भाग १ इथे वाचा : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड
भाग २ इथे वाचा : रामघळीचा थरार!
भाग ३ इथे वाचा : भैरोबाच्या मुलुखात
भाग ४ इथे वाचा : मु.पो. पाथरपुंज
भाग ५
“माझी कुत्री जर तिथं आली नसती तर त्या अस्वलाने मला फाडलेच होते! एक महिनाभर कराडला व्हतो दवाखान्यात!”, सह्याद्रीचं एक जुनं खोड, मारुतीदादा चाळके, आपला अनुभव आम्हाला सांगत होते. त्या धुक्याने माखलेल्या दाट अरण्यात सकाळचे ९ वाजले तरी सूर्यकिरणं प्रवेश करायला धजावत नव्हती, मे महिन्याचा पहिला दिवस असला तरी बराच गारवा हवेत होता आणि आम्ही तिघं सोडलो तर मैलोनमैल माणसाची चाहूल नाही. अशा जंगलात मारुतीदादांचा हा अनुभव ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा आला, थंडीत ही घाम फुटला! चालता चालता कंबरेला खोचलेल्या खंजिरावर हात गेला. त्याचं अस्तित्व मनाला थोडंसं आश्वासित करून गेलं. वास्तविक त्याने अस्वलाला फक्त गुदगुल्याच झाल्या असत्या! तरीही!
*****
गुलाबी थंडीत पांघरूण डोक्यावरून घेऊन आम्ही मारुतीदादांच्या अंगणात झोपलो होतो. हळूच पांघरुणातून डोकं बाहेर काढून डोळे किलकिले करून पाहिले तर चक्क उजाडलं होतं! हातावरच्या घड्याळात पाहिलं तर पावणे सात वाजले होते! मारुतीदादांनी आम्हाला ६:३० वाजता तयार राहायला सांगितलं होतं! आधीच वाटाड्या मिळत नसताना ते तयार झाले होते आणि त्यात आम्हीच उशिरा उठलो! बाजूला झोपलेल्या बोक्याला गदागदा हलवून जागे केले. अनुपने त्याच्या फोनचा अलार्म सकाळी वाजल्या-वाजल्या बंद केला होता. त्यामुळे त्याचाही डोळा लागला! जिथे अनुप उठला नाही तिथं माझ्यासारख्या कुंभकर्णाची काय गत?
भराभर अंथरूणं आवरून घेतली. पटकन चूळ भरली, तोंडं धुतली. लागोलाग चूल पेटवून चहाचे आधण ठेवून त्या गुलाबी थंडीत गरमागरम चहा घेतला. चहाचा एक एक घोट घशाखाली उतरू लागला तशी आपोआप तरतरी आली. उगीचच चहाला ‘अमृततुल्य’ म्हणत नसावेत! आम्ही सगळं आटपून तयार होतो न होतो इतक्यात घरातून मारुतीदादा आले. “चलायचं का?”, असं त्यांनी विचारताच आम्ही माना हलवल्या आणि पाठीवर पिशव्या घेऊन निघालो!
गाव केव्हाच जागं झालं होतं. पुरुष मंडळी रानाकडे गुरं घेऊन निघून गेली होती. पोरं शाळेत जायला निघत होती तर बायका त्यांना शाळेत पिटाळत होत्या. धडाडून पेटलेल्या चुलीतला धूर घरातून निघून हवेत रेंगाळत होता. मे महिना असूनही हवेत गारवा होता. आम्ही मात्र इतरांसोबत न जाता वेगळी वाट धरली. सह्याद्रीच्या धारेला समांतर असा आमचा रस्ता होता. उजवीकडे कोकण आणि डावीकडे घाटमाथा अशी आमची ‘धारेवरची’ कसरत सुरु झाली.
निघताना मारुतीदादांनी कंबरेला कोयता लटकवला होता आणि पोटाला शिदोरी बांधली होती. मला पटकन जयराम लांबोरेची आठवण झाली. त्याने पण हेच केले होते. आम्ही मात्र पाथरपुंज गावात परत येणार असल्याने त्यांनी सोबतीला कोणालाच घेतले नव्हते. मात्र जयराम सारखेच ‘काळ्या’ आणि ‘नान्या’ हे आपले दोन कुत्रे सोबत घेतले होते. शिकारी गंग्या जितका उत्साही, मस्तीखोर आणि नवखा तितकेच हे दोघे शांत, संयमी आणि अनुभवी! अवघं आयुष्य मालकासोबत जंगलात भटकल्यामुळे त्यांना इथलं पान अन् पान बरोबर ठाऊक होतं. आपला व आपल्या मालकाचा जीव कसा जपायचा याचे अनेक धडे त्यांनी घेतले होते.
चालता चालता आम्ही मनातल्या मनात आमच्याजवळ असलेल्या खाद्यपदार्थांची एक यादी तयार केली. पिण्याचे जवळ जवळ ५ लिटर पाणी होते. मात्र गेल्या २ दिवसात आमच्याजवळ असलेले खाण्याचे बरेचसे सामान आम्ही संपवले होते. आता उरली होती शिळ्या थेपल्याची फक्त २ पाकिटं, ६ मावा केकचं एक पाकीट, काही लिंबं, भरपूर साखर आणि इलेक्ट्राल! एखादे मॅगीचे पाकीट होते पण चूल पेटवणे आता शक्य नव्हते आणि तसे करणे धोकादायक होते. का? कारण भैरवगड-पाथरपुंज-प्रचितगड या पट्ट्यात गावकरी आणि वनखात्याची माणसं सोडली तर इतरांना प्रवेश निषिद्ध होता. म्हणून इथे चूल पेटवणे धोक्याचे होते. आमच्या अस्तित्वाच्या खुणा आम्हाला मागे सोडायच्या नव्हत्या. समजा वनखात्याच्या नजरेस आम्ही पडलो असतो तर सरळ ५०,००० रुपये दंड आणि ३ वर्षे तुरुंगवास भोगायला लागला असता! दुसरं म्हणजे जंगलात वणवा लागून जैवविविधतेचे नुकसान होण्याची शक्यता आणि तिसरं म्हणजे वेळेची मर्यादा! ती पाळणे आम्हाला अपरिहार्य होते कारण या प्राण्यांच्या जगतातून बाहेर पडून माणसांच्या जगात जाऊन आम्हाला चिपळूणवरून रात्री मुंबईसाठी एसटी पकडायची होती!
एव्हाना पाथरपुंज मागे टाकून आम्ही सपाटीवरून सुसाट सुटलो! सगळ्यात पुढे आमच्यातले सर्वात तरुण असे मारुतीदादा! धुक्यामुळे जंगलाला एक गूढ वातावरण प्राप्त झालं होतं. त्यात सूर्याची उन्हं अजून वाढलेली नव्हती. त्यामुळे आम्ही अत्यंत वेगवान चाल चालत होतो! पाठीवर जास्त ओझं न घेता, खाण्या-पिण्याची तमा न बाळगता, ‘दुष्मनाच्या’ मुलुखात आम्ही गनीम लोकं घुसलो होतो! त्याच्या मुलुखात कुणाच्या नजरेस न पडता आत खोलवर घुसायचे, आपले लक्ष्य गाठायचे आणि तितक्याच वेगात त्याच्या प्रदेशातून सुखरूप बाहेर यायचे! मला तर एकदम मराठ्यांच्या ‘कमांडो रेड्ज’ची आठवण झाली. चिटणीस बखरीतील एक वाक्य आठवले ‘हे आदमी नव्हत, भूतखाना आहेत!’. उगीच आपलं स्वतःच कौतुक केलं! तेवढंच बरं वाटलं!
पण खरंच आम्हा तिघांच्या चालीत एक कमालीची लय होती. कवायती शिपाई नसलो तरी शिस्तबध्द होतो. का कोण जाणे पण तिघांचा ताळमेळ सुरुवातीपासूनच पक्का जुळून आला होता! पुढे मारुतीदादा, मध्ये मी आणि मागे अनुप! (जेणेकरून वाघ आलाच तर मी सगळ्यात सुरक्षित! :D)
इतक्यात मारुतीदादा अचानक थांबले. अगदी काही फुटांवर कडा होता. पलीकडे कोकण! तिथूनच खाली उतरणारी एक वाट दिसत होती.
“इथून मळे घाट सुरु होतो! कोकणात उतरायला चांगली वाट आहे!”, मारुतीदादा म्हणाले.
“कुठल्या गावात उतरतो?”
“नेरदवाडी! तिथनं गाड्या भेटतात संगमेश्वरच्या!”, असं सांगून ते परत चालू लागले. चांदोलीतून कोकणात उतरणारी आणखी एक वाट मिळाली होती. तिची डोक्यात नोंद करून ठेवली आणि पुन्हा निघालो!
काही वेळाने आम्ही दाट जंगलात शिरलो. चांदोलीच्या अरण्यात उंचच-उंच, भले मोठे, प्रचंड वृक्ष आहेतच पण त्यासोबत असलेलं रान इतकं गच्च आहे की प्रकाश इथे नावाला असतो! त्यात धुक्याचं साम्राज्य पसरलेलं, दवबिंदू चक्क आमच्या अंगावर पडत होते! आणि या थंडगार जंगलातून आम्ही मात्र झपाझप पावलं टाकीत होतो. नागमोडी वळणं घेत, पाला-पाचोळा तुडवीत, कधी रस्त्यात आडव्या पडलेल्या मृत झाडांच्या खोडावरून तर कधी एखाद्या झाडाच्या खालून वाकून आम्ही चालता चालता अचानक रान संपलं आणि समोर जे नजरेस पडलं ते पाहताच पावलं जागीच खिळली!
समोर होतं एक अतिशय विस्तीर्ण असं पठार! चाहु बाजूंनी झाडांनी वेढलेले! साधारण २-३ फुटबॉलची मैदानं सामावून घेईल इतकं मोठं! त्याच्यावर धुक्याची दुलई पांघरली होती. आम्हाला जायचे होते तो रस्ता समोर धुक्यात वळणं घेत नाहीसा झाला होता. पण आमच्या डाव्या बाजूस, मैदानाच्या सीमेवरील झाडांचा वेढा भेदून एक भली रुंद अशी वाट खोल कुठेतरी जाता जाता धुक्याशी एकरूप होऊन गेली होती! आणि त्या वाटेच्या तोंडावर उभं होतं एक नर सांबर हरीण! डोक्यावर असलेला शिंगांचा मुकुट मिरवत, मोठ्या ऐटीने मान उंचावून शेजारी असलेल्या झाडाचा पाला चवीने खात होता. पाठीमागे पसरलेल्या धुक्यामुळे त्याला एक दैवी वलय लाभले होते आणि त्याच्या पायाखालून गेलेल्या आणि धुक्यात अदृश्य झालेल्या रस्त्यामुळे त्या दृश्याला एक वेगळीच खोली लाभली होती! आमचे त्या ठिकाणी येणे त्याच्या लक्षात आले नसल्यामुळे तो सकाळची न्याहारी करण्यात व्यग्र होता! त्या दिवशी मी तरी आयुष्यात पहिल्यांदा जंगलात एक सांबर पाहिले होते! ते राजबिंडे रुपडे पाहतच रहावेसे वाटत होते. अनुप तर पट्टीचा फोटोग्राफर! पण आश्चर्य म्हणजे तो ही मंत्रमुग्ध होऊन हे दृश्य पाहत होता! या दृश्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करावे असे माझ्या मनात आले खरे पण तितक्यात कुठेतरी ‘खुट्ट’ असा आवाज झाला. त्या बरोबर सांबराने आमच्या रोखाने पाहिले आणि काय होतंय हे कळायच्या आत, पुढच्या क्षणाला धूम ठोकत, उड्या मारीत जंगलातील धुक्यात ते नाहीसं झालं!
रामघळीच्या जंगलात जसा गव्याचा फोटो नव्हता मिळाला तशीच गत इथे झाली! एका क्षणाचा हा खेळ! फोटो जरी नसला मिळाला तरी त्या रुबाबदार सांबराचं ते दैवी अस्तित्व आज ही मनाच्या पटलावर स्पष्टपणे कोरलेलं आहे! अकरा वर्षानंतरही तो क्षण डोक्यात तितकाच ताजा आहे, आज ही ती धुक्यातील सकाळ तितकीच स्वच्छ आठवते! आणि जर कधी या डोक्यातून सह्याद्रीच्या अशा आठवणी पुसल्या गेल्याच, तर त्या जगण्याला थोडीच अर्थ उरणार आहे?
ते सांबर जसे जंगलात निघून गेले तसे आम्ही सुद्धा आमच्या वाटेने चालायला लागलो. उन्हाळा असून थंडी होती त्यामुळे थकवा वगैरे अजिबात जाणवत नव्हता! चालता चालता सहज कॅमेरा काढला, हातात घेतला आणि त्याच्या स्क्रीनकडे पाहायला मान खाली झुकवली तर टोपीमधून पाण्याची एक धार कॅमेऱ्यावर पडली! एक क्षण चमकलो! पाऊस? पण पावसाचे थेंब इतर कुठेच पडत नव्हते! दवबिंदू? शक्यच नाही! हा माझ्या टोपीत साठलेला घाम होता! पटकन लक्षात आलं! इतकी थंडी असल्यामुळे शरीरात निर्माण होणारी उर्जा, उष्णता आणि त्यामुळे आलेला घाम जाणवत नव्हता. शर्टला हात लावला तर तो चिंब भिजला होता! शरीरातलं इतकं पाणी कमी झाल्याचं आम्हाला थंडीमुळे कळलंच नाही! शरीराचे ‘निर्जळीकरण’ अशा वातावरणात अगदी नकळत होते. म्हणून मग भरपूर पाणी पिऊन घेतलं!
यावेळी जेव्हा जंगल संपून पठारावर आलो तेव्हा मात्र धुकं पांगलं होतं. लख्खं ऊन पठाराच्या लाल मातीला न्हाऊ घालत होतं! त्यामुळे माती अधिकच आरक्त झाली होती! काही पाऊले पुढे जाताच मारुतीदादा पुन्हा थांबले. जमिनीकडे बोट दाखवत म्हणाले, “अस्वल गेलंय नुकतंच हिथून!”
जमिनीकडे पाहिले तर अस्वलाच्या पावलांचे ताजे, ठसठशीत ठसे मातीवर उमटले होते! काही मिनिटांसाठी आमची आणि अस्वलाची चुकामुक झाली होती. पण यात दुःखी होण्यासारखं काहीच नव्हतं! कारण जंगलात एखादा गवा किंवा सांबर भेटणं आणि अस्वल भेटणं यात जमीन अस्मानाचा फरक असतो! गवा आणि सांबराच्या भेटीनंतर त्याचे किस्से सांगायला तुम्ही सुखरूप घरी परत आलेले असता. पण एखाद्या अस्वलाशी चुकून जर आमने-सामने भेट झालीच तर तुम्ही स्वतःच एक ‘किस्सा’ बनून जाता!
सहज म्हणून मारुतीदादांना विचारलं, “दादा, तुम्ही कधी जंगलात पाहिलंय का अस्वल?”
तो प्रश्न विचारताच मारुतीदादांच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलत गेले. जणू भूतकाळाची एक सफर ते करून आले. शेवटी हसत म्हणाले, “हो मग!”
“काय झालं तेव्हा?”, लहान मुलांसारखे आम्ही कुतूहलाने विचारले.
“झाली खूप वर्षं!”, मारुतीदादा आपल्या अनुभवांचं गाठोडं उलगडू लागले. “रोजच्या सारखा निघालो सकाळी रानात जायला. सरपण आणि मध गोळा करायचा व्हता! सोबत कुत्री व्हतीच आमची. त्यांच्या बिगर तर आम्ही एकटे कधीच रानात जात न्हाई! सरपण गोळा करून मध काढाया निघालो. डोंगरातील एका कपारीत व्हती मधाची पोळी. चढायला सुरुवात केली तर अचानक समोरून एक अस्वल उतरत येत हुतं! वर जायला आणि खाली उतरायला एकच वाट हुती! आम्ही दोघंबी एकमेकांना बघून थांबलो. लगेच ते अस्वल दोन पायांवर उभं राहिलं! ती अस्वलाची मादी हुती! जवळच पिल्लं असतील! म्हणून मला पाहून ती चिडली. एक आरोळी ठोकून मला पंजा मारायला पुढे येऊ लागली. माझ्याकडे कुऱ्हाड हुतीच. आज हिचं डोस्कच फोडतो नाहीतर मी काय घरी जित्ता जाणार न्हाई असं म्हणून कुऱ्हाड डोक्यावर उचलली. सगळी पावर लावून तिच्या टाळक्यात घालणार इतक्यात कुऱ्हाड वरच्या फांद्यात अडकली आणि हातातून सुटली! आता माझ्याकडे काहीच हत्यार नव्हतं! काही विचार केला नाही. जे होईल ते होईल म्हणत सरळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली! मिठी मारल्याबरोब्बर ती तोंडाने चावा घ्यायचा प्रयत्न करू लागली, हाताना मला फाडायचा प्रयत्न करू लागली. पण तिला ते काही जमंना! त्या झटापटीत दोघांचा तोल गेला आणि दोघंबी कोलांट्या खात खाली आलो. त्यात तिनं तिच्या पायानं माझ्या मांड्या फाडून टाकल्या. खाली येईपातुर मिठी सुटली. जमिनीवर पडल्यावर लगेच ती मला चावायला धावत आली! मला तर वाटलं आज काय खरं न्हाई बाबा आपलं. तिनं माझ्यावर झेप घातली अन मला चावणार इतक्यात हा सगळा आवाज ऐकून आमची कुत्री भुंकत आली! डायरेक तिच्यावर झेप घेऊन चावायला लागताच ती रानात पळून गेली! मी तिथंच रक्ताच्या थारोळ्यात पडून हुतो! इतक्यात काही गावातली माणसं धावत आली! मला कराडला नेलं! तिथं दीड महिना दवाखान्यात हुतो! बरा झालो! मग आलो गावात!”
आम्ही दोघे चाट पडलेलो. तोंडातून एक शब्द फुटेना!!
“माझी ही दोघी कुत्री नसती तर मी तिथंच मेलो असतो!”, जवळच बसलेल्या नान्याच्या कानामागे खाजवत मारुतीदादा कृतज्ञता पूर्वक म्हणाले. नान्याचे डोळे पण “तुमच्यासाठी कायपण मालक” असं बोलून गेले!
हा किस्सा ऐकल्यावर मारुतीदादांबाद्दलचा आमचा आदर शतपटीने वाढला. आपल्यासोबत असलेला वाटाड्या भलताच कसलेला आणि अनुभवी आहे असं समजल्यावर खूप आधार वाटतो! कधी बाका प्रसंग ओढवला तर आपल्याला त्यातून सुखरूप बाहेर काढतील याची खात्री होते! त्यांनी अनुभवलेलं जंगल ऐकायला मिळणं ही वेगळीच मेजवानी!
सहज म्हणून चालता चालता मारुतीदादांना विचारलं, “दादा. तुमचं वय किती असेल हो?”
“अ…. तसं नक्की सांगता येत नाही…पण साठ एक असेल!”
साठ! साठाव्या वर्षी माणसाने इतकं काटक आणि तरुण असावं? शहरातली साठीतली वाकलेली माणसं आणि डोंगरातील साठीतील निरोगी माणसं यांच्यातला फरक पाहून थक्क झालो!!
चालता चालता आम्ही अगदी कड्यापाशी आलो. इथे चक्क कोकणातून पांढऱ्या शुभ्र ढगांचे लोट घाटावर चालून येत होते. सह्याद्रीच्या माथ्याला बेभानपाने आदळत पठारावर येऊन शांत होत होते! इथं मारुतीदादा थांबले. वळून आम्हाला म्हणाले, “आता हितनं पुढं गेल्यावर एक ओढा लागल. तिथं फारिष्टने क्यामेरे लावलेत! सांभाळून जावं लागल. मी पुढं जातो. बघून येतो. तुम्ही थांबा!”
तसे आम्ही थांबलो. मारुतीदादा धुक्यात नाहीसे झाले. आम्ही जरा फोटो काढत तिथे वेळ काढला. १० मिनिटं झाले तरी मारुतीदादा येईनात. आम्ही जरा काळजीत पडलो. अनुप म्हणाला, “गेले कुठे रे? चल आपण जाऊन बघूया!”
तसं थोडंसं पुढे गेलो. एक सुकलेला प्रचंड ओढा आडवा आला. अचानक वाऱ्याची झुळूक आली अन धुकं बाजूला हटले. डावीकडे सहज पहिले तर रानाच्या कडेला केशरी शर्ट घातलेली मारुतीदादांची आकृती जागेला खिळल्यासारखी उभी होती. “काय झालं असेल?” असा सवाल आम्ही नजरेनेच एकेमेकांना केला आणि पुढे झालो. मारुतीदादांच्या जवळ जाताच रहस्यभेद झाला आणि आमच्या पोटात खड्डा पडला! वनखात्याने ओढ्यावर येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या ‘ट्रॅप’ कॅमेऱ्यासमोर मारुतीदादाच नव्हे तर आता आम्ही तिघंही उभे होतो! वनखात्याच्या या ‘ट्रॅपमध्ये’ सावज अलगद गावलं होतं!
एक क्षण मन सुन्न झालं! अचानक नजरेसमोर ५०,००० रुपयांचा दंड आणि डोळ्यासमोर तुरुंगाचे गज दिसायला लागले! या ही पेक्षा अधिक भीती आपल्या घरच्यांना हे कळल्यावर ते आपलं काय करतील याची होती!
“दादा, आता काय करायचं?”, आता आम्हाला हे भीमरूपी मारुतीरायच यातून बाहेर काढणार होते!
“फारिष्टची माणसं बघतील अन गावाजवळच्या चौकीला कळवतील. मग तिथनं गार्ड लोकं निघतील आपल्याला पकडायला. आता काही न्हाई करायचं. सरळ प्रचीतगडावर जायचं. मग बघू!”, असे आश्वासक उत्तर दादांनी देताच आम्ही तिघंही तिथून तडक निघालो. पुढील प्रवास काहीच न बोलता झाला. चालता चालता अचानक समोर एक दगडांनी भरलेलं मैदान लागलं. गोल गोल दगड साऱ्या मैदानभर विखुरले होते. जणू देवांनी सारीपाट खेळताना या सोंगट्या उधळल्या होत्या! याला ‘सडा’ म्हणतात! लाखो वर्षांपूर्वी जेव्हा इथे ज्वालामुखी होते तेव्हा फुटलेल्या ज्वालामुखीतून हे दगड निर्माण झाले!
या सड्यावरील दगडांतून वाट काढीत आम्ही पुन्हा जंगलात शिरलो. फार काळ वाट बघावी लागली नाही आणि अगदी काही मिनिटातच जंगलातून बाहेर पडलो. समोर एक वाट खाली उतरत होती. आणि त्या खोल खोल जाणाऱ्या वाटेच्या शेवटी उभा होता दगडाची भक्कम तटबंदी ल्यालेला एक बुलंद डोंगर!
प्रचितगड!!
समुद्राच्या पाण्यातून पृष्ठभागावर येणारी पाणबुडी कधी पहिली आहे का तुम्ही? प्रचितगड अगदी तसाच भासत होता! त्याच्या मागे खाली दिसत होते ते कोकण! कोकणातले वातावरण भुरकट होते. त्यामुळे इथून श्रुंगारपूर स्पष्ट दिसत नव्हते. प्रचितगडाच्या मागे होता तिवरे घाट. मळे आणि तिवरे या दोन घाटवाटांवर लक्ष ठेऊन भैरवगड आणि जंगली जयगडसारखाच हा गड देखील अखंड पहारा देत उभा होता! सह्याद्रीची अख्खी रांग अशाच किल्ल्यांनी सुरक्षित केलेली आहे! राज्ये समृद्ध करायची असतील तर घाटांचे अर्थकारण असेच सुरक्षित करावे लागते!
अधिक वेळ न दवडता आम्ही तिथेच आमच्या पाठपिशव्या उतरवल्या. झाडीत सुरक्षित ठेवल्या आणि उतरायला सुरुवात केली. इथला उतार उघडा-बोडका असल्याने ऊन चांगलेच लागायला लागले होते. प्रचितगड आणि चांदोलीमधील खिंडीत पोहोचून आम्ही गडाला वळसा घातला आणि निश्वास सोडला. आता आम्ही अधिकृत रित्या चांदोलीच्या अभयारण्यातून बाहेर पडून प्रचीतगडावर आलो होतो! सांगली जिल्ह्यातून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात आलो होतो. त्यामुळे आता वनखात्याच्या अखत्यारीबाहेर आम्ही आलो! काही काळापुरते का होईना आम्ही सुरक्षित झालो!
इथून प्रचितगडाच्या सावलीतून चालत गेल्यावर लागते ते प्रचितगडाचे उध्वस्त महाद्वार. आम्ही गेलो तेव्हा इथली शिडी गंजलेली होती, त्यातील बऱ्याच पायऱ्या तुटल्या होत्या आणि पाऊल ठेवताच ती डगमगू लागे! डावीकडे गडाच्या कड्याचा आधार घेत उजवीकडच्या खोल दरीकडे लक्ष न देता, बेभान वाऱ्याची तमा न बाळगता कशी बशी आम्ही ती शिडी पार करून प्रचितगडाच्या आत प्रवेश करते झालो. हा किल्ला १४०४ मध्ये बांधला गेल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी सुर्व्यांकडून हा किल्ला जिंकून घेतला असे म्हणतात. सुभेदार तानाजी मालुसऱ्यांनी १००० मावळ्यांना सोबत घेऊन १६६० मध्ये हा गड स्वराज्यात आणला. पुढे १८१८ पर्यंत हा किल्ला स्वराज्यातच होता. इंग्रजांनी ताब्यात घेतल्यानंतर मात्र किल्ला दुर्लक्षिला गेला. बहुदा त्यांनी नेहमीप्रमाणेच किल्ल्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त करून गड निकामी केला.
गडमाथा तसा बोडकाच आहे! गडावर आम्हाला पुढे गेल्यावर एकच वृक्ष मिळाला. गडावर भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराबाहेरच दोन तोफा रचून ठेवल्या आहेत. कंबरे इतकी उंचीची भिंत आणि त्याला वर पत्र्याचे छप्पर असे या मंदिराचे रूप आहे. भवानी मातेच्या मूर्ती समोर मोकळी जागा आहे. मंदिराच्या भिंतीवर सुद्धा दोन छोट्या तोफा ठेवल्या आहेत. मंदिराच्या आवारात आणखी काही देवीच्या मूर्ती आढळतात! जर आम्ही दुसऱ्याच दिवशी मोठी मजल मारली असती तर प्रचितगडावर मुक्काम करता आला असता. पण इथे हे एक मंदिर सोडले तर दुसरा कोणताच निवारा नाही. गडावर पाणी मुबलक आहे पण उघड्यावर मुक्काम असल्यामुळे श्वापदांची भीती! आणि इथे जर मुक्काम केलाच असता तर पाथरपुंज गावातील ती रात्र कशी अनुभवता आली असती?
इथून पुढे आम्ही निघालो गडावरील पाण्याच्या शोधात. हे पाण्याचं टाकं कुठे आहे? तर एका भल्यामोठ्या राजवाड्याच्या खाली कोरलेली आणि आतूनच जोडलेली ही खांब टाकी आहेत! या टाक्यावरूनच किल्ल्याचे प्राचीनत्व लक्षात येते! राजवाड्याची भग्न वास्तू आणि मातीखाली लपलेली जोती त्याची भव्यता सहज सांगून जाते. याचे जर उत्खनन झाले तर एक सुंदर वास्तू पुन्हा मोकळा श्वास घेईल! पाण्याच्या टाक्यात मग मी उतरलो. मागून येणाऱ्या सूर्याचे किरण थेट पाण्याच्या टाक्यात पडत होते. पाणी इतके साफ होते की आम्हाला थेट टाक्याचा तळ दिसत होता! ते निळेशार, स्वच्छ, गोड आणि थंडगार पाणी बाटलीत भरून घेतले. पोट फुटेस्तोवर ते अमृत प्यायलो आणि गडफेरी पूर्ण करायला निघालो!
महाराष्ट्रात आणि खासकरून सह्याद्रीच्या माथ्यावर किल्ले असे आहेत की ज्यांना नैसर्गिक आणि भौगोलिक संरक्षण लाभल्यामुळे त्यांची तटबंदी सलग नाही आहे. प्रचितगड मात्र याला अपवाद आहे. चारही बाजूंनी सरळसोट कडे असूनसुद्धा या किल्ल्याची तटबंदी बऱ्याच ठिकाणी सलग आहे!
किल्ला फिरून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. भग्न प्रवेशद्वार उतरून, गडाला वळसा घालून चढाई केली आणि पुन्हा चांदोलीत दाखल झालो! आता वेळ होती न्याहारी करण्याची. आमच्याजवळ असलेले शिळे ठेपले आम्ही दोघांत वाटले. मारुतीदादांनी घरून ताज्या नाचणीच्या भल्यामोठ्या दोन भाकऱ्या आणि पालेभाजी आणलेली. त्यातली एक त्यांनी आम्हाला दिली. आम्ही त्यांना आमचे ठेपले दिले. काही काळ शांततेत गेल्यावर ते बोलू लागले, “पोराहो! फारिष्टची माणसं आता गस्त घालीत असतील. त्यामुळं कंधार डोह नाही बघता यायचा! तिथं गेलो तर आपण सापडू त्यांना!”
“मग आता?”, इतक्या दूरवर येऊन कंधार डोहाच्या दर्शनाला आपण मुकणार हे ऐकताच तोंडातल्या शिळ्या ठेपल्याची उरली सुरली चव नाहीशी झाली. पण मारुतीदादांचे अगदी बरोबर होते. तिथे जाणे धोक्याचे ठरले असते. आमच्यावर तर कारवाई झालीच असती पण मारुतीदादांवर पण कठोर कारवाई झाली असती. त्यांचा देखील विचार आम्ही करायला हवा होता!
“आता काय न्हाई करायचं. आलो त्या वाटेनं न थांबता पळायचं! मी सांगेन तिथं रस्ता सोडायचा अन माझ्या मागं यायचं!”
आम्ही माना डोलवत न्याहारी आटपली, सोबत आणलेले ३ मावा केक तिघांनी फस्त केले, सामान आवरले आणि आल्या पावली परत फिरलो. आता सुरु झाला एक खेळ. वनखात्याची माणसे आणि आमच्यात पकडा-पकडीचा आणि लपंडावाचा खेळ!! आम्ही निघालो तेव्हा साधारण ११ वाजले होते. आलो त्याच्याहून अधिक वेगाने आम्ही चालायला सुरुवात केली. सुमारे अर्धा तास चालल्यावर दादा थांबले. आमच्याकडे पाहत म्हणाले, “आता हितनं फक्त माझ्या मागं यायचं. मी नेईन तसं जायचं. मी सांगेपर्यंत अजिबात बोलायचं न्हाई! अजिबात प्रश्न विचारायचे न्हाईत. फारिष्टवाल्यांनी ऐकलं तर आपण समदेच सापडू! आहे कबूल?” आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता! मान हलवून आम्ही संमती दर्शवली आणि मारुतीदादा शेजारच्या रानात घुसले!
इथून पुढचा अर्धा तास आम्ही अक्षरशः दादांची सावली बनून त्यांच्या मागून चालत होतो. तोंडातून एक शब्द न काढता एखाद्या आज्ञाधारक शिष्याप्रमाणे आम्ही त्यांच्या मागे मागे जात होतो. चांदोलीचं जंगल तसंही भयानक दाट आणि अंध:कारमय! त्यात आम्ही मुख्य पायवाट सोडून आत घुसलेलो. अक्षरशः ते जसे वळत होते तसे आम्ही वळत होतो. ते झाडाखालून वाकून गेले की आम्ही देखील वाकून जात होतो. आकाश दिसत नसल्यामुळे आणि अत्यल्प सूर्यप्रकाश आतपर्यंत येत असल्यामुळे दिशेचा अंदाज बांधायचे केव्हाच सोडून दिले होते. त्यांचे अंधानुकरण करत करत आम्ही जंगलातली वाट तुडवीत होतो. हे सगळे करताना पावलांचा आवाज होऊ नये याची देखील काळजी घेत होतो. चांदोलीच्या त्या जंगलात दादा वाट चुकले असते किवा आम्हाला तिथेच सोडून निघून गेले असते तर मी हे आज लिहायला जिवंत नसतो. तिथेच कुठेतरी चांदोलीच्या जंगलात माझी आत्मा भटकत राहिली असती!
आम्ही या ‘अंधारवनातल्या’ प्रवासात एकही फोटो काढला नाही! आमच्याकडे जीपीएस असते तर कदाचित आम्ही घेतलेला रस्ता कळू शकला असता. तिथे पुन्हा गेलो तर त्याचा वापर करता आला असता. पण दादांना या तंत्रज्ञानाच्या कुबड्यांची मुळात गरजच नव्हती! अख्खा जन्म जंगलात गेलेल्या या माणसाला इथलं पान अन पान ठाऊक होतं. रात्रीच्या अंधारात जरी त्यांना आमच्यासोबत इथे सोडले असते तरी त्यांनी आम्हाला सुखरूप बाहेर काढले असते! आणि खरं सांगू? आम्ही त्यांच्यासोबत चांदोलीत रात्रीत जायला एका पायावर तयार झालो असतो!
काही वेळाने जंगल विरळ होऊ लागलं अन आम्हाला चक्क समोरचा रस्ता दिसायला लागला. सावधपणे अंदाज घेत दादांनी आम्हाला मुख्य रस्त्यावर आणले. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला! जीव भांड्यात पडला! चालत चालत काही अंतर पुढे गेल्यावर दादांनी आम्हाला रस्त्यावर उमटलेले बुटांचे ठसे दाखवले! ते वनखात्याच्या गार्डसचे होते आणि प्रचितगडाच्या दिशेने ते गेले होते! आम्ही थोडक्यात बचावलो होतो! मारुतीदादांनी खरोखर भीमरूपी मारुतीरायासारखे आम्हाला संकटातून सुखरूप बाहेर काढले होते!
इतका थरारक अनुभव घेतल्यावर आता पुढील प्रवास अगदीच सामान्य वाटू लागला! बराच वेळ चालल्यावर आम्ही मळे घाटाच्या तोंडाजवळ आलो. इथे आल्यावर मारुतीदादा म्हणाले, “आता तुम्ही गावात येऊ नका. इथून मी एकटाच जातो! तिथं फारिष्टची माणसं आली तर लई लफडी होतील! तुम्ही असं करा, इथून उतरा खाली नेरदवाडीत. घाटात मध्ये पाण्याचं टाकं आहे. खाली नेरदवाडीत येष्टी मिळते!”
निरोप घ्यायची वेळ आली होती! बापूराव उर्फ मारुती चाळके यांचे आभार कसे मानावे तेच कळेना! ठरलेल मानधन दिले अन जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला. काही काळ त्यांच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे आम्ही पाहत राहिलो. जसे ते आणि ‘काळ्या-नान्या’ झाडीत अदृश्य झाले तसे आम्ही भानावर आलो. सूर्य आता चांगलंच तापला होता! सुमारे दीड वाजला होता. इथून पुढे फक्त उतार असला तरी मध्ये फारशी झाडं नसल्यामुळे सावलीचा प्रश्नच नव्हता! मग आम्ही एक काम केले. तिथेच एका निवडुंगाच्या खाली मी बैठक मारली. अनुपच्या जवळ असलेली लिंबं घेतली, साखर आणि इलेक्ट्राल आणि एक लिटरच्या बाटलीत ती सगळी एकत्र केली आणि एक जालीम एनर्जी ड्रिंक तयार केलं. त्याचा एक घोट घेताच ‘किक’ बसली! आता हे सरबत आणि जवळ असलेले ३ केक यांच्या जोरावर आम्हाला हा घाट उतरून नेरदवाडी गाठायची होती!
मळे घाट उतरताना आमच्या असे लक्षात आले की हा घाट बांधून काढलेला आहे. फारसा वापरात नसल्यामुळे इथे जमिनीवर साधारण इंचभर पाचोळा जमलेला होता. त्यामुळे आम्ही सावधपणे पाऊले टाकीत चाललो होतो. उतरताना मध्येच प्रचितगडाचे अन त्याच्या पुढे असलेल्या वानरटोक सुळक्याचे दर्शन होई. काही काळ चालून आम्ही एका भल्या मोठ्या वृक्षाजवळ आलो. तिथे पाण्याचे टाके होते. थोडी विश्रांती घेऊन, पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. आता ऊन चांगलेच लागायला लागले होते. लिंबू सरबत आम्ही अगदी मोजून मापून पीत होतो!
मजल दरमजल करीत आम्ही कोकणात उतरलो. मागे अनेक दुर्गांनी आणि घाटवाटांनी नटलेली अखंड अशी सह्याद्रीची भिंत उभी होती आणि समोर होतं कोकणातलं एक टुमदार गाव – नेरदवाडी! चालत चालत आम्ही गावात पोहोचलो! गावात प्रवेश केला खरा पण कुणीच नजरेस पडेना! दुपारच्या ३:३० वाजताच्या गर्मीत कोण कशाला बाहेर पडेल? शेवटी एका घरातून एक काका बाहेर आले. त्यांनी आम्हाला पाहताच आम्ही विचारले, “काका नायरीला जाणारी एसटी किती वाजता आहे?”
“एसटी? इथं एसटी नाय!”
“मग नायरीला कसे जायचे? काही वाहन मिळेल का?”
“नाय! एसटी सकाळच्याला असते! इथून ४ किलोमीटर निवळीपर्यंत चालत जावं लागेल तुम्हाला! तिथनं मिळल गाडी!”
हे ऐकून मात्र आता आमचा धीर सुटायची वेळ आली. दिवसभर जंगलातले, सपाटीवरचे चालणे झाल्यावर आता तापलेल्या डांबरी रस्त्यावरून, दुपारच्या उन्हात चालत जाणे अगदी जीवावर आले! पण आमच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता! गपगुमान उठलो अन दोघेही निवळीच्या दिशेने चालायला लागलो. पुढचे ४ किलोमीटर ही खरोखर आमच्या सहनशक्तीची कसोटी होती. आमची ती गोगलगाईसारखी चाल पाहून मागेच उभे असलेले भैरवगड आणि प्रचितगड आम्हाला हसत असतील! शेवटच्या टप्प्यात तर आम्ही इतके थकून गेलो होतो बसायला सावली नाही मिळाली म्हणून रस्त्याच्या कडेला उन्हातच बसकण मारली. सोबत असलेले केक संपवले आणि तापलेले लिंबू सरबत कसे बसे घशाखाली ढकलले. इतक्यात एक आजोबा रस्त्याने चालत आले. आम्हाला पाहताच म्हणाले, “का रं पोरांनो! इथं उन्हात का बसलात?”
“जरा दोन मिनिटं बसलो पाणी प्यायला.निवळीला निघालोय!”
“आरं, मग तिथं बसा की!”, असं म्हणत त्यांनी बोट दाखवले. अगदी २० पावलांवर चक्क एक डेरेदार आंब्याचा वृक्ष होता आणि त्याच्याखाली मोठी सावली पडली होती! आम्ही इतके थकलो होतो की इतक्या जवळ असलेले झाड देखील आम्ही पाहिले नव्हते! स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहत आम्ही उठलो. पायाचे तुकडे पडायची जेव्हा वेळ आली तेव्हा कुठे निवळी गाव आले. तिथे नायरीला जाणारा रिक्षावाला लगेच भेटला. पण त्याला २ मिनिटे थांबून जवळच असलेल्या किराणामालाच्या दुकानातून थंडगार मँगोला आधी ढोसला! ते अमृत पोटात जाताच तरतरी आली! मग रिक्षात बसलो आणि इथून पुढे मानवी जगतात प्रवेश करीत संगमेश्वर पर्यंतचा आमचा प्रवास सुरु झाला!रिक्षातून जाताना मागे प्रचितगड उभा होता. अनुप सहज बोलून गेला, “वाघ्या, आज आपण साधारण ३५ किलोमीटर चाललोय!”
खरंच! सकाळी पाथरपुंजला सुरु केलेले चालणे इथे कोकणात उतरल्यावरच थांबले होते! झालेच असतील ३५ किमी!! मला आमचाच भयानक अभिमान वाटला!
पुढे नायरी-संगमेश्वर करीत चिपळूणला पोहोचलो. तिथे प्रिय मित्र राहुल ओक भेटला. आम्हाला गाडीत जबरदस्तीने कोंबून घरी घेऊन गेला. आंघोळ करून ताजेतवाने झाल्यावर मोठ्या प्रेमाने आग्रह करित मस्त मासे खायला घातले आणि मुंबईच्या बसमध्ये बसवून दिले!
आज या ट्रेकला ११ वर्षे होऊन गेली. त्यानंतर पुन्हा कोयना-चांदोलीत जाणे झाले नाही. आज जयराम लांबोरेशी संपर्क नाही. त्याचा शिकारी गंग्या आज हयात असेल की नाही काहीच कल्पना नाही! आणि चांदोलीचे मारुतीदादा? ते तर २०१२ मध्येच साठीचे होते. ते आज असतील का? आणि असले तरी त्यांना आम्ही आठवू का? मी ऐकलेलं आम्हाला मळे घाटात सोडल्यावर गावात वनखात्याची माणसं आली होती आणि त्यांची कसून चौकशी झाली होती. कधी कधी वाटतं की असंच उठावं, पाठीला पिशवी मारावी आणि निघावं पुन्हा कोयनेच्या जंगलात भटकायला, समर्थांच्या रामघळीत रात्र काढायला, जयरामसोबत जंगली गवे बघायला आणि मारुतीदादांसोबत चांदोलीच्या अरण्यात बेभान होऊन फिरायला! पण दुर्दैवाने आता कोयना-चांदोलीत सरकारदरबारी नियमांचे तट-बुरुज उभारलेत. ते पार करून जाणे शक्य नाही. ते पार करून आम्हाला नेतील अशी जुनी माणसं आता शिल्लक नाहीत!
पण एक मात्र खरं, आज जरी प्रत्यक्ष तिथे जाता आले नाही तरी जेव्हा-केव्हा शहरी जीवनाच्या जीवघेण्या, निरर्थक शर्यतीचा कंटाळा येतो तेव्हा मी मनाच्या कोपऱ्यात दडवलेली एक कुपी उघडतो आणि पुन्हा कोयना-चांदोली फिरून येतो! पुन्हा जयरामला भेटतो, पुन्हा रामघळीत समर्थांचा नामजप ऐकतो, गंग्याचे लाड करतो, प्रचितगडच्या उतारावर मारुतीदादांसोबत भाकर खातो आणि पाथरपुंजच्या त्या अंगणात पाठीवर पडून फाटक्या छतामधून माझ्या वाटेला आलेल्या त्या आकाशाच्या तुकड्यातील तारे बघत समाधी अवस्थेत जातो!
(समाप्त)
–प्रांजल वाघ
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
छायाचित्र साभार : अनुप बोकील, प्रांजल वाघ
कोयना चांदोलीची आणखी काही छायाचित्रे!
30 comments
Aflatoon series!
All of this was possible just because you gave me a call that day in 2012! 😀 Thank you!
मारुती दादाच …अस्वल झटापट प्रसंग भयानक होता.
प्रांजल तु ५ वा भाग जबरदस्त लिहलं आहे.
आणि फ़ोटोही👌👌.
मनःपूर्वक आभार!! 😀
अस्वलाचा प्रसंग माझ्यावर गुदरला असता तर इतके प्रसंगावधान राखता आले असते की नाही कुणास ठाऊक! त्यासाठी जंगलातील माणसच लागतात!
कळस!!!
खरंच कळस आहे हा भाग या पूर्ण कोयना चांदोली ब्लॉगचा. जुनी माणसं वाटाड्या म्हणून भेटली की मेजवानीच असते. हल्लीची नवीन तरुण लोकं नुसते नोटा बघतात. जंगल किती अनुभवलंय त्या मारुती दादांनी हे बदललेली वाट, आणि नंतर फॉरेस्ट वाल्यांचे बुटांचे ठसे हे बघून कळतंय. चांदोली कोयनेत कधी प्रवेश मिळेल माहीत नाही पण तुमच्या या ब्लॉगमुळे शेकोटीभोवती बसून 4 किस्से नक्कीच झाडता येतील, एवढं नक्की…
मनःपूर्वक आभार! मारुती चाळके हा इसम नसता तर आम्ही आज कुठे असतो कुणास ठाऊक! फोरेस्टवाल्यांनी आतच टाकलं असत आम्हाला! खरंच आता अशी माणसं मिळण महाकठीण! तरीही चांदोलीत पुन्हा जायचंय एकदा!
भन्नाट आहेत सगळे भाग👌🏼
धन्यवाद साहेब! अशीच कृपा दृष्टी राहू द्या! 😀
Khup mastaaa!!!
आभारी आहे!! असेच वाचत रहा!! 😀
प्रांजल काय भारी शिदोरी हाय ही! आज जाणे शक्य नसलेल्या जंगलात भटकून फार आनंद वाटला!
खूप छान! लिहित रहा!
नशीब बल्वत्तर म्हणून ही शिदोरी लाभली! पुन्हा जायची तीव्र इच्छा होतेय! 😀
अफलातून .. अप्रतिम .. 👌👌👌 Best series ever ❤
खूप खूप धन्यवाद !!
वाघोबा, भन्नाट लिव्हलंयस! अस्सल, साजेसा आणि भरजरी शेवट!! तु कादंबरीकार नक्की होशील, नव्हे, व्हावंस! ‘इवल्या’चं ‘एवढं’ करायला छान जमतंय. मनस्वी शुभेच्छा! शेवटी, हे सारं जंगल कसं अगदी मनानं जगलो, कारण काहीसं असंच, अन याहून बरचसं अधिक म्हणजे आणखी कोअर जंगल, त्यातली ती अद्भुत मचाण, तीवरील तो मुक्काम, ते तावडीत सापडणं आणि ती सुटका’ हा भयानक, अजूनही जिता जागता अन् अविस्मरणीय असा अनुभव आहे ना!
लिहित रहा, बच्चमजी!!!
तुमचे अनुभव आणखीनच भन्नाट आहेत! त्यावर एक ब्लॉग येऊ द्या लवकर! 😀
प्रवास वर्णन वाचायला नेहमीच आवडतात, त्यातून जर तर निसर्गवेड्या लेखकांनी लिहिली असतील तर दुधात साखरच असते. असो तर एकूण 11 वर्षा पूर्वीचे अनुभव जिवंत शब्दात मांडले आहेत त्यामुळे नुकताच तुम्ही तिथे जाऊन आला आहे असे वाटले आणि मनाने का होईना पण मला पण तुम्ही सफर घडवलीत.
या रोमांचकारी जंगल तोड कथा आमच्या सोबत शेअर केली यासाठी हार्दिक धन्यवाद.
मनपूर्वक आभार सर!! तुमच्यासारख्या वाचकांचं प्रेम लाभलं की मग आम्हाला सुद्धा लिहायला उत्साह येतो! 😀
Jabardast… … Shalet ki college la astana “aswasth dashkachi dayari” vachali hoti…. Jabardast first class… Pustak liha… Vlog asta tr 10-12 million views asey zale aste.
Go. ni. Cha Maharashtra desha chi athavan zali 👍🙏 keep it up
Thank you so much for the lovely compliment!! 😀 Vlog करायला नक्को आवडला असता पण त्या काळची विझुअल्स नव्हते! तुम्हाला आवडला आणि थेट गोनीदांच्या लिखाणाची आठवण झाली यातच मला १२ मिलीयनचे समाधान मिळाले! जमल्यास शेअर जरूर करा!!
I have no words. Nice experience.really very interesting. Start to end. Maruti dada character khup bhaval. Tyana parat kadhi bhetala ki nahi? Mala pan aashi Bhatakanti karayala khup aavadate. Majhe gav pan chandoli javal aahe.
मनःपूर्वक आभार!! दुर्दैवाने पाथरपुंजला पुन्हा जाण्याचा योग आला नाही. आता तिथे परवानगी शिवाय जाता येत नाही. त्यामुळे मारुतीदादांना पुन्हा भेटणे झाले नाही! तुम्ही चांदोली जवळ राहता म्हणजे खरोखर भाग्यवान आहात!!
खूपच छान लिहिले आहे दादा….खरंच आपण फिरत असल्याचा भास होतो…..रत्नागिरी का असताना प्रचीतगड ला जाण्याचे योजले पण शल्याऊ नाही झाले…पण तुमच्या लेखणीने परत ती सल कुठेतरी आणखी जागी झाली ….आणि हो मारुती दादा ,जयराम दादा हे म्हणजे खरेच बहिर्जीचे शिलेदार जणू……..Hats off….
तुम्ही दिलेली उपमा अगदी योग्य आहे! मारुतीदादा असोत वा जयराम लांबोरे – दोघेही खरोखर बहिर्जींचे शिलेदार! देव करो अन तुमचे प्रचितगडला जाने लवकरच होवो! मनःपूर्वक आभार!!
अफलातून झालाय…
मनःपूर्वक आभार!!
2019 च्या दिवाळीत नरकचतुर्दशीला प्रचितगड ला गेलो होतो, त्यावेळी रत्नागिरी जवळ समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे आम्हाला पावसाचा त्रास झाला होता, सर्व जंगल पावसाने ओलावले होते, त्यामुळे तयारी करून ही जळवांचा प्रसाद भरपूर मिळाला , वाड्या समोरील उंबराच्या झाडाखाली टेंट टाकून मस्त मुक्काम केला,
रात्री पाऊस ही झाला पण टेंट मुळे निभावले, दुसऱ्या दिवशी भैरीभवानीचे दर्शन घेऊन आम्ही सडा पार करून जून्या रुंदिव गावी गेलो, गाव पुनर्वसन केल्याने आता तिथं फक्त जून्या रुंदिव गावच्या खाना खुना शिल्लक राहिल्या आहेत, ते पाहून शेजारची वारणा नदी जवळ केली आणि कड्यावरून कोसळणारा कंधारडोह याची देही याची डोळा पाहिला,
आज हा ब्लॉग वाचून मला मी केलेल्या मळे-प्रचित-कंधार-मळे ट्रेक च्या आठवणी ताज्या झाल्या
अप्रतिम लिहला आहे ब्लॉग
🌟🌟🌟🌟🌟५/५
खुल्या दिलानं इतकी प्रशंसा केल्याबद्दल खूप खूप आभार!! अनुभव आहे तुमचा! कंधारडोह पाहिलात म्हणजे नशीबवानच तुम्ही! तो मात्र पहायचा राहून गेलाय! बघू या जन्मी शक्य होतंय का! 😀
2012….11 yrs …. असं वाटलच नाही का ब्लॉग वाचत आहे म्हणून…..तुमच्याबरोबर प्रत्येक पाऊलवाट चालत होतो…..रमघळीत राहिलो…..मारुती दादांचं अस्वलाची मुठभेड डोळ्यासमोर उभी राहिली
अप्रतिम लिखाण… मला नक्की आवडेल ..एखादी अनवट वाटे सोबत ओळख करायला
नमस्कार!
तुमची प्रशंसा वाचून कृतकृत्य झालो! तो अनुभव, ते दिवस जादुई होते! पुन्हा पुन्हा जावसं वाटतंय आता!!
कधी गेलोच तर जाऊ एकत्र वाटा धुंडाळायला! 😀