त्यावर उभे असलेले कांगोरीनाथाचे मंदिर. आपोआपच आमची पावलं मंदिराकडे वळली. गडाखाली गावात सुद्धा कांगोरीनाथाचे मंदिर आहे. असे बऱ्याच ठिकाणी आढळते. गावकऱ्यांच ह्या मागचे लॉजिक  असे असते की लोकांना वर जाण कठीण झालं म्हणून देव खाली आला! (म्हणजे खाली आणला!) असो! सुकलेल्या गवताने पिवळ्या झालेल्या माचीवरून वाट काढीत पुढे जाताना देवळा आधी थोडी हिरवळ लागते. हीच गडावरची सध्याची पिण्याच्या पाण्याची टाकी. त्यातील एक टाकं सुकून गेलं होतं. दुसरं मात्र आम्हाला नंतर खूप उपयोगी पडलं!

Bhairavnath (Kangorinath) Temple on the machi कांगोरी गडाची माची अन त्यावर उभे असलेले कांगोरीनाथाचे मंदिर

पायऱ्या चढून आम्ही मंदिरात प्रवेश करते झालो. गाभाऱ्यातली कांगोरीनाथाची दगडी मूर्ती अतिशय सुंदर आहे. त्यांना पहिले नमस्कार केला अन मग मंदिराच्या छप्पर नसलेल्या छोट्याशा सभामंडपात सावली शोधून आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतली. इथे समस्त “खजूर” लोकांनी खजूर खाल्ले, पाणी प्यायले. काही क्षणांची विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा निघालो. मंदिरामागे आलो आणि दोन क्षण थबकलो!

20131116_122654रौद्र, रांगडं रूप धारण करून सह्याद्री उभा ठाकला होता!

रौद्र, रांगडं रूप धारण करून सह्याद्री उभा ठाकला होता! जावळीच्या निबिड अरण्यातून उभे राहून आकाशाकडे झेपावणारे डोंगर आमची नजर खिळवून ठेवीत होते. दूरवर दिसणारे  रायरेश्वर-नाखिंद, दुर्गाडी दिमाखात उभे होते! दक्षिणेला महादेव-मुऱ्हाची रांग आणि त्या पल्याड उभा असलेला चंद्रगड – आमचं दुसऱ्या दिवशीचं ध्येय – सारं सारं आम्ही नुसते नजरेत साठवत होतो! हे अफाट सौंदर्य डोळ्यांनी पिऊन आम्ही बालेकिल्ल्याकडे मोर्चा वळवला.  बालेकिल्ल्यावर भयंकर गवत माजले होते. पुरुष-पुरुष उंचीच्या कारवी अन झाडी मधून वाट काढीत आम्ही निघालो. पण वाड्यांचे  थोडेसे  शिल्लक अवशेष पण वाढलेल्या रानाने गिळंकृत केले होते. मग आम्ही तसेच माघारी फिरलो.

गडाखाली उतरलो तेव्हा गर्मी बरीच वाढली होती, घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. शाळेमागे असलेल्या बोअर-वेलवर हात-पाय धुवायला म्हणून जाणार इतक्यात शाळेच्या भिंतीला टेकून, रचून ठेवलेल्या काही मूर्ती आढळल्या. एके काळी अतिशय देखण्या असलेल्या ह्या मूर्ती आज ह्या अवस्थेत पाहून वाईट वाटले. गडावर सुद्धा मंदिराजवळ काही मूर्ती अशाच पडल्या आहेत. ना  त्यांना कोण वाली आहे, ना त्यांची कोण निगा राखतो. संस्कृतीचा टेंभा एका बाजूने मिरवणारे आपणच अशा मौल्यवान ठेव्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपल्या श्रेष्ठ संस्कृतीचा श्वास जणू कोंडत असतो, तिच्या ह्या पाऊलखुणा पुसून तिचे अस्तित्वच धोक्यात आणत असतो!

Some Stone Sculpted Dieties and a Veergal (Stone Carving in Memory of a Dead Warrior) at the school in GogavaleWadi (Pimpalwadi)शाळेच्या भिंतीला टेकून, रचून ठेवलेल्या काही मूर्ती  आणि एक वीरगळ.

बोअर-वेलवर थंडगार पाण्याने जवळ जवळ आंघोळच झाली. पोभर पाणी प्यायलो तशी हुशारी आली. जवळच असलेल्या गोगावलेंच्या  दुकानावर चिक्की खाल्ली, अजयचं आवडतं थंडगार “थम्पास” प्यायलो अन निघालो चंद्रगडाच्या रोखाने!

तळपत्या उन्हात, तापलेल्या रस्त्यावर अम्याची गाडी सुसाट सुटली होती. पण आमच्या पोटात थैमान घालत असलेले कावळे आम्हाला स्वस्थ बसू देईनात. आता आमचे (चंद्रगडाच्या आधी) एकंच लक्ष्य होते. पोटोबाची पूजा! लगेचच एक हॉटेल गाठून रीतसर कोंबडीचा फडशा पाडण्यात आला! तृप्त ढेकर देत आम्ही निघालो ढवळे गावाच्या दिशेने.

सूर्य मावळतीस जाण्याआधी ढवळे गाव गाठू असं आमचा अंदाज होता. पण तिथल्या रस्त्यांनी आमचा हा मनसुबा अक्षरशः खड्ड्यात घातला! रस्त्यातले रस्ते चुकवत, खड्ड्यातला रस्ता शोधात आमचा “डायव्हर” गाडी २० च्या वेगाने हाकीत होता. सुभेदार तानाजी मालुसारेंचं उमरठ गाव मागे टाकून आम्ही ढवळे गावाच्या दिशेला लागलो तेव्हा सूर्य असतास जाऊन आकाशात लक्ख चंद्रकोर दिसत होती.  अंधार होऊ लागलं तशा डोंगरांच्या आकृत्या अंधुक होऊ लागल्या, रातकिडे ओरडायला लागले आणि गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात खड्डे चुकवत मुक्कामी पोहोचण्याच काम आम्ही करू लागलो.

Dusk Sets in On the way to Dhawale Gaon!ढवळे गावाकडे जाणारा रस्ता! 

किर्र रान, घनदाट झाडी असं चहुबाजूने पसरलेलं जावळीच जंगल, पडलेला अंधार आणि त्यात ह्या “खड्डेदार” रस्त्यावरची अगणित वळणे घेत घेत आम्हाला अचानक दूर, काळोखात, एकदम खोल, कुठेतरी खाली मिणमिणणारे दिवे दिसले आणि त्या अंधारातही आम्ही ओळखले!

ढवळे गाव!

निर्मनुष्य जावळीत बऱ्याच  वेळानंतर  दिसलेली मनुष्य वस्तीची पहिली खूण!  अंधारात दूरवर चमकणारे ते दिवे दिसले, चाकाखालचा खडबडीत रस्ता जाणवला आणि एक गोष्ट लक्षात आली. आपण सरकारला आपल्या घरी बसून नेहमी शिव्या देत असतो. सरकार काहीच काम करत नाही, सरकार नुसते पैसे खाते, आज २१व्या शतकात पण गावात वीज नाही वगैरे वगैरे. पण इथे चक्क जावळीच्या खोऱ्यात, चंद्रगडाच्या पायथ्याशी वीज आणि रस्ता ह्याच कामचोर सरकारने पोहोचवले होते! सरकारी माणसं काम पण करतात ह्याची एक प्रत्यक्ष झलक आम्हाला दूर जावळीत मिळाली होती!

ढवळे गावातील रवींद्र मोरे ह्याचा भ्रमणध्वनी क्रमांक पुण्यातील ओंकार ओक ह्याने मुद्दाम दिला होता. जेवण-खाण, राहायची सोय आणि चंद्रगड दाखवण्याचे काम “रवी” उत्तमरित्या करेल असे आवर्जून सांगितले होते. म्हणून मग रवीशी आगाऊ संपर्क साधून ठवला होता.आम्ही गावात पोहोचताच रवीने आम्हाल त्याच्या घरी नेले. रात्रीचे भोजन उरकले, गरम दूध गट्टम केले अन  रवीच्या वडिलांशी गप्पा रंगल्या. बराच वेळ गप्पा मारल्यावर आम्ही झोपायला निघालो. मंगळगडावर चढाई करताना पाय थोडा दुखावल्याने पंकज लवकर झोपी गेला. मी, अम्या आणि अज्या मात्र मंदिराच्या अंगणात गप्पा मारायला निघालो. जवळच एका पिंपळाच्या वृक्षाखाली मग ३ भुतांच्या गप्पा रंगल्या.

885277_10152048966950569_25302318_oदुधी चांदण्यात, गार वाऱ्यासोबत खास मित्रांसोबत मारलेल्या गप्पा खरच अन्मोल! 

 

चंद्रप्रकाशात चंद्रगड न्हाऊन निघाला होता. त्याची अंधुक आकृती डोळ्यात साठवीत आमच्या गपपा चालल्या होत्या. बऱ्याच वेळाने, नाईलाजाने उठलो, झोपायला निघालो. काही क्षणात तिघांच्या घोरण्याने ताल धरला  आणि ह्यांच्या निद्रेची मैफिल रंगली.

पण मला मात्र झोप येत नव्हती.

 

20131116_191405
एक तस्बीर होती राष्ट्रपती पदक स्वीकारणाऱ्या एका उमद्या पोलीस अधिकाऱ्याची  
20131116_191423
आणि दुसरी होती भारतीय सैन्यातील पॅरा कमांडोझच्या एका तुकडीची

रवीच्या घरातील भिंतीवरील दोन तस्बिरींनी माझे विचारचक्र फिरवायला सुरुवात केली होती.  एक तस्बीर होती राष्ट्रपती पदक स्वीकारणाऱ्या एका उमद्या पोलीस अधिकाऱ्याची   आणि दुसरी होती भारतीय सैन्यातील पॅरा कमांडोझच्या एका तुकडीची. विचारल्यावर कळलं की रवीच्या दोन मामांच्या ह्या तसबिरी आहेत. आणि हे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो! एका खेड्यातून अशी माणसे येऊ शकतात हे आम्ही शहरी माणसं मुली विसरूनच बसलो होतो का?

महाराष्ट्राच्या एका लहानग्या खेड्यातील ही दोन माणसं. पण केवढं ते कर्तृत्व! भल्या भल्या शहरी  माणसांना जे जमत नाही ते ह्यांनी करून दाखवलं! तो अभिमानाने छाती फुलवून पदक स्वीकारणारा अधिकारी पहा! आणि दुसरं तर थेट पॅरा कमांडो!! पॅरा कमांडोझ हे भारतीय सैन्यातील सर्वोत्तम सैनिक समजले जातात. शत्रूच्या प्रदेशात विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उड्या मारायच्या, शत्रूच्या महत्वाच्या विमानतळांवर, ठाण्यांवर हल्ला चढवायचा  आणि अत्यंत कठीण परिस्थितीत आपले “मिशन” यशस्वी करायचे हे त्यांचे मुख्य काम! ह्यासाठी लागते ते बळकट शरीर आणि त्याहूनही बळकट मन! आणि अशी माणसं फक्त शहरात आणि मोठ्या गावात नसून थेट खेड्यात सुद्धा आहेत हे पाहून एक सुखद धक्का बसला! शिवाजी महाराजांनी पण ह्या माणसांचे हेच गुण हेरून स्वराज्य स्थापिले होते! तानाजी मालुसरे, येसाजी कंक ही तर सगळी खेड्यातलीच  पोरं होती ना? तरी पण त्यांचे गुण  ओळखून, त्यांचा योग्य तो उपयोग करून महाराजांनी शून्यातून राज्य उभे केलेच ना?  इथल्या शेतकऱ्याच्या मनगटी बळ अन मनाला उभारी जर दिली तर अखंड हिंदुस्थान  पादाक्रांत होतो अन  अटकेपार झेंडे रोविले जातात ही शिकवण आपला इतिहास आपल्याला देतो! आता गरज आहे फक्त ही खेड्यात, रानात लपलेली ही रत्ने हुडकून काढण्याची! मग भारताला महासत्ता बनवणे अजिबात कठीण नाही!!

(क्रमशः)

(भाग २ इथे वाचा)

-प्रांजल वाघ ©

१५ जून २०१४

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

छायाचित्रे साभार : अमित कुलकर्णी, पंकज झरेकर

विशेष आभार : ओंकार ओक, अजय काकडे

Creative Commons License

 

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).

This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

11 comments

madhukar dhuri June 20, 2014 - 12:35 PM

नीरा देवघर आहे देवधर नाही. बाकी झकास !!

Reply
Pranjal Wagh June 20, 2014 - 8:31 PM

मधुकरजी,

चूक सुधारली आहे! धन्यवाद!

Reply
shailendra chavan June 20, 2014 - 3:17 PM

Apratim lihila ahe..
Rajanikant cha dialog tar bharich vaparlay

Reply
Pranjal Wagh June 20, 2014 - 8:31 PM

शैलेंद्र,

धन्यवाद मित्रा! पुढचा भाग लवकरच येत आहे!

Reply
vinayak date June 22, 2014 - 6:33 PM

exciting. do you watch too many daily soaps or what?why do you take a break when we are in the flow?:)

Reply
Pranjal Wagh June 23, 2014 - 6:58 PM

Date Sir!

Thanks a lot for the comment! I don’t watch any daily soaps but yes I will post the second part soon!

Reply
Pranjal Wagh June 25, 2014 - 12:05 AM

Date Sir,

I have posted the second part in this series here: http://wp.me/p4cYBY-gv

Reply
R R Abhyankar August 4, 2014 - 4:18 PM

Sundar lihile ahes. Amhi he sarva Mazeri te Mahabaleshwar bhar pavasat purna chalat 1975 madhye kele hote. Tevha hi sarva gave rastyapasun dur hoti. Amhi Pune -Mazeri mukkam-Kangori te dhavale chalat -1 divas ani nantar Chandragad ani mahabaleshwar Aurther Seat 1 divas ase kele hote.

Reply
Pranjal Wagh September 1, 2014 - 5:55 PM

Sir Blog vachun comment kelyabaddal me apla abhari aahe 🙂
Ushira reply dilyabaddal khsamasvi!
Aani tumhi kelelya trekcha varnan aikun me natmastak! 🙂
hats off!!

Reply
Ketanketan More June 4, 2015 - 1:09 PM

khoop mast akdm

Reply
Pranjal Wagh October 17, 2015 - 12:27 AM

धन्यवाद केतन!!
असेच वाचत रहा आणि प्रोत्साहन देत रहा!

Reply

Leave a Comment

You may also like