चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी (भाग २)

…जाता गोवळी!

by Pranjal Wagh
88 views
 म्हसोबाच्या खिंडीपुढे सुरु होतो तो चंद्रगडाचा खरा चढ!

…जाता गोवळी!

(भाग २)

(भाग १ इथे वाचा)

ढवळे गावातील पहाटेची निरव शांतता आणि आमची साखर-झोप खाड्कन मोडली.

एक बाबा विठ्ठलाच्या देवळात पहाटे  ५ वाजता देवळात जोर जोरात श्लोक “म्हणत” होता.  दिवसाला अशी भक्तीपूर्वक सुरुवात मिळाल्यावर पुढचा दिवस चांगला जाणार यात शंकाच नाही! तो बाबा काही थांबायचे नाव घेई ना. मग नाईलाजाने आम्हाला उठावेच लागले. एका अर्थी बरेच झाले ते. पटापट आवरून आम्ही रवीच्या घरी हजार झालो. जावळीच्या निबीड अरण्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत सकाळचा गरम गरम चहा तर हवाच! तो पोटात गेला तसे बरे वाटले, नव्याने चढाई करण्यास उत्साह आला!

दूरवर निळ्या डोंगरामागून डोकावणारी किरणे सूर्योदय झाल्याची जाणीव करून देत होती!

GOPR0041  दूरवर निळ्या डोंगरामागून डोकावणारी किरणे सूर्योदय झाल्याची जाणीव करून देत होती!

 

उन्हाची झळ चुकवण्यासाठी आम्ही लवकरच निघालो. दूरवर निळ्या डोंगरामागून डोकावणारी किरणे सूर्योदय झाल्याची जाणीव करून देताच आम्ही निघालो. सगळ्यात पुढे रवी होताच. जावळीच्या गर्द रानात रवीसारखा कुशल अन विश्वासू वाटाड्या हवाच!  समोर आकाशात चंद्रगड चढला होता. जंगलाने वेढलेला हा छोटेखानी किल्ला त्याची दुर्गमता दाखवून देत होता.

थोड्याच वेळात गर्द झाडीत आम्ही शिरलो अन  थंडी अधिक जाणवू लागली. रानातून नागमोडी वळणं घेत घेत आम्ही निघालो. सुमारे अर्ध्या तासात म्हसोबाच्या खिंडीत पोहोचून थोडी विश्रांती घेतली. आदल्या दिवशी गोगावले वाडीतून घेतलेली  चिक्की उरली होती. ती आता उपयोगी पडली. म्हसोबाच्या खिंडीपुढे सुरु होतो तो चंद्रगडाचा खरा चढ! सुमारे ७० अंशात वर चढणारा, दमवणारा, त्या थंडीतही घाम काढणारा आणि कारवीची झाडी, सुकलेलं गवत ह्यांनी नटलेला असं हा उभा चढ! हा चढ चढताना, धापा टाकत असताना ही माझ्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे हा गड जरी छोटा असला तरी तो जिंकून घेणे मात्र अतिशय कठीण.  जावळीच्या जंगलाचं नैसर्गिक कवच लाभलेला असा हा चंद्रगड!. ह्या गडावर येणाऱ्या वाटा दोनंच आणि दोन्ही वाटा म्हणजे अंगावर येणारे उभे चढ!  शत्रू हा चढ चढताना आधीच अर्धमेला झालेला  असतो. अन मग वर मोजकीच शिबंदी जरी असली तरी हे चढणारे शत्रू बाणाने टिपणे म्हणजे  शेतातली बुजगावणी टिपण्या इतके सोपे!

Climbing the Steep Ascent to Chandragad! म्हसोबाच्या खिंडीपुढे सुरु होतो तो चंद्रगडाचा खरा चढ!

 

 म्हसोबाच्या खिंडीपुढे सुरु होतो तो चंद्रगडाचा खरा चढ!

पसरलेली जावळी अन त्यात उभे असलेले हे अभेद्य, दुर्गम गड पाहिल्यावर मग आठवते ती चंद्रराव मोऱ्यांची गुर्मी. स्वराज्याच्या सरहद्दीत घुसून चालवलेली लूटमार अन स्त्रियांचा विनयभंग करणाऱ्यास दिलेला आसरा ह्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला जरबेत घेणारा खलिता धाडला तर ह्याने उलट महाराजांना आव्हान केले,

“….येता जावळी …जाता गोवळी! पुढे एक मनुष्य माघारा जाणार नाही! तुम्हामध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार तर आजच या! येथे उपाय कराल तर अपाय होईल! जावळीस येणारच तरी यावे! दारुगोळा मह्जूद आहे!”

जावळी परिसरावर एक नजर फिरली कि चंद्ररावला चढलेली गुर्मी, त्याच्या मस्तवालपणाचे कारण लक्षात येते. इतके निबिड अरण्य, जिथे दाट झाडी पार करून सूर्यप्रकाश जायला धजत नाही, तिथे शत्रूच्या माणसांची काय तमा? जावळीत आलेला शत्रू परत माघारी जाण्याची शक्यता कमीच!

थेट शिवाजी महराजांना “तुम्ही कोण राजे?” असा जाब विचारणारा चंद्रराव, मुजोरी असला तरी त्याच्या ह्या आव्हानाचे किंचित कौतुक वाटते! पण ह्याहून जास्त कौतुक अन अभिमान वाटतो तो महाराजांचा! शत्रू बेसावध असताना त्याच्या छावणी वर छापा घालणे वेगळे आणि शत्रूच्या “आमंत्रणाचा” मान ठेवून, तो संपूर्ण जागरूक असताना, त्याच्याच प्रदेशात घुसून त्याला नेस्तनाबूत करणे फार फार वेगळे!!

सुमारे पाउण तासाने तो उभा चढ पार करून आम्ही जसे शेवटच्या कातळटप्प्याकडे पोहोचलो तसे बेभान वारा आणि तळपणारा सूर्य ह्यांनी आमचे जोरदार स्वागत केले. इतका वेळ सावलीतून, थंड वातावरणातून चढून आम्ही जरी घामाघूम झालो असलो तरी ऊन नसल्याने थोडासा दिलासा मिळत होता. पण आता अचानक सूर्यकिरणांचा मारा झाला  आणि घाम अधिक जोमाने वाहू लागला.  मुबलक प्रमाणात विटामिन डी आम्हाला मिळत होते हीच काय ती जमेची बाजू!

इथून एक छोटे प्रस्तरारोहण केले की आपण थेट चंद्रगडात  प्रवेश करतो. गडाचा माथा सुकलेल्या सोनेरी गवताने भरून गेला होता. सहज मनात कल्पना येऊन गेली. दुरून जर आज ह्याचे कोणी दर्शन घेत असेल तर हा ढवळ्या डोंगर एखाद्या साधू सारखा दिसत असेल. महादेवाच्या पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखलेले विशाल कपाळ, अनिर्बंध वाढलेल्या जटा, राकट कणखर शरीर असा हा साधू कठोर तपस्या करीत शतकानुशतके ऊन, पाऊस, वारा साऱ्यांना तोंड देत उभा आहे! अढळ आणि अचल!!

The Beautiful Nandi on Chandragad!
चंद्रगडावरील एक सुंदर घडीव नंदी आढळतो!

चंद्रगडावर प्रवेश करताच काही अंतरावर एक सुंदर घडीव नंदी आढळतो अन त्याच्या बाजूलाच दगडात खोदलेले भले मोट्ठे शिवलिंग! हजारो वर्षांपूर्वी एका ओबडधोबड दगडाचे अज्ञात हातांनी छिन्नीचे घाव घालून ह्या अप्रतीम शिवलिंगात रुपांतर केले! आजही ती  कलाकृती तशीच आहे! इतकेच नव्हे तर पिंडीच्या बाजूला एक दगडी दिवा आहे. तो देखील नवीन असल्यासारखाच भासतो! त्या काळातील कारागीरांच्या भक्तीची, प्रतिभेची आणि कामाच्याप्रती असलेल्या निष्ठेची ही ढवळेश्वराची पिंडी मूर्तिमंत पावतीच होती!

The Superb, Huge Carved ShivLing on Chandragad!
दगडात खोदलेले भले मोट्ठे शिवलिंग!

रवीने सकाळी निघताना माझ्या जवळ एक पाण्याची बाटली आणि अगरबत्तीचा पुडा दिला होता तो ह्यासाठीच. त्याने लगेच पिंडीच्या आजूबाजूला असलेला पाला-पाचोळा काढून, पाण्याने पिंडी धुवून साफ केली, अगरबत्त्या पेटवल्या, दगडी पणतीत दिवा लावला आणि ढवळेश्वराला भावपूर्ण नमस्कार केला. इथल्या लोकांची ढवळेश्वरावर खूप भक्ती. दरवर्षी इथे जत्रा भरते.हजारो गावकरी ह्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी बऱ्याच दूरवरून येतात.

Dhawale River ..the mysterious interiors of Jawli fascinate me...Would like to explore one day! रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या गर्द झाडीत उगम पावलेली ढवळी नदी

रवीने आजूबाजूच्या परिसराची ओळख करून दिली. महाबळेश्वर, आर्थर सीट, ढवळे घाट , रायरेश्वर, नाखिंदा, प्रतापगड ह्यांनी जणू चंद्रगडाला वेढा दिला होता! जिथे नजर फिरेल तिथे सह्याद्री उभा ठाकला होता! आमच्या मागे दूर ढवळे गावातील घरटी दिसत होती. रायरेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या गर्द झाडीत उगम पावलेली ढवळी नदी त्या रानातून वळणदार वाट काढीत ढवळे गावाजवळून खळाळत वाहत होती. चंद्रगड लहान असला तरी इथून बरंच मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. बहुदा ढवळे घाटावर नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला जात होता!

चंद्रगडावर तसे फारसे अवशेष नाहीत. शिवलिंग मागे टाकून पुढे एक छोटा प्रस्तर चढलो कि आपला प्रवेश बालेकिल्ल्यात होतो. गवतात लापेली तटबंदी शोधली तरच नजरेस पडते. तीच गत वाड्याच्या अवशेषांची.  त्या काळी लढाऊ अवस्थेत हा गड कसा असेल ह्याची कल्पना करणे देखील काही वेळा कठीण होऊन बसते इतकी बिकट परिस्थिती आज चंद्रगडावर आहे! गडाचा दुसरा दरवाजा उत्तरेस आहे. इथे दगडी पायऱ्या उतरून गेलो कि एक दरवाजा लागतो. त्या दरवाज्यातून पुढे गेलात की लागते ते चंद्रगडाचे उत्तर टोक. इथे एक भक्कम बुरुज उभा आहे. विशेष म्हणजे इथे अगदी कड्याला लागून, बुरुजाच्या आत एक पाण्याचं टाकं खोदलेलं आहे. इथले पाणी पिण्याजोगे आहे. इथे सावलीत थोडे विसावलो, थोडेसे पाणी प्यायलो आणि ह्या टाक्यातले “हिरवेगार” पाणी बाटल्यांत भरून घेतले आणि मग निघालो परतीच्या वाटेवर!

Our Water Canteen :) टाक्यातले “हिरवेगार” पाणी

अजय आणि मी फोटो काढत थोडे मागे राहिलो. बाकीचे पुढे निघून गेले. माझे फोटो काढून जाहले अन मी जाण्यासाठी वळलो तसे मला हवेत धूर दिसू लागला. मी विचारात पडलो.

धूर? इथे? की धुकं आहे ते?  पण ते देखील कुठून येणार?

म्हणून मी अजयला हाक मारली,

“अजय, तो बघ तो धूरंच आहे का?!”

“हो रे, धूरंच दिसतोय!”, अन मग थोडं थांबून म्हणाला, “दिव्यामुळे आग लागली वाटतं!”

क्षणभर एकमेकांकडे पाहिले अन अजय उद्गारला,

”वाघ्या! पळ!!”

 

Fire on the Mountain! Run!Run! Run!सुक्या गवताने पेट घेतला आणि बघता, बघता वणवा पेटला होता!

आम्ही तिथून तीरासारखे सुटलो! पुढे बाकीचे तिघे होतेच. बालेकिल्ल्याचा उतार आणि चंद्रगडाचा दक्षिण दरवाजा ह्यांच्या मधोमध, दिव्याने ठिणगी देताच सुक्या गवताने पेट घेतला आणि बघता, बघता वणवा पेटला होता! वेळ न दवडता आम्ही आग नसेल तिथून पुढे पुढे जात राहिलो न एकदाचे त्या आगीतून बाहेर पडलो. मागे वळून पाहिले तर काही क्षणांपूर्वी मी आणि अजय जिथे उभे होतो तिथेच बालेकिल्ल्याने पेट घेतला होता! नशिबाने माझ्या डोक्यावर असलेल्या गो-प्रो कॅमेऱ्यात  ह्याचे चित्रीकरण केले होते.

डोंगराला आग लागली! पळा! पळा!! पळा!!! from Pranjal Wagh on Vimeo.

आग आमच्यापर्यंत पोहोचण्याआधी उतरणे प्राप्त होते. तशी आग आमच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते पण कशाला “अग्निपरीक्षा” घ्या? म्हणून आम्ही लागलीच निघालो! खाली म्हसोबाच्या खिंडीत काही क्षण विश्रांती घेतली व तासाभरात ढवळे गाव गाठले.रवीच्या घरी थोडेसे चहापान केले आणि त्याचा निरोप घेतला. रवी उत्तम पखवाज वाजवतो हे आम्हाला निघताना कळले. पुढच्या वेळी पखवाज वाजवून दाखवण्याचं आश्वासन त्याच्याकडून घेतलं अन मगंच निघालो!

वाटेत एका थंडगार पाण्याच्या डबक्यात ह्या चार रेड्यांनी यथेच्छ डुंबण्याचा  कार्यक्रम उरकला.  पुढे उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा ह्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि खड्डेदार रस्त्यावरून गचके खात निघालो आम्ही पोलादपूरच्या रस्त्याने!

चंद्र-मंगळ मोहीम तर यशस्वी झाली होती. पण आता पोटात भुकेने एक पोकळी निर्माण झाली होती. पोट रागाने मध्येच, “खायला दे!”, म्हणून गुरगुरत होते.   रस्त्यावरचे खड्डे सरकार जेव्हा बुझवायचे तेव्हा बुझवेल पण आमच्या पोटाला पडलेला खड्डा आम्हालाच भरून काढावा लागणार होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. म्हणून मग लगेच नवी मोहीम आखली गेली. आता सगळ्यांच्या डोळ्यासमोर फिरून एक नवं ध्येय उभं राहिलं!

झणझणीत रस्सा आणि कोंबडी!! 😉

(समाप्त)

– प्रांजल वाघ ©

२१ जून २०१४

Instagram: @sonofsahyadris

Facebook : Son Of Sahyadris

संपूर्ण शृंखला इथे वाचा:

 चंद्र-मंगळ – जावळी खोऱ्यातील दुर्गद्वयी

येता जावळी … (भाग १)

… जाता गोवळी! (भाग २) }

 

छायाचित्रे  : अमित कुलकर्णी, प्रांजल वाघ

विशेष आभार : ओंकार ओक, सौरभ वैशंपायन  

Creative Commons License

 

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.

This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).

This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.

7 comments

vinayak date June 24, 2014 - 11:57 AM

pranjal,i have lived the entire experience thru your eyes and words.beautiful narration and apt photos add to the already exciting ‘mohim’.bravo!

Reply
Pranjal Wagh June 24, 2014 - 11:57 PM

Date Sir!

You are too kind in your appreciation!! Once again thanks a lot for being an avid reader of this blog!!

Reply
Aditya Dixit June 24, 2014 - 12:55 PM

Superb.. nice..

Reply
Pranjal Wagh June 24, 2014 - 11:58 PM

Dear Aditya,

Thanks a lot! Do share it with your friends if you like it!

Reply
जितेंद्र बंकापुरे उर्फ दत्तू तुपे June 24, 2014 - 2:16 PM

मस्त वर्णन… दोन्ही भाग उत्तम लिहिले आहेस… अग्निपरीक्षा जमलेलं आहे…

Reply
Pranjal Wagh June 24, 2014 - 11:59 PM

जितेंद्र,

मित्रा शतशः आभारी आहे मी! तुझी प्रतिक्रिया आज माझ्या ब्लॉगला मिळाली, भरून पावलो!
धन्यवाद!!

Reply
R R Abhyankar August 4, 2014 - 4:07 PM

Nice Pranjal,
Matra ethun pudhe kadhihi konatyahi killyawar gelat tar Udbatti ani itar aag petavu naka. Ani ti petavalitach tar ti shant hoi paryant tithech thamba.
Sahyadrit apalya asha nishkalaji panane lagalele vanave swastat padat nahit!!
Ravi Abhyankar

Reply

Leave a Comment

You may also like