भाग १ इथे वाचा : कुंभार्ली घाटाचा पहारेकरी : जंगली जयगड
भाग २ इथे वाचा : रामघळीचा थरार!
भाग ३ इथे वाचा : भैरोबाच्या मुलुखात
भाग ४
“२००० रुपये देत असाल तरंच येणार!”
२००० रुपये? प्रचितगड आणि कंधार डोहला जायला? पाथरपुंज गावातून? हे जरा जास्तच होते!
रघुनाथ कदम नामक इसम आपल्या घराच्या आतल्या खोलीत जमिनीवर लोळत पडला होता. आम्ही त्याच्या घराच्या दरवाजाबाहेर उभे होतो. दरवाजाच्या आत त्यांचा गोठा होता आणि त्या नंतर पुढे घर. रघुनात कदम हे पाथरपुंजच्या बापूराव चाळकेंचे जावई. चाळकेंनीच आम्हाला यांच्याकडे पाठवले होते. “आमचे जावई तुम्हाला नेऊन आणतील किल्ल्यावर!”, असं मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं होतं!
कदमांच्या दारावर येऊन आम्ही हाक मारली, “ रघुनाथ कदम आहेत का?”
“व्हंय! मीच! काय हवंय?”, जमिनीवर लोळत पडलेला माणूस त्रासिकपणे उद्गारला.
“प्रचितगड आणि कंधार डोहला जाऊन यायचंय! तुम्ही न्याल का?”, आम्ही विचारलं.
आमच्याकडे धड न पाहता, पडल्या-पडल्या हवेत एक हात उंचावला, बोटांनीच २ हा आकडा दाखवीत म्हणाला, “ २००० रुपते देत असाल तरंच येणार!”
“२०००? २००० खूप जास्त होतायत हो! जरा कमी करा ना!”, आम्ही विनवले. २०१२ साली २००० रुपये आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती!
“ नाय! नाय! नसतील द्यायचे तर निघा मग!”
निघा?!
ही कोणती बोलण्याची पद्धत?
माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण ओठांवर आलेल्या राखीव शिव्यांची लाखोली कशी बशी आत दाबून टाकली. गावात येऊन भांडणं करणे आमच्या पचनी पडणारं नव्हतं. पण सह्याद्रीत पहिल्या प्रथमच अशी वागणूक मिळत होती! मन खट्टू झालं पण यांच्याशी हुज्जत घालण्यात अर्थ नव्हता. आधीच पांडुरंग चाळकेंनी नकार दिला होता. त्यात आता कदम साहेबांची भर! आता तिसरा वाटाड्या शोधणे आले! आणि जर तो नाही मिळाला तर आमचा पुढचा अख्खा ट्रेक रद्द करावा लागणार होता!!
*****
भैरवनाथाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात एक मस्त झोप काढून आम्ही उठलो. दुपारचे साधारण १:३० वाजले होते. सामान तसंही तयारच होतं. पायात बूट घातले, पाठीवर पिशव्या मारल्या आणि आमची पाऊले मंदिरासमोरून जंगलात अदृश्य होणाऱ्या लालभडक कच्च्या सडकेवर पडायला लागली! हा खरं तर गाडी रस्ता आहे. थेट पाटणवरुन भैरवनाथ मंदिरात भक्त गाड्यांनी येतात. त्यांच्यासाठी आहे ही सडक. याच रस्त्यावरील दीड तासाच्या दमदार चालीनंतर लागतं ते आमचं आजचं लक्ष्य – पाथरपुंज गाव! प्रचितगड किल्ल्यावर जर देशावरून पोहोचायचं असेल तर पाथरपुंज गाव हे “बेस व्हिलेज” आहे. इथे पोहोचून आम्हाला बापूराव चाळकेंना शोधायचे होते. ते आम्हाला मदत करतील असं जयरामने सांगितले होते.
भैरवगड ते पाथरपुंजपर्यंत जाणारी वाट अत्यंत रमणीय आहे. दुतर्फा दाट झाडी आणि सपाट चाल, नागमोडी वळणं घेत गेलेला रस्ता आणि दूर दूर पर्यंत माणसांचा नामोनिशाण नाही! एका ट्रेकरला आणखी काय हवं? त्यात आमची चाहूल लागताच झाडीतून ३-४ रानकोंबड्या सैरावैरा पळत सुटत! आजूबाजूच्या झाडीमधून मध्येच एखाद्या वानराचा “हू s s प” ऐकू येई! कुठे साप दिसतो का, कुठे बिबट्याचे दर्शन होते का याचा अंदाज घेत आम्ही चालत होतो. पण आम्हाला हे ही ठाऊक होते – तुमच्या दोन डोळ्यांनी जंगलात तुम्ही काही पाहण्या अगोदरच जंगलातील हजार डोळ्यांनी तुम्हाला पाहिलेलं असतं! त्यामुळे माणसांची चाहूल किवा त्यांचा वास लागताच जंगली श्वापदं रानात निघून गेलेली असतात!
तितक्यात आकाशात एक चित्कार घुमला. आवाजाच्या रोखाने वर पाहिले तर एक भला मोठा गरुड आकाशात घिरट्या घालीत होता. त्याचे ते बलशाली पंख पसरून आकाशात विहार करण्यात एक वेगळाच राजेशाही भाव होता, एक वेगळेच स्वातंत्र्य होते! त्या क्षणी तो त्या आकाशाचा राजा होता! त्याने एरोनॉटिक्सच्या पुस्तकातील किचकट समीकरणांची पारायणं केली नव्हती तरीही ती सारी विद्या त्याच्या डीएनएमध्ये हजारो वर्षांपासून भिनली होती! इतक्या उंचावरून जमिनीवरील एखाद्या उंदराची हालचाल देखील तो सहज टिपू शकत होता. उडता उडता बदलणाऱ्या हवेच्या रोखाप्रमाणे त्याच्या पंखांच्या पिसांच्या सूक्ष्म हालचालींनी तो त्याच्या उड्डाणाचे संतुलन राखीत होता. जणू हवेत तो अगदी सहज तरंगत होता. आयुष्यात तरी आपण वेगळं काय करायचं असतं? लक्ष्याकडे झेप घेतल्यावर आपल्या पंखांच्या हालचालीने बदललेली परिस्थिती आणि परिस्थितीनुसार बदललेली माणसं यांच्यावर मात करीत आपले उड्डाण अविरत ठेवायचे असते! स्वतःला “बुद्धिमान” म्हणवणाऱ्या मानवाने या प्राण्यांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे!
याचं ओघात चालत चालत आम्ही काही अंतर पुढे आलो आणि अचानक बाजूच्या रानातून दरड कोसळावी असा मोठा आवाज झाला. पाहतो तर काय आमच्या उजव्या बाजूच्या झाडीतून, अवघ्या दहा फुटांवरून गव्यांचा एक कळप आम्हाला पाहताच उधळला होता! लगबगीने ती प्रचंड धूडं रान तुडवीत आत नाहीशी झाली! या वेळी त्यांच्यावर धावून जायला गंग्या जरी नसला तरी गंग्याचे मित्र येतायत म्हंटल्यावर त्यांनी पोबारा केला होता. एकूण समस्त गवा जगतात गंग्याची भलतीच दहशत पसरली होती वाटतं – असा एक मिश्कील विचार मनाला चाटून गेला!
असाच पुढील काही वेळ पक्ष्यांचे बोल ऐकत, सूर्याची आग सोसत आणि पावलागणिक लाल मातीचे ‘धुरळे’ उडवीत त्या वाटेवर चालत राहिलो. साधारण तास दीड तासानंतर अचानक रान संपलं. पुढे एक पठार लागलं, पायाखालच्या कच्च्या रस्त्याने एकदम डावीकडे वळण घेत आमचा निरोप घेतला आणि काही अंतरावर नजरेसमोर उभं ठाकलं ते दाटीवाटीनं एकमेकांना बिलगून उभ्या असलेल्या पाचपन्नास टुमदार घरट्यांचं, जंगलातलं एक गाव!
पाथरपुंज!
चालता चालता आम्ही कोयनेचं अभयारण्य ओलांडून चांदोलीच्या राखीव जंगलात प्रवेश केला होता आणि स्वागताला समोर उभं ठाकलं होतं हे छोटंसं गाव! २०१२ साली चांदोलीचे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर’ झोन मध्ये मोडायचे आणि भैरवगडचा किल्ला आणि परिसर ‘बफर’ झोनमध्ये. दुर्गशास्त्राच्या भाषेत बोलायचं झाल्यास आम्ही किल्ल्याची बाहेरील तटबंदी ओलांडून बालेकिल्ल्यात प्रवेश केला होता. आज २०२३ साली भैरवगडदेखील ‘कोअर’ झोनमध्ये मोडतो आणि तिथे परवानगीशिवाय जाणे निषिद्ध आहे.
पाथरपुंज गावात प्रवेश करताच आम्ही एका घराजवळ गेलो आणि ओसरीवर बसलेल्या एका आजोबांना विचारते झालो, “आजोबा, बापूराव चाळकेंचं घर कोणतं?”
“बापूराव?”, आजोबांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. एक क्षण विचारमग्न झाले. आम्हाला वाटले की आपण पत्ता चुकलो. आपला प्रचितगड होणार की नाही याची शंका आली. पण तितक्यात आजोबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. हसत म्हणाले, “हा म्हणजे मारुती चाळके! हितं जवळच राहत्यात!”
अंगणात मित्रांसोबत खेळत असलेल्या आपल्या नातवाला त्यांनी एक हाळी घातली, “ ए किसन्या!! ह्यास्नी मारुती आजोबांच्या घरी घेऊन जा!”
किसन्या खेळाचा डाव तसाच टाकून उठला आणि आमच्यासोबत यायला तयार झाला. आजोबांनी सांगितलेलं काम लगेच करायला तयार होणारी नातवंडे शहरात नसली तरी आजही गावात अस्तित्वात आहेत हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो! दुसरीत शिकत असलेल्या किसन्याने आम्हाला काहीच क्षणात मारुतीरावांच्या घरासमोर आणून सोडले अन तिथून अर्धवट राहिलेला डाव खेळायला मागच्या मागेच पळ काढला!
अंगणात खाटेवर चाळीशीतला वाटणारा एक काटक, सडपातळ तरुण गडी बसलेला होता. त्यालाच आम्ही विचारले, “दादा, मारुती चाळके आहेत का घरात?”
“ हा बोला! मीच मारुती चाळके!”, ती व्यक्ती उत्तरली.
तरीही आमचा विश्वास बसे ना. ‘मारुती आजोबा’ आणि इतके तरुण? संकोचाने आम्ही पुन्हा विचारले, “ बापूराव चाळके तुम्हीच?”
“हो मीच! बोला काय काम आहे?”
आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहत राहिलो! हा तरणाबांड दिसणारा गडी आजोबा! पण जास्त विचार न करता आमचं काम सांगितलं, “जयराम लांबोरेंनी पाठवलंय तुमच्याकडे. आम्हाला प्रचितगड आणि कंधार डोह पहायचा आहे. ते म्हणाले तुम्ही मदत कराल!”
“ हा मग! आमचे जावई आहेत ना! ते नेऊन आणतील तुम्हाला गडावर! आता ते बाहेर गेलेत. संध्याकाळी येतील. तो पर्यंत तुम्ही इथेच थांबा. इथेच अंगणात रात्री राहिलात तरी चालेल! हवं तर जाऊन गावातल्या विहिरीवर अंघोळ करून या!”
आंघोळ! भर दुपारच्या उन्हातून चालत आलेलो आम्ही, घामाच्या धारांनी भिजलेलो, २ दिवस अंगाला पाण्याचा थेंब नव्हता लागलेला! विहिरीवर जाऊन थंड गार पाण्याने अंघोळ करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच आमचा थकवा गायब झाला. तिथेच अंगणात एका बाजूला पाठपिशव्या उतरवल्या आणि निघालो आंघोळीला!
दाढीची खुंटं वाढलेली, मळके कपडे, पायात जाडजूड बूट आणि अंगावर लाल धुळीचा वर्ख लावलेली ही दोन सोंगं गावातील गल्ली-बोळांतून चालत विहिरीकडे निघाली तशी गावातली बच्चे कंपनी घाबरून पळू लागली! दारा आड लपून हळूच पाहू लागली! “मस्ती करणाऱ्या मुलांना पळवून नेणारी एक टोळी येते गावात असं आज्जी म्हणते ती टोळी खरोखर आली की काय?”, असे भाव त्यांच्या कावऱ्याबावऱ्या डोळ्यातून प्रकट झाले! तरी नशीब आमच्या मागे कोणी “ वेडा! वेडा!” म्हणून दगड घेऊन लागले नाही! आम्ही लगबगीने विहिरीवर आलो. थंडगार पाण्याने मनसोक्त अंघोळ केली! सारा थकवा नाहीसा झाला! इतक्यात समोर लक्ष गेले. एक लहानसा ओढा संथपणे वाहत होता. निर्मळ, नितळ आणि स्वच्छ पाणी! हा कोणता ओढा? आणि मग लक्षात आलं! ही तर वारणा नदी! इथेच काही मीटर अंतरावर जंगलात तिचा उगम होतो आणि सुमारे १६० किलोमीटर प्रवास करून ती कृष्णेस मिळते! कृष्णेला भेटण्या अगोदर वारणा नदीचे पात्र काही ठिकाणी ७० मीटर इतके रुंद होते! इतकी मोठी होणारी नदी पण तिचा उगम बघा किती छोटा! यशस्वी व्यक्तींचं पण असंच असतं ना? स्वकर्तृत्वावर भरारी मारून विलक्षण उंची गाठलेल्या माणसांचे उगम असेच छोटे असतात! लांबचा पल्ला गाठायचा असेल तर पहिले पाऊल टाकणे सगळ्यात महत्वाचे!
स्नान आटपून आमचा मोर्चा परत चाळकेंच्या घराकडे वळला. मारुतीरावांचे घर भलतेच छान होते. समोर मस्त मोकळे शेणाने सारवलेलं अंगण. उजवीकडेच म्हशींचा गोठा. अंगणात बसायला खाट आणि समोर घर. संपूर्ण अंगणाला छपराने झाकले होते त्यामुळे उन्हं बिलकुल लागत नव्हती! तिथेच आम्ही बसलो अन चहा बनवला. मारुतीदादा पण होतेच. नको नको म्हणत असताना त्यांच्या हातात एक पेला कोंबलाच! मग मस्त गप्पांचा फड रंगला.
“कुठून आलात तुम्ही?”, त्यांनी पहिला सवाल केला.
“आम्ही मुंबईहून आलो. काल जंगली जयगड पाहिला , रामघळीत रात्री मुक्काम केला, आज सकाळी भैरवगड पाहून इथे आलो चालत!”
“काय? चालत आलात?”, त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपले नाही.
“हो! तासाभरात आलो! काय झालं?”
“तो रस्ता बंद आहे! माणसांना परवानगी नाही त्या रस्त्याने यायला! गाड्या चालतात पण माणसं नाही येऊ शकत! फारिष्टवाल्यांनी धरलं तर ५०००० फाईन मारत्यात! जेल पण हुते! इथं गावाबाहेरच चौकी आहे फारिष्टची!”
आम्ही ‘आ’ वासून बघत राहिलो! ही माहिती नवीनच होती. म्हणजे आम्ही गावात शिरताना जो रस्ता डावीकडे वळतो तिथेच काही अंतरावर एक चौकी होती! थोडक्यात वाचलो होतो!
“पण तो रस्ता बंद का आहे?”
“कारण तिथं वाघ फिरतो!”, दादा सांगून मोकळे झाले!
“बिबट्या?”, मी विचारलं.
“न्हाई! पट्टेरी!”, दादा सहजपणे बोलून गले!
नुसत्या कल्पनेनेच आम्हाला दरदरून घाम फुटला! समजा आज दुपारी पाथरपुंजला येत असताना एखाद्या वाघाने सहज म्हणून त्या रस्त्यावर दुपारी फेरफटका मारला असता अन् त्याला आम्ही दिसलो असतो तर कदाचित आम्ही मारुतीदादांच्या अंगणात चहा पीत बसलो नसतो! मी आणि अनुपने फक्त एकमेकांकडे पाहिलं. काही बोलायची गरजच उरलेली नव्हती!
बहुतेक मारुतीदादांना आमची मनस्थिती कळली असावी. त्यांनी लगेच विषय बदलला, “चला आपण आमच्या जावईबापूंना भेटून येऊ. तुम्ही बोला त्यांच्याशी!” असं म्हणून ते उठले. आम्ही त्यांच्या पाठोपाठ निघालो. काही वेळातच त्यांचे जावई रघुनाथ कदम यांच्या घरासमोर आम्ही आलो. आम्हाला तिथं सोडून मारुतीदादा परत निघून गेले. सासरेबुवा इतके चांगले पण जावई कमालीचा उर्मट निघाला! वाटाड्या म्हणून सोबत येण्याचे २००० रुपये मागू लागला. कमी करायला देखील तयार होई ना. राग आला खरं पण नाईलाजाने मागं फिरलो. प्रचितगड ट्रेकला लागलेलं ग्रहण काही सुटायचं नाव घेत नव्हतं!
मारुतीदादांच्या घरी पोहोचलो तेव्हा आमचे चेहरे उतरलेले होते.
“झालं का बोलणं?”, आम्हाला पाहताच मारुतीदादांनी विचारलं
“ झालं पण ते यायला तयार नाहीत. खूप जास्त पैसे सांगतायत!”, अनुप उत्तरला.
“नीट बोलले सुद्धा नाहीत. पैसे कमी करायला पण तयार नाहीत!”, माझ्या सुरातून नाराजी प्रकट झालीच.
मारुतीदादांच्या चेहऱ्यावर अनेक भाव तरळून गेले. काय बोलायचं सुचेना! अवघड जागेचं दुखणं! जावयाला कसं बोलणार? काही क्षण शांततेत गेले.
“जाऊ द्या! बघू आपण काय करता येईल ते! मी बघतो आणखी कोण तयार असेल तर!”, असं म्हणून ते गावात निघून गेले.
आम्ही मात्र चिंतातूर होऊन बसून राहिलो. जर कोणीच तयार नाही झालं तर आमच्यापुढे दोन मार्ग होते – एक म्हणजे इथून खाली कोकणात उतरून मुंबई गाठायची, प्रचितगड मग जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा करायचा! दुसरा मार्ग म्हणजे आपणच जंगलात घुसायचं आणि प्रचितगड कंधार डोह पाहून मग शृंगारपुरास उतरायचे! दुसरा मार्ग अधिक जोखमीचा होता! चांदोलीचे जंगल म्हणजे चक्रव्यूह! आत शिरायचं कसं हे आम्हाला ठाऊक होतं पण बाहेर पडण्याची खात्री नव्हती! जंगली श्वापदांचा धोका तर होताच पण त्याहून मोठा धोका वनखात्याकडून होता! राखीव जंगलात वनखात्याला आम्ही सापडलो असतो तर भुर्दंड आणि तुरुंग – दोन्ही निश्चित होते! काहीच कळत नव्हते! जेव्हा वेळ येईल तेव्हा ठरवू असे म्हणून आम्ही उठलो!
मोकळी हवा खाण्यासाठी जरा गावाबाहेर आलो. जवळच एक उंचवटा होता.गावातली बच्चे कंपनी तिथेच खेळत होती. खेळ काय होता? समोरच्या मैदानात छोटे छोटे दगड पाडले होते. आळीपाळीने दगड उचलायचे अन समोर पडलेल्या दगडांवर निशाणा साधायचा! हे करताना त्या बालमित्रांच्या गमती-जमती, हास्य-विनोद आणि भांडणं सुरूच होती! खेळाची कोणतीही साधनं नसताना मुलांनी उपलब्ध असलेल्या दगडा-धोंड्यातून एक खेळ निर्माण केला होता आणि मनसोक्त आनंद लुटत होते!
एव्हाना सूर्य मावळती कडे झुकू लागला होता. उन्हाळा सुरु आहे हे बहुतेक निसर्ग विसरला आणि मस्त थंडी पडू लागली होती. सूर्य अस्तास जाऊ लागला तसे आकाशात सोनेरी रंग उधळले गेले. आणि आकाशात कृष्णमेघ गोळा होऊ लागले. कोकणातून येणारे काळे ढग सह्याद्रीचा उभा कडा अडवून ठेवत होता. मध्येच जोराचा वारा येई आणि आकाशातले ढग उधळले जात, बुडत्या सूर्याचे दर्शन होई! आमच्या मनात उसळलेला विचारांचा कल्लोळ जणू समोरच्या आकाशात आम्हाला दिसत होता!
इतक्यात अंगावर पावसाचा एक थेंब पडला! एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी चक्क हलका हलका पाऊस पडायला लागला होता! पाऊस पडायला लागताच आम्ही गावाकडे चालायला सुरुवात केली. त्या थंडगार पाण्याचे थेंबांचा स्पर्श होताच थंडीने अंग शहारून उठलं! भर उन्हाळ्यात ट्रेक सुरु केल्याने आम्ही छत्री-रेनकोट काहीच सोबत आणले नव्हते. नशिबाने आम्ही चाळकेंच्या अंगणात पोहोचताच पाऊस थांबला. पण रात्री झोपल्यावर किंवा ट्रेक करताना पाऊस पडला तर आमच्यासकट आमचं सगळं सामान भिजणार होतं! ही मोठी अडचण होती!
पण ती चिंता तात्पुरती बाजूला ठेवून आम्ही चूल मांडून भात लावला. सोबत असलेली इंस्टंट डाळ गरम केली अन चांदोलीच्या जंगलात मस्त डाळ-भात फस्त केला! सर्व आवरून अंथरूण घातलं तरीही मारुती दादांचा पत्ता नव्हता. मग तिथेच अंगणात चकाट्या पिटत बसलो. आम्हाला अंगणातल्या गोठ्यात बांधलेल्या म्हशींचा आयता श्रोतृवर्ग लाभलेला होता. त्याही बंध तोडून पळू शकत नव्हत्या म्हणा! इतक्यात मारुतीदादा आले!
“दादा, कोणी भेटलं का?”, ते येताच आम्ही विचारलं
“न्हाई!”, इतकं बोलून ते घरात गेले
ग्रामस्थांना सरपण गोळा करायला, मध काढायला जंगलात जायला परवानगी होती पण पर्यटक घेऊन जायला नव्हती! त्यामुळे आमच्यासाठी वनखात्याची वाढलेली गस्त आणि कायद्याचा ससेमिरा कोण स्वतःहून ओढवून घेणार? आम्ही थोडे निराश झालो. पण उद्या आपण स्वतःच जायचं असा निश्चय केला. त्याच क्षणाला मारुतीदादा आतून बाहेर आले अन् म्हणाले, “ मी येतो सोबत! सकाळी ६:३० वाजता निघू!”
आमच्या कळ्या लगेच खुलल्या! सरतेशेवटी प्रचितगड आणि कंधार डोह होणार तर! ते पण मारुती चाळकेंसारख्या सह्याद्रीतल्या जुन्या-जाणत्या वाटाड्यासोबत!
लगबगीने आम्ही अंथरुणात शिरलो आणि डोळे मिटून झोपेची प्रतीक्षा करू लागलो. तिने फार काळ ताटकळत ठेवलेच नाही! मध्यरात्री एप्रिल महिना संपून मे महिना सुरु झाला. चक्क मे महिन्यात कडाक्याची थंडी पडली आणि अंगाखाली असलेली सतरंजी आणि पांघरलेली चादर या तिला रोखण्यात असमर्थ ठरल्या. साहजिकच माझी झोपमोड झाली. सहज वर लक्ष गेलं. छतामधील फटीतून दिसणारा आभाळाचा एक तुकडा माझ्या नशिबी आला. ताऱ्यांनी खच्चून भरलेलं मोकळं धाकळं, ढग विरहित आकाश! शहरी माणसांच्या कधीच नशिबी नसणारं! सारं गाव गाढ झोपी गेलं होतं – अगदी शेजारच्या गोठ्यातील म्हशीसुद्धा! मनात आलं की असाच उठावं अन गावाबाहेर एक फेरफटका मारावा, जरा रात्रीचं जंगल आणि आभाळ अनुभवावं! पण अशावेळी भलती साहसं परवडणारी नव्हती आणि एकट्याने बाहेर फिरणे धोकादायक होते!
मग आकाश निरखीत झोपेची वाट पाहू लागलो. तारे बघता बघता झोप कधी लागली कळलंच नाही. बाहेर कडाक्याची थंडी पडलेली, चादरीत कुडकुडणे सुरूच होते पण सकाळी प्रचीतगडाची भेट होणार या विचारानेच आता तिचं काही वाटेनासं झालं होतं!
(क्रमश:)
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
छायाचित्र साभार : अनुप बोकील, प्रांजल वाघ
भाग ५ इथे वाचा : प्रचितगडाची प्रचिती आणि चांदोलीतील पाठलाग!
10 comments
Best!!!!
Thank you!!
😀
अप्रतिम अनुभव व वर्णन .
मनःपूर्वक आभार!!
आधीचे ३ भाग नक्की वाचा!!
आता प्रचितगड आणि कंधारडोह जाण्यास सक्त मनाई आहे तेव्हा पण होती तुम्ही गेलात आणि नसापडता परत आलात खरंच तुम्ही नशीबवान आहात
मनःपूर्वक आभार!! आम्ही तेव्हा कसे गेलो आणि कसे परत आलो, पकडले गेलो का? नक्की काय झालं त्या दिवशी हे पुढच्या भागात कळेलच! लवकरच!
चारही ब्लॉग दणदणीत झालेत. पहिला वाचायला घेतल्यावर दुसरा तिसरा आणि चौथा देखील वाचून संपला. अकरा वर्षांनी देखील प्रत्येक किस्सा भारी मांडलाय. मजा आली वाचताना, पुढचेही भाग येऊ दे लवकरच.
काल whatsappवर म्हटल्याप्रमाणे आभार मानायला माझ्याजवळ शब्दच नाहीत! पुढचा भाग लवकर येतोय!
Khup mast vatal bagun photo aani mahiti
मित्रा!! तुझ्याकडून ही कमेंट आणि तुझ्याशी बोलून फार भारी वाटलं! चांदोलीतला , अगदी पाथरपुंजमधला माणूस भेटला!! लवकरच भेटूया!!