भाग १ इथे वाचा : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड
भाग २ इथे वाचा : रामघळीचा थरार!
भाग ३
“Little by Little, One travels far!”
कोयनेच्या घनदाट जंगलाच्या सीमेवर असलेल्या ‘चाफ्याचा खडक’ नामक छोट्याशा धनगरवाड्यातून आम्ही ५ जण जेव्हा भैरवगडाच्या वाटेवर निघालो तेव्हा मला “लॉर्ड ऑफ द रिंग्स” मधील वरील ओळ आठवली. माणूस जेव्हा निकराने, निश्चयाने एक एक पाऊल पुढे टाकत जातो तेव्हा तो खूप मोठा पल्ला गाठतो. एव्हरेस्टच्या चढावर, प्राणवायूची अत्यंत कमतरता असताना, तुम्ही एक एक पाउल पुढे टाकता तेव्हाच शिखर सर करता येते! आम्ही पामर एव्हरेस्ट तर सर करत नव्हतो पण गेल्या एका दिवसात आम्ही जंगली जयगड आणि हेळवाकची रामघळ अनुभवली होती, नातवंडांना भोवती जमवून सांगाव्या अशा चार गोष्टी गाठीस बांधल्या गेल्या होत्या!
मी आणि अनुप, आम्ही दोन वाटसरू! एक वेडं साहस करण्यासाठी कोयना-चांदोली परिसर आम्ही निवडला. पहिल्या दिवशीची जंगली जयगडची भटकंती आणि रात्रीचा रामघळीतला थरार अनुभवला खरा पण आता आमचा ट्रेक खऱ्या अर्थाने सुरु होत होता. इथून पुढे मोबाईलला रेंज नसणार होती, कुठे वैद्यकीय मदतीची गरज लागली तर प्रथमोपचार सोडून आमच्या हाती काहीच नसणार होतं. कोयना-चांदोलीत बिबटे, अस्वलं यांची नियमित गस्त असते. त्यांच्याशी सामना झाला तर आमच्याकडे चाकूशिवाय हत्यार नाही. सूर्यकिरणांना ज्या जंगलात मज्जाव होता ते जंगल किती दाट असेल याची कल्पना करा! या चक्रव्यूहात आम्हाला शिरायचं ठाऊक होतं पण इथून बाहेर पडणे खूप कठीण. अशा वेळी आपला सगळा अहंकार बाजूला ठेवायचा आणि वाटाडे सोबत घ्यायचे! आम्ही तसेच केले! जयराम लांबोरे, त्याची बायको आणि त्याचा छोटा कुत्रा – गंग्या यांना सोबत घेतले! ही याच मातीची आणि जंगलाची लेकरं! इथलं जंगल, इथल्या वाटा यांना तोंडपाठ. रात्री झोपेतून उठवलं तरी तुम्हाला बरोबर रस्त्याने आणून सोडतील!
आम्ही जेव्हा ‘चाफ्याचा खडक’ सोडला तेव्हा सकाळचे सुमारे ८३० वाजले होते. गंग्या आमच्या टोळीचा म्होरक्या! आम्हा सगळ्यांच्या पुढ्यात धावत जाऊन रस्त्याची खात्री करायचा. परत धावत मागे येऊन आमच्याकडे असं काही बघायचा की त्याचे डोळे त्याच्या भावना नेमक्या बोलून जायच्या, “काय तुम्ही म्हंबईचे लोक! श्या! जरा चाला की पटा पटा!” पण आमच्याकडून काही प्रतिसाद येत नाहीसा पाहून पुन्हा आपल्या कामात व्यग्र व्हायचा!
काहीच क्षणात आम्ही जंगलात प्रवेश केला आणि मानवी वस्तीशी आमची नाळ तुटली. हे विश्वच वेगळ होतं! सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावरील अनेक किल्ले भटकताना त्यांच्या अवतीभोवती असलेली रानं पालथी घातली होती पण कोयनेची बात काही औरच होती! उंचच उंच, भले थोरले वृक्ष! त्यांनी आम्हा पाहुण्यांच्या डोक्यावर जणू छत्रीच धरलेली! मे महिना असून कुठेही उष्णता जाणवत नव्हती. उलट वातावरण थंडगार होते! पायाखालील जमीन दिसू नये इतका पाचोळा. रानकोंबड्यांचा, पक्षांचा, फुलपाखरांचा, कीटकांचा स्वैर संचार! थोडीशी समज असलेल्या माणसाला, जंगलं का महत्वाची आहेत हे कळण्यासाठी फक्त एकदा इथे येण्याची गरज आहे. मग त्याला कोणती भली-थोरली पुस्तकं वाचायची गरज नाही!
रामघळीच्या मागील डोंगर चढून एव्हाना आम्ही भैरवगडाच्या वाटेला लागलो होतो. सहजपणे जयरामला विचारले,
“इथून भैरवगड किती वेळात येईल?”
“इथून… दोन अडीच तासात पोहोचू आपण!”, तो उत्तरला
“तो तुमच्या चालण्याचा वेग रे! आम्हाला किती वेळ लागेल?”, मी लगेच विचारले. सह्याद्रीतला एक नियम आहे. एखाद्या ठिकाणी पोहोचायला स्थानिक लोकं तुम्हाला जितका वेळ सांगतील त्याच्यापेक्षा १-१.५ तास अधिक धरून चालायचं! आपला चालण्याचा वेग हा त्यांच्यापेक्षा कमीच असतो! पण जयरामने चक्क मान हलवली अन म्हणाला,
“न्हाई! तुमचा स्पीड बऱ्यापैकी आहे! पोहोचू आपण २-२.५ तासातच!”
चक्क स्थानिक माणसाकडून आपल्या चालण्याच्या वेगाचे कौतुक ऐकून आमच्या अंगावर मुठभर मांस चढलं! आमचा वेग आणखी वाढला! हा वेग असाच कायम ठेवला तर इथून दोन-अडीच तासाच्या सुसाट चालीनंतर भैरवगड भेटणार होता! एव्हाना चढ संपला होता आणि जंगलातला हायवे लागला होता! हायवे यासाठी की रस्ता सपाट, रुंद आणि दुतर्फा झाडांची “कॅनपी”! इथे चालायला खूपच मजा येते! मुख्य म्हणजे तुम्ही वेगाने चालू शकता आणि उन्हाची झळ लागत नाही!
झपाझप पावलं टाकीत आम्ही त्या रस्त्याने सुसाट सुटलो! जयराम आणि पत्नी सगळ्यात पुढे! गंग्या तर अती उत्साही! परंपरागत वैर असल्या सारखा तो रानकोंबड्यांच्या मागे लागे. चालता चालता वास लागला की एक क्षण थांबायचा आणि बाणासारखा झाडीत सुटायचा! अर्जुनासारखं मग त्याला फक्त त्याचं लक्ष्य दिसायचं! बाकी सगळं विसरून बिचाऱ्या कोंबड्यांना सळो की पळो करून सोडायचा! त्याच्या तावडीत एक ही कोंबडी सापडायची नाही ती गोष्ट वेगळी! पण दर वेळी अपयश पदरात पडून सुद्धा त्याने प्रयत्न करायचे सोडले नाहीत! लहानसा दोन महिन्यांचा रांगडा, उत्साही गंग्या, शहरामध्ये हजारो रुपये मोजून वातानुकुलीत खोलीत “लाइफ कोच” कडून मिळणारे “लाइफ लेसन्स” नकळतपणे कोयनेच्या जंगलात मोफत शिकवून गेला!
चालता चालता अचानक जयराम आणि त्याची पत्नी दोघेही थबकले! आणि त्यांचं ते थबकणे साधंसुधं नव्हतं! त्यांची देहबोली क्षणात बदलली! अधिक सावध झाली! “काय झालं?”, असं मी खुणेनेच विचारलं. त्यांनी फक्त बाजूच्या झाडीकडे बोट दाखवले. इतक्यात अनुप सुद्धा तिथे दाखल झाला. बाजूच्या झाडीत पाहताच आमचे धाबेच दणाणले!! पिळदार शरीरयष्टीचा, तेल लावलेल्या काळ्याकभिन्न मल्लासारखा चमकणारा, सात फूट उंचीचा एक महाकाय नर गवा आमच्याकडे टक लावून बघत होता!! त्याच्या अंगावरील प्रत्येक स्नायू तटतटून फुगलेला होता! डोक्यावर भल्यामोठ्या शिंगांचा मुकुट तो एखाद्या राजासारखा मिरवीत होता! स्वतःच्या राजबिंड्या रुपड्याचं त्याचं ते पुरुषी मिरवणं आमच्यापासून अवघ्या १० फूटांवर सुरु होतं! आम्ही काही क्षण मंत्रमुग्ध होऊन पाहत राहिलो! आमचे ते अचानक येणे पाहून त्याने देखील काहीच हालचाल केली नाही. बहुदा या माणसांकडून आपल्याला काही धोका आहे की नाही याचं मूल्यमापन तो करत असावा. कोणती ही हालचाल आम्ही अचानक केली असती तर तो उधळला असता. तो आमच्यावर धावून आला असता तर? आमची काही खैर नव्हती! या क्षणाचा फोटो घेण्याचा मोह मात्र मला आणि अनुपला, दोघांना आवरला नाही. अगदी सावकाशपणे, कोणती ही अचानक हालचाल न करता माझा हात कंबरेवरील कॅमेऱ्याच्या पाऊचकडे सरकला. हे सगळं होत असताना काळ जणू काही मंदावला होता. पाऊचचे वेल्क्रो उघडताना ते जसे चरचर वाजले तसे त्या गव्याने माझ्याकडे पाहत, नाकपुड्यांतून जोरदार सुस्कारा देत एक हुंकार टाकला!! माझ्या पोटात खोल-खोल खड्डा पडला! झालं! संपलं सगळं!! आपला पृथ्वीवरील प्रवास आता इथेच, या कोयनेच्या जंगलात संपणार असा विचार मनात येणार इतक्यात बंदुकीतून गोळी सुटावी तशी एक अस्पष्ट पांढरी आकृती माझ्या पायाजवळून त्या गाव्यावर वादळासारखी धावून गेली!
गंग्या!!
अवघा २ महिन्यांचं हे पिल्लू ७ फूटी गव्याला जाऊन बिनधास्त भिडले!! या गंग्याची आता इथेच समाधी बांधावी लागणार असं आम्हाला वाटलं पण काय आश्चर्य!! तो महाकाय, काळाकभिन्न गवा पाठीला पाय लावून रानात पळत सुटला! काही फूट पाठलाग करून हा पठ्ठ्या परत आला तो थेट आपल्या मालकाजवळ! जयरामने त्याचे भरभरून लाड केले. गवा आमच्यावर धावून आला असताच असं नाही पण गंग्याच्या उतावीळ आणि निर्भीड मुसंडीमुळे “बला टल गयी थी”!
“जीव वाचला पण फोटो गेला” वगैरे खंत आम्ही बिलकुल बाळगली नाही. नसत्या हुरहुरी जीवाला लावून घेण्यात अर्थच नव्हता! या प्रसंगाचे आमच्याजवळ कोणतेच छायाचित्र रुपी पुरावे राहणार नव्हते. पण त्या दिवशी,कोयनेच्या जंगलातील त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्याच मनावर तो अनुभव कायमचाच कोरला गेला आहे!
“हा तुमचा गंग्या भलताच हिम्मतवाला आहे!” , मी जयरामला सहज म्हंटले. एव्हाना आम्ही पुढे चालायला सुरुवात केली होती.
“हा मग! त्याला शिकारी बनवणार हाय मी!”, हे सांगताना जयरामची छाती अभिमानाने फुलून आली! खरंच, त्याचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं मला मनापासून वाटलं!
चालता चालता सपाटी जशी संपली तशी जंगलातील वृक्षांची गर्दी पांगली आणि समोरील नजारा आमच्यासाठी सह्याद्रीने खुला केला. जणू इथपर्यंत मजल मारल्याचे बक्षीसच! विस्फारलेल्या नेत्रांनी आम्ही समोर असलेलं कोयनेच्या जंगलाचे मनमोहक रूप पाहत उभे राहिलो! नजर जाईल तिथपर्यंत हिरवे गालिचे अंथरल्याप्रमाणे जंगल पसरले होते! समोर भैरवनाथाचे मंदिर असलेला डोंगर दिसत होता. भैरवगड त्याच्याही पलीकडे, सह्याद्रीच्या मुख्य रांगेला एका अरुंद वाटेने जोडला गेला होता. इथून तो दिसणे शक्य नव्हते. कोकणातल्या दुर्गवाडीहून येणाऱ्या घाटवाटांवर आणि प्राचीन व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवायला हा किल्ला आजही तत्पर होता! समोरच्या जंगलाकडे एक नजर टाकताच, या जंगलात वाटाड्या असणे का महत्वाचे आहे हे लक्षात आले! इथल्या जंगलात घुसणे फार सोपे. पण या भूलभुलैया मधून बाहेर कसे निघाल? आमचे लक्ष्य जरी समोर दिसत असले तरी जंगलाची माहिती नसलेल्याला तिथे पोहोचणे म्हणजे केवळ अशक्यप्राय गोष्ट!
पायाखाली जसा उतार लागला तसं आम्ही सपासप अंतर कापत गेलो. शेवटी उतार संपताच काही वेळाने मनुष्यवस्तीच्या खुणा दिसू लागल्या. इथे? जंगलाच्या मधोमध? काही पाउले पुढे गेल्यावर कळलं की ती वस्ती केव्हाच ओस पडली होती! कारण उरली होती ती फक्त गावातील घरांची जोती! १९६७ साली आलेल्या कोयनानगर भूकंपात हे गाव उध्वस्त झालं आणि मग इथल्या गावकऱ्यांचे स्थलांतर केले असे वाचले होते. एकेकाळी माणसांनी गजबजलेला हा “जुना वाघेना” गाव आज ओसाड आणि निर्मनुष्य पाहताना मन थोडं विषण्ण झालं. आपलं हक्काचं घर, जमीन आणि गाव नाईलाजाने सोडून जावं लागणे हे फार वाईट!
तिथून लगेचच काढता पाय घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. गावाबाहेर येताच आम्हाला एक ओढा लागला. मे महिन्याच्या कृपेने या ओढ्याचे रुपांतर काही दिवसातच डबक्यात होणार होते. पण अजूनही या सुकत चाललेल्या ओढ्यातले पाणी स्वच्छ, नितळ आणि निर्मळ होते! पाण्यावर अनेक “water boatmen” स्केटिंग केल्यासाखे फिरत होते. जवळच कुठेतरी मधमाशांचे पोळे असावे कारण तिथे एक दोन मधमाशा सुद्धा गुणगुणत होत्या. इथं झाडांची गर्दी थोडी विरळ झाल्यामुळे आता उन्हाच्या झळा बसू लागल्या होत्या. आणि त्यात हे साक्षात अमृततुल्य पाणी समोर दिसल्यावर मोह आवरला नाही.
“ बोक्या, पाणी स्वच्छ दिसतंय! चल बाटल्या भरून घेऊ!”, असं म्हणत मी पाठीवरची बाटली काढली. पाणी भरायला तळ्याजवळ एक पाऊल टाकतो न टाकतो तोच परत माझ्या पायातून एक पांढरं वादळ धावत गेलं आणि … फचा s s क!! गंग्याने मधमाशांची शिकार करण्याच्या नादात थेट पाण्यात उडी मारली होती!! त्याबरोबर ते स्वच्छ, निर्मळ आणि नितळ पाणी गढूळ झालं! कुत्र्याने अंघोळ केलेले पाणी कोण पिणार?
“गंग्या डुकरा s s s !! हाणतोच तुला आता!!”, असं मी मनातल्या मनात चरफडलो! एखाद्या आगाऊ लहान मुलाचा कितीही राग आला तरी त्याच्या बापासामोर त्याला थोडीच दम भरता येतो? त्यात इवलसं पोर ते! पाण्यातल्या पाण्यात त्याचा चाललेला मधमाशांचा पाठलाग पाहून आमच्यात हशा पिकली. पाणी न मिळाल्याचे दू:ख कुठल्या कुठे गायब झाले! सगळ्यांचे हसणे ऐकून गंग्या थोडा बावरला आणि मग थोडा हिरमुसल्यासारखा झाला आणि पाण्याच्या बाहेर आला. न राहवून त्याला जवळ घेऊन त्याचे खूप लाड केले. साहेबांची कळी लगेच खुलली. लाडात येऊन ओल्याचिंब जिभेने माझे गाल चाटून तो जो सटकला तो पुन्हा शिकारीच्या शोधात कुठेतरी पुन्हा अदृश्य झाला!
पाण्याची सोय आता थेट भैरवगडावर होणार होती! फिरून पुन्हा चालायला आम्ही सुरुवात केली! झपाझप पाउले टाकीत उरला सुरला सपाटीचा प्रदेश पार केला. आणि मग लागला तो भैरवगडाचा उभा चढ! घाटमाथ्यावरुन आम्ही चढाई करत असून हा किल्ला इतका उंच! मग कोकणातून चढायचा तर विचारच नको करायला! दुर्गवाडीतून चढून येणाऱ्या लोकांचे आम्हाला प्रचंड कौतुक वाटले! मुंगळे गुळाच्या ढेपेला भिडवेत तसे आम्ही सह्याद्रीच्या त्या चढाला भिडलो. वळणं घेत, रान तुडवीत आम्ही चढाई करू लागलो. इतका वेळ सपाटीची चाल होती आणि आता हा चढ! पार दम काढला आमचा. झाडाची छाया असूनही घामाच्या धारा वाहू लागल्या, छातीचा उर श्वासाने धपापू लागला पण चढाई संपायचं नाव घेईना ! चढावर एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबल्यावर “आणखी किती वेळ लागेल?” असं जयरामला विचारायला तोंड उघडणार इतक्यात माझे मलाच उत्तर मिळाले!
कसे?
सह्याद्रीत असो किंवा अख्ख्या भारतात. कोणत्याही पर्यटन अथवा धार्मिक स्थळाजवळ आपण पोहोचलो हे कसे ओळखायचे? तर जसे जंगलातले वाघ-बिबटे आपल्या मुलुखावर आपली “स्वाक्षरी” सोडून जातात तसेच माणसे आपला प्रदेश चिन्हांकित करण्यासाठी आपला कचरा मागे सोडून जातात! मी जयरामला प्रश्न विचारणार इतक्यात मला पायाखाली गुटख्याची पाकीट, चॉकलेटच्या चांद्या दिसू लागल्या! आणि हो सगळ्यात महत्वाचे चिन्ह म्हणजे “बिअरच्या बाटल्या”! देवाच्या पावन मानल्या गेलेल्या देऊळामागील चढावर बियरच्या बाटल्यांचा जणू अभिषेकच केला होता भक्तांनी! आपण माणसं किती दुटप्पी आहोत याचा चांगलाच अनुभव तिथं आला! देवदर्शनाला जायचं, सह्याद्री चढताना “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” च्या आरोळ्या द्यायच्या आणि वर पोहोचल्यावर दारू ढोसून कचरा तिथेच फेकून द्यायचा! पावसाळ्यात हा प्लास्टिकचा कचरा वाहून कुठल्यातरी नदीतून समुद्रात जाईल ही भाबडी आशा असावी कदाचित! पण हे प्लास्टिक शतकानुशतके इथेच पडून राहते! बाटल्यांचा चुरा होऊन प्राण्यांच्या, माशांच्या पोटात जातो! पण हे लक्षात कोण घेतो?
हेच विचारचक्र डोक्यात सुरु ठेवत, पायाखालील कचरा आणि काचांचे तुकडे चुकवत, धापा टाकत हा चढ मी चढून वर कधी आलो माझे मलाच कळले नाही! आणि चक्क समोर स्वागताला उभं होतं आपलं माणूस! कोण? दुसरं तिसरं कोणी नसून समोर उभे होते “छत्रपती शिवाजी महाराज!”
मंदिराच्या जवळच एका पाषाणावर महाराजांची एक छोटेखानी मूर्तीच उभी केली होती! तिचे दर्शन होताच लागलेला दम आणि आलेला थकवा कुठल्या कुठे पळून गेला! आपल्या लाडक्या सह्याद्रीची आपल्याच माणसांनी केलेली दुरवस्था चेहऱ्यावर हलकं स्मित ठेवत महाराज शांतपणे पाहत होते! महाराजांसमोर नतमस्तक होऊन तडक मंदिराचा ऐसपैस मंडप गाठला. सामान तिथे उतरवून निश्वास सोडला! आलो एकदाचे भैरवगडावर! जयराम, त्याची पत्नी आणि अनुप आधीच तिथे विसावले होते. सहज मंदिरावर नजर टाकली. भैरवगडाचे भैरवनाथ मंदिर म्हणजे एक भली मोठी वास्तू! सध्या ती पूर्णपणे सिमेंटने बांधून काढली आहे. मात्र पूर्वी हे मंदिर दगडी होते. अस्सल कोकणातील मंदिरांसारखे कौलारू! त्याचे तसे जुने फोटो “सांगाती”मध्ये पाहिले होते. पण आता नवीन जमाना होता! त्यामुळे मंदिराचा “जीर्णोद्धार” झाला होता! कौलारू मंदिर पाहायला न मिळाल्यामुळे मनाला चुकल्या चुकल्यासारखं वाटून राहिलं!
भैरवगडाचे मंदिर तसे फार प्रशस्त आहे. त्याच्या मंडपात ५०-६० लोकं सहज झोपू शकतील इतका तो मोठा आहे! मंदिरात ५ देवतांच्या मूर्ती आहेत. भैरी देवी, तुळाई देवी आणि वाघजाई देवी यांच्या २-३ फुटी मूर्ती एका देव्हाऱ्यात तर दुसऱ्या देव्हाऱ्यात मंदिराची आणि गडाची मुख्य देवता “भैरोबा” आणि चंडिका देवी (बहुदा). भैरोबाची मूर्ती साधारण ३-४ फुटी असून त्यावरील काम नजरेत भरते! मंदिराच्या मागील बाजूस भक्तांसाठी भलं मोठं स्वयंपाकघर आहे. जत्रेच्या दिवशी इथेच महाप्रसाद वगैरे बनत असणार. अगदी चुली, कळशा, भांड्यापासून ते दगडी पाट्या-वरवंट्या पर्यंत इथे सगळे आहे. आमच्यासारखे ट्रेकर कधी मुक्कामाला आलेच तर इथे असलेली चूल वापरतात. हे सगळे पाहून आम्ही मंदिराच्या सभा मंडपात आलो. तिथे बसून न्याहारी आटोपली. पाणी प्यायलो आणि भैरवगड पाहायला निघालो!
किल्ला तसा छोटेखानीच! जंगली जयगड सारखाच हा सुद्धा मुख्य रांगेपासून विलग पण फक्त एका निमुळत्या पायवाटेने जोडला गेलेला! गडाच्या पश्चिमेस विस्तीर्ण कोकण दिसते. कोकणातून देशावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहतुकीवर आणि सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे या चौकीवजा किल्ल्याचे मुख्य काम असणार. ऐतिहासिक उल्लेख फारसे नाही सापडत! भैरवनाथ मंदिराच्या बाहेर पडल्यावर उजवीकडे आपल्याला दरवाजाची एक मोडकी चौकट दिसते. इथूनच आम्ही गडावर प्रवेश केला. निमुळती पायवाट उतरून समोरचा डोंगर गाठताच समोर उभा ठाकला तो भैरवगडाचा पहिला बुरुज! भैरवनाथाच्या डोंगराकडून आणि कोकणातून येणाऱ्या वाटेकडे लक्ष देऊन उभा असलेला! याच्या बाजूने पुढे गेले की बाजूच्या झाडीत काही अवशेष नजरेस पडले. दरवाज्याचे अवशेष असावेत असा एक अंदाज मनी बांधला. इथून पुढे वाट अचानक उजवीकडे वळली आणि काही वेळेतच गडाचा ढासळलेला महादरवाजा नजरेस पडला. एकेकाळी दिमाखात उभा असलेला आपला वारसा आपणच मातीमोल केल्याची जाणीव नेहमीप्रमाणे झाली! गड माथा तसा फार मोठा नसल्याने गड पाहायला जास्त वेळ लागत नाही. किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यातून पोटभर पाणी पिऊन, बाटल्या भरून आम्ही मोर्चा पुन्हा भैरवनाथाच्या मंदिराकडे वळवला.
एव्हाना लांबोरे दाम्पत्याचा नाश्ता आटोपला होता. गंग्या महाराज कुठेतरी शिकारीवर गेले होते बहुतेक. आम्हाला पाहताच जयरामची कळी खुलली.
“झाला का किल्ला पाहून?”, त्याने विचारले.
“हो”
“मग आता कसं करणार?”
“ आता पाथरपुंज मधल्या एका गाईडना फोन करून सांगणार आहोत की आम्ही येतोय म्हणून!” , अनुप उत्तरला. अनुपने पाथरपुंज मधील पांडुरंग चाळके यांचा नंबर शोधून ठेवला होता. त्यांना फक्त आम्ही यायची आगाऊ वर्दी देऊन आम्ही इथून निघणार होतो. भैरवनाथाच्या मंदिराबाहेर काही अंतरावर फोनला रेंज येत होती. अनुपने तिथे जाऊन पांडुरंग चाळकेंना फोन लावला. मी सभा मंडपात बसलो अन अनुपचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. फोनवरील संभाषण जसं पुढे जाऊ लागलं तशी अनुपची देहबोली बदलू लागली. जेव्हा तो फोन संपवून परत आला तेव्हा त्याचा चेहरा पाहताच मनात शंकेची पाल चुकचुकली.
“काय झालं रे?”
“ वाघ्या! प्रॉब्लेम झालाय! मी फोन लावला तर पांडुरंग चाळकेंच्या बायकोने उचलला. ती म्हणाली ते शहरात गेलेत. २-३ दिवस तरी काही यायचे नाहीत परत!”
“मग आता?”, मी बावचळून विचारले.
“आता बहुतेक पाथरपुंजलाच जाऊन बघावं लागेल तिथे कोणी वाटाड्या मिळतो का ते!”
“आणि नाही मिळाला तर?”
“नाही मिळाला तर मग आपणच प्रचितगड करायचा प्रयत्न करू. किवा मग पाथरपुंजहूनच कोकणात उतरून घरी जायचं!”
म्हणजे प्रचितगड होणार नाही? आमच्या ट्रेकचं मुख्य आकर्षण हे प्रचितगड होतं. त्याचं मनमोहक रूप अनेक फोटोमधून पाहिलं होतं. त्याच्या त्या रांगड्या रुपड्यानं भलतीच मोहिनी घातली होती. पण प्रचितगडला वाटाड्याशिवाय जाणे? ते सुद्धा या निबिड जंगलातून? रस्ता चुकण्याची शक्यता खूप जास्त. त्यात अस्वल-बिबट्यांचा स्वैर संचार. पट्टेरी वाघोबा आडवा आला तर बघायलाच नको! इतकी जोखीम पत्करणे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती! मन खट्टू झालं. आमचे चेहरे उतरले.
जयराम लांबोरे हे सगळे तिथेच उभे राहून पाहत होता. त्याच्या लक्षात आले काहीतरी गडबड आहे. त्याने झटकन पुढे होऊन विचारलं, “काय झालं दादा?”
त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितल्यावर तो म्हणाला, “ काळजी करू नका. पाथरपुंज गावात बापूराव चाळके राहतात. त्यांना माझं नाव सांगा! ते करतील काहीतरी व्यवस्था!”
हे ऐकून हायसं वाटलं. प्रचितगड पाहण्याची अशा पुन्हा पल्लवित झाली! स्थानिक वाटाड्या घेतल्याचा हा आणखी एक फायदा!
एव्हाना सकाळचे ११:३० वाजले होते. पाथरपुंजला जायची घाई नव्हती. भैरवनाथ मंदिरात थोडी निद्रोपासना करण्याचे ठरले. दुपारी १-२ च्या सुमारास इथून निघून पाथरपुंज गाठायचे, बापूराव चाळकेंना भेटून पुढील व्यवस्था करून मग पुढील सकाळी प्रचितगड (आणि जमलं तर कंधार डोह धबधबा) करायचा असा बेत ठरला.
जयरामचा निरोप घेण्याची वेळ येऊन ठेपली होती. अंधार पडायच्या आत दोघांना घरी पोहोचायचे होते. सोबत रक्षणकर्ता गंग्या होताच दिमतीला! जयरामचे आभार मानीत, गंग्याचे लाड करीत त्या दाम्पत्याचा आम्ही निरोप घेतला. मंदिरात प्रवेश करीत, आतील थंडगार लादीवर शरीर तसच झोकून दिलं अन झोपेच्या अधीन झालो!
आम्ही निर्धास्तपणे झोपलो होतो खरं पण दुपार नंतर पुढील दीड दिवस एक वेगळंच नाट्य उलगडण्याच्या तयारीत होते. चांदोलीचं जंगल आमची वाट पाहत होतं!
(क्रमश:)
भाग ४ इथे वाचा : मु.पो. पाथरपुंज
भाग ५ इथे वाचा : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
छायाचित्र साभार : अनुप बोकील, प्रांजल वाघ
20 comments
Layy bharii !!
Thank you so much Sir !!
Besht!!
Thank you!!
कमाल वर्णन. हेलवाक – जुना वाघेना – भैरवगड – भैरव मंदिरात मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी कोकणात उतरलो होतो. माझा पुन्हा प्रवास घडला. आमच्या ट्रेक मधले प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले.
जंगली जयगड, प्रचीतगड अजून तरी करता आलेले नाहीत. तुमच्या वर्णनातून घडतील आता.
सुंदर लेखन. प्रत्यक्षदर्शी. स्वतःचा अनुभव त्यामुळे त्यात वेगळीच मजा येतेय वाचताना.
मनःपूर्वक आभार!! कोयना-चांदोलीचा परिसर कमाल आहे!! तिथे कितीही वेळा गेलो तरी कमी पडेल! मला जर परवानगी मिळू शकली आता तर हातातली कामं टाकून जाईन तिथ! तुम्हाला मी तो अनुभव देऊ शकलो यातच मी भरून पावलो!!
मस्त लिहिलंय! मी या किल्ल्यावर दि. २९/०१/१९९२ रोजी गेले होते. आम्ही गुणवंतगड-दातेगड-जंगली जयगड- भैरवगड- प्रचितगड- महिमंतगड असा ८ दिवसांचा ट्रेक केला होता. त्यावेळी भैरवनाथाचे कौलारू देऊळ होतं. आम्ही त्या देवळात रात्र मुक्काम केला होता आणि तिथली भांडी जेवण करायला वापरली होती. तुझं वर्णन वाचून तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या.
तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही १९९२ मध्ये हा ट्रेक केला. तेव्हा इथल जंगल अधिक निबिड आणि अधिक दाट असणार यात तिळमात्र शंका नाही! त्यात तुम्ही भैरवगडाचे जुने देऊळ नुसतेच याची देही याची डोळा न पाहता तिथे प्रत्यक्ष मुक्काम केलात याला दुग्धशर्करा योगच म्हणायला हवे! आम्ही तुमच्मया नंतर तब्चेबल २० वर्षांनी इथे भटकंती केल्यामुळे काहीतरी बघणे राहून गेले असणार हे नक्की! थोडी का होईना खंत वाटते! ? कमेंटसाठी खूप खूप आभार!!
मी दि. २५/०१/१९९२ ते ०२/०२/१९९२ दरम्यान गुणवंतगड-दातेगड-जंगली जयगड -भैरवगड – प्रचितगड – महिमंतगड असा ८ दिवसांचा ट्रेक केला होता. त्यावेळी भैरवनाथाचे देऊळ कौलारूच होतं आणि तिथे रात्री मुक्काम केला होता. तिथली भांडी जेवण करायला वापरली होती. तेव्हाच्या आठवणी जाग्या झाल्या. तू केलेलं वर्णन मस्तच! पुन:प्रत्ययाचा आनंद देणारं!
तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही १९९२ मध्ये हा ट्रेक केला. तेव्हा इथल जंगल अधिक निबिड आणि अधिक दाट असणार यात तिळमात्र शंका नाही! त्यात तुम्ही भैरवगडाचे जुने देऊळ नुसतेच याची देही याची डोळा न पाहता तिथे प्रत्यक्ष मुक्काम केलात याला दुग्धशर्करा योगच म्हणायला हवे! आम्ही तुमच्मया नंतर तब्चेबल २० वर्षांनी इथे भटकंती केल्यामुळे काहीतरी बघणे राहून गेले असणार हे नक्की! थोडी का होईना खंत वाटते! 😀 कमेंटसाठी खूप खूप आभार!!
अतिशय मनमोहक आणि जिवंत वर्णन! प्रांजल इतक्या वर्षानंतर देखील कोणतेही दुवे न निखळता अतिशय उत्तम आणि परिपूर्ण झालाय ब्लॉग! सरतेशेवटी इथे परवानगी नाही (आता)हे ठळकपणे टाकून दे नाहीतर वन खात्याच्या पाहुणचार कोणाला तरी करावा लागेल!
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरणारे कसलेले गिर्यारोहक जेव्हा आपल्या लिखाणाच कौतुक करतात तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते! तुमचे खूप खूप धन्यवाद!! आणि हो सरतेशेवटी परवानगीबद्दल नक्कीच टाकेन!! 😀
मस्त प्रांजल, हा भागही आवडला. पुन्हा मागे नेलंस. अतिशय रम्य अशा आठवणीत. ते घनदाट जंगल, मध्येच लागलेलं एक नदीचे द्विभुज पात्र, काही वळणदार चढाव – उतार आणि हो, ते त्या खतरनाक गव्याचे भीतीदायक मोहक रुप! ही दृश्ये मात्र झर्रर्रकन तरळून गेली. आम्ही मात्र गडावर मुक्काम केलेला. स्थानिकांची अद्भुत होळीही अनुभवली. फोटोंअभावी ते लेखन मात्र अवघड आहे. असो. गवादर्शन मात्र आम्हाला ‘प्रचीत’च्या वाटेवर झालेलं. प्रचीतगड ते चांदोली हा आमचा प्रवास, झालेली अटक आणि सुटका हा एक वेगळा ब्लॉग होईल पण तो ही फोटोंअभावी निर्जीव ठरेल. असो.
छान नि उत्कंठावर्धक लिहितोस. इंग्लिश मिडीयमचा दिसतोयस, त्यातुलनेने मराठी लेखन खूपच ‘भुंगा’! लिहित रहा, आम्ही वाचत राहू! गोड शुभेच्छा! ???
गव्याचा प्रसंग खूपच भारी घडला होता. तसं गवा असो वा कोणता ही प्राणी – सहसा उगीच तुमच्या वाटेला जात नाही. पण प्रत्यक्षात तो समोर आला असताना हे विचार येत नाहीत डोक्यात! त्या भीतीदायक रुपात सुद्धा एक अद्भुत सौंदर्य दडलेले असत!
चांदोली प्रचीतचे अनेक अनुभव यायचे आहेत! लिहितोच लवकर! बाकी या ब्लॉगच्या निमित्ताने मला अनेक ट्रेकर्सचे याचं प्रदेशातील अनेक अनुभव ऐकायला-वाचायला मिळालेत! त्याचा खूप आनंद आहे!
आणि हो इंग्लिश मिडीयमचा असलो तरी मराठी लिहिण्यात जी सहजता आणि जो आनंद मिअसतो तो इंग्रजीमध्ये नाही मिळत! 😀
आपण असेच पाठीशी राहावे हीच शुभेच्छा!!
mast re waghya!! Chaan lihilays! Ani baryach warshanni ka asena, salag blogs yet aahet hi changli gosht ahe. Keep it up! 🙂
मनःपूर्वक आभार सर!! 😀
कोरोना नंतर …
मुंबईतुन बाईकने मित्रांसोबत जंगलीजयगड,भैरवगडला जाण्यासाठी निघालो.
जंगलीजयगड पाहुन हेलवाकला आलो.
मग स्थानिक जीपने भैरवगडला निघालो जंगली जनावरे दिसावे या आशेने जीपच्या कॅरीयर बसून चहुबाजुला पाहु लागलो.
पण प्राणी दर्शन न झाल्याने ..शेवटी भैरवगड पाहिल्याने समाधान झालं.
जंगली प्रवासवर्णन तु खुप छान लिहलं आहेस.
??
नशीबवान आहात जो तुम्हाला भैरवगड कोव्हीद नंतर पुन्हा पाहता आला ! 😀
अतिशय सुंदर वर्णन ?
मनःपूर्वक आभार!!