काळ्या आकाशात जरा कुठे उजाडू लागलं होतं. त्या अंधुकश्या प्रकाशात नजरेत सहज भरून येत होतं तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळे त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी एक भीतीयुक्त आदराची भावना निर्माण झाली. कैक सहस्त्र वर्षांपासून तप करीत असलेला जणू एखादा साधुपुरुषच! बेफाट सुटलेल्या वार्यामुळे पावसाचे ढग त्याच्या माथ्यावर आदळत होते, विखुरले जात होते! जणू शेकडो मेघदूत त्या पर्वतऋषींशी संदेशांची देवाणघेवाण करीत असवते! असा हा ब्रह्मगिरी पर्वतऋषी आपल्या माथ्यावर त्र्यंबकगडाचा मुकुट मिरवत, त्र्यंबकेश्वरास आपल्या कुशीचे अभेद्य संरक्षण देत युगानुयुगे अचल उभा आहे!
